Ethanol Policy, Oilseed Prices : सरकारचे इथेनॉल धाेरण उठले तेलबियांच्या जीवावर!
1 min readEthanol, Oilseed prices : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जैवइंधन धोरण – 2018 (National Policy on Biofuels)मुळे भारतात इथेनाॅलचा (Ethanol) वापर आणि मागणी यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे सन 2014 ते 2026 या 12 वर्षांत इथेनाॅलचे उत्पादन प्रतिवर्ष 421 कोटी लिटरवरून 2,000 काेटी लिटरवर पाेहाेचले. म्हणजेच गेल्या 12 वर्षांत इथेनाॅल उत्पादनात 375.06 टक्क्यांची वाढ झाली आहे. इथेनाॅल निर्मितीसाठी सर्वाधिक उसाच्या मळीचा (Molasses) वापर केला जात असल्याचा दावा सरकार करीत असले तरी ते पूर्ण सत्य नाही. कारण देशभरात वर्षभर तयार हाेणारी उसाची मळी आणि इथेनाॅल उत्पादन यात माेठी तफावत आहेत. याच धाेरणांतर्गत केंद्र सरकारने 2018 साली मका (Maize), खराब झालेले धान्य (Damaged food grains), ज्वारी (Sorghum) आणि एफसीआय (FCI – Food Corporation of India) कडील तांदूळ (Rice) यापासून इथेनॉल बनवण्यास मंजुरी दिली. सध्या देशात इथेनाॅल निर्मितीसाठी 36 टक्के मका, 33 टक्के उसाची मळी, 25 टक्के तांदूळ व 4 टक्के ज्वारी व इतर पदार्थांचा वापर केला जात आहे. स्वस्त दरात कच्चा माल मिळावा म्हणून केंद्र सरकार याच शेतमालाचे दर नियंत्रित करण्याची संधी साेडत नाही. दुसरीकडे, इथेनाॅल निर्मितीनंतर तयार हाेणाऱ्या मका व तांदळाच्या चाेथ्यामुळे (DDGS – Distillers Dry Grains with Solubles) साेयाबीन (Soybean) व इतर तेलबियांचे (Oilseed) दर (prices) पडत आहेत.
♻️ मक्याचा औद्याेगिक वापर
मक्याची मागणी केवळ अन्न व पशुखाद्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. इथेनॉल, बायोप्लास्टिक्स व तत्सम औद्योगिक उत्पादनांसाठी (Industrial non-food products) मक्याचा वापर वाढल्याने मागणीही वाढली आहे. उद्याेगांना कमी दरात मका उपलब्ध व्हावा, यासाठी सरकारी पातळीवरून मक्याचे दर दबावात ठेवले जात आहेत. त्यातच भारत-अमेरिका व्यापार करारात भारताने अमेरिकन सोयाबीन तेल व डिस्टिलर्स ड्राइड ग्रेन्स विथ सोल्युबल्सच्या (Distillers Dry Grains with Solubles) शुल्कमुक्त आयातीला सहमती दर्शविल्याने मक्याचे दर घसरले आहेत. फिक्की व येस बँकेचा संयुक्त अहवाल तसेच भारतीय मका संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, 20 टक्के मका मानवी खाद्यासाठी तर 75 ते 80 टक्के मका औद्याेगिक उत्पादनांसाठी वापरला जाताे. मागील दाेन वर्षांपासून एकूण उत्पादनाच्या 26 मका इथेनाॅल निर्मितीसाठी वापरला जाताे. मक्याच्या एकूण औद्योगिक वापरापैकी 60 टक्के वाटा एकट्या पोल्ट्री (कोंबड्यांचे खाद्य) व कॅटल फीड (पशुखाद्य) उद्योगाकडे जातो तर 14 टक्के मका स्टार्च, लिक्विड ग्लुकोज, कॉर्न फ्लेक्स व इतर बेकरी उत्पादनांसाठी वापरला जाताे. पोल्ट्री क्षेत्राच्या वार्षिक वाढीमुळे मक्याची मागणी दरवर्षी साधारण 5 ते 6 टक्क्यांनी वाढत आहे.
