krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Gen Z Generation : ‘जेन-झी’चा जन्म; पिढ्यांच्या नावाची कहाणी

1 min read

Gen Z Generation : नीट (NEET) पेपरफुटीवरून (Exam paper leak) दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर जुलै – 2026 मध्ये विद्यार्थ्यांचे (Students) आंदाेलन (Protest) झाले. सुरुवातीला केंद्र सरकार व देशातील मीडियाने दुर्लक्ष केल्याने आंदाेलन चिघळले आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून दिल्लीसाेबतच देशभरातील प्रमुख शहरांमध्ये निदर्शने केली. त्यांच्या हाती असलेल्या फलकांवरील विविध घाेषवाक्यांमुळे प्रस्थापितांना धक्का बसला तर अनेकांची झाेप उडाली आणि जेन-झी (Gen Z) हा शब्द पुन्हा एकदा सर्वत्र पसरला. या शब्दाची उत्पत्ती कशी, कुणी व कधी केली?

♻️ मानवी पिढ्यांचे वर्गीकरण व नामकरण
मानवी पिढ्यांचे वय आणि 15 वर्षांच्या कालखंडानुसार नामकरण करण्याच्या या आधुनिक वर्गीकरण पद्धतीचा शोध ऑस्ट्रेलियन समाजशास्त्रज्ञ आणि लोकसंख्याशास्त्रज्ञ (Demographer) मार्क मॅकक्रंडल (Mark McCrindle) यांनी लावला आहे. त्यांच्या मॅकक्रंडल रिसर्च (McCrindle Research) या संस्थेने या वर्गीकरण पद्धतीचा पाया रचला. जेव्हा 2010 च्या सुमारास जेन झी (Gen Z) नंतर येणाऱ्या नवीन पिढीसाठी काय नाव द्यावे, यावर चर्चा सुरू होती, तेव्हा मार्क मॅकक्रंडल यांनी ग्रीक मुळाक्षरांचा (Greek Alphabet) वापर करण्याचा प्रस्ताव मांडला. गणित व विज्ञानात ज्याप्रमाणे क्रमाने नाव देण्यासाठी अल्फा, बीटा, गॅमा वापरतात, तशीच रचना त्यांनी सामाजिक विश्लेषणात आणली. द एआय जनरेशन (AI Generation) किंवा डिजिटल जनरेशन (Digital Generation) अशी नावे दिल्यास ती काही काळाने जुनी वाटू शकतात. त्याऐवजी ग्रीक अक्षरे वापरल्यामुळे प्रत्येक पिढीला स्वतःची नवीन ओळख स्वतः निर्माण करता येते, असा युक्तीवादही मार्क मॅकक्रंडल यांनी केला.

♻️ कालखंड निश्चित
मॅकक्रंडल यांच्या वर्गीकरण पद्धतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रत्येक पिढीसाठी तंतोतंत 15 वर्षांचा कालखंड (15-Year Standardized Span) निश्चित केला. पूर्वीच्या पिढ्यांचे कालखंड अनिश्चित असायचे. मॅकक्रंडल यांनी हा गोंधळ दूर करून एक अचूक शास्त्र तयार केले.
📍 जेन वाय/मिलिनियल्स – 1980 ते 1994 (15 वर्षे)
📍 जेन झी – 1995 ते 2009 (15 वर्षे)
📍 जेन अल्फा – 2010 ते 2024 (15 वर्षे)
📍 जेन बीटा – 2025 ते 2039 (15 वर्षे)

♻️ जागतिक मान्यता
मार्क मॅकक्रंडल यांनी 2008 मध्ये प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या संशोधन अहवालात सर्वप्रथम जेन अल्फा (Generation Alpha) हा शब्द वापरला व जाहीर केला. आज जगातील सर्व मोठे उद्योग, समाजशास्त्रज्ञ, विद्यापीठे आणि संयुक्त राष्ट्रे (UN) देखील लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी मॅकक्रंडल यांनी विकसित केलेली हीच अल्फा, बीटा, गॅमा वर्गीकरण पद्धती वापरतात.

