krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Ethanol’s Political Flare-up : इथेनॉलचा राजकीय भडका

1 min read

Ethanol’s Political Flare-up : इथेनॉल (Ethanol) एक अती ज्वलनशील (Highly flammable) पदार्थ आहे. आगीच्या संपर्कात आला की, पेट घेते किंवा त्याचा स्फोट (Explosion) होतो. याच गुणधर्मामुळे त्याचा इंधन (Fuel) म्हणून वापर, जगभरात अनेक वर्षांपासून होत आहे. भारतात इथेनॉलचा वापर सन 2001 पासून सुरू झाला. पेट्रोलमध्ये (Petrol) 5 टक्क्यांपासून सुरुवात होऊन आता 20 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित केले जात आहे. E-20 पेट्रोल या नावाने प्रचलित असलेल्या या इंधनाबाबत आता मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. इथेनॉल हे कुठल्याही सडणाऱ्या वस्तूपासून तयार करता येते. पण व्यावसायिक वापरासाठी ऊस, बीट, मका, तांदूळ इत्यादी धान्याचा उपयोग केला जातो. साखर कारखान्यात तयार होणाऱ्या मळी (Molasses) पासून सुरुवातीला इथेनॉल तयार केले जात असे. मागणी वाढल्यानंतर थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार केले जाऊ लागले. आता धान्यापासून सुद्धा ते तयार होत आहे.

🔳 शेतकरी तयार करू शकतो ‘शेत तेल’
शेतकरी नेते शरद जोशी यांनी सन 2008 या वर्षी शेतकरी संघटनेचे एक अधिवेशन, खास इथेनॉल व एरोपोनिक्स (Aeroponics) या अद्यावत शेतीची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी घेतले होते. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना स्वतःला इथेनॉल तयार करण्याची परवानगी द्या, अशी सरकारकडे मागणी केली होती. शेतकरी स्वतः शेतीमाल व शेतात वाया जाणाऱ्या काडी कचऱ्यापासून इंधन तयार करतील व स्वतः विकतील, अशी त्यांनी मांडणी केली होती. इथेनॉल निर्मिती व विक्रीची सरकारने परवानगी न दिल्यास शेतकऱ्यांनी दारूची हातभट्टी लावतात, तशी छोटी उपकरणे तयार करून इथेनॉल विकण्याचे आंदोलन दिले होते. इथेनॉल हे अल्कोहोलच (Alcohol) असते. 100 टक्के शुद्ध अल्कोहोल म्हणजे इथेनॉल. तयार करण्याची प्रक्रिया एकच आहे. या इंधनाला शरद जोशींनी ‘शेत तेल’ (Farm oil) असे नाव दिले होते. यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल, देशाचे इंधनासाठी इतर देशांतील खनिज तेल वरील अवलंबित्व कमी होईल, खर्च होणारे डॉलर वाचतील असा त्या मागचा हेतू होता.

🔳 ऊस उत्पादकांच्या नफ्याची चोरी
सध्या बरेच साखर (Sugar) कारखाने इथेनॉल तयार करतात. प्रामुख्याने, उसाच्या रसातून साखर काढून घेतल्यानंतर जी मळी उरते, त्यातील अल्कोहोलचा अंश, ऊर्ध्वपातन (Distillation) करून अल्कोहोल व त्यापासून इथेनॉल तयार केले जाते. या उद्योगातून मिळणारा अतिरिक्त नफा मात्र ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचत नाही, अशी ओरड शेतकरी नेहमीच करत आले आहेत. साखर कारखान्यातील उप पदार्थांचा हिशोबच साखर कारखाने देत नाहीत, असा आरोप केला जातो.

🔳 इंधन म्हणून इथेनॉल उत्तम
भारतातील वाहन चालकांकडून सध्या खूप मोठ्या प्रमाणात गाड्या खराब होणे व बंद पडण्याच्या तक्रारी येत आहेत. E-20 पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब होत आहेत व मायलेज पण कमी मिळत असल्याच्या तक्रारी वाहनधारक करत आहेत. त्यात तथ्य ही आहे. असे का झाले? तर आपण आपली वाहने त्या प्रकारच्या इंधनासाठी तयार नसताना जास्त प्रमाणात इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळायला सुरुवात केली. इथेनॉल इंधन म्हणून खराब असते तर इतर देशात ते स्वीकारले नसते. ब्राझीलमध्ये तर 100 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने आहेत. त्यांनी अनेक वर्षे संशोधन करून त्या क्षमतेची वाहनाची इंजिन तयार केली आहेत. दोष इंधन म्हणून इथेनॉलचा नाही, सरकारने केलेली घाई अंगाशी आली आहे.

🔳 राजकीय भडका
इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे त्रस्त झालेल्या जनतेला सक्तीने E-20 पेट्रोल घ्यायला भाग पाडले जात आहे याचा राग आहे. प्रवासाचा खर्च वाढला व वाहने दुरुस्तीचा खर्च ही वाढला आहे. इतकेच काय, शेतकरी आपल्या पिकांवर कीटकनाशक, तणनाशक फवारणीसाठी पेट्रोलचे पंप वापरतात, ते शेतकरी ही इंजिनमधील (Engine) कार्बोरेटर (Carburetor) वारंवार खराब होत असल्याच्या तक्रारी करत आहेत. त्रस्त झालेली जनता आता उघडपणे अशा पेट्रोलला विरोध करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, हे गेली अनेक वर्षे, इथेनॉलचे फायदे जाहीरपणे सांगत होते व त्यामुळे पेट्रोल स्वस्त मिळेल, असे ही सांगत होते. आता ना पेट्रोल स्वस्त झाले, ना वाहनाचे इंजिन सुरक्षित राहिले, ना शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. नितीन गडकरी यांच्याकडे पेट्रोलियम खाते नसताना, केवळ इथेनॉलचा अतिरेकी पुरस्कार केल्यामुळे त्या वह्या गळ्यात ही घोंगडे पडले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. खरे तर, इथेनॉल हे खरोखर शेतकऱ्यांच्या व देशाच्या फायद्याचे आहे. मात्र, केवळ त्या दर्जाची इंजिन तयार न करता इथेनॉल विकण्याची घाई केल्यामुळे आज ही संकट उभे राहिले आहे. ज्या उद्योजकांनी कोट्यवधी रुपये गुंतवून इथेनॉल निर्मितीचे कारखाने टाकले, त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असेल. सरकारने ब्राझील सारख्या देशातून इथेनॉलवर व्यवस्थित चालणारे इंजिन तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. असे झाले तरच अन्नदात्याला ऊर्जादाता होता येईल व देश इंधनाच्या बाबतींत आत्मनिर्भर होईल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!