krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Nandurki : जलरक्षक नांदुरकी झाड

1 min read

Nandurki : संत तुकाराम महाराज यांच्या देहू गावामध्ये त्यांनी बांधलेल्या विठ्ठल मंदिरासमोर जे महाकाय झाड आहे, त्या झाडाचे नाव नांदुरकी (Nandurki) आहे. येथूनच या झाडाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला पटली. दरवर्षी तुकाराम बिजेला येथे मोठा उत्सव असतो. यावेळी या झाडावर तुकाराम महाराज येतात व ते आल्यावर हे झाड विशिष्ट संकेत देतात, अशी आख्यायिका महाराष्ट्रात प्रचलित आहे. वडाच्या कुळातील हा एक वेगळा वृक्ष आहे. तो वडासारखाच महाकाय वाढतो, त्याला पारंब्या येतात व तो गाढ सावलीही देतो. कायम सदाहरित असल्यामुळे उन्हाळ्यात तो हवेत गारवा निर्माण करतो व तापमान कमी करण्यास मदत करतो. संपूर्ण भारतासाेबतच तो महाराष्ट्रातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो.

नदीकाठावर उभी नांदुरकी,
मूकपणे सांगते निसर्गाची गोष्ट सखी,
मुळांत साठवते पाण्याचे गीत,
पानोपानी वाजते हिरवे संगीत.

📍 इतिहास
अतिशय पुरातन काळापासून हा वृक्ष भारतात पाहायला मिळतो. हा वृक्ष 6- 7 कोटी वर्षांपासून पृथ्वीवर आढळतो. डायनासोर ज्या काळात होते, तेव्हापासून याचा इतिहास सांगितला जातो. उष्ण कटिबद्धीय प्रदेशात याचा विकास झाला व त्यानंतर तो संपूर्ण जगभर पसरला. भारतामध्ये सिंधू संस्कृतीपासून ही झाडे पवित्र मानली गेली आहेत. प्राचीन काळात प्रत्येक गावात ज्या देवराई असत, त्यामध्ये ही झाडे पाहायला मिळत होती. नांदुरकी हे झाड छाया देणारे व संरक्षक मानले गेले, यामुळे याची लागवड गावातील वेशीजवळ, पाणवठ्याजवळ, सार्वजानिक जागी केली जात होती. मंदिरासमोर ही झाडे मोठ्या प्रमाणात लावली जात असत. आधुनिक काळात वाढत्या शहरीकरणामुळे ही झाडे नामशेष होत आहेत.

📍 झाडाची रचना
नांदुरकी हे झाड महाकाय वाढणारे आहे. याच्या मुळ्या खोलवर जमिनीत जातात व काही मुळ्या जमिनीलगत चुंबळ करून राहतात. या झाडाचे खोड उंच सरळ वाढते. खोडाचा रंग पांढरट व करडा असतो. खोड जाड व मजबूत असते. खोडाला समांतर फांद्या फुटतात. या फांद्या झाडाला गोलाकार आकार देतात. यांची वाढ खूप वेगाने होते. या फांद्यांना पारंब्या फुटतात व त्या जमिनीच्या दिशेने वाढतात. या झाडाला खूप दाट पाने असतात. ही पाने लंब गोलाकार आकाराची असतात. नंदुरकीची फुले आपल्याला बाहेरून दिसत नाहीत, ती फळांच्या आतील पोकळीत लपलेली असतात. या झाडांची रचना कुंभाकृती व आकार गोलसर असतो, त्याच्या आतमध्ये शेकडो अतिसूक्ष्म तसेच नर व मादी फुले असतात, वरच्या बाजूला एक लहान छिद्र असते. निसर्गातील विशिष्ट किडीपासून याचे परागीभवन होते. आकार महाकाय व गोलाकृती असल्साने हे झाड दिसण्यास अतिशय सुंदर दिसते.

