Drought Orange Orchards : भूजल आटले, संत्रा बागा उद्ध्वस्त!
1 min read
Drought Orange Orchards : यावर्षीचा कमी पाऊस, त्यातच दिवसागणिक खालावत चाललेली भूजल (Groundwater) पातळी यामुळे विदर्भातील संत्रा (Orange), माेसंबी (Sweet lime – Mosambi) व लिंबू (Lemon) तसेच मराठवाड्यातील माेसंबी व लिंबाच्या बागांच्या सिंचनासाठी (Irrigation) पाणी हळूहळू मिळेनासे हाेत आहे. राज्य सरकार या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वेळीच याेग्य उपाययाेजना करायला तयार नसल्याने महाराष्ट्रातील संत्रा, माेसंबी व लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. विहिरी आणि बोअरवेल्स कोरड्या पडल्याने बागा जगविण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. परिणामी, संत्रा उत्पादकांना पक्व होण्यापूर्वीच मृग बहाराची संत्री झाडावरून तोडून फेकावी लागत आहेत. पुरेसे पाणी न मिळाल्याने अंबिया बहाराच्या संत्र्यांचा आकार देखील वाढला नाही. दुष्काळामुळे (Drought) या बागा वाळल्यास विदर्भातील शेतकऱ्यांचे दरवर्षी सरासरी 8,140 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
🍊 मृग बहाराची संत्री तोडून फेकली
संत्र्याला अंबिया व मृग या दाेन बहारांची फळे येतात. अंबियाच्या तुलनेत मृग बहाराच्या संत्र्याला चांगले दर मिळतात. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात झाडांना ताण देणे धाेकादायक असल्याने तसेच मृग नक्षत्रात पावसाची शाश्वती नसल्याने बहुतांश बागायतदार अंबिया बहाराचे तर काही मृग बहाराच्या संत्र्याचे उत्पादन घेतात. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने अंबिया बहाराच्या संत्र्यांचा आकार पुरेशा प्रमाणात वाढला नाही. दुसरीकडे, विहिरी व बाेअरवेल्सनी ऑक्टाेबर 2026 च्या शेवटच्या आठवड्यापासून तळ गाठायला सुरुवात केल्याने अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील जरुड, मांगरुळी, वावरुडी, लोणी, टेंभूरखेडा, गव्हाणकुंड, बाहदा, इसंब्री, बेनोडा (शहीद), पडसोना आणि मांगोना, मोर्शी तालुक्यातील सालबर्डी, पाडा, डोंगरयावली, घोडदेव आणि हिवरखेड या गावांसह चांदूरबाजार आणि अचलपूर, तसेच नागपूर जिल्ह्यातील नरखेड व वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी त्यांच्या बागांमधील मृग बहाराची संत्री (माेठ्या आवळ्याच्या आकाराची) पक्व होण्यापूर्वीच तोडून फेकली आहेत. यावर्षी संत्र्याचे उत्पादन मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी असून, दर मात्र चांगले आहेत.
🍊 दुष्काळाचा फटका किती मोठा?
महाराष्ट्रात किमान 2 लाख हेक्टरवर नागपुरी संत्रा बागा आहेत. यातील 1 लाख 80 हजार संत्रा बागा विदर्भात असून, 1 लाख 60 हजार हेक्टरमधील संत्रा बागा या उत्पादनक्षम आहेत. या बागांपासून दरवर्षी किमान 7.50 ते 8 लाख टन संत्र्याचे उत्पादन होते. यात सरासरी 4.50 ते 5 लाख टन अंबिया आणि 2.50 ते 3 लाख टन मृग बहाराच्या संत्र्याचा समावेश आहे. संत्रा बागेतून प्रतिहेक्टरी दरवर्षी सरासरी 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, अशी माहिती संत्रा बागायतदारांनी दिली. राज्यात 90 हजार हेक्टरवर मोसंबीच्या बागा असून, जवळपास 80 हजार हेक्टरमधील बागा उत्पादनक्षम आहेत. माेसंबीच्या सर्वाधिक बागा मराठवाड्यात असून, त्याखालाेखाल विदर्भात आहेत. राज्यात 33 हजार हेक्टरवर लिंबाच्या बागा असून, यातील किमान 29 हेक्टरवरील बागा या उत्पादनक्षम आहेत. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या 305 तालुक्यांमधील अनेक भागांत या फळबागांचे क्षेत्र असल्याने या बागांवर दुष्काळाचे सावट आहे.