♻️ मक्याच्या वार्षिक वाढीचा दर व भविष्यातील अंदाज
गेल्या 10 वर्षांत भारतामध्ये मक्याच्या एकूण औद्योगिक वापराचा चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (CAGR) 5.6 टक्के राहिला आहे, तर मक्याचे उत्पादन फक्त 2.9 टक्के दराने वाढले आहे. त्यामुळेच खुल्या बाजारात मक्याची टंचाई व मागणी सातत्याने वाढत आहे. औद्योगिक मागणी पूर्ण करण्यासाठी देशातील मक्याचे उत्पादन वर्ष 2015-16 मधील 2.26 कोटी टनांवरून वाढून 2025-26 मध्ये सुमारे 5 कोटी टनांपर्यंत (120 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ) पोहोचले आहे. 2030-31 पर्यंत भारतातील मक्याची औद्योगिक मागणी आणखी 44 टक्क्यांनी वाढणार असून ती 7.2 कोटी मेट्रिक टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांत भारतातील मक्याचा निव्वळ औद्योगिक प्रक्रिया क्षेत्रातील वापर (इथेनॉल पॉलिसी लागू झाल्यानंतर) वार्षिक 15 ते 20 टक्के या गतीने वाढला आहे, ज्यामुळे मका हे आता केवळ खाण्याचे धान्य न राहता एक स्ट्रॅटेजिक कमोडिटी (धोरणात्मक औद्योगिक माल) बनले आहे.
♻️ इथेनाॅल निर्मितीत मक्याचा 36 टक्के वाटा
मक्यामध्ये 65 ते 75 टक्के स्टार्च असताे. इथेनॉल बनवताना स्टार्चचे रूपांतर आधी साखरेत केले जाते आणि नंतर त्या साखरेचे रूपांतर अल्कोहोलमध्ये करून त्यापासून इथेनाॅल तयार केले जाते. मक्यापासून 38 ते 42 टक्के इथेनॉल निर्मिती होते. म्हणजेच 1 टन (10 क्विंटल) कोरड्या व दर्जेदार मक्यापासून 380 to 420 लिटर इथेनाॅल मिळते. जून 2025 पर्यंत एकूण इथेनॉल पुरवठा 717 कोटी लिटरवर पोहोचला हाेता. यापैकी 36 टक्के म्हणजेच 258 काेटी लिटर इथेनाॅलचे उत्पादन मक्यापासून केले हाेते.
♻️ इथेनॉल निर्मितीचे शास्त्रीय समीकरण
मक्यापासून इथेनाॅल तयार करण्यासाठी मक्याच्या दाण्यांची बारीक पूड करून त्यात एन्झाइम्स (Enzymes) मिसळले जाते. त्यामुळे मक्यातील स्टार्चचे रूपांतर ग्लुकोज म्हणजेच साध्या साखरेत होते. या ग्लुकोजमध्ये यीस्ट (Yeast) टाकून किण्वन प्रक्रिया (fermentation process) केली जाते. 1 मोलेक्युल्ड ग्लुकोजपासून 2 मोलेक्युल्स इथेनॉल आणि 2 मोलेक्युल्स कार्बन डायऑक्साइड मिळते.
♻️ उप-उत्पादने
मक्यापासून फक्त इथेनॉलच मिळत नाही, तर डिस्टिलरी प्रक्रियेतून अत्यंत मौल्यवान उप-उत्पादने मिळतात. 1 टन मक्याच्या प्रक्रियेतून साधारणपणे 390 लिटर इथेनॉल, 300 ते 320 किलाे DDGS (Distillers Dried Grains with Solubles – उच्च प्रोटीनयुक्त पशूआहार आणि पोल्ट्री फीड), 15 ते 20 किलाे कॉर्न ऑइल (Corn Oil – ज्याचा वापर औद्योगिक किंवा बायोडीझेलसाठी वापर) आणि 250 ते 300 किलाे कार्बन डायऑक्साइड (Carbon dioxide – हा गॅस गोळा करून शीतपेय किंवा औद्योगिक कारखान्यांना विकला जातो) आदी उप उत्पादने मिळतात. जर मक्यामध्ये ओलावा 15 टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि स्टार्चचे प्रमाण उत्तम असेल, तर 39.5 टक्के म्हणजेच प्रति टन 395 लिटर इथेनाॅल मिळते. हा भारतामधील डिस्टिलरींचा प्रातिनिधिक व अधिकृत सरासरी उतारा (Yield) मानला जातो. याच कारणामुळे भारताच्या इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राममध्ये (EBP – Ethanol Blending Program) मक्याला हाय-यिल्डिंग फीडस्टॉक (High-yielding feedstock – अधिक उतारा देणारा कच्चा माल) म्हणून प्राधान्य दिले जात आहे.
