krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Earthworms; fertility of soil : गांडूळ; शेती-मातीच्या सुपीकतेचं गुपित

1 min read

Earthworms; fertility of soil : सृष्टीतील प्रत्येक जीव हा लहान किंवा माेठा, तसेच उपयाेगी अथवा निरुपयाेगी नसताे. या प्रत्येक जीवाचे निसर्गाला पूरक असे विशिष्ट कार्य असते आणि ते अविरतपणे करत असतात. असाच एक किळसावाणा वाटणारा, डाेळे, कान व हाडे नसलेला जीव म्हणजे गांडूळ (Earthworm)! जगाला सेंद्रिय शेती (Organic Farming) व माती सुपीकतेची (Soil fertility) गुरुकिल्ली देणारा गांडूळ हा शेती व पर्यावरणाचा सर्वात मोठा नैसर्गिक मित्र आहे. शास्त्रीय भाषेत गांडूळांना ॲनेलिडा (Annelida) संघातील प्राणी मानले जाते. वर्षभर जमिनीत राहणारे गांडूळ पावसाला सुरुवात हाेताच माेठ्या प्रमाणावर जमिनीवर येतात. त्यांच्या जमिनीवर येण्याला विशिष्ट वैज्ञानिक कारण आहे.

♻️ ऑक्सिजनची कमतरता व श्वसनाची समस्या
गांडुळांना नाक व फुप्फुसे नसल्याने ते त्वचेद्वारे (Skin) मातीत खेळणाऱ्या हवेतील ऑक्सिजन (Oxygen) शाेषून घेतात व जिवंत राहतात. श्वास घेण्यासाठी त्यांची त्वचा सतत ओलसर राहणे आवश्यक असते. मातीची कणे सछिद्र असतात. पावसामुळे मातीच्या कणांमधील छिद्रे तसेच गांडूळ राहात असलेल्या मातीतील माेकळी जागा पाण्याने भरून जात असल्याने गांडुळांना श्वास घेण्यास त्रास हाेताे. त्यांना जीव गुदमरल्यागत हाेत असल्याने ते श्वास घेण्यासाठी तसेच स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी ते पावसाळ्यात माेठ्या संख्येने जमिनीवर येतात.

♻️ वेगाने प्रवास करण्याची संधी
गांडुळांना प्रवास करण्यासाठी मातीत ओलावा असणे अनिवार्य असते. कोरड्या जमिनीवर चालताना त्यांच्या शरीरातील ओलावा सुकू शकतो व त्यांना श्वास घेण्यास त्रास हाेऊ शकताे. पावसाळ्यात जमीन पूर्णपणे ओली असते. या ओलसरपणाचा फायदा घेऊन ते कोरडे पडण्याच्या भीतीशिवाय जमिनीवरून खूप वेगाने आणि लांब अंतरापर्यंत प्रवास करू शकतात. नवीन जागेचा शोध घेण्यासाठी किंवा स्थलांतरासाठी ही त्यांच्यासाठी उत्तम संधी असते.

♻️ पाऊस व शत्रूचा संभ्रम
काही शास्त्रज्ञांच्या मते, जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचे कंपन (Vibrations) हे गांडुळांना त्यांच्या नैसर्गिक शत्रूच्या म्हणजेच अंधारी किंवा उंदीर-घुशींच्या (Moles) हालचालींसारखे वाटते. शत्रू खाली येतोय या भीतीने स्वतःचा बचाव करण्यासाठी ते वेगाने जमिनीच्या वर पळ काढतात. जमिनीवर आल्यानंतर अनेकदा गांडुळांना पक्षी खातात किंवा उन्हाचा चटका लागून त्यांचा मृत्यू होतो. तरीही, पाण्याच्या आत गुदमरून मरण्यापेक्षा वर येऊन जगण्याचा प्रयत्न करणे हा त्यांचा नैसर्गिक बचाव मार्ग (Survival Instinct) आहे.

