krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Edible Oil Import : खाद्यतेल आयात 7 टक्क्यांनी वाढली, पामतेल वाटा 48 टक्क्यांवर

1 min read

Edible oil Import : केंद्र सरकार तेलबियांचे (Oilseeds) उत्पादन वाढवून खाद्यतेल (Edible Oil) उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या गप्पा करीत असले तरी खाद्यतेलावरील भारताचे परावलंबित्व (Dependence) कायम आहे. चालू खाद्यतेल वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत म्हणजेच 1 नाेव्हेंबर 2025 ते 30 जून 2026 या काळात भारताची खाद्यतेलाची आयात (Import) 7 टक्क्यांनी वाढून 103.88 लाख टनांवर पाेहाेचली आहे तर एकूण वनस्पती तेलाच्या (Vegetable oil) आयातीत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आठ महिन्यांच्या कालावधीत खाद्यतेलाच्या आयातीत पामतेलाचा वाटा 48 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जूनमध्ये वनस्पती तेलाची आयात वार्षिक तुलनेत 29 टक्क्यांनी घटून 11.47 लाख टन झाली.

♻️ साेयाबीन व सूर्यफूल तेलाची आयात
चालू खाद्यतेल वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत (1 नाेव्हेंबर 2025 ते 30 जून 2026) वनस्पती तेलाची (खाद्य आणि अखाद्य – Edible and Inedible) एकूण आयात 6 टक्क्यांनी वाढून 105.71 लाख टन झाली आहे. जून 2026 मध्ये देशाची वनस्पती तेलाची आयात आयातीच्या वार्षिक तुलनेत 29 टक्क्यांनी घटून 11.47 लाख टन झाली आहे. खाद्यतेल उद्योग संघटना अर्थात सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (SEA – Solvent Extractors’ Association of India) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 1 नाेव्हेंबर 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत भारताची एकूण खाद्यतेल आयात 7 टक्क्यांनी वाढून 103.88 लाख टन झाली आहे. यामध्ये सर्वाधिक आयात होणाऱ्या खाद्यतेल प्रकारातील कच्चे पामतेल (Crude palm oil) 49.42 लाख टन होते. कच्च्या आणि शुद्ध सोयाबीन तेलाची (Soybean oil) आयात 32.73 लाख टन आणि कच्च्या व शुद्ध सूर्यफूल तेलाची (Sunflower oil) 20.94 लाख टन आयात झाली.

♻️ पामतेलाचा वाटा वाढला
चालू खाद्यतेल वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत पामतेलाची आयात 50.12 लाख टनांपर्यंत वाढली असून, मागील वर्षी याच कालावधीत (1 नाेव्हेंबर 2024 ते 30 जून 2025) पामतेलाची आयात 42.94 लाख टन होती. एकूण खाद्यतेल आयातीमध्ये पामतेलाचा वाटा 44 टक्क्यांवरून 48 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात गेल्या वर्षीच्या (1 नाेव्हेंबर 2024 ते 30 जून 2025) 54.35 लाख टनांवरून 53.76 लाख टनांपर्यंत कमी झाली. त्यामुळे एकूण खाद्यतेल आयातीमधील या तेलांचा वाटा 56 टक्क्यांवरून 52 टक्क्यांपर्यंत घसरला. पामतेल हे जगभरात सर्वात स्वस्त खाद्यतेल मानले जाते. जागतिक बाजारात पामतेलाच्या तुलनेत साेयाबीन व सूर्यफुल तेलाचे दर नेहमीच अधिक असतात. सूर्यफुल तेल महागड्या तर साेयाबीन तेल मध्यम श्रेणीत माेडते. भारतात प्रत्येक सिंगल व डबल रिफाइन खाद्यतेलात 65 ते 70 टक्के पामतेल मिसळले जात असल्याने पामतेलाची आयात वाढविण्यावर भर दिला जात आहे.