📍 पर्यावरणीय उपयोग
निसर्गामध्ये या झाडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे झाड सदाहरित व महाकाय असते, यामुळे हवेत गारवा निर्माण करून पाऊस पडण्यासाठी याचा उपयोग होतो. बुलबुल, मैना, पोपट, वटवाघळे, खारी, माकडे, कीटक यांना हे झाड वर्षभर अन्न देते तसेच विविध पक्ष्यांना राहण्यासाठी निवारा देते. अनेक कीटक, मुंग्या यांना राहण्यासाठी अधिवास तयार करते. याची मुळे जमिनीत खोलवर जातात, यामुळे पावसाचे पाणी जमिनीत खोलवर घेऊन जातात तसेच जमिनीतील भूजलाचा साठा वाढवितात व ही मुळे जमिनीत पाणी धरून ठेवतात. मातीची धूप रोखत असल्याने ही झाडे प्रामुख्याने नदी, ओढा व तलावाकाठी अधिक उपयोगी आहेत. याला प्रचंड पाला असतो, तो जमिनीवर पडून जमिनीला सेंद्रिय खत मिळते. हे झाड प्रचंड ऑक्सिजन निर्माण करते तसेच हवेतील कार्बन शोषून घेत असल्यामुळे जागतिक तापमानवाढ कमी होण्यास मदत होते. याची फळे पिकल्यावर अनेक पक्ष्यांना अन्न मिळते, त्यातून याचा बीजप्रसार होतो. यामुळे स्थानिक परिसंस्था अखंड राहते. शहरी भागातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी याचा उपयोग होतो, हवेतील धुळ शोषून घेतात, यामुळे हवा शुद्ध राहते. शेतीमध्ये ही झाडे असल्यास पक्ष्यांनाही आकर्षित करतात, यामुळे पिकांवरील किडी कमी होतात. यामुळे नैसर्गिक शेतीला फायदेशीर आहेत. पुराच्या वेळी नदीकाठ संरक्षित करते तसेच वादळात जमिनीला घट्ट धरून ठेवते. यामुळे ही झाडे पाणी, माती, पक्षी, हवा व जैवविविधतेचे रक्षण करणारे हे झाड आहे.

📍 धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मात या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे. या झाडाला अनेक गावात देवराई परंपरेचा भाग मानले गेले आहे. अनेक मंदिर परिसरात ही झाडे लावण्याची प्रथा आहे. या झाडाच्या मुळात ब्रह्मदेव, खोडात विष्णुदेव, फांद्यात महादेव असतात अशी मान्यता आहे. यामुळे या झाडाची पूजा जीवनचक्राचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्राच्या अनेक भागात पौर्णिमा व अमावस्येला या झाडाला प्रदक्षिणा घातल्या जातात. झाडाखाली दिवा लावणे, नैवद्य दाखविणे, झाडाला धागा बांधणे अशा प्रथा आहेत. नवस पूर्ण झाल्यावर झाडाला पाणी घालणे किंवा नवीन रोप लावण्याची परंपरा आहे. ही झाडे जलदेवता व निसर्गदेवतेचे प्रतीक मानली जातात, पाणी टिकविणारी, गाव जगविणारी अशी श्रद्धा लोकांमध्ये आहे. ध्यान, भजन, कीर्तनासाठी झाडाखाली बसण्याची परंपरा आहे. नांदुरकी तोडणे म्हणजे पाप, अशी अनेक ठिकाणी समजूत आहे. नांदुरकी हे झाड पावित्र्य, संरक्षण,जलसंधारण, जीवनसातत्य यांचे धार्मिक प्रतीक मानले जाते.

📍 साहित्यातील महत्त्व
प्रामुख्याने संत साहित्यात या झाडाचा उल्लेख आढळतो. वारकरी साहित्यात संत तुकाराम महाराज यांच्या विठ्ठल मंदिरासमोर हे झाड असल्याचा उल्लेख केला आहे. लोककथा, भारुडे, ओव्या यामध्ये गावाचे झाड म्हणून उल्लेख येतो. ग्रामीण कथा, कादंबऱ्या, दुष्काळ, स्थलांतर यामध्ये या झाडाचा वापर झालेला आहे. उपनिषदांमध्ये हा वृक्ष ब्रह्मांडाचे प्रतिरूप म्हणून वापरला आहे. याची मुळे, खोड, फांद्या जीवनाचा तात्विक आराखडा आहे असे सांगितले आहे. मौन, ध्यान, आत्मपरीक्षण याचे हे झाड अधिष्ठान आहे. छाया, पानाची सळसळ, पक्षांचा कलरव असे काव्यात वापरले जाते.