♻️ संशोधन पद्धती
मार्क मॅकक्रंडल यांची पिढ्यांचे वर्गीकरण करण्याची संशोधन पद्धती (Generational Research Methodology) प्रामुख्याने लोकसंख्याशास्त्र (Demography), समाजशास्त्र (Sociology) आणि जागतिक बदलांच्या अभ्यासावर आधारित आहे. कोणत्याही लोकसंख्येला पिढ्यांमध्ये विभागताना ते केवळ जन्म वर्ष पाहत नाहीत, तर त्या काळातील जागतिक घटनांचा मानवी मानसिकतेवर काय परिणाम झाला, याचा अभ्यास करतात. त्यांच्या या संशोधन पद्धतीचे मुख्य चार आधारस्तंभ आहेत.
📍 मॅकक्रंडल यांच्या संशोधनापूर्वी पिढ्यांचा कालावधी अनिश्चित असायचा. काही पिढ्या 20 वर्षांच्या तर काही 18 वर्षांच्या असायच्या. मॅकक्रंडल यांनी यात सुसूत्रता आणली आणि 15 वर्षांचा मानकीकृत कालखंड (15-Year Standardized Span) निश्चित केला. 15 वर्षे हा काळ एका पिढीला बालपणातून तारुण्यात किंवा एका शालेय टप्प्यातून दुसऱ्या मोठ्या सामाजिक टप्प्यात जाण्यासाठी पुरेसा असतो, असे जैविक व सामाजिक कारणे मॅकक्रंडल यांनी दिली. प्रत्येक पिढीला तंतोतंत 15 वर्षांचा काळ दिल्यामुळे दोन वेगवेगळ्या पिढ्यांची तुलना करणे सांख्यिकीय दृष्ट्या (Statistically) सोपे व अचूक होते.

📍 सामाजिक गुणविशेष व जागतिक घटना (Global Markers) या पद्धतीत केवळ जन्म वर्ष महत्त्वाचे नसते, तर त्या 15 वर्षांत जगात कोणत्या मोठ्या घडामोडी झाल्या, यावर संशोधन केले जाते. याला जनरेशनल मार्कर म्हणतात. त्या पिढीने जन्मानंतर कोणते तंत्रज्ञान पाहिले? (जेन झीने स्मार्टफोन पाहिले, तर जेन अल्फाने कृत्रिम बुद्धिमत्ता/AI पाहिली). जागतिक मंदी, महामारी (कोविड-19) किंवा राजकीय क्रांती यांचा त्या पिढीच्या विचारसरणीवर काय परिणाम झाला, याचे विश्लेषण केले जाते.

📍 मॅकक्रंडल रिसर्च संस्था दरवर्षी हजारो लोकांचे सर्वेक्षण करते. त्यामध्ये संख्यात्मक (Quantitative) व गुणात्मक (Qualitative) या दोन पद्धतींचा वापर केला जाते. संख्यात्मक पद्धतीत मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण (Surveys) करणे, जनगणना डेटा (Census Data) आणि आर्थिक आकडेवारी गोळा केली जाते. गुणात्मक पद्धतीत वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या मुलाखती (Interviews) घेणे, त्यांच्या खरेदीच्या सवयी, कामाची पद्धत आणि जीवनशैलीचा बारकाईने अभ्यास केला जाताे.

📍 मॅकक्रंडल यांनी पाश्चात्य इंग्रजी अक्षरे (X, Y, Z) संपल्यानंतर अल्फा (α), बीटा (β), गॅमा (γ) या ग्रीक अक्षरांचा वापर सुरू केला. विज्ञानात ज्याप्रमाणे चक्रीय किंवा सातत्यपूर्ण बदलांसाठी ग्रीक अक्षरे वापरतात, त्याचप्रमाणे मानवी इतिहासातील नवीन युगाची सुरुवात दर्शवण्यासाठी ही पद्धत लागू केली गेली, हा त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. ही अक्षरे कोणत्याही एका देशापुरती मर्यादित नसून संपूर्ण जगासाठी लागू पडतात. मार्क मॅकक्रंडल यांच्या या संशोधन पद्धतीचा वापर कॉर्पोरेट कंपन्या मार्केटिंग किंवा नोकरभरतीसाठी करतात.

