Low Rainfall : गाेकुळ अष्टमीपर्यंत कमी पाऊस
1 min read
Low Rainfall : महाराष्ट्रात शुक्रवार (दि. 21)पासून गोकुळ अष्टमी (शुक्रवार, दि. 4 सप्टेंबर)पर्यंतच्या दाेन आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी (Low Rainfall) राहणार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
📍 मध्यम ते मुसळधार पाऊस
राज्यातील ठाणे, पालघर, मुंबई सबर्बन, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या 12 जिल्ह्यांत ह्या दोन आठवड्यात त्यांच्या केवळ सरासरीइतक्या मध्यम ते मुसळधार पावसाचीच शक्यता जाणवते.
📍 तुरळक व किरकोळ पाऊस
नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच संपूर्ण मराठवाडा व विदर्भातील अमरावती, बुलढाणा, वर्धा, अकोला, वाशिम, यवतमाळ या 24 जिल्ह्यात दोन आठवड्यांमध्ये त्यांच्या नेहमी पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा कमी आणि तुरळक ठिकाणी किरकोळ, पहाळे टाईप पावसाची शक्यता जाणवते.
📍 खरीप पिकांची अवस्था व सिंचन
आज-उद्या पाऊस होईल, या आशेवर सिंचनास झालेला उशीर आणि पाणी द्यावे तर पाऊस होवून पीक नुकसानीच्या भितीपोटी, सिंचन सुविधा उपलब्ध असूनही सध्या खरीप पिके काही ठिकाणी सिंचनाच्या ताणाखाली ओढली गेली आहेत. परंतु, येणाऱ्या दोन आठवड्यात सरासरीपेक्षा कमीच पावसाच्या शक्यतेमुळे, खरीप पिके लगेचच सिंचित करण्यास हरकत नाही, असे वाटते. ज्यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन अगोदरच धाडसाने पिकांचे सिंचन कव्हर करत आणले, अशा शेतकऱ्यांच्या ऊस, मका, सोयाबीन भुईमूग व भाजीपाला पिकांची स्थिती उत्तम आहे.
📍 जिरायत क्षेत्रातील खरीप पिकांची अवस्था
जून-जुलै महिन्यांमध्येच जिरायत क्षेत्रात पीक पेरते वेळेसच भविष्यातील ज्या काळात या पिकांच्या जीवदानाची साशंकता व भीती वाटत होती, हाच तो (ऑगस्ट-सप्टेंबरचा) काळ समजावा. हाच सध्या आपण अनुभवतोय तो एल-निनो होय.
📍 परतीचा पाऊस व रब्बी हंगामाचे भवितव्य
2026 मधील मान्सूनच्या एकूण कालावधीतील अखेरच्या सप्टेंबर महिन्यात एल-निनोच्या तीव्रतेत होणाऱ्या वाढ शक्यतेत बदल नसून, ते भाकित कायम आहे. म्हणजेच एकंदरीत, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमीच पावसाची शक्यता जाणवते.