Refined edible oil blended palm oil : पामतेलमिश्रित रिफाइन खाद्यतेल ‘स्लाे पाॅइझन’
1 min read
Refined edible oil blended palm oil : तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी अन्न व औषधी प्रशासन (FDA – Food and Drug Administration) विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दुधासह विविध खाद्यपदार्थांमधील भेसळीला आळा घालण्यासाठी राज्यभर धाडी टाकायला आणि भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली. त्यांच्या या धाडी व कारवाईचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे आणि ते याेग्यही आहे. या सर्व घडामोडींमध्ये विविध कंपन्यांच्या रिफाइन खाद्यतेलांमध्ये (Refined edible oil) पामतेल (palm oil) आणि काही घातक रसायने (Hazardous chemicals) मिसळली जातात, त्या पामतेलातील घटक व रसायनांचा मानवी आरोग्यावर हळूहळू घातक परिणाम होत असल्याने विविध आजार व त्यामुळे मृत्यूचे प्रमाण तसेच नागरिकांचा वैद्यकीय खर्च वाढत चालला आहे, यावर कुणीही गांभीर्याने विचार करायला आणि त्या सरकारमान्य भेसळीला (Adulteration) कायमस्वरूपी आळा घालायला का तयार नाही?
♻️ खाद्यतेलांमध्ये पामतेल का मिसळतात?
सन 1970 च्या दशकापर्यंत भारतात तेलबिया व खाद्यतेलाचे उत्पादन कमी असल्याने देशाला खाद्यतेलाची आयात करावी लागायची. ही आयात सरकारी नियंत्रणाखाली स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (STC – State Trading Corporation)च्या माध्यमातून केली जायची. नागरिकांना शिधापत्रिकांवर रेशेनिंग दुकानांमधून पामाेलिन तेल दिले जायचे. पिवळ्या क्रांतीमुळे सन 1986 ते 1994 काळात भारत खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. त्यानंतर हळूहळू खाद्यतेलाची मागणी व वापर वाढत गेला आणि उत्पादन घटत गेले. ही तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने तेलबिया (Oilseeds) आणि खाद्यतेलाचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्याऐवजी आयातीला (Imports) प्राधान्य दिले. खाद्यतेलासह शेतमालावर आधारित इतर वस्तूंच्या किमती वाढायला सुरुवात हाेताच विराेधी पक्ष महागाई वाढल्याची ओरड करतात तर दुसरीकडे मतांच्या राजकारणासाठी केंद्र सरकार व सत्ताधारी नेते नागरिकांना स्वस्तात खाद्यतेल मिळावे, यासाठी शेतमाल बाजारात अवाजवी हस्तक्षेप करून पारंपरिक तेलबियांचे दर नियंत्रित करतात, किंबहुना पाडतात. बाजारात तेलबियांना उत्पादन खर्च भरून निघेल, एवढाही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक तेलबियांचे पेरणीक्षेत्र (Sown area) कमी केले. त्यामुळे तेलबिया व खाद्यतेलाचे उत्पादन सातत्याने कमी होत गेले आणि देशाचे खाद्यतेलाचे परावलंबित्व वाढत चालले आहे. लोकसंख्येसोबत खाद्यतेलाचा वापर आणि तूट वाढत गेली. ही तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 23 एप्रिल 1990 रोजी रिफाइन खाद्यतेलात 5 टक्के पामतेल मिसळण्याची अधिकृत परवानगी दिली.
♻️ खाद्यतेलातील भेसळीचा प्रवास
प्रत्येक रिफाइन खाद्यतेलात पामतेल मिसळणे ही सरकारमान्य भेसळ होय. सन 1990 ते 2000 या काळात रिफाइन खाद्यतेलात 5 टक्के पामतेल मिसळले जायचे. सन 2001 ते 2010 या काळात रिफाइन खाद्यतेलातील पामतेलाचे प्रमाण 7 टक्के झाले, तर 2011 ते 2015 या काळात 10 टक्के, 2016 ते 2020 या काळात 25 टक्के, 2021 ते 2024 या काळात 35 टक्के आणि 2025 पासून हेच प्रमाण 50 टक्क्यांवर पोहोचले आहे. वास्तवात, बहुतांश कंपन्या रिफाइन खाद्यतेलात 70 ते 80 टक्क्यांपर्यंत पामतेल मिसळतात. या गंभीर आणि जीवघेण्या प्रकाराकडे शासन, प्रशासन व नेत्यांसह इतर कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. जागतिक बाजारात इतर तेलबिया आणि खाद्यतेलाच्या तुलनेत ऑइल पाम आणि पामतेलाचे दर खूप कमी असतात. त्यामुळे केंद्र सरकार पामतेलाच्या आयातीला आणि कंपन्या हेच तेल रिफाइन खाद्यतेलात मिसळण्याला प्राधान्य देत असल्याने भारतात पामतेलाचा वापर व आयात वाढत आहे.
