Village sanitation, water pollution : सरकारची ग्रामस्वच्छता, जलप्रदूषण आणि राष्ट्रसंतांची ग्रामशुद्धी
1 min read
Village sanitation, water pollution : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी (Rashtrasant Tukadoji Maharaj) ग्रामगीतेच्या (Gramgita) ‘ग्रामशुद्धि’ या बाराव्या अध्यायात स्वच्छ व शुद्ध गाव (Village sanitation) कसे असावे, त्यासाठी प्रत्येकाने काय करायला हवे, मलमूत्र आणि विष्ठेचा वापर शेतजमिनीची सुपिकता व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी कसा होतो, यावर प्रबोधन केले. मागील काही वर्षांपासून देशात व राज्यात हागणदारीमुक्त गाव अभियानांतर्गत गावागावात सेप्टिक टँक (Septic tank) नसलेल्या साध्या खड्ड्यांच्या शौचालयांवर भर देण्यात आला. या शौचालयांमधील मलमिश्रित पाणी (Fecal-contaminated water) झिरपत परिसरातील विहिरी व बाेअरवेल्समध्ये मिसळल्याने गावांमधील पारंपरिक जलस्रोत दूषित (pollution) झाले आहे. कोरड्या दुष्काळामुळे या जलस्रोतांकडे लक्ष गेले आणि ही समस्या ऐरणीवर आली असली तरी शासन, प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या अक्षम्य चुकीमुळे उद्भवलेल्या या गंभीर समस्येचे वैषम्य कुणालाही वाटत नाही.
♻️ घरकुल याेजना व बांधलेली घरे
गरीब नागरिकांना राहायला हक्काची पक्की घरे मिळावी, यासाठी देशभर विविध घरकुल याेजना राबविल्या जात आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 2014-15 ते 2024-25 या 10 वर्षांच्या काळात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 13.45 लाख घरकुलांचे बांधकाम करण्यात आले असून, रमाई आवास योजनेंतर्गत 6.15 लाख घरे बांधण्यात आली. शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत 2.85 लाख घरकुले बांधण्यात आली असून, पारधी व आदिम जमाती घरकुल योजनेंतर्गत 42 हजार, मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत 65 हजार, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत व अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत 28 हजार आणि अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत 18 हजार अशा एकूण 24 लाख 40 हजार घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. या सर्व याेजनांच्या लाभार्थ्यांना घरांचे बांधकाम करण्यासाठी 1 लाख 30 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात आले. या तुटपुंज्या अनुदाना लाभार्थ्यांना घरांसाेबतच शाैचालयांचे बांधकाम करणे अनिवार्य हाेते.
♻️ हागणदारीमुक्त गाव अभियान
मागील काही वर्षांपासून हागणदारीमुक्त गाव अभियान अर्थात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) राबविले जात आहे. या अभियानांतगर्गत महाराष्ट्राम 2014-15 ते 2024-25 या 10 वर्षांमध्ये 85.50 लाख वैयक्तिक वापराच्या शाैचालयांचे बांधकाम करण्यात आले. हे शाैचालय बांधकाम सक्तीचे हाेते. त्यासाठी राज्य सरकारने लाभार्थ्यांना प्रत्येकी 12,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले. घरकुल याेजनांसाेबत या शाैचालयांचा विचार केल्यास महाराष्ट्रात 10 वर्षांमध्ये 1 कोटी 9 लाख 48 हजार शाैचालयांचे बांधकाम करण्यात आले. ही सर्व शाैचालये विना सेप्टिक टॅंक (Septic Tank) म्हणजेच साध्या खड्यांची आहेत. या शाैचालयांमध्ये राेज प्रत्येकी किमान 30 ते 50 लिटर पाणी वापरले तर राेज लाखाे लिटर पाणी शाैचासह जमिनीत मुरते. पुढे ते मलमिश्रित पाणी जमिनीत झिरपून परिसरातील गावांमधील विहिरी आणि बाेअरवेल्स पाण्यात मिसळते आणि ते जलस्राेत दूषित करते. एकदा दूषित झालेला जलस्राेत पूर्ववत करण्यासाठी किती खटाटाेप करावे लागतात, त्या जलस्राेतांमधील दूषित पाणी पिण्यासाठी किंवा इतर कामांसाठी वापरल्यास त्याचे मानवी आराेग्यावर काय परिणाम हाेतील, याचा विचार धाेरणकर्त्यांनी तेव्हाही केला नाही व आताही करीत नाही. शिवाय, शाैचालयांचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी याचे काही घेणे-देणे नाही.
