Auxins and Cytokinin : मातीतून सोनं पिकवण्याची गुरुकिल्ली : ऑक्सिन्स आणि सायटोकाइनिनची जादू
1 min read
Auxins and Cytokinin : आपण शेतकरी म्हणजे निसर्गासोबत गप्पा मारणारे लोकं. आपण बियाणे पेरतो, पाणी देतो आणि पीक कसं वाढतं, हे बारकाईनं बघतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की एक छोटंसं बी पेरल्यावर त्याला कोणी सांगतं की तू आता मुळं खाली सोड, खोड वर काढ, फांद्या पसरव आणि मग फुलं धर? या सगळ्या कामासाठी पिकाच्या शरीरात दोन ‘मास्टर कंट्रोलर’ काम करत असतात. ते म्हणजे वनस्पतींचे दोन महत्त्वाचे हार्मोन्स: 1. ऑक्सिन्स (Auxins) आणि 2. सायटोकाइनिन(Cytokinin). हे हार्मोन्स (Hormones) म्हणजे आपल्या पिकाचं अदृश्य बुद्धी आणि ताकद आहेत. ज्या शेतकऱ्याला या दोघांची भाषा समजली, त्यानं समजायचं की त्यानं शेतीतला सर्वात मोठा ‘गुरुमंत्र’ मिळवला आहे. आज आपण याच दोन घटकांची सखोल माहिती घेऊया, जी तुम्हाला तुमच्या शेतीत थेट फायदा देईल.
♻️ भाग – 1 :- ऑक्सिन्स (Auxins) – पिकाचा ‘फाऊंडेशन इंजिनियर’
📍 ऑक्सिन्स म्हणजे काय?
‘ऑक्सिन’ म्हणजे ‘वाढवणारा’. हे हार्मोन प्रामुख्याने पिकाच्या शेंड्यावर, नवीन फुटणाऱ्या पानात आणि वाढणाऱ्या कोंबात तयार होतं. तयार झाल्यावर ते वरून खाली मुळांच्या दिशेने प्रवास करतं.
📍 ऑक्सिन्सचं मुख्य काम काय आहे? (सोप्या भाषेत)
तुम्ही नवीन घर बांधायला सुरुवात करता, तेव्हा सर्वात आधी काय महत्त्वाचं असतं? फाऊंडेशन (पाया) आणि उंची! ऑक्सिन्सचं काम अगदी तसंच आहे.
🔆 मुळांचा विकास (पिकाचा पाया)
ऑक्सिन्स हे मुळांच्या वाढीसाठी आणि निर्मितीसाठी सर्वात महत्त्वाचं रसायन आहे.
📍 व्यावहारिक उपयोग (Use) :- तुम्ही जेव्हा उसाची, द्राक्षाची किंवा फुलांची कलमं (Cuttings) लावता, तेव्हा ती लवकर मुळं धरावीत म्हणून आपण जे पावडर किंवा द्रावण लावतो, तेच हे ऑक्सिन असतं (उदा. रूटींग हार्मोन).
📍 फायदा :- याने मुळं लवकर येतात, ती खोलवर जातात आणि रोपाला मातीत लवकर स्थिर करतात. म्हणजे, रोपाला सुरुवातीलाच मजबूत पाया मिळतो.
🔆 शेंड्याचं वर्चस्व (उंची वाढवणं)
ऑक्सिन्समुळे पिकाचा मुख्य शेंडा वेगाने वर वाढतो. याला ‘शेंड्याचं प्राबल्य’ (Apical Dominance) म्हणतात.
📍 सोपं उदाहरण :- बाभळीच्या झाडाचा किंवा नारळाच्या झाडाचा शेंडा एकदम उंच जातो, पण फांद्या कमी असतात. हे ऑक्सिन्समुळे होतं.
📍 शेतकऱ्यांसाठी फायदा :- ज्या पिकाला (उदा. मका, सूर्यफूल) उंची वाढवायची आहे, त्याला हे हार्मोन मदत करतं.
📍 तोडगा :- जर तुम्हाला बाजूच्या फांद्या (उदा. कापूस, वांगी) जास्त हव्या असतील, तर तुम्ही मुख्य शेंडा खुडून (Pinching) टाकतात. यामुळे ऑक्सिन्सचा प्रभाव कमी होतो आणि बाजूच्या फांद्या जोर धरतात.
🔆 फळं आणि फुलं गळणे थांबवणे
ऑक्सिन्स फळ तयार झाल्यावर त्याला झाडाला घट्ट धरून ठेवण्यास मदत करतात.
📍 व्यावहारिक उपयोग :- जेव्हा आंबे, संत्री, किंवा टोमॅटोची फुलं किंवा लहान फळं गळायला लागतात, तेव्हा कमी प्रमाणात ऑक्सिन्सची फवारणी केल्यास ही गळती थांबते.
