krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Maharashtra Drought : महाराष्ट्र काेरड्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर

1 min read

Maharashtra Drought : दरवर्षी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतांश जलसाठे अर्धेअधिक भरलेले असतात. एल-निनाेच्या (El Nino) प्रभावामुळे यावर्षी मान्सून (Monsoon) कमजाेर झाला आहे. जूनचे पहिले तीन आठवडे काेरडे गेले असून, जूनच्या शेवटच्या आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात काही प्रमाणात सर्वदूर पाऊस झाला. याच पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आटाेपली. जुलैच्यास दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस पुन्हा बेपत्ता झाला. पावसाने दडी मारल्याने 1 जून ते 14 जुलै 2026 या काळातील महाराष्ट्रातील पावसाची तूट 3.72 टक्के असली तरी विदर्भातील ही तूट किमान 27 टक्के, मराठवाडा 37 टक्के, उत्तर महाराष्ट्र 20 टक्के तूट असून, पश्चिम महाराष्ट्रात 7 टक्के, मुंबईत 94 टक्के आणि काेकणात 6 टक्के पाऊस अधिक झाला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे (Monsoon break) काेकण व पश्चिम महाराष्ट्र (Maharashtra) वगळता उर्वरित महाराष्ट्रात खरीप पिके सुकण्याची शक्यता निर्माण झाल्याने काेरड्या दुष्काळाच्या (Drought) उंबरठ्यावर उभा आहे.

♻️ तूट भरून निघाली
एल-निनोमुळे यावर्षी पाऊस कमजोर झाला आहे. 23 जूनला दमदारपणे दाखल झालेला मान्सून पुढे मात्र मंदावला. त्यामुळे राज्यातील पावसाची तूट 40 टक्क्यांवर पाेहाेचली हाेती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अतिशय दमदार पाऊस झाल्याने ही तूट 24 टक्क्यांनी भरून निघाली. जोरदार पावसाचा अंदाज असतानाही आकाशात जमलेले ढग बरसले नाही. 6 व 7 जुलै रोजी पावसाने विदर्भात जोरदार हजेरी लावली, पण हा जोर अल्पकालीन ठरला. त्यानंतर मात्र पावसाचा खंड आजपर्यंत कायम आहे. त्यातच पुढील पाच दिवस जोरदार पावसाची कुठलीही शक्यता नाही, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केल्याने चिंतेचे ढग आणखी गडद झाले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात 16 टक्क्यांवर असलेली पावसाची तूट 24 टक्क्यांवर गेला असून पुढे आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊसच नसल्याने तलाव, धरणांमधील पाण्याची पातळी खालावली असून, त्यात गतवर्षीपेक्षा घट झाली आहे.

♻️ पावसाची कोणतीच प्रणाली सक्रिय नाही
पावसासाठी अनुकूल असलेली कोणतीच प्रणाली सध्या सक्रिय नाही. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातही पावसाला पूरक घडामोडी नाहीत. त्यामुळे विदर्भासह मध्य भारतात पुढचे पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता नसून, वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अगदीच तुरळक सरी होतील व एक-दोन ठिकाणी मध्यम सरींचा अंदाज आहे. 15 जुलैनंतर ढगाळ वातावरणासह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

♻️ राज्यात काय परिणाम?
20 जुलैनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र तयार झाले तर अफगाणिस्तातून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांना अटकाव होईल. हे कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाच्या जवळ असेल, त्यामुळे विदर्भात किंचित जास्त पाऊस असेल, तर मराठवाडा परिसरात फार पाऊस पडणार नाही. हा पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यासारखा नसेल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

♻️ विदर्भातील 1 जून ते 13 जुलैपर्यंतचा पाऊस (मिमी)
जिल्हा – झालेला पाऊस – सामान्य पाऊस – तूट (टक्के)
🔆 नागपूर – 237.6 – 303.1 – (-21)
🔆 भंडारा – 191.8 – 323.7 – (-41)
🔆 गोंदिया – 407.5 – 352 – (16)
🔆 बुलढाणा – 197.4 – 214.4 – (-4)
🔆 वर्धा – 248.3 – 284 – (- 13)
🔆 गडचिरोली – 184.5 – 390.3 – (-53)
🔆 चंद्रपूर – 225.3 – 340.3 – (-34)
🔆 वाशिम – 175 – 270.9 – (-35)
🔆 अमरावती – 196.7 – 258.7 – (-24)
🔆 अकोला – 181.7 – 230.2 – (-21)
🔆 यवतमाळ – 226.1 – 280 – (-19)
🔆 सरासरी – 218.9 – 299 – (-27)

