krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

WhatsApp University vs Nagpur Board : याला असे म्हणायचे का पटवे साहेब? ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी विरुद्ध नागपूर बोर्ड!’

1 min read

प्रति,
मा. अध्यक्ष साहेब,
विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर.
विषय : तुमच्या ‘पारदर्शक’ यंत्रणेच्या फुटलेल्या पेपरवर आणि पालकांच्या ‘न फुटणाऱ्या’ धैर्यावर थोडे बोलण्याबाबत…
सप्रेम नमस्कार, साहेब!
सध्या नागपुरात सुरू झालेल्या उन्हाच्या चटक्यांपेक्षा तुमच्या शिक्षण मंडळाच्या (Nagpur Board) ‘हॉट’ चर्चांचीच जास्त वाफ निघते आहे. बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ असतो, असे आपण दरवर्षी मोठ्या कौतुकाने भाषणांतून सांगता. पण साहेब, सध्या हा टर्निंग पॉइंट अभ्यासाच्या टेबलावरून घसरून थेट व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) ‘फॉरवर्ड’ मेसेजवर येऊन थांबला आहे. या प्रगत तंत्रज्ञानाचे आणि तुमच्या यंत्रणेच्या ‘गतिमानते’चे कौतुक करावे की कीव, हेच कळत नाहीये. साहेब, तुमचे ‘कडक सुरक्षा कवच’ आणि ‘गोपनीयतेचे पोकळ दावे’ एखाद्या सुईने फुगा फुटावा तसे हवेत विरले आहेत. रसायनशास्त्राचा पेपर फुटला, भौतिकशास्त्राचाही फुटला; आता फक्त तुमच्या यंत्रणेच्या उरल्यासुरल्या अब्रूचा पेपर फुटायचा बाकी आहे. मुले रात्रभर जागून ‘अभिक्रिया’ पाठ करत होती आणि इकडे व्हॉट्सॲपवर तुमच्या सिस्टीमच्या चुकीच्या ‘रिॲक्शन’मुळे प्रश्नपत्रिकांची उत्तरे आधीच नाचत होती. किती हा भयंकर विरोधाभास.

तुमची ‘ॲक्शन मोड’मधील कारवाई बघून खरे तर थोडे हसूच आले. सेंट उर्सुला केंद्रावरील 21 पर्यवेक्षकांना तडकाफडकी बदलले म्हणजे नक्की काय साध्य केले? हा प्रकार म्हणजे ‘घर जळताना वासे मोजण्या’सारखा आहे. त्या 21 जणांना बदलून तुम्ही व्यवस्थेचे ‘गंगाजलाने शुद्धीकरण’ केले की केवळ लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी ‘पत्ता बदल’ केला? साहेब, मूळ प्रश्न हा आहे की, ज्या कस्टोडियन, रनर आणि केंद्रप्रमुखांच्या लोखंडी त्रिकोणातून सीलबंद पेपर येतो, तिथे भगदाड पडले कसे? की तुमच्या या त्रिकोणात एखादा ‘चतुष्कोण’ किंवा ‘गुप्त रस्ता’ तयार झाला आहे, ज्याची चावी निशिकांत मूलसारख्या ‘छोट्या मोहरां’कडे इतक्या सहजासहजी लागते? निशिकांत तर केवळ एक टपाल पोहोचवणारा ठरला, पण हा टप्पा गाठण्यापूर्वी पेपर नक्की कोणाच्या पदराखालून बाहेर पडला, हे सांगण्याचे धाडस नागपूर बोर्ड दाखवणार आहे का?

आता तुमची ‘तोंडी परीक्षा’ सुरू झाली आहे. पण भीती एकच आहे, दरवेळेप्रमाणे तुम्ही ‘मॉडेल आन्सर’ (नेहमीची गुळगुळीत आणि छापील उत्तरे) वाचून दाखवाल. ‘चौकशी समिती नेमली आहे’, ‘दोषींवर कठोर कारवाई करू’, ‘यंत्रणा अधिक सक्षम करू’… साहेब, ही तुमची स्क्रिप्ट आता जुनी झालीय, लोक ही ‘रिव्हिजन’ ऐकून विटले आहेत. पालकांना आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता हे ‘रटाळ रिव्हिजन’ नकोय, त्यांना ठोस ‘रिझल्ट’ हवा आहे. एक घरगुती शिकवणी घेणारा शिक्षक जर राजरोसपणे पेपर वाटण्याची हिंमत करतो, तर तुमच्या मंडळाच्या ‘गोपनीय’ लॉकरच्या चाव्या नक्की कुणाकुणाच्या खिशात मुक्कामाला आहेत? ही ‘चेन’ निशिकांतवर संपते की तिचे धागेदोरे मंत्रालयाच्या वातानुकूलित दालनापर्यंत पोहोचतात, हे शोधण्याचे धाडस तुम्ही दाखवाल का? की फक्त ‘विद्यार्थिनीची प्रसाधनगृहात झडती घेतली’ एवढ्यावरच तुमचे शौर्य संपणार?

सांभाळा साहेब! ज्या पोरांनी वर्षभर क्लासच्या भरमसाठ फी भरल्या, डोळ्यांत तेल घालून अभ्यास केला, त्यांच्या विश्वासाचा निकाल तुमच्या हातात आहे. ज्यांनी रात्र-रात्र जागून कागद काळे केले, त्यांच्या कष्टाची थट्टा तुमच्या या खिळखिळ्या यंत्रणेने मांडली आहे. जर ही गुन्हेगारी साखळी तुम्ही मुळासकट तोडू शकला नाहीत, तर उद्या लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी म्हणतील, ‘अभ्यास कशाला करता? फक्त एक चांगला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा!’ शिक्षण क्षेत्रातील ही ‘व्हायरल’ झालेली कीड जर आताच ठेचली नाही, तर गुणवत्तेचा गळा घोटला जाईल.
तुमच्याकडून विद्यार्थ्यांना ‘ग्रेस मार्क्स’ नकोत, तर सडलेल्या व्यवस्थेचे ‘शुद्धीकरण’ हवे आहे. जनतेसमोर ‘मॉडेल उत्तरे’ वाचून दाखवू नका, तर मूळ आणि संपूर्ण सत्य मांडा. कारण आता पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या संयमाची ‘एक्सपायरी डेट’ संपत आली आहे. साहेब, ही केवळ पेपरफुटी नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची झालेली राखरांगोळी आहे. तुमच्या पुढील ‘तपासाच्या फारसाला’ आणि ‘प्रशासकीय कसरतीला’ खूप खूप शुभेच्छा! आता तरी मॉडेल उत्तरे वाचण्यापेक्षा मूळ उत्तर शोधण्याचे धाडस दाखवाल, अशी अपेक्षा आहे.

आपलाच,
एक त्रस्त पालक आणि सजग नागरिक.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!