Social menu is not set. You need to create menu and assign it to Social Menu on Menu Settings.

June 11, 2026

krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Weather Forecast : येरे येरे पावसा… हवामान अंदाज, शेतकरी अन् बदलत्या महाराष्ट्राची वास्तवकथा!

1 min read

Weather Forecast : ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा…’ बालपणी निरागस वाटणारी ही ओळ, आज महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या जीवनातील सर्वात मोठी प्रार्थना बनली आहे. कारण शेती अजूनही आभाळावर उभी आहे आणि आभाळ अजूनही पूर्णपणे कुणाच्याच हातात आलेले नाही. चैत्र महिना सुरू झाला की, महाराष्ट्रातील शेतकरी मनाने पुढील हंगामात प्रवेश करतो. गुढीपाडव्याच्या दिवशी घराघरात गुढी उभी राहते; पण शेतकऱ्याच्या मनात त्या दिवशी सर्वप्रथम उभा राहतो तो प्रश्न, ‘यंदा पाऊस (Rain) कसा असेल?’ पाडव्याच्या दिवशी अनेक गावांमध्ये भूमिपूजन केले जाते. काही ठिकाणी पंचांग पाहून पावसाचे भाकीत सांगितले जाते. गावातील ज्येष्ठ मंडळी, अनुभवी शेतकरी, गुरव, भटजी किंवा पारंपरिक ज्ञान असलेले लोक ग्रामदैवतासमोर बसून चर्चा करतात. ‘यंदा पाऊस भरपूर होईल’, ‘दुष्काळाची चिन्हे आहेत’, ‘रोहिणी चांगली आहे’, ‘आषाढ जोरात जाईल’, अशा चर्चा रंगतात. काही ठिकाणी ‘अढी’ लावली जाते, तर काही गावांमध्ये ‘होईक’ सांगितले जाते.

या सर्व परंपरा फक्त अंधश्रद्धा नव्हत्या; त्या शतकानुशतके निसर्गाचे निरीक्षण करून तयार झालेल्या लोकज्ञानाचा भाग होत्या. पण काळ बदलला. विज्ञान पुढे आले. हवामानशास्त्र (Meteorology) विकसित झाले. इंग्रजांच्या काळात सुरू झालेले भारतीय हवामान विभाग आज सॅटेलाईट, सुपर कॉम्प्युटर, रडार, महासागर अभ्यास, एल-निनो, ला-नीना अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पोहोचले. आज हजारो कोटी रुपये खर्च करून देशात हवामानाचा अभ्यास केला जातो. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडी, विविध कृषी विद्यापीठे, इस्रो तसेच स्कायमेट, एक्वा वेदरसारख्या खासगी संस्था हवामानाचे (Weather) वेगवेगळ्या टप्प्यांवर अंदाज (Forecast) देतात. मान्सून (Monsoon) कधी येईल, किती पाऊस पडेल, कोणत्या भागात कमी-जास्त होईल, चक्रीवादळे कुठे तयार होतील, अवकाळी पाऊस किंवा गारपीट कुठे होईल, याचे सतत विश्लेषण केले जाते. परंतु, प्रश्न अजूनही कायम आहे, हा सल्ला योग्यवेळी योग्य शेतकऱ्यापर्यंत कितपत पोहोचतो?

आज माहितीचा स्फोट झाला आहे. मोबाइल हातात आला, इंटरनेट गावागावात पोहोचले, सोशल मीडिया प्रत्येकाच्या खिशात गेला. पण याच सोशल मीडियाने हवामानशास्त्रालाही बाजारात आणले. कोणताही व्यक्ती दोन नकाशे पाहून स्वतःला हवामान तज्ज्ञ म्हणवू लागला. ‘यंदा भयंकर दुष्काळ’, ‘इतिहासातील सर्वात मोठा पाऊस’, ‘अमुक तारखेला महापूर’, ‘तमुक दिवशी महाराष्ट्र वाहून जाणार’ अशा भीतीदायक पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. या अंदाजांमुळे शेतकऱ्यांचा फायदा किती झाला आणि नुकसान किती झाले, हे ग्रामीण महाराष्ट्र चांगले जाणतो. काही शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या भीतीने पेरणी उशिरा केली आणि वेळ निघून गेली. काहींनी अतिवृष्टीच्या भीतीने पीक पद्धती बदलल्या. काहींनी अफवांवर विश्वास ठेवून आर्थिक निर्णय घेतले. ग्रामीण भागातील अशिक्षित किंवा अल्पशिक्षित समाजावर अशा गोष्टींचा मोठा मानसिक परिणाम होतो. ‘यंदा काही खरं नाही’ ही भीतीच अनेकदा नुकसान घडवते.