📍 फायदा :- फुलं आणि फळं झाडावर टिकून राहिल्यामुळे, तुमचं उत्पादन 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढू शकतं.
🔆 तण नियंत्रण (गवत मारणे)
तुम्ही जे तणनाशक (उदा. 2,4-D) वापरता, ते एक कृत्रिम (माणूस बनवलेलं) ऑक्सिन असतं.
📍 कसं काम करतं? :- हे रुंद पानांच्या तणांना इतकं जास्त वाढायला लावतं की ते स्वतःच मरून जातात. पण गव्हासारख्या अरुंद पानांच्या पिकाला त्याचा जास्त त्रास होत नाही.
♻️ भाग – २ :- सायटोकाइनिन (Cytokinins) – पिकाचा ‘फूटवा आणि हिरवेपणा मॅनेजर’
📍 सायटोकाइनिन म्हणजे काय?
‘सायटोकाइनिन’ म्हणजे ‘पेशी विभाजन करणारा’. हे हार्मोन ऑक्सिन्सच्या अगदी उलट, प्रामुख्याने मुळांच्या टोकांमध्ये तयार होतं आणि तेथून वरच्या भागाकडे प्रवास करतं.
📍 सायटोकाइनिनचं मुख्य काम काय आहे?
ऑक्सिन्स जर घराचा पाया आणि उंची वाढवत असेल, तर सायटोकाइनिन घराला खिडक्या, दरवाजे आणि नवीन खोल्या तयार करून देतं. म्हणजे, हे रुंदी आणि फुटवे वाढवण्याचं काम करतं.
🔆 पेशी विभाजन आणि फुटवे निर्मिती
हे या हार्मोन्सचं सर्वात महत्त्वाचं काम आहे. यामुळे पिकाला जास्त फांद्या, जास्त फुटवे आणि जास्त पानं येतात.
📍 सोपं उदाहरण :- भात (Paddy) किंवा गहू (Wheat) या पिकांमध्ये एका रोपातून अनेक नवीन रोपे (फुटवे) तयार होतात. हे काम सायटोकाइनिनमुळे होतं.
📍 व्यावहारिक उपयोग :- जेव्हा भात किंवा गव्हाला फुटवे फुटायला सुरुवात होते, त्या वेळी याची फवारणी केल्यास प्रति रोप फुटव्यांची संख्या वाढते. यामुळे तुम्हाला प्रति एकर जास्त दाणे मिळतात.
🔆 पानांचा हिरवेपणा (पिकाचं तारुण्य)
सायटोकाइनिन हे पिकाला ‘म्हातारपण’ येऊ देत नाही. ते पानांमध्ये असलेलं क्लोरोफिल (Chlorophyll – हिरवा रंग) लवकर खराब होऊ देत नाही.
📍 फायदा :- पानं जास्त दिवस हिरवी राहिल्यास, ती जास्त काळ अन्न (शक्ती) तयार करतात.
📍 शेतकऱ्यांसाठी महत्त्व :- जेव्हा पीक काढणीच्या जवळ येतं आणि पानं पिवळी पडायला लागतात, तेव्हा सायटोकाइनिनची फवारणी केल्यास पानं अजून काही दिवस हिरवी राहतात. यामुळे दाणे भरण्याच्या शेवटच्या टप्प्यातही पिकाला पूर्ण पोषण मिळतं आणि दाण्याचं वजन वाढतं.
🔆 अन्न-पदार्थांचे वहन (पोषण वळवणे)
सायटोकाइनिन हे पिकाच्या शरीरातील पोषण (खाद्य) जिथे जास्त गरज आहे, तिथे वळवण्याचं काम करतं.
📍 सोपं उदाहरण :- जेव्हा फळं मोठी होत असतात, तेव्हा हे हार्मोन खोड आणि जुन्या पानांमधलं पोषण उचलून थेट त्या फळांकडे किंवा दाण्यांकडे पाठवतं.
📍 परिणाम :- यामुळे फळांना चांगला आकार, वजन आणि चकाकी मिळते.
🔆 रोगांशी लढण्याची ताकद
काही अभ्यासांनुसार, सायटोकाइनिन पिकाला ताण (Stress) आणि रोगांशी लढण्याची ताकद (Immunity) देते, विशेषतः दुष्काळ किंवा जास्त उष्णतेच्या परिस्थितीत.
♻️ भाग – ३ :- ‘जुगलबंदी’ – ऑक्सिन्स आणि सायटोकाइनिनचा समतोल
शेतकरी मित्रांनो, ही दोन हार्मोन्स एकमेकांविरुद्ध काम करत नाहीत, तर ते एकमेकांना मदत करतात. त्यांचा समतोल (Balance) राखणं हीच खरी शेतीतली कला आहे.