उद्याेजक शेतकरी
शेतमाल आणि शेतकरी यांच्या लुटीचा इतिहास फार जुना आहे. तरीही, भारतात स्वातंत्र्यापूर्वी ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नाेकरी’ ही व्यवस्था कायम हाेती. ब्रिटिशांनी या व्यवस्थेला पहिल्यांदा छेद देण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘समाजवादी’ अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्यासाठी वेळावेळी घटनादुरुस्ती करून काही कायदे व नियम तयार करीत त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. सरकारने शेतीक्षेत्रावर विविध बंधने लादल्याने भारतातील शेतीक्षेत्र इतर उद्याेगक्षेत्राच्या तुलनेत संकुचित हाेऊन आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाले. परिणामी, सरकारी व खासगी उद्याेगातील नाेकरीला चांगले दिवस आल्याने ही व्यवस्था ‘उत्तम नाेकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती’ यात परावर्तीत झाली. लुटीच्या या व्यवस्थेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे संपूर्ण स्वातंत्र्य संकुचित हाेऊन शेती व शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण व आत्महत्या वाढत गेल्या. ही बाब झाकून ठेवण्यासाठी आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी ‘भिकवादी’ सरकारी याेजनांचा वापर केला आणि भारतीय शेतकरी त्याला भाळले.
स्वयंपूर्ण खेडी
ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतातील प्रत्येक खेडं (गाव) एक स्वयंपूर्ण युनिट हाेते. ब्रिटिशांनी पहिल्यांदा ही व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. साेबतच त्यांनी काही पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सामाजिक सुधारणाही केल्या. शेतीक्षेत्राची आर्थिक लूट ही विचारसरणी बनत चालल्याने तसेच त्या विचारसरणीचे अनुसरण काही भारतीय मंडळी करीत असल्याने महात्मा ज्याेतिबा फुले यांनी ‘इंग्रज या देशात आणखी काही काळ राहिले तरी चालेल. पण, अंग्रेजीयत या देशातून गेली पाहिजे’, असा विचार मांडला. ‘अंग्रेजीयत’ म्हणजे, शेती व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लुटणारी विचारसरणी हाेय.
पुढे हाच धागा पकडून स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी ‘स्वयंपूर्ण खेडी’ ही उद्याेग व सत्ता विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली आणि ‘खेड्याकडे चला’ हा मूलमंत्र दिला. स्वातंत्र्यानंतर भारतीय सत्ताधाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या या आर्थिक व राजकीय विकेंद्रीकरणाला बासनात गुंडाळून ठेवले आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा अवलंब करीत केंद्रीकरणावर भर दिला. आज त्याचे दुष्परिणाम देशात सर्वच क्षेत्रात स्पष्ट दिसून येत आहेत.
शेतीच्या लुटीचा इतिहास
‘जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे. प्रकृती आणि मनुष्य एकत्र आल्यानंतर ताे निर्माण झाला. पंचमहाभूतांच्या लक्षावधी वर्षांच्या साठलेल्या ऊर्जा माणसांच्या श्रमाचा स्पर्श हाेताच गुणाकार करीत फळाला येतात. एका दाण्यापासून शंभर दाणे तयार हाेण्याचा चमत्कार शेतीतच हाेताे. ज्या दिवशी हे लक्षात आले, त्या दिवसापासून शेतीमध्ये तयार झालेली ही बचत लुटून न्यायला सुरुवात झाली. आजपर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये हाेणारा गुणाकार लुटण्याची आहे.’ हा विचार जगात पहिल्यांदा शेतकरी संघटनेचे प्रणेते स्व. श्री शरद जाेशी यांनी सन 1980 च्या दशकात मांडला. भारतीय शेतकऱ्यांच्या गरीबी आणि दारिद्र्याचे मूळ शेतमालाच्या लुटीत आहे. ही लूट करण्यासाठी भारतात विविध कायदे व नियम तयार करण्यात आले आहेत. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित ‘रास्त भाव’ आणि शेतकऱ्यांना संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, हे स्व. श्री शरद जाेशी यांनी वेळावेळी सप्रमाण सिद्ध करून दिले आहे.
चतुरंग शेती
भारतीय शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा, उद्याेजक व्हावा, त्याला बाजारपेठेत स्वत:चे अस्तित्व व दबदबा निर्माण करता यावा, यासाठी स्व. श्री शरद जाेशी यांनी 9 व 10 नाेव्हेंबर 1991 राेजी शेगाव, जिल्हा बुलडाणा येथे आयाेजित शेतकरी मेळाव्यात व त्यानंतर 15, 16 व 17 डिसेंबर 1991 राेजी वर्धा येथे पार पडलेल्या शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ‘सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती आणि निर्यात शेती’ या चतुरंग शेतीची संकल्पना मांडली. त्यांनी ही चतुरंग शेती विस्ताराने समर्पक शब्दात व साेप्या भाषेत समजावूनही सांगितली. यात त्यांनी ‘सीता शेती’त शेतकऱ्यांनी त्यांच्या पत्नीला शेतजमिनीचे मालकी हक्क देणे व जैविक पदार्थांचा वापर करून शेती करणे, ‘माजघर शेती’त घरातील महिलांकरवी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करणे, ‘व्यापार शेती’त प्रक्रिया केलेला शेतमाल शेतकऱ्यांनी बाजारात विकणे, विक्रीसाठी दुकानांची साखळी निर्माण करणे आणि निर्यात शेती’त शेतकऱ्यांनी पब्लिक लिमिटेड कंपन्या स्थापन करून भारतीय शेतमालाची निर्यात करून देशाला अमूल्य परकीय चलन मिळवून देणे, ही संकल्पना मांडली हाेती.
फाेर एफ-वन पी
संपूर्ण शेती व शेतमाल हा अन्न (Food), चारा (Fodder), धागा (Fabrics), इंधन (Fuel) आणि औषधी (Pharmaceutical) या ‘फाेर एफ-वन पी’मध्ये सामावला आहे, ही
संकल्पनादेखील पहिल्यांदा स्व. श्री शरद जाेशी यांचीच मांडली व समजावून सांगितली.
महात्मा ज्याेतिबा फुले यांनी सांगितलेली ‘अंग्रेजीयत’, महात्मा गांधी यांनी मांडलेली ‘स्वयंपूर्ण खेडी व विकेंद्रीकरणा’ची संकल्पना आणि स्वातंत्र्यानंतर स्व. श्री शरद जाेशी यांनी दिलेला ‘चतुरंग शेती’चा मूलमंत्र यावर भारतीय शेतकरी व शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलामुलींनी कधीच गांभीर्याने विचार केला नाही. इथेच शेतकरी व त्यांच्या मुलामुलींची फसगत झाली. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी भारतीय शेतीक्षेत्राची अत्यंत विदारक अवस्था केली असली तरी भारतीय शेतकरी व त्यांच्या मुलामुलींमध्ये ‘उद्याेजक शेतकरी’ बनण्याची पुरेपूर क्षमता आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या मुलामुलींनी एकत्र येऊन ‘उद्याेजक शेतकरी’ बनणे ही काळाजी गरज आहे.