खरं तर, महाराष्ट्राचे हवामान समजून घेणे हे जगातील कठीण कामांपैकी एक मानले जाते. फार पूर्वी एका इंग्रज हवामान शास्त्रज्ञाने महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेबद्दल भाष्य करताना म्हटले होते की, येथे हवामानाचा अचूक अंदाज बांधणे अत्यंत अवघड आहे. कारण, महाराष्ट्र हा केवळ एक राज्य नाही; तो अनेक हवामान पट्ट्यांचा संगम आहे. एका बाजूला सह्याद्रीच्या उंच कडेकपाऱ्या आहेत. दुसऱ्या बाजूला कोकणचा दमट समुद्रकिनारा आहे. मराठवाड्याचा कोरडा पट्टा आहे. विदर्भातील उष्ण हवामान आहे. गडचिरोलीसारखे दाट जंगल आहे. पश्चिम महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती, खानदेशात वेगळी. येथे दहा किलोमीटरवर हवामान बदलते. भाषा बदलते. माणसांची राहणी बदलते. पावसाचे स्वरूप बदलते. एका गावात मुसळधार पाऊस पडतो, तर शेजारच्या गावात ढगही दिसत नाहीत. ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे. म्हणून हवामान अंदाज हा ‘एक राज्य – एक अंदाज’ अशा पद्धतीने समजून चालणार नाही. स्थानिक पातळीवरील सूक्ष्म निरीक्षण, स्थानिक हवामान केंद्रे, अचूक डेटा आणि त्याचे योग्य विश्लेषण यांची आज सर्वाधिक गरज आहे.

मागील काही वर्षांत भारतीय हवामान विभागाने बऱ्याच बाबतीत उल्लेखनीय प्रगती केली आहे. अनेक वेळा दिलेले अंदाज बऱ्यापैकी अचूक ठरले. चक्रीवादळांचा वेध, मुसळधार पावसाचे इशारे, अवकाळी पाऊस, गारपीट याबाबत आयएमडीची कामगिरी सुधारलेली दिसते. हे शेतकऱ्यांनीही मान्य केले आहे. परंतु, अजूनही ‘शेवटच्या टप्प्यातील संवाद’ कमकुवत आहे. हवामान विभागाने दिलेला अंदाज जर गावातील शेतकऱ्यापर्यंत वेळेवर, त्याच्या भाषेत आणि त्याला समजेल अशा पद्धतीने पोहोचला नाही, तर त्या अंदाजाचा उपयोग मर्यादित राहतो.

आज गरज आहे ती ‘डेटा’पेक्षा ‘विश्वासार्ह मार्गदर्शनाची’. शेतकऱ्याला फक्त एवढेच हवे असते, पेरणी कधी करावी? औषध फवारणी कोणत्या दिवशी टाळावी? पाऊस किती दिवस टिकेल?
कापूस, सोयाबीन, डाळिंब, कांदा, द्राक्ष यासारख्या पिकांसाठी पुढील आठवड्यातील हवामान कसे असेल? जर हा सल्ला अचूक आणि स्थानिक पातळीवर मिळाला, तर शेतकरी हजारो रुपयांचे नुकसान वाचवू शकतो. महाराष्ट्र शासनाने, कृषी विभागाने आणि हवामान विभागाने आता एकत्रितपणे पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म हवामान केंद्रे, ग्रामपातळीवरील डिजिटल सूचना व्यवस्था, मोबाइलवर स्थानिक भाषेतील अलर्ट, कृषी सहायकांमार्फत हवामान सल्ला, स्थानिक रेडिओ व सोशल मीडिया यांचा योग्य वापर झाला पाहिजे.
त्याचबरोबर शेतकऱ्यांचे हवामान साक्षरता अभियानही राबवले पाहिजे. कारण अर्धवट माहिती ही अनेकदा अज्ञानापेक्षा धोकादायक असते.

दुष्काळाची भीती दाखवून निराशा पसरवणे किंवा अतिवृष्टीची भीती निर्माण करून समाजात गोंधळ उडवणे, हे थांबले पाहिजे. हवामान अंदाज हा अभ्यासाचा विषय आहे; तो व्हायरल पोस्टचा खेळ नाही. आजचा शेतकरी बदलतो आहे. तो मोबाइल वापरतो, सॅटेलाईट प्रतिमा पाहतो, हवामान अ‍ॅप डाउनलोड करतो. पण त्याच वेळी तो अजूनही आकाशाकडे पाहून ढग ओळखतो. त्याला विज्ञानही हवे आहे आणि अनुभवाचाही आदर आहे. म्हणूनच भविष्यातील शेती ही ‘परंपरागत ज्ञान + आधुनिक विज्ञान’ यांच्या संगमातूनच उभी राहणार आहे. पाऊस हा केवळ हवामानाचा विषय नाही; तो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा श्वास आहे. शेतकऱ्याच्या आशा-निराशेचा केंद्रबिंदू आहे. म्हणून हवामान अंदाज हा केवळ बातमी नसून तो ग्रामीण जीवनाचा जीवनदर्शक नकाशा आहे. आज आवश्यकता आहे ती अचूकतेची, जबाबदारीची आणि संवेदनशीलतेची. कारण शेतकरी अजूनही प्रत्येक चैत्रात आभाळाकडे पाहून एकच प्रार्थना करतो.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!