♻️ पिढ्यांचे नामकरण
🔆 1901 ते 1927 – द ग्रेटेस्ट जनरेशन (The Greatest Generation)
🔆 1928 ते 1945 – द सायलेंट जनरेशन (The Silent Generation)
🔆 1946 ते 1964 – बेबी बुमर्स (Baby Boomers)
🔆 1965 ते 1980 – जेन एक्स (Generation X)
🔆 1981 ते 1996 – मिलिनियल्स जेन वाय (Millennials/Gen Y)
🔆 1997 ते 2012 – जेन झी (Gen Z)
🔆 2013 ते 2024 – जेन अल्फा (Gen Alpha)
🔆 2025 ते 2039 – जेन बीटा (Generation Beta)
🔆 2040 ते 2054 – जेन गॅमा (Generation Gamma)
🔆 2055 ते 2069 – जेन डेल्टा (Generation Delta)
🔆 2070 ते 2084 – जेन इप्सिलॉन (Generation Epsilon)
🔆 2085 ते 2099 – जेन झेटा (Generation Zeta)
🔆 2100 ते 2114 – जेन इटा (Generation Eta)
🔆 2115 ते 2129 – जेन थिटा (Generation Theta)

♻️ द ग्रेटेस्ट जनरेशन
द ग्रेटेस्ट जनरेशन (The Greatest Generation) हा शब्द अमेरिकन पत्रकार व लेखक टॉम ब्रोका (Tom Brokaw) यांनी 1998 मध्ये लिहलेल्या त्यांच्या The Greatest Generation या प्रसिद्ध पुस्तकामुळे जगात लोकप्रिय झाला. या पिढीने त्यांचे बालपण किंवा तारुण्य 1929 च्या जागतिक महामंदीत घालवले. तीव्र गरिबी, अन्नाची कमतरता व बेरोजगारीचा सामना केल्यामुळे त्यांच्यामध्ये बचत करणे, कठोर परिश्रम व संयम हे गुण रुजले. या पिढीतील तरुण सैन्यात भरती झाले व त्यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला. ज्यांनी युद्धात भाग घेतला नाही, त्यांनी मायदेशात (Home Front) राहून कारखान्यांमध्ये, शेतात आणि सैन्यासाठी युद्धसामग्री तयार करण्यात अहोरात्र काम केले. या पिढीने स्वतःच्या वैयक्तिक इच्छांपेक्षा समाज, देश व जगाच्या स्वातंत्र्याला प्राधान्य दिले. महायुद्ध संपल्यानंतर त्यांनी देशांची पुनर्रचना केली, आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा नवसंजीवनी दिली. संयुक्त राष्ट्रसंघ, नाटो (NATO), मार्शल प्लॅन यासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्था व उपक्रमांची पायाभरणी याच पिढीच्या काळात झाली. तक्रार न करता सातत्याने काम करण्याची वृत्ती, देश आणि कुटुंबाप्रती असलेले उत्तरदायित्व जपणे, युद्धात किंवा आयुष्यात प्रचंड मोठे यश मिळवूनही त्याबद्दल आव आणण्याऐवजी शांतपणे पुढे जाणे ही या पिढीची वैशिष्ट्ये आहेत.

♻️ द सायलेंट जनरेशन
या पिढीचे बालपणी महामंदी (Great Depression) व दुसऱ्या महायुद्धाच्या छायेत गेले. त्यानंतर अमेरिकेत मॅकार्थीझम (McCarthyism) म्हणजेच डाव्या विचारांचा काळ आला. त्यांनी या पिढीने व्यवस्थेला आव्हान देण्यापेक्षा किंवा बंडखोरी करण्यापेक्षा कॉर्पोरेट संस्कृतीत रुळणे, नोकरी टिकवणे व नियमांचे तंतोतंत पालन करण्याला प्राधान्य दिले. त्यांनी जगावर व संस्कृतीवर मोठा प्रभाव पाडला. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर, माल्कम एक्स, रोझा पार्क्स यासारखे मोठे नेते याच काळात जन्माला आले. युद्धानंतरच्या काळात त्यांनी शांतपणे काम करून आर्थिक समृद्धी मिळवली. लवकर लग्न करून स्थिर कुटुंबव्यवस्था निर्माण करण्यावर त्यांचा भर होता. एकाच कंपनीत किंवा व्यवसायात आयुष्यभर निष्ठेने काम करण्याची वृत्ती, महामंदीच्या काळात लहानपण गेल्यामुळे पैशांचा विनाकारण अपव्यय न करणे आणि भविष्यासाठी बचत करणे, कामाच्या ठिकाणी शांतपणे, न तक्रार करता दिलेली जबाबदारी पूर्ण करणे ही या पिढीची विशेष वैशिष्ट्ये आहेत.