♻️ नागपूर विभागातील प्रकल्पातील पाणीसाठा
जलसाठे – आजचा साठा (टक्के) – गतवर्षी याच दिवशी
🔆 मोठे 16 – 43.3 – 47.42
🔆 मध्यम 43 – 30.33 – 49.17
🔆 लघु 328 – 29.93 – 41.24
🔆 एकूण 387 – 39.70 – 46.99

पॅसिपिक प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल-निनो आणखी प्रभावशाली होत असून, या जोडीला अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत. या दोन्ही घटकांचा परिणाम म्हणून मान्सून निष्क्रिय झाला आहे. ओढ घेतलेला मान्सून या आठवड्यातही कोसळणार नसल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हा आठवडाही कोरडा जाणार असून, 20 जुलैनंतर कदाचित मान्सून पुन्हा सक्रिय होईल; परंतु त्याचा जोर हवामान बदलावर अवलंबून असणार आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी दिली. मंगळवार (दि. 14 जुलै)पासून पुढील रविवार (दि. 19 जुलै) – सोमवार (दि. 20 जुलै)पर्यंत कुठेही मोठ्या पावसाची फार शक्यता नाही. बुधवारी (दि. 15 जुलै) आणि गुरुवारी (दि. 16 जुलै) किंचित पावसाची शक्यता असली तरी यातून फार काही दिलासा मिळणार नाही. थोडक्यात मुंबईसह राज्यात पाऊस फार सक्रीय नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

♻️ मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट
एल-निनोमुळे यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आता खरा ठरत आहे. जुलैचा दुसरा आठवडा संपत आला तरी पावसाअभावी 35 टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. दुसरीकडे, मागील पाच दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस नाही. ही परिस्थिती आणखी आठ ते दहा दिवस अशीच राहिल्यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. 1 जून ते 13 जुलै या कालावधीत मराठवाड्यातील खरीप हंगामातील एकूण 49 लाख 72 हजार 729 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 32 लाख 32 हजार 255 हेक्टर अर्थात 65 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. जमिनीत पेरणीलायक ओल नसल्यामुळे अद्यापही 35 टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नाही. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, बीड आणि संभाजीनगर या तीन जिल्ह्यांचे खरीप हंगामाचे 21 लाख 42 हजार 24 हेक्टर क्षेत्र आहे. यंदा 19 लाख 46 हजार 561 हेक्टर अर्थात 91 टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर लातूर विभागांतर्गत लातूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडला. यामुळे लातूरमध्ये सर्वात कमी 43 टक्के पेरण्या झाल्या, धाराशिव जिल्ह्यात 48 टक्के, नांदेड जिल्ह्यात 78 टक्के, परभणी जिल्ह्यात 70 टक्के आणि हिंगोली जिल्ह्यात 76 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

♻️ मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा 71 टक्के पेरणी
जिल्हा – 5 वर्षांची टक्केवारी – यंदाची टक्केवारी
🔆 संभाजीनगर – 96 – 70
🔆 जालना – 96 – 70
🔆 बीड – 83 – 62
🔆 लातूर – 96 – 43
🔆 धाराशिव – 92 – 48
🔆 नांदेड – 95 – 78
🔆 परभणी – 90 – 70
🔆 हिंगोली – 85 – 76
🔆 एकूण – 92 – 65

♻️ 21 जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार
मराठवाड्यात पाऊस नसल्यामुळे गंभीर परिस्थिती आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर दुष्काळाचे संकट ओढवू शकते. आता 21 जुलैपर्यंत मोठा अथवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार नाही. 21 जुलैनंतर पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!