♻️ मक्याची एमएसपी व मिळालेला दर
🔆 वर्ष – एमएसपी – वाढ – खुल्या बाजारातील दर (प्रतिक्विंटल)
🔆 2022-23 – 1,962 – 92 रुपये – 1,500 ते 2,600 रुपये
🔆 2023-24 – 2,090 – 128 रुपये – 1,650 ते 2,650 रुपये
🔆 2024-25 – 2,225 – 135 रुपये – 1,700 ते 2,500 रुपये
🔆 2025-26 – 2,400 – 175 रुपये – 1,400 ते 2,750 रुपये
🔆 2026-27 – 2,410 – 10 रुपये – —– ते —–
♻️ दर एमएसपीच्या खाली राहणार
चालू खरीप हंगामात देशभरातील मक्याचे पेरणीक्षेत्र 19 टक्क्यांनी वाढणार असून, ते 144 लाख हेक्टरवर पाेहाेचणार असल्याची शक्यता केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजात व्यक्त केली आहे. मागील वर्षी हे क्षेत्र 116.64 लाख हेक्टर हाेते. 2025-26 मध्ये देशभरात एकूण 551 लाख टन मक्याचे विक्रमी उत्पादन झाले हाेते. जे 2024-25 च्या हंगामात 434 लाख टन हाेते. ऑक्टाेबर, नाेव्हेंबर 2026 पासून नवीन मका बाजारात येणार असून, या काळात मक्याचे दर एमएसपीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज तामिळनाडू कृषी विद्यापीठाने सर्वेक्षण अहवालात व्यक्त केला आहे.
♻️ इथेनाॅलसाठी तांदळाचा वापर
भारतात व्यावसायिक पातळीवर डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 या काळात तांदळापासून इथेनॉल निर्मिती करण्याला अधिकृत सुरुवात झाली. केंद्र सरकारने डिस्टिलरीजना एफसीआयचा तांदूळ प्रतिटन 20,000 रुपये (प्रतिकिलाे 20 रुपये) दराने देण्याचा निर्णय घेतला. एप्रिल 2021 पासून डिस्टिलरीजना तांदळाचा प्रत्यक्ष पुरवठा सुरू झाला व इथेनाॅलचे उत्पादन वेगाने वाढले. इथेनाॅलसाठी तुटलेला तांदूळ (Broken Rice) किंवा एफसीआयचा जुना तांदूळ वापरला जातो. या तांदळात स्टार्चचे प्रमाण सुमारे 72 ते 78 टक्के म्हणजेच मक्याच्या तुलनेत अधिक असल्याने तांदळापासून मिळणारा इथेनॉलचा उतारा (Yield) अधिक मिळताे. तांदळापासून 43 ते 46 टक्के इथेनॉल रिकव्हरी म्हणजेच 1 टन (10 क्विंटल) कोरड्या व दर्जेदार तांदळापासून सरासरी 430 ते 460 लिटर इथेनॉल मिळते. भारतात दरवर्षी 35 लाख ते 45 लाख टन तांदूळ (एफसीआयचा अतिरिक्त तांदूळ व खुल्या बाजारातील तुकडा तांदूळ एकत्र करून) इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जातो. सन 2024-25 मध्ये 38 लाख टन तांदळाचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्यात आला. सन 2025-26 मध्ये इथेनॉलसाठी 40 लाख टन तांदूळ वापरण्यात आला.
♻️ चाेथ्यामुळे तेलबियांचे दर दबावात
1 टन मक्यापासून 300 ते 320 किलो कोरडा चोथा (Maize DDGS) तर 1 टन तांदळापासून 320 ते 350 किलो कोरडा चोथा (Rice DDGS) मिळतो. मक्याच्या तुलनेत तांदळापासून थाेडा अधिक चोथा मिळताे. मक्याच्या चाेथ्यात 28 ते 30 टक्के तर तांदळाच्या चाेथ्यात 42 ते 45 टक्के प्रथिने (Proteins) असतात. या दाेन्ही चाेथ्याचा वापर पशुखाद्य व पाेल्ट्री फीड म्हणून केला जाताे. खुल्या बाजारात मक्याच्या चाेथ्याचे दर प्रतिकिलाे 26 ते 30 रुपये आणि तांदळाच्या चाेथ्याचे दर 35 ते 40 रुपये प्रतिकिलाे आहेत. या दाेन्ही चाेथ्याच्या तुलनेत साेयाबीन व इतर तेलबियांच्या ढेपेचे (DOC – De-Oiled Cake) दर अधिक असल्याने साेयाबीन व अन्य तेलबियांच्या ढेपेचा वापर व मागणी घटली आहे. त्यामुळे साेयाबीनसह इतर तेलबियांचे दर कायम दबावात राहण्याला इतर काही बाबींसह मका व तांदळाचा चाेथा देखील जबाबदार आहे. दुसरीकडे, डिस्टिलरीजना कमी दरात मका व तांदूळ मिळावा, यासाठी या दाेन्ही शेतमालाचे दर दबावात ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करते.
©️ मातीतलं अर्थकारण