♻️ मलमिश्रित पाण्यामुळे हाेणारे आजार
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, मलमिश्रित पाणी पिण्यासाठी वापरल्यास व्हिब्रिओ कॉलरी (Vibrio cholerae) जिवाणूमुळे कॉलरा (Cholera), साल्मोनेला टायफी (Salmonella typhi) मुळे टायफॉइड (Typhoid), शिगेला (Shigella spp.)मुळे आमांश (Bacillary Dysentery), ई-कोलाय (Escherichia coli)मुळे गॅस्ट्रो व तीव्र अतिसार हे जिवाणूजन्य, कावीळ (Hepatitis A & E), रोटाव्हायरस आणि नोरोव्हायरस संक्रमण (Viral Gastroenteritis), पोलिओ (Poliomyelitis), परजीवी आणि कृमीजन्य आजार (Protozoan & Helminthic Diseases), अमिबियासिस (Amoebiasis), एंटामिबा हिस्टोलिटिका (Entamoeba histolytica), जिआर्डियासिस (Giardiasis), क्रिप्टोस्पोरिडिओसिस (Cryptosporidiosis) हे विषाणूजन्य आजार तसेच पोटातील कृमी (Intestinal Worms) यासह इतर गंभीर व जीवघेणे आजार हाेतात.
♻️ पाण्याचे वाढते परावलंबित्व
सन 1960 च्या दशकापूर्वी काही दुष्काळी गावे वगळला बहुतांश गावे ही पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी हाेती. काही गावांचे पाण्याचे अवलंबित्व गावालगतच्या नदी-नाल्यांवर हाेते तर काही गावांचे सार्वजनिक व खासगी विहिरींवर हाेते. या सर्व जलस्राेतांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक नागरिक बिनबाेभाटपणे पार पाडायचे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तिसऱ्या पंचवार्षिक याेजनेपासून म्हणजेच 1961 पासून नळ व पाणीपुरवठा याेजना राबवायला सुरुवात झाली. कमी कष्टात व पैशात मुबलक पाणी मिळत असल्याने काळाच्या ओघात नळ याेजनांचा विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या गावांमधील विहिरी व इतर जलस्राेतांकडे दुर्लक्ष करीत त्यांना अडगळीत टाकले. हे पारंपरिक जलस्राेत अडगळीत जावे, या दृष्टीने शासन व प्रशासनाने धाेरणे आखून ती राबविली. याच जलस्राेतांनी आपली पिढ्यानपिढ्या तहाण भागविली ही महत्त्वाची बाब धाेरणकर्त्यांसाेबतच स्थानिक नागरिकही विसरले आणि पाण्याचे परावलंबित्व पदरी पडले.
♻️ पुनर्भरणाकडे दुर्लक्ष
या पारंपरिक जलस्राेतांचे संवर्धन करण्यसाऐवजी त्यांना बुजविणे आणि त्या जागा इतर कामांसाठी वापरण्यावर धाेरणकर्त्यांसाेबतच स्थानिक नागरिकांचा कल राहिला आहे. वास्तवात, या जलस्राेतांचे पाणी कुणी पिण्यासाठी जरी वापरले नसते तरी त्यांचे व्यवस्थित देखभाल, दुरुस्ती व संवर्धन करून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने पुनर्भरण करण्यावर धाेरणकर्त्यांनी भर दिला असता, त्यांचे पुनर्भरण करणे सक्तीचे केले असते तर पावसाचे पाणी माेठ्या प्रमाणात वाहून जाण्याऐवजी ते पुनर्भरणाद्वारे जमिनीत मुरले असते आणि भूजल पातळीत वाढ झाली असती. दुर्दैवाने भारतात पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाण्याचे तसेच जमिनीतील पाण्याच्या उपशाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या सर्व जलस्राेतांचे संवर्धन करून त्यांचे आधीच शास्त्रीय पद्धतीने पुनर्भरण केले असते तर सध्याच्या दुष्काळात जमिनीतील पाण्याची उपलब्धता चांगली असती.
♻️ राष्ट्रसंतांची ‘ग्रामशद्धि’
राष्ट्रसंतांनी विष्ठेला खत संबाेधले आहे. ते म्हणतात,
‘एरव्ही ताे वांढाळ गडी। जाे वाटेल तिकडे मळा सांडी।
ते खतद्रव्यांची करिती नासाडी। वानर जैसे।’
म्हणजेच गावांमधील लाेकं वाट्टेल तिकडे शाैचास बसतात आणि माकडांप्रमाणे खताची नासाडी करतात.