♻️ बेबी बुमर्स
दुसरे महायुद्ध (1945) संपल्यानंतर अमेरिका, युरोप व इतर पाश्चात्य देशांमध्ये जन्मदरात अभूतपूर्व वाढ झाली. या काळात झालेल्या मुलांच्या या प्रचंड संख्येला Baby Boom म्हटले गेले आणि या काळात जन्मलेल्या पिढीला Baby Boomers हे नाव मिळाले. या पिढीतील तरुणांनी प्रस्थापित परंपरांना आव्हान दिले. हिप्पी संस्कृती (Hippie Movement), महिला मुक्ती चळवळ (Women’s Rights), पर्यावरणवादी चळवळींना या पिढीने पाठिंबा दिला. या पिढीने अतिशय स्पर्धात्मक वातावरणात काम केल्याने त्यांना Workaholics (सतत काम करणारे) म्हटले गेले. कॉर्पोरेट जगतात यश मिळवणे, चांगला पगार कमावणे, करिअरला प्राधान्य देणे, कठोर परिश्रम करून सामाजिक आणि आर्थिक दर्जा उंचावणे, स्वतःची ओळख आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला अधिक महत्त्व देणे, पेन्शन योजना, रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आणि भविष्यासाठी संपत्ती निर्माण करणे ही त्यांची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. या पिढीने त्यांच्या प्रौढ वयात टेलिव्हिजनचा विस्तार, सुरुवातीचे कॉम्प्युटर आणि नंतर इंटरनेटचा उदय जवळून पाहिला व तो स्वीकारला.

♻️ जेन एक्स
जेन एक्स ही पिढी बेबी बुमर्स आणि त्यांच्या नंतर आलेल्या मिलेनियल्स (Gen Y) या दोन मोठ्या पिढ्यांच्या मध्ये अडकलेली असल्याने तिला अनेकदा मिडल चाइल्ड (Middle Child Generation) किंवा लॅचकी किड्स जनरेशन (Latchkey Generation) देखील म्हटले जाते. या काळात महिलांनी मोठ्या प्रमाणावर नोकरी व व्यवसायात प्रवेश केला आणि घटस्फोटांचे प्रमाणही वाढले. स्वतःचे काम स्वतः करणे, शाळेतून घरी आल्यावर चावीने (Latchkey) स्वतःच घर उघडून राहणे, पालकांच्या अनुपस्थितीत स्वतःचे खाणे-पिणे सांभाळणे हे या पिढीतील मुलांसाठी सामान्य होते. अगदी लहानपणापासूनच एकटे राहिल्यामुळे ही पिढी अत्यंत स्वावलंबी, स्वतंत्र विचारांची व समस्यांवर स्वतः उपाय शोधणारी बनली. जेन एक्स ही अशी एकमेव पिढी आहे जिने ॲनालॉग (Analog) आणि डिजिटल (Digital) या दोन्ही जगांचा अनुभव अगदी समसमान घेतला आहे. अ‍ॅनालॉग बालपण म्हणजे, लहानाचे मोठे होताना त्यांनी लँडलाईन फोन, कॅसेट, व्हीसीआर, टीव्ही वृत्तपत्रे पाहिली. तरुण वयात त्यांनी पर्सनल कॉम्प्युटर (PC), इंटरनेट, ईमेल व मोबाईल फोनचा उदय पाहिला व आत्मसात केला. या पिढीने टेक-सॅव्ही (Tech-Savvy) म्हणजेच तंत्रज्ञान समजून घेण्यात आणि ते दैनंदिन कामात रुजवण्यात मोलाची भूमिका बजावली. या पिढीने बेबी बुमर्स पिढीसारखे निव्वळ कामालाच आयुष्य न मानता, त्यांनी कौटुंबिक आयुष्य व वैयक्तिक वेळेलाही (Work-Life Balance) महत्त्व देण्यास सुरुवात केली. कॉर्पोरेट मंदी व अस्थिरता जवळून पाहिल्यामुळे ते व्यवस्थेवर आंधळा विश्वास ठेवत नाहीत. ते वास्तववादी आणि थोडे संशयवादी (Skeptical) असतात. नोकरीवर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्ट-अप सुरू करण्याकडे या पिढीचा मोठा कल राहिला.