♻️ जूनमध्ये आयातीत 29 टक्क्यांची घट
भारताची वनस्पती तेलाची (खाद्य आणि अखाद्य) आयात जून 2025 च्या तुलनेत जून 2026 मध्ये 29 टक्क्यांनी घटली आहे. जून 2025 मध्ये 11.47 लाख टन तर जून 2026 मध्ये 11.11 लाख टन खाद्यतेल आणि 35,427 टन अखाद्य तेल आयात करण्यात आले. मे 2026 मध्ये 13.39 लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले हाेते. ही आयात जून 2026 मध्ये 11.11 लाख टनांपर्यंत कमी झाली. पामतेलाची मागणी घटल्याने आयातही घटली. जूनमध्ये पामतेलाची आयात 4,87,000 टनांपर्यंत घटली, जी मे महिन्याच्या तुलनेत 10.5 टक्के घट आहे. सोयाबीन तेलाची आयातही 4.94 लाख टनांवरून 3.81 लाख टनांपर्यंत घटली असून, ही घट 23 टक्के एवढी आहे.

पामतेलाची आयात घटण्याचे मुख्य कारण म्हणजे पामतेल आणि सॉफ्ट ऑइल्स (सोयाबीन तेल) यांच्या किमतीतील फरक जवळजवळ संपुष्टात आला आहे. पामतेलावरील किमतीतील सवलत प्रतिटन 50 डॉलरपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे त्याचा स्पर्धात्मक फायदा कमी झाला असून, आयातीवर परिणाम झाला आहे, असे मत एसईए (SEA – Solvent Extractors’ Association of India)च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. इंडोनेशिया, मलेशिया आणि अमेरिकेतील जैवइंधनासाठीच्या (Biofuel) अनिवार्य मिश्रण धोरणांमुळे खाद्यतेलातील वनस्पती तेलाचा मोठा वाटा इंधनाकडे वळवला जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात वनस्पती तेलाच्या किमतींवर दबाव आला आहे आणि भारतीय आयातदारांच्या खरेदीवर परिणाम झाला आहे, असेही एसईए (SEA)च्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

🔆 तुलनात्मक मासिक खाद्य/अखाद्य तेल आयात (2025-26 ➖ 2024-25)

महिना – खाद्य तेल – अखाद्य तेल – एकूण ➖ खाद्य तेल – अखाद्य तेल – एकूण

📍 नाेव्हेंबर – 2025 – 1,20,605 – 32,877 – 1,23,7482 ➖ 1,613,635 – 37,341 – 6,16,50,976 – (-) 25%
📍 डिसेंबर – 2025 – 1,40,987 – 21,000 – 1,430,873 ➖ 1,229,790 – 45,764 – 12,75,554 – (+) 12%
📍 जानेवारी – 2026 – 1,37,313 – 27,528 – 1,400,662 ➖ 1,078,279 – 41,614 – 11,19,893 – (+) 25%
📍 फेब्रुवारी – 2026 – 1,34,710 – 24,502 – 1,371,597 ➖ 9,63,473 – 14,004 – 977,477 – (+) 40%
📍 मार्च – 2026 – 1,23,590 – 13,401 – 1,249,301 ➖ 1,045,281 – 27,742 – 1,073,023 – (+) 16%
📍 एप्रिल – 2026 – 1,36,650 – 2,200 – 1,368,698 ➖ 946,025 – 29,000 – 975,025 – (+) 40%
📍 मे – 2026 – 1,33,894 – 26,202 – 1,365,138 ➖ 1,254,883 – 12,040 – 1,266,923 – (+) 8%
📍 जून – 2026 – 1,11,153 – 35,427 – 1,146,958 ➖ 1,597,995 – 18,497 – 1,616,492 – (-) 29%
📍 एकूण – 1,03,87,572 – 1,83,137 – 1,05,70,709 ➖ 97,29,361 – 2,26,002 – 99,55,363 – (+) 6%
(सर्व आकडे मेट्रिक टन)