♻️ पामतेलातील घटक व त्याचे मानवी आरोग्यावरील परिणाम
🔶 पामिटिक ॲसिड
पामतेलात जवळपास 50 टक्के संपृक्त मेद (Saturated Fatty Acids) आणि 44 ते 45 टक्के पामिटिक ॲसिड (Palmitic Acid) असते. ते यकृतातील एलडीएल रिसेप्टर्सची (LDL Receptors) कार्यक्षमता कमी करते. त्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) साचून राहत असल्याने रक्तातील LDL (Low-Density Lipoprotein)चे प्रमाण वाढते. रक्तातील अतिरिक्त LDL कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन होऊन रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर चरबीचे थर अर्थात प्लाक्स (Plaques) साचू लागतात. त्यामुळे रक्तवाहिन्या कडक व अरुंद होतात आणि उच्च रक्तदाब (Hypertension), कार्डियाक अरेस्ट (Cardiac arrest) आणि हार्ट अटॅकचा (Heart attack) धोका अनेक पटींनी वाढतो.
पामतेलाला शुद्ध (Refine) व गंधहीन करण्यासाठी उच्च तापमानात (200°C पेक्षा जास्त) प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेदरम्यान MCPD (monochloropropane, diol) व Glycidyl Fatty Acid Esters (GE) ही दाेन घातक उप-उत्पादने (Carcinogens) तयार हाेतात. जागतिक आरोग्य संघटना (WHO) व EFSA (European Food Safety Authority) च्या अभ्यासानुसार, MCPD आणि GE हे घटक कार्सिनोजेनिक (Carcinogenic) म्हणजेच कॅन्सरला कारणीभूत ठरणारे तसेच यकृत व मूत्रपिंडासाठी (Kidney) विषारी (Toxic) मानले गेले आहेत.
पामिटिक ॲसिड मानवी शरीरातील पेशींच्या पातळीवर इन्सुलिन सिग्नलिंग (Insulin signaling) मध्ये अडथळा निर्माण करते. त्यामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणे बंद करतात. याला इन्सुलिन रेझिस्टन्स (Insulin Resistance) म्हणतात. परिणामी, स्वादुपिंडाला (Pancreas) जास्त इन्सुलिन (Insulin) तयार करावे लागते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित न राहिल्याने टाईप-2 मधुमेहाचा (Type-2 Diabetes) धोका वाढतो.
1 ग्राम पामतेलातून जवळपास 9 कॅलरीज मिळतात. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये (फरसाण, बिस्किटे, वेफर्स) पामतेल भरपूर असल्याने नकळत अतिरिक्त कॅलरीज पोटात जातात. संपृक्त मेदाचे विघटन सहजासहजी होत नसल्याने ते पोटातील अवयवांभोवती (Visceral Organs) साचू लागते. याला विसेरल फॅट (Visceral Fat) असे संबाेधले जाते. यकृतामध्ये ट्रायग्लीसराईड्स (Triglycerides) व अतिरिक्त चरबी साचल्याने फॅटी लिव्हरची (NAFLD – Non-Alcoholic Fatty Liver) समस्या उद्भवते आणि यकृताला सूज येऊ शकते. यातून वजन वाढण्याची समस्या उद्भवते.
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा-6 आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिडचे संतुलन आवश्यक असते. पामतेलामध्ये ओमेगा-6 चे प्रमाण जास्त आणि ओमेगा-3 चे प्रमाण अत्यंत नगण्य असते. हा असंतुलित आहार शरीराच्या उतींमध्ये (Tissues) Pro-inflammatory Molecules (Cytokines, TNF-alpha) चे प्रमाण वाढवतो. त्यामुळे सांधेदुखी, रक्तवाहिन्यांमधील सूज (Chronic Systemic Inflammation) आणि चयापचयाचे आजार (Metabolic Syndrome) बळावतात.
🔶 स्टेअरिक ॲसिड
पामतेलात स्टेअरिक ॲसिड (Stearic Acid) अर्थात ऑक्टाडेकानॉईक ॲसिड (Octadecanoic Acid) चे प्रमाण 4 ते 5 टक्के असते. त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलवर पामिटिक ॲसिड इतका थेट वाईट परिणाम करत नसले, तरी अतिसेवनामुळे यकृतावर अतिरिक्त ताण येतो व पचनक्रिया मंदावते.
🔶 ओलेईक ॲसिड
पामतेलात ओलेईक ॲसिड (Oleic Acid – Monounsaturated Fat) अर्थात ऑक्टाडेसेनॉईक ॲसिड (Octadecenoic Acid)चे प्रमाण 39 ते 40 टक्के असते. हे ओमेगा-9 फॅटी ॲसिड शुद्ध स्वरूपात मानवी आरोग्यासाठी चांगले मानले जात असले तरी पामतेलातील अति-संपृक्त मेदामुळे (Palmitic Acid) चांगल्या गुणांचा प्रभाव नगण्य ठरतो.
🔶 लिनोलेईक ॲसिड
या तेलात लिनोलेईक ॲसिड (Linoleic Acid – Polyunsaturated Fat) म्हणजेच ऑक्टाडेकाडायएनॉईक ॲसिड (Octadecadienoic Acid)चे प्रमाण 9 ते 10 टक्के असते. हे ओमेगा-6 फॅटी ॲसिड असून, पामतेलामध्ये ओमेगा-3 चे प्रमाण नगण्य जमा असल्याने ओमेगा-6 आणि ओमेगा-3 चे संतुलन बिघडते. त्यामुळे रक्ताभिसरण संस्था व सांध्यांमध्ये तीव्र दाह/सूज (Inflammation) निर्माण होते. कच्च्या पामतेलामध्ये व्हिटॅमिन E (Tocotrienols) व कॅरोटीनॉइड्स असते. या तेलाच्या रिफाइंड आणि ब्लेंडिंग प्रक्रियेत हे सर्व पोषक घटक नष्ट होतात आणि केवळ पामिटिक ॲसिड व प्रक्रियेदरम्यान तयार झालेली विषारी रसायने (GE & 3-MCPD) उरतात.
♻️ रिफाइनिंगसाठी वापरले जाणारे घातक घटक
रिफाइन ऑइलमध्ये पामतेलासोबत रसायनांची (Chemicals) केली जाणारी ही अधिकृत व सरकारमान्य भेसळ मानव आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक व विविध आजारांना निमंत्रण देणारी आहेत, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांसह केमिस्टनी दिली आहे. रिफाइन तेल तयार करण्यासाठी पामतेलाचा ब्लेंडिंग (Blending) म्हणून वापर केला जातो. या पामतेलात आधीच डालडा व चरबीचा वापर केला जातो. केमिकल्स वापरल्याशिवाय तेल रिफाइंड होत नाही. सिंगल रिफाइंडसाठी गॅसोलिन (Gasoline), सिंथेटिक अँटी ऑक्सिडंटस् (Synthetic antioxidants), हेक्सेन (Hexane) यासह एकूण 7 तर डबल रिफाइंडमध्ये 14 घातक केमिकल्स वापरली जातात. या केमिकल्समुळे त्या तेलाचा वास येत नाही. चव आणि चिकटपणा नष्ट होतो. त्यात कोणतेही प्रोटीन (Protein), फॅटी ॲसिड (Fatty acids), व्हिटॅमिन ई (Vitamin E) व मिनरल्स (Minerals) तसेच मानवी आरोग्याला आवश्यक असलेले घटक शिल्लक राहत नाही. बहुतांश मंडळी त्यांच्या आरोग्याऐवजी गंध व चव रहित खाद्यतेल खाण्याला प्राधन्य देतात. जे लोकं कडक उपवास करतात व खनिज मीठ वापरतात त्यांनी तळण्यासाठी चुकूनही रिफाइन तेल वापरू नये, असा सल्लाही डॉक्टर देतात.
♻️ घातक दिशेने जाणारी आत्मनिर्भरता
भारताला सध्या एकूण गरजेच्या 62 ते 65 टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. खाद्यतेलाच्या एकूण आयातीत पामतेलाचा वाटा किमान 59 टक्के आहे. देशाचे खाद्यतेल परावलंबित्व दूर करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी केंद्र सरकारने 2021 मध्ये नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल्स-ऑइल पाम (NMEO-OP – National Mission on Edible Oils-Oil Palm) आणि 2024 मध्ये नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल्स-ऑइल सीड्स (NMEO-Oilseeds – National Mission on Edible Oils-Oilseeds)ची घाेषणा केली. या दाेन्ही मिशन अंतर्गत देशात ऑइल पाम लागवड आणि तेलबियांचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल्स-ऑइल पाम मिशनसाठी सरकारने 11,040 काेटी रुपयांची तरतूद केली असून, यात केंद्र सरकारचा वाटा 8,844 काेटी रुपयांचा तर राज्य सरकारचा वाटा 2,196 काेटी रुपयांचा आहे. हा निधी 2021-22 ते 2025-26 या 5 वर्षांसाठी मंजूर केला हाेता. नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल्स-ऑइल सीड्स मिशनसाठी केंद्र सरकारने (2024 ते 2031 या 7 वर्षांसाठी) 10,103 काेटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तर सरकारने बाजारात हस्तक्षेप व वायदेबंदी करून, खाद्यतेलाची आयात वाढवून तसेच स्टाॅक लिमिट लावून पारंपरिक तेलबियांचे दर वाढण्याचे उपद्व्याप अद्यापही बंद केले नाही. पारंपरिक तेलबिया उत्पादनाच्या तुलनेत ऑइल पाम उत्पादनाला झुकते माप दिले जात असल्याने केंद्र सरकारची ही खाद्यतेल आत्मनिर्भरता चुकीच्या व घातक दिशेने वाटचाल करीत आहे.
©️ मातीतलं विज्ञान