♻️ मिलिनियल्स/जेन वाय
ही पिढी नवीन सहस्रकामध्ये (Millennium – वर्ष 2000 च्या सुमारास) मोठी होत असल्यामुळे किंवा वयात येत असल्यामुळे त्यांना मिलेनियल्स हे नाव मिळाले. जेन एक्स नंतर जन्माला आल्याने या पिढीला जेन वाय (Gen Y) असेही संबोधले जाते. या पिढीने इंटरनेट, सोशल मीडिया (Facebook, Orkut, Instagram), स्मार्टफोन्स आणि सर्च इंजिन्सचा (Google) उदय व विकास अगदी जवळून पाहिला. लहानपणी अ‍ॅनालॉग तंत्रज्ञान वापरून मोठे होताना त्यांनी डिजिटल तंत्रज्ञान पूर्णपणे आत्मसात केले. 2008 ची जागतिक महामंदी (Great Recession) या पिढीच्या उच्च शिक्षण किंवा करिअरच्या सुरुवातीच्या काळात आली. यामुळे नोकऱ्यांची अनिश्चितता, वाढता शिक्षण खर्च आणि घर घेण्यातील अडचणी यांचा सामना त्यांना करावा लागला. घर, गाडी किंवा भौतिक वस्तू खरेदी करून ठेवण्यापेक्षा प्रवास करणे, नवनवीन अनुभव घेणे, इव्हेंट्सना जाणे आणि लाइफस्टाइल एन्जॉय करणे यावर मिलेनियल्सचा अधिक भर राहिला. पारंपारिक 9 ते 5 च्या नोकरीपेक्षा फ्री-लान्सिंग, वर्क फ्रॉम होम, स्वतःचे स्टार्ट-अप सुरू करण्याच्या संस्कृतीला मिलेनियल्सने मोठी चालना दिली. Uber, Airbnb, Zomato यासारख्या अ‍ॅप-आधारित सेवांचा सर्वाधिक वापर व विस्तार याच पिढीने केला. कामाच्या ठिकाणी किंवा ब्रँड्स निवडताना केवळ पैसा न बघता, त्यामागे काही सामाजिक हेतू (Purpose) किंवा पर्यावरणाची काळजी आहे का, याला ही पिढी महत्त्व देते. काम व वैयक्तिक आयुष्यात मोकळेपणा व लवचिकता असणे, वरिष्ठांचा धाक मानण्यापेक्षा कामाच्या ठिकाणी मोकळा संवाद आणि टीमवर्क पसंत करणे तसेच वर्क-लाइफ बॅलन्स, मेंटल हेल्थ आणि वैयक्तिक विकासाबाबत (Self-care) उघडपणे बोलण्याची सुरुवात या पिढीने केली.