🍊 बागायतदारांचे नुकसान
🔆 संत्रा
संत्र्याचे दरवर्षी प्रतिहेक्टर किमान 5.5 लाख रुपयांचे उत्पन्न हाेते. पाण्याअभावी संत्र्याच्या 1.48 लाख हेक्टरवरील बागा वाळल्यास संत्रा बागायतदारांचे वार्षिक किमान 8,140 काेटी रुपयांचे नुकसान हाेईल.
🔆 माेसंबी
मोसंबीचे प्रती हेक्टरी सरासरी 5 लाख रुपयांचे उत्पन्न होते. पाण्याअभावी राज्यातील 80 लाख हेक्टरवरील मोसंबी बागा वाळल्यास मोसंबी उत्पादकांचे वर्षाकाठी सरासरी 4,000 काेटी रुपयांचे नुकसान हाेईल.
🔆 लिंबू
लिंबाचे प्रति हेक्टरी सरासरी 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. या बागा वाळल्यास लिंबू उत्पादकांचे वार्षिक सरासरी 2,100 कोटी रुपयांचे नुकसान होईल.
🍊 बागा जगविण्यासाठी पाणी आणायचे कुठून?
यंदा कमी पावसामुळे संत्रा आणि मोसंबी पट्ट्यातील भूजल पातळी कमालीची खालावली आहे. विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे धरणे आणि तलावांमधील पाणी फळबागांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक धरणे व तलावांमधील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही किंवा औद्याेगिक वापराला दिले जात नाही. बाष्पीभवनामुळे यातील पाणी हळूहळू कमी हाेत आहे. सरकारने या मागणीला बगल देत नवीन बोअरवेल्स खोदण्यास मुदतवाढ दिली. नवीन बाेअरवेल खाेदण्यावर लादण्यात आलेली बंदी उठवावी, यासाठी बाेअरवेल्स मशीन मालकांच्या हस्तकांनी हालचाली सुरू केल्या हाेत्या. याला सरकारने मुदतवाढ देताच बोअरवेल्स मशीन मालकांनी दुष्काळाकडे संधी म्हणून बघत त्यांचे दर प्रति फूट 125 रुपयांवरून 275 रुपये केले आहेत. त्यामुळे 500 फूट बाेअरवेल खाेदायला येणार किमान 2.50 लाख रुपयांचा खर्च आता दुपटीपेक्षा अधिक वाढला असून, बाेअरवेलच्या खाेलीनुसार खर्चही वाढत जाताे. बागा जगविण्यासाठी लागणारे पाणी तसेच बाेअरवेल खाेदायला लागणारा पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न बागायतदारांसमाेर उभा ठाकला आहे. सत्ताधारी नेत्यांनी या मुदतवाढीच्या निर्णयाचा माेठा गाजावाजा केला असला तरी हा निर्णय शेतकऱ्यांच्या काडीच्याही फायद्याचा नाही. या दुष्काळात सरकारला शेतकऱ्यांची खरच चिंता हाेती तर त्यांनी धरण व तलावांमधील पाणी बागांच्या सिंचनासाठी तातडीने उपलब्ध करून दिले असते.
🍊 बागा वाळल्यास बागायतदार आठ वर्षे मागे नुकसान
संत्रा, मोसंबी आणि लिंबाच्या बागा लागवडीनंतर साधारणत: 6 वर्षांनी उत्पादनक्षम होतात. त्यामुळे एकदा बाग वाळली की नव्याने कलमांची लागवड करून उत्पादन व उत्पन्न सुरू होण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करून पुन्हा 6 ते 7 वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रभावी सरकारी उपाययोजना न झाल्यास तसेच बागा वाळल्यास संत्रा, माेसंबी व लिंबू बागायतदार किमान 8 वर्षे मागे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पाण्याअभावी नागपूर, अमरावती, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या मोसंबी बागा तोडून फेकायला सुरुवात केली आहे.
©️ मातीतलं अर्थकारण