♻️ नेपाळमधून शुद्ध तेलाची आयात
नेपाळमधून भारतात होणारी शुद्ध खाद्यतेलाची आयात उच्च पातळीवर कायम आहे. 1 नोव्हेंबर 2025 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत नेपाळने भारताला 3.39 लाख टन शुद्ध खाद्यतेल निर्यात केले. यामध्ये 2.98 लाख टन शुद्ध सोयाबीन तेल, 19,911 टन शुद्ध सूर्यफूल तेल, 18,295 टन आरबीडी पामोलिन (RBD – Refined, Bleached, and Deodorized) आणि 3,081 टन मोहरीच्या तेलाचा समावेश होता. मे 2026 मध्ये नेपाळने भारताला 54,000 टन शुद्ध खाद्यतेल निर्यात केले तर जून 2026 मध्ये ही निर्यात 32,000 टन होती. यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक शुद्ध सोयाबीन तेल तसेच कमी प्रमाणात शुद्ध सूर्यफूल तेल आरबीडी पामोलिन तेलाचा (RBD Palmolein Oil) समावेश हाेता. विशेष म्हणजे, दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार (SAFTA – South Asian Free Trade Area) अंतर्गत नेपाळमधून भारताला होणाऱ्या या निर्यातीवर कुठलाही आयात शुल्क आकारला जात नाही.

♻️ देशांतर्गत खाद्यतेलाच्या साठ्यात घट
1 जुलै 2026 पर्यंत देशाच्या बंदरांवरील खाद्यतेलाचा साठा 9.06 लाख टन आणि पाइपलाइनमधील साठा 11.03 लाख टन असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण उपलब्ध साठा 20.09 लाख टन होता, जो 1 जून 2026 च्या 22.16 लाख टनांच्या तुलनेत 2.07 लाख टनांनी कमी आहे. जूनमधील कमी आयातीमुळे देशांतर्गत साठ्यात ही घट झाली आहे, असे एसईएच्या (SEA)च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

♻️ कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीत वाढ, शुद्ध तेलाच्या आयातीत घट
1 नोव्हेंबर 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत शुद्ध खाद्यतेलाची आयात 3.69 लाख टनांपर्यंत घटली, जी गेल्या वर्षी (1 नोव्हेंबर 2024 ते 30 जून 2025) याच कालावधीत अंदाजे 15 लाख टन होती. याउलट, कच्च्या खाद्यतेलाची आयात 100.19 लाख टनांपर्यंत वाढली. या काळात एकूण खाद्यतेलाच्या आयातीत शुद्ध तेलाचा वाटा 15 टक्क्यांवरून केवळ 4 टक्क्यांपर्यंत घसरला, तर कच्च्या खाद्यतेलाचा वाटा 85 टक्क्यांवरून 96 टक्क्यांपर्यंत वाढला. हा बदल प्रामुख्याने कच्च्या पामतेलाच्या आयातीत झालेल्या वाढीमुळे झाला.

♻️ अर्जेंटिना सर्वात मोठा पुरवठादार
1 नोव्हेंबर 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत अर्जेंटिना भारताला खाद्यतेलाचा सर्वात मोठा पुरवठादार होता. या काळात अर्जेंटिनाने 23,39,000 टन खाद्यतेल निर्यात केले, ज्यात प्रामुख्याने कच्चे सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाचा समावेश होता. यानंतर मलेशियाने भारताला 19,81,000 टन आणि इंडोनेशियाने 19,04,000 टन पाम तेलाची निर्यात केली. रशिया, ब्राझील, थायलंड, युक्रेन, चीन, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती हे देखील प्रमुख पुरवठादार होते.

♻️ आंतरराष्ट्रीय किमती व रुपयावरील दबाव
जून 2025 च्या तुलनेत जून 2026 मध्ये कच्च्या पाम तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती 17 टक्क्यांनी, आरबीडी पामोलिनच्या किमती 18 टक्क्यांनी, सोयाबीन तेलाच्या किमती 14 टक्क्यांनी आणि सूर्यफूल तेलाच्या 19 टक्क्यांनी जास्त होत्या. दरम्यान, गेल्या वर्षभरात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे 11 टक्क्यांहून अधिक अवमूल्यन झाले आहे, ज्यामुळे खाद्यतेलाची खरेदी व आयातीचा खर्च आणखी वाढला.

©️ मातीतलं अर्थकारण

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!