♻️ जेन झी
ही पिढी पूर्णपणे 21 व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रभावाखाली मोठी झाली आहे. या पिढीचा जन्मच इंटरनेट, स्मार्टफोन्स व हाय-स्पीड डेटा येण्याआधी झाला. त्यांनी इंटरनेटविना असलेले जग कधी पाहिलेच नाही. इंस्टाग्राम, टिकटॉक/रील्स, यूट्यूब आणि व्हॉट्सॲप यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर लहानाचे मोठे झाल्यामुळे अत्यंत कमी वेळात माहिती मिळवणे आणि ती प्रक्रिया करणे ही यांची सवय आहे. सोशल मीडियामुळे ही पिढी जागतिक स्तरावर जोडलेली आहे. जगभरात घडणाऱ्या घडामोडी, ट्रेंड्स आणि पॉप-कल्चरचा प्रभाव त्यांच्यावर त्वरित पडतो. बनावट किंवा दिखावूपणापेक्षा ही पिढी रिअल आणि पारदर्शक गोष्टींना प्राधान्य देते. कॉर्पोरेट दाव्यांऐवजी ब्रँड्सची खरी मूल्ये ते तपासतात. मिलेनियल्सनी भोगलेली 2008 ची मंदी आणि कोविड-19 मुळे आलेली आर्थिक अनिश्चितता जवळून पाहिल्यामुळे जेन झी आर्थिक बाबींमध्ये अधिक व्यावहारिक (Pragmatic) व बचत/गुंतवणुकीबाबत जागरूक आहे. विचार व्यक्त करण्यासाठी मीम्स, इमोजी आणि No Cap, Rizz, Slay, FOMO यासारख्या आधुनिक शब्दांचा (Slang) वापर ही या पिढीची ओळख आहे. लिंगभाव (Gender Neutrality), समानता व विविध सामाजिक घटकांना स्वीकारण्याबाबत ही पिढी अत्यंत संवेदनशील व आग्रही आहे. केवळ कामासाठी आयुष्य न जगता, मानसिक स्वास्थ्य (Mental Health) आणि वैयक्तिक वेळेला ही पिढी प्रथम प्राधान्य देते. पारंपरिक नोकरीपेक्षा युट्युबर, इन्फ्लुएन्सर, डिजिटल आर्टिस्ट किंवा स्वतःचे छोटे बिझनेस (Side Hustles) सुरू करण्याकडे यांचा मोठा कल आहे. हवामान बदल (Climate Change) व सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर ही पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडपणे आवाज उठवते.

♻️ जेन अल्फा
ही पिढी जुन्या पिढ्यांच्या चौकटीतून बाहेर पडून एका नवीन युगाची सुरुवात करणारी पिढी मानली जाते. या पिढीने जेन झीचे इंटरनेट व स्मार्टफोन्स पाहिले आहेत. ही अशी पहिली पिढी आहे जी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता), स्मार्ट स्पीकर्स (Alexa, Siri) व व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) च्या काळात लहानाची मोठी होत आहे. ही पिढी अतिशय लहान वयातच स्क्रीनशी जोडली गेली आहे. मजकूर वाचण्यापेक्षा व्हिडिओ (YouTube Kids, Shorts, Interactive games) द्वारे शिकण्याकडे यांचा कल जास्त आहे. या पिढीवर स्क्रीन व व्हिज्युअल मीडियाचा प्रभाव आहे. त्यांच्या बालपणात कोविड-19 ची साथ आली. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण, घरातून शिकणे व डिजिटल संवाद हा त्यांच्या अगदी सुरुवातीच्या आयुष्याचा एक स्वाभाविक भाग बनला. केवळ मनोरंजनासाठी खेळण्याऐवजी Roblox, Minecraft आणि Fortnite यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर ही मुले एकमेकांशी संवाद साधतात, स्वतःचे व्हर्च्युअल जग तयार करतात आणि सामाजिक ओळख निर्माण करतात. या पिढीचे पालक प्रामुख्याने मिलेनियल्स आहेत. त्यामुळे जेन अल्फाच्या संगोपनात खालील बदल दिसतात. तंत्रज्ञानाचा योग्य आणि सुरक्षित वापर कसा करावा, यावर पालक भर देतात. लहानपणापासूनच त्यांना विविधता (Diversity), पर्यावरण संरक्षण आणि मानसिक स्वास्थ्य (Mental Health) या विषयांची जाणीव करून दिली जात आहे. अभ्यासासोबतच कोडिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग आणि डिजिटल स्किल्सवर भर दिला जात आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!