फळांत तिच्या दडले बीज,
निर्मितीची पवित्र ज्योत,
गळून पडूनही ते सांगते
अंत म्हणजेच नवा आरंभ होतो.

📍 अर्थकारण
नांदुरकी हे झाड ग्रामीण अर्थव्यस्थेला बळ देऊ शकते. या झाडांची लागवड आजच्या काळात वाढत आहे. विविध सामाजिक संस्था, शाळा, शेतकरी ही झाडे लावत आहेत, यामुळे या झाडाची रोपवाटिका बनऊन रोपे विक्रीतून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती शक्य आहे. हलक्या बांधकामासाठी, पेट्या, अवजारे, हस्तकला यासाठी उपयोग, स्थानिक कलाकारांना यातून रोजगार निर्मिती होते. साल, चिक, पाने यामधून अनेक औषधे निर्माण होतात, यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. या झाडांची लागवड करून मोठ्या प्रमाणावर निसर्ग पर्यटन वाढत आहे, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते, पुढील काळात यासाठी खूप वाव आहे. या प्रकारे ही झाडे अर्थकारणाला गती देण्याचे कार्य करतात.

📍 आयुर्वेदिक उपयोग
नांदुरकी या झाडाचे पाने, साल, फळे, मुळे, चिक ही सर्व औषधी गुणधर्म असलेली आहेत. विविध प्रकारचे त्वचारोग, खाज, खरूज, फंगल इन्फेक्शन यावर सालीची भुकटी करून लेप लावतात. सालीचे चूर्ण करून जखमेवर लावल्यास जखम भरून येते. सूज कमी करणे, दातांचे व हिरड्यांचे आजार यावर उपयुक्त आहे. याचा चिक चामखिळी, त्वचारोग, दातदुखी, व्रणशोधन यावर गुणकारी आहे. पाने सूज, दाह, डोकेदुखी, जखमांवर बांधण्यासाठी उपयोगी आहे. फळे पचन सुधारणा, कृमी, अशक्तपणा यावर उपयोगी आहे. मुळे सांधेदुखी, वातविकार, मूत्रविकार यावर गुणकारी असतात. हे संपूर्ण झाडच विविध औषधी गुणधर्मांनी युक्त आहे.

मानवासाठी नांदुरकी हे झाड अतिशय महत्त्वाचे आहे. जनावरांना सावली मिळण्यासाठी, तापमान कमी करण्यासाठी, पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी, विविध औषधे मिळण्यासाठी हे झाड उपयोगी आहे. यामुळे 2020 साली नागर फाउंडेशनने रवळगावमध्ये ‘एक घर, एक नांदुरकी झाड’ प्रकल्प सुरू केला. त्यावेळी गावात एकही नांदुरकी झाड नव्हते. या झाडाची फांदी लावल्यानंतर हे झाड येते. याच्या फांद्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही बीड जिल्ह्यातील अनेक गावात फिरलो. आष्टी तालुक्यातील काही गावांमध्ये आम्हाला ही झाडे मिळाली, तेथील लोकांना विनंती करून या झाडाच्या शेकडो फांद्या आणून आम्ही रवळगावमध्ये लावल्या. अनेक घरी जाऊन मी स्वतः खड्डे घेऊन ही झाडे लाऊन दिली. यामुळे आज गावामध्ये शेकडो नांदुरकी झाडे मोठी झाली आहेत व वेगाने वाढत आहेत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक नांदुरकी झाड लावलेच पाहिजे, त्याचे जतन केले पाहिजे, असे आवाहन नागर फाउंडेशनवतीने करण्यात येत आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!