अहाे ! ही निसर्गाची रचना। समजलीच पाहिजे सर्व जना।
खाद्यचि हाेत खत जाणा। खतापासाेनि खाद्यात्पत्ती।
अर्थात खाद्यापासून खत तयार हाेते आणि याच खतापासून खाद्याची उत्पत्ती म्हणजे निर्मिती हाेते.
आपण जे जे काही खाताे। रसरक्तमांस तेणे जमविताे।
त्यातून वाचले ते खत म्हणताे। भूमिवरि घालावया।
आपण जे काही खाते, ते आपण त्यातील पाैष्टिक घटक आपले शरीर शाेषून घेणे आणि वाचलेले जे टाकाऊ पदार्थ असतात, त्याला आपण खत म्हणताेे. ते खत शेतजमिनीत घालायचे असते.
‘मूत्रविष्टाहड्डी मिसळली। त्याने भूमीस स्फूर्ती चढली।
पुन्हा पेरणी करिता उद्भवली। प्रचंड कणसे’
मूत्र, विष्टा हाडे मातीत मिसळल्यास जमिनीस स्फूर्ती चढते. त्या जमिनीत बियाण्यांची पेरणी केल्यास भरपूर उत्पादन हाेते.
म्हणाेनि सर्व गावाचे मलमूत्र। जमवाेनि झाकावे जाणाेनि तंत्र।
त्याने गावाची जमीन सर्वत्र। खतवाेनि द्यावी।
याने दूर हाेईन घाण। थांबेल राेगराईचे नुकसान।
आणि पिकेल अधिक धान्य। अनेक लाभ एकामाजी।
सर्व गावातील मलमूत्र व्यवस्थित गाेळा करून ते शास्त्रीय पद्धतीने झाकल्यास त्याचे खत तयार हाेते. यामुळे गावातील घाण दूर हाेते आणि राेगराई पसरत नाही. याच खताचा वापर केल्यास शेतमालाचे अधिक उत्पादन हाेत असल्याने याचे अनेक फायदे आहेत. याच खताचा याेग्य वापर केल्यास शेतीचा पाेत सुधारून शेतमालाचे उत्पादन चांगले हाेते. गावांमध्ये शेणापासून गाेवऱ्या तयार करतात आणि त्याच गाेवऱ्यांचा वापर जाळण्यासाठी केला जाताे. त्याच शेणात लक्ष्मी वसत असल्याचे राष्ट्रसंत सांगतात.
♻️ राज्य सरकारचा दुटप्पीपणा
राज्य सरकारने सन 2000-01 पासून महाराष्ट्रातील गावागावांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबवायला सुरुवात केली. हे अभियान आजही सुरूच आहे. राज्यातील प्रत्येक गाव स्वच्छ व निराेगी राहावे, हा या अभियानामागचा उदात्त हेतू असावा. वास्तवात, हे अभियान राबविताना राष्ट्रसंतांच्या ‘ग्रामशुद्धी’विषयक महत्त्वाच्या विचारांना काळजीपूर्वक डावलून केवळ राजकीय व आर्थिक फायदा सत्ताधाऱ्यांनी बघितला. यावरून हे अभियान राबविणाऱ्या आजवरच्या सरकारांचा दुटप्पीपणा स्पष्ट हाेताे. याच दुटप्पीपणामुळे वरून स्वच्छ दिसणाऱ्या बहुतांश गावांमधील जलस्राेत दूषित करण्यात आले आणि स्थानिक ग्रामस्थांचे पाण्याचे अवलंबित्व नळ याेजनांवर वाढवून पारंपरिक जलस्राेत निकामी करण्याचे पाप केले. संपूर्ण गावात गटर लाईन (Gutter Line) टाकून गाेळा झालेल्या विष्टेचे सहज खत तयार करता आले असते. जर गटर लाईन टाकायची नसती तर शाैचालयांवरील अनुदानात वाढ करून किमान दाेन घरांमिळून एक सेप्टिक टॅंक तयार करता आली असती. ती सेप्टिक टॅंक पूर्णपणे भरल्यानंतर त्यातील विष्ठेचा त्याच कुटुंबीयांना त्यांच्या शेतात खत म्हणून वापर करता आला असताे. यातून शेतीला पुरेसे सेंद्रिय खत मिळाले असते, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी राहिले असते आणि गावातील जलस्राेत देखील स्वच्छ व अबाधित राहिले असते. राष्ट्रसंतांनी यासह ग्रामस्वच्छतेच्या इतर सर्व बाबी ग्रामगीतेच्या ‘ग्रामशुद्धि’ या बाराव्या अध्यायातून सप्रमाण पटवून दिल्या असल्या तरी त्यावर याेग्य अंमल करताे काेण?
©️ मातीतलं विज्ञान