Rain Forecast : आगामी पाच दिवस पाऊस कसा असेल?
1 min read
Rain Forecast : आज (गुरुवार, दि. 13 ऑगस्ट) पासून पुढील पाच दिवस म्हणजे सोमवार (दि. 17 ऑगस्ट)पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण, विदर्भ, खानदेश तसेच नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर या 27 जिल्ह्यात मध्यम (Moderate) ते मुसळधार (Heavy) पावसाची (Rain) शक्यता (Possibility) जाणवते. दरम्यानच्या काळात, उर्वरित मराठवाडा आणि अहिल्यानगर व सोलापूर या 9 जिल्ह्यात मात्र केवळ तुरळक (Scattered rain) तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
🔷 मान्सूनची महाराष्ट्रात सक्रियता कशामुळे?
विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पाऊस सक्रीय झाला आहे. याची कारणे…
🔆 सध्या मान्सूनचा आसाचे पश्चिमेकडील टोक त्याच्या नेहमीच्या सरासरी जागेपेक्षा उत्तरेकडे तर पूर्वेकडील टोक दक्षिणेकडे झुकलेले आहे. आज (गुरुवार, दि. 13 ऑगस्ट) मान्सूनचा आस तो फिरोझपूर, मुझफ्फरनगर, बाराबंकी, देहरी या शहरांवरून समुद्र सपाटीपासून दीड किमी उंचीपर्यंतच्या हवेच्या जाडीत असून, तो वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचला आहे.
🔆 वाऱ्याचा उभा शिअर झोन (Shear zone) (एकमेकांविरुद्ध वाहणारे वारे) महाराष्ट्राच्या साधारण 22 डिग्री उत्तर म्हणजेच साधारण नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांच्या वरून अक्षवृत्तावर समुद्र सपाटीपासून 3.1 ते 7.6 किमी उंच अशा साडेचार किमी हवेच्या जाडीत पूर्व-पश्चिम पसरल्यामुळे व त्यातूनच त्या उंचीवर तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून मुंबईसह संपूर्ण कोकण, विदर्भ, खानदेश तसेच नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर या 27 जिल्ह्यात काहीशी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
🔷 उर्वरित ऑगस्टमध्ये पावसाची वातावरणीय शक्यता
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रातील पश्चिमी मान्सुनी वाऱ्यांना बळकटी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वारे अधिक दक्षिण-वायव्येकडे सरकल्यास ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण होवू शकते. अर्थात याला ‘जर-तर’चे कंगोरे आहे. पुढील निरीक्षणांतीच ते नंतर ठरवता येईल.