♻️ जमिनीच्या आतील चमत्कार
गांडुळांचा खरा चमत्कार जमिनीत दिसून येताे. ते 24 तास व वर्षभर न थांबता, न थकता माती भुसभुशीत व सुपीक करण्याचे अमूल्य कार्य करत असतात. ते जमिनीत जसजसे पुढे जातात तसतसे मागे छिद्र तयार करीत जातात. ते छिद्र जमिनीसाठी ‘व्हॅन्टिलेशन’चे (Ventilation) काम करतात. याच छिद्रांमुळे झाडांच्या मुळाशी हवेतील ऑक्सिजन व पाणी आरामात पाेहाेचते. जर मातीत गांडूळ नसेल तर ती माती टणक हाेईल व झाडांच्या मुळांना आत जाण्यास त्रास हाेईल.

♻️ गांडुळांचे वर्गीकरण व प्रजाती
गांडूळ (Earthworm) हा शेती आणि पर्यावरणाचा सर्वात मोठा नैसर्गिक मित्र आहे. शास्त्रीय भाषेत त्यांना ॲनेलिडा (Annelida) संघातील प्राणी मानले जाते. जगाला सेंद्रिय शेती व माती सुपीकतेची गुरुकिल्ली देणाऱ्या या जिवाची वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांच्या राहणीमानानुसार प्रामुख्याने तीन भागांत वर्गीकरण केले जाते.

📍 इपिजिक (Epigeic)
या प्रजातीतील गांडूळ जमिनीच्या अगदी वरच्या थरात म्हणजेच कचऱ्यामध्ये राहतात. हे वेगाने सेंद्रिय पदार्थ खातात. खत निर्मितीसाठी इसिनिया फिटिडा (Eisenia fetida) याच प्रजातीचा वापर होतो.

📍 इंडोजिक (Endogeic)
या प्रजातीतील गांडूळ जमिनीच्या मध्यम थरात म्हणजेच 2 ते 3 फूट खोलीवर आडवी बिळे करून राहतात आणि माती खातात.

📍 ॲनेसिक (Anecic)
या प्रजातीतील गांडूळ जमिनीच्या खूप खोलवर म्हणजेच 10 ते 15 फुटांपर्यंत उभी बिळे करतात. माती खणण्याचे मुख्य काम हेच करतात.

♻️ जीवनचक्र व खाद्य
गांडुळांचे जीवनचक्र (Life Cycle) साधारणपणे 3 ते 6 महिन्यांचे असते. काही प्रजाती अनुकूल वातावरणात 2 ते 3 वर्षेही जगू शकतात. गांडूळ हा उभयलिंगी (Hermaphrodite) प्राणी आहे, म्हणजेच एकाच गांडुळाच्या शरीरात नर आणि मादी दोन्ही प्रजोत्पादन अंग असतात. तरीही, वंशवृद्धीसाठी दोन वेगवेगळ्या गांडुळांना एकत्र यावे लागते. मिलन झाल्यानंतर गांडुळाच्या शरीरावर असलेल्या पट्टीतून (Clitellum) एक पिवळसर रंगाचे कोकून (अंडे) (Cocoon/Egg Stage) तयार होते आणि मातीत सोडले जाते. एका कोकूनमधून साधारणपणे 2 ते 3 आठवड्यांत 2 ते 4 पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले पुढील 6 ते 8 आठवड्यांत पूर्ण वाढ होऊन अंडी घालण्यासाठी सक्षम बनतात. गांडुळांचे मुख्य खाद्य कुजणारे सेंद्रिय पदार्थ, झाडांची सुकलेली पाने, शेण व माती हे असते. गांडुळांना दात नसतात. ते अन्नासोबत मातीचे कण गिळतात. त्यांच्या शरीरातील गिझार्ड (Gizzard – स्नायूंची पिशवी) या भागात या मातीच्या कणांच्या साहाय्याने अन्नाचा बारीक भुगा केला जातो. त्यांच्या आतड्यांमधील पाचक रसांमुळे या अन्नाचे विघटन होते आणि उत्सर्जित विष्ठेच्या रूपात उत्तम दर्जाचे खत बाहेर पडते.

♻️ निसर्गाचे नांगर
त्यांना निसर्गाचे नांगर (Nature’s Plow) म्हटले जाते. मातीची सुपीकता टिकवण्यात त्यांचे कार्य अतुलनीय आहे. गांडुळे जमिनीमध्ये सतत वर-खाली प्रवास करत असतात. यामुळे मातीमध्ये असंख्य छिद्रे आणि भुयारे तयार हाेत असल्याने जमीन भुसभुशीत (Aeration) करतात. या नैसर्गिक पोकळीमुळे मातीमध्ये हवा खेळती राहते आणि मुळांना ऑक्सिजन मिळतो. पावसाचे पाणी जमिनीत वेगाने मुरत असल्याने भूजल पातळी वाढते व जमिनीची धूप थांबते.

♻️ शेतीचे ‘ब्लॅक गाेल्ड’
गांडूळ खत निर्मिती (Vermicompost) करतात. त्यांच्या विष्ठेला वर्मीकास्ट (Vermicast) म्हणतात. हे वनस्पतींसाठी अमृत मानले जाते. रासायनिक खतांच्या तुलनेत यामध्ये पोषक तत्वांचे प्रमाण खूप जास्त असते. पोषक तत्व सामान्य मातीच्या तुलनेत प्रमाणात…

📍 नायट्रोजन (नत्र – Nitrogen) – 5 पट अधिक
📍 फॉस्फरस (स्फुरद – Phosphorus) – 7 पट अधिक
📍 पोटॅशियम (पालाश – Potassium) – 11 पट अधिक
📍 कॅल्शियम (Calcium) – 3 पट अधिक

गांडुळाच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या विष्ठेमध्ये कोट्यवधी उपयुक्त जिवाणू (Bacteria) व बुरशी (Fungus) असते, जी माती सजीव करते. गांडुळे मातीचा सामू (pH) उदासीन (Neutral) ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे पिकांना अन्नद्रव्ये शोषून घेणे सोपे असल्याने त्यांची वाढ झपाट्याने व निकाेप हाेते. कमी होत चाललेले सेंद्रिय कर्ब (Organic carbon) व रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मृत होत चाललेल्या जमिनीला पुन्हा जिवंत करण्याचे अत्यंत मोलाचे काम गांडूळ करत असतात.

♻️ शास्त्रज्ञांची मते
गांडुळांच्या वैज्ञानिक महत्त्वाला जगासमोर आणण्यात काही थोर जीवशास्त्रज्ञांचे (Biologists) मोलाचे योगदान आहे. गांडूळ हा केवळ एक कीटक नसून, तो पृथ्वीचा इतिहास बदलणारा जीव आहे, हे या शास्त्रज्ञांनी प्रयोगांद्वारे सिद्ध केले.

📍 चार्ल्स डार्विन
गांडुळांवर जगातील सखोल व पहिला वैज्ञानिक अभ्यास चार्ल्स डार्विन (Charles Darwin) यांनी केला. त्यांनी आपल्या मृत्यूच्या अवघे काही महिने आधी, 1881 मध्ये गांडुळांच्या कार्यातून सुपीक मातीची निर्मिती (The Formation of Vegetable Mould through the Action of Worms) हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. यात डार्विन म्हणतात, ‘जगाच्या इतिहासात असा क्वचितच एखादा जीव असेल, ज्याने पृथ्वीच्या रचनेत गांडुळांइतकी महत्त्वाची भूमिका बजावली असेल.’ एका एकर जमिनीतील गांडुळे दरवर्षी सुमारे 10 ते 18 टन माती खाऊन जमिनीच्या वर आणतात आणि तिचे सुपीक थरात रूपांतर करतात. इंग्लंडमधील अनेक ऐतिहासिक वास्तू व दगड हजारो वर्षांत जमिनीच्या आत गाडले जाण्यामागे तिथल्या गांडुळांनी बाहेर काढलेली मातीच कारणीभूत होती, हे डार्विन यांनी त्यांच्या संशाेधनातून सिद्ध केले आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन म्हणतात, मानवी जीवनात गांडूळ हा असा जीव आहे, जे मानवासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व उपयुक्त कार्य अविरतपणे करताे. मातीतील गांडूळ पूर्णपणे नामशेष झाले, तर मानवावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

📍 अरिस्टॉटल
जीवशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ अरिस्टॉटल (Aristotle) यांनी गांडुळांना पृथ्वीची आतडी (The Intestines of the Earth) ही अतिशय अचूक उपमा दिली होती. ज्याप्रमाणे आपल्या शरीरात आतडी अन्न पचवून शरीराला ऊर्जा देतात, त्याचप्रमाणे गांडुळे पृथ्वीवरील