Rainfall Deficit : राज्यात पावसाची 17 टक्के तूट
1 min read
Rainfall Deficit : महाराष्ट्रात (Maharashtra) यंदाच्या पावसाळ्यात (Monsoon) पावसाचे वितरण (Rainfall distribution) अत्यंत विषम राहिले असून, 1 जून ते 17 सप्टेंबर 2026 या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत 17 टक्के पावसाची (Rainfall) तूट (Deficit) नोंदविली आहे. या कालावधीतील राज्यात सामान्य पर्जन्यमान (Normal Rainfall) 922.2 मिलिमीटर असून, राज्यात 768.5 मिलिमीटर पाऊस झाला. अर्थात राज्यात सरासरीपेक्षा सुमारे 153.7 मिलिमीटर कमी पाऊस झाला आहे. टक्केवारी हा पाऊस सामान्य पर्जन्यमानापेक्षा 17 टक्के कमी आहे.
🔳 यंदाच्या पावसाळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य
राज्यातील पावसाची 17 टक्के तूट ही संपूर्ण परिस्थितीचे एकसंध चित्र दाखवत नाही. जिल्हानिहाय आकडेवारी पाहिल्यास काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक पाऊस झाला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये तब्बल 40 ते 50 टक्क्यांहून अधिक पावसाची कमतरता आहे. त्यामुळे ‘पावसाची तूट’पेक्षा ‘पावसाचे अत्यंत विषम वितरण’ हे यंदाच्या पावसाळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे. राज्यातील चारही पर्जन्य विभागांची स्थिती वेगवेगळी आहे. मराठवाड्यात सर्वाधिक 38 टक्के तूट असून, त्यानंतर विदर्भात 25 टक्के, कोकण-गोवा विभागात 11 टक्के आणि मध्य महाराष्ट्रात 6 टक्के तूट नोंदविली गेली आहे, अशी माहिती हवामान साक्षरता अभियानाचे मुख्य प्रबंधक राहुल रमेश पाटील यांनी दिली.
🔳 मराठवाड्यात 38 टक्के तूट
मराठवाडा (Marathwada) हा यंदाच्या पावसाच्या तुटीचा सर्वाधिक फटका बसलेला विभाग ठरला आहे. या विभागाचे सामान्य पर्जन्यमान 574.3 मिलिमीटर असून, तुलनेत केवळ 356.8 मिलिमीटर पाऊस झाला म्हणजेच या विभागातील पावसाची तूट ही 38 टक्के तूट आहे. जिल्हानिहाय परिस्थिती आणखी गंभीर आहे. बीड जिल्ह्यामध्ये 52 टक्के तूट असून, हिंगोलीत 49 टक्के, जालना आणि धाराशिवमध्ये प्रत्येकी 46 टक्के, परभणीत 44 टक्के, लातूरमध्ये 37 टक्के आणि नांदेडमध्ये 32 टक्के पावसाची तूट नोंदविली आहे. या पावसाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील उपलब्ध जलसाठे, जमिनीतील ओलावा, पिकांची स्थिती आणि आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
📍 महाराष्ट्रातील विभागनिहाय पावसाची स्थिती
🔆 विभाग – प्रत्यक्ष पाऊस – सामान्य पाऊस – पावसाची तूट
🔆 कोकण-गोवा – 2,432.0 मिमी – 2,726.2 मिमी – 11 टक्के
🔆 मध्य महाराष्ट्र – 635.4 मिमी – 672.4 मिमी – 6 टक्के
🔆 मराठवाडा – 356.8 मिमी – 574.3 मिमी – 38 टक्के
🔆 महाराष्ट्र – 768.5 मिमी – 922.2 मिमी – 17 टक्के
(कालावधी 1 जून ते 17 सप्टेंबर 2026)
🔳 राज्यातील सर्वाधिक 57 टक्के तूट सोलापूर जिल्ह्यात
जिल्हानिहाय आकडेवारीत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 57 टक्के पावसाची तूट नोंदविली आहे. त्यामुळे सोलापूरची स्थिती राज्यातील पावसाच्या कमतरतेच्या दृष्टीने विशेष लक्षवेधी ठरते. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण सामान्य पर्जन्यमानापेक्षा कमी राहिले आहे. सांगली जिल्तह्यात पावसाची तूट 24 टक्के असून, सातारा जिल्ह्यात 23 टक्के आणि कोल्हापुरात 11 टक्के तूट नोंदविली गेली आहे. याशिवाय अहिल्यानगरमध्ये 42 टक्के आणि सोलापूरमध्ये 57टक्के तूट असल्याचे नकाशातील जिल्हानिहाय आकडेवारीतून दिसते. या भागासाठी केवळ पावसाची एकूण मात्रा नव्हे, तर पावसाचे कालावधीतील वितरण, पाणलोट क्षेत्रातील पाऊस, नद्या आणि धरणांतील उपलब्ध साठा यांचेही महत्त्व आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात कमी पाऊस असून, या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या वितरणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. विशेषतः खरीप हंगामातील पिकांची स्थिती, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि आगामी रब्बी पिकांसाठी लागणारे पाणी यांचा विचार करताना या पावसाच्या तुटीचा संदर्भ महत्त्वाचा आहे. कृष्णा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्र, धरणांमध्ये झालेला पाऊस आणि उपलब्ध जलसाठा यावरही आगामी पाणी नियोजन अवलंबून राहणार आहे. त्यामुळे केवळ जिल्ह्याच्या पावसाची टक्केवारी पाहण्याऐवजी स्थानिक पाणलोट क्षेत्रनिहाय परिस्थिती तपासणे आवश्यक ठरेल.
🔳 विदर्भात 25 टक्के तूट
विदर्भातही (Vidarbha) पावसाची परिस्थिती समाधानकारक नाही. विदर्भाचे सामान्य पर्जन्यमान 888.9 मिलिमीटर असले तरी या विभागात साडेतील महिन्यांमध्ये 669.1 मिलिमीटर पाऊस झाल्याने या विभागाची पावसाची तूट ही 25 टक्के नोंदविली आहे. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार अमरावती जिल्ह्यातील पावसाची तूट 38 टक्के असून, अकोला जिल्हा 36 टक्के, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये प्रत्येकी 30 टक्के, वर्धा जिल्हा 25 टक्के, गडचिरोली 22 टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची तूट 21 टक्के आहे. गोंदिया जिल्ह्यात मात्र सामान्यापेक्षा 4 टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे विदर्भातही जिल्हानिहाय पावसाचे वितरण एकसमान राहिलेले नाही.
🔳 कोकण-गोवा विभागात 11 टक्के तूट
कोकण-गोवा (Konkan-Goa) विभागात राज्यातील सर्वाधिक पर्जन्यमान नोंदविले आहे. या विभागाचे सामान्य पर्जन्यमान 2,726.2 मिलिमीटर असून, साडेतीन महिन्यांत 2,432 मिलिमीटर पाऊस झाला असून, पावसाची तूट ही 11 टक्के आहे. या विभागातही जिल्हानिहाय परिस्थितीत मोठा फरक आहे. पालघर जिल्ह्यात 27 टक्के अधिक पाऊस झाला असताना रत्नागिरीत 12 टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 35 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे कोकणात एकूण पाऊस मोठा असला तरी तो सर्व जिल्ह्यांमध्ये समान प्रमाणात झालेला नाही.
🔳 नाशिकमध्ये 43 टक्के तर पुण्यात 20 टक्के अधिक
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने मात्र सामान्य पर्जन्यमानापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा तब्बल 43 टक्के अधिक पाऊस झाला असून, पालघरमध्ये 27 टक्के आणि पुण्यात 20 टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा 4 टक्के अधिक पाऊस नोंदविला आहे. नाशिक आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांतील आकडेवारी विशेष लक्षवेधी आहे. एका बाजूला नाशिकमध्ये 43 टक्के अधिक, तर दुसऱ्या बाजूला सोलापूरमध्ये 57 टक्के कमी पाऊस अशी मोठी तफावत दिसून येते. यावरून राज्याची सरासरी तूट ही जिल्हानिहाय प्रत्यक्ष परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट करू शकत नसल्याचे दिसून येते.
📍 निवडक जिल्ह्यांतील पावसाची स्थिती
🔆 जिल्हा सरासरीच्या तुलनेत बदल
🔆 नाशिक :- +43 टक्के
🔆 पालघर :- +27 टक्के
🔆 पुणे :- +20 टक्के
🔆 कोल्हापूर :- -11 टक्के
🔆 सातारा :- -23 टक्के
🔆 सांगली :- -24 टक्के
🔆 सोलापूर :- -57 टक्के
🔆 बीड :- -52 टक्के
🔆 हिंगोली :- -49 टक्के
🔆 जालना :- -46 टक्के
🔆 धाराशिव :- -46 टक्के
🔆 परभणी :- – 44 टक्के
🔳 रब्बी हंगामासाठी पाण्याचे नियोजन महत्त्वाचे
यंदाच्या पावसाळ्याचे विश्लेषण करताना महाराष्ट्रात सर्वत्र कमी पाऊस झाला, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. राज्याच्या एकूण पावसात 17 टक्के तूट असली तरी नाशिक, पालघर, पुणे आणि गोंदिया यासारख्या काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दुसरीकडे सोलापूर, बीड, हिंगोली, जालना, धाराशिव, परभणी, अमरावती, अकोला यासारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची तूट आहे. त्यामुळे राज्याची सरासरी, विभागाची सरासरी आणि जिल्ह्याची प्रत्यक्ष परिस्थिती या तीनही पातळ्यांवर पावसाचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते. पावसाची तूट असलेल्या जिल्ह्यांमध्ये आगामी काळात उपलब्ध पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः जलाशयांतील पाणीसाठा, भूजलपातळी, जमिनीतील ओलावा, खरीप पिकांची सद्यस्थिती आणि रब्बी पिकांसाठी उपलब्ध पाणी या घटकांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. पावसाच्या तुटीचा शेतीवर होणारा परिणाम हा प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक पिकात वेगळा असू शकतो. त्यामुळे केवळ पर्जन्यमानातील टक्केवारीवर आधारित निष्कर्ष काढण्याऐवजी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास आवश्यक आहे. यंदाच्या पावसाचे चित्र ‘राज्यात सर्वत्र कमी पाऊस’ असे नसून, जिल्हानिहाय मोठी तफावत असलेले आहे. काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, तर काही जिल्ह्यांत पावसाची 40 ते 50 टक्क्यांहून अधिक तूट आहे. त्यामुळे पावसाचे विश्लेषण केवळ राज्याच्या सरासरीवर न करता विभागनिहाय, जिल्हानिहाय आणि पाणलोट क्षेत्रनिहाय करणे आवश्यक आहे, असे मत हवामान साक्षरता अभियानाचे मुख्य प्रबंधक राहुल रमेश पाटील यांनी व्यक्त केले.
©️ स्रोत :- IMD मुंबई – Seasonal Rainfall Summary | कालावधी : 1 जून ते 17 सप्टेंबर 2026 | आकडेवारी विश्लेषण : हवामान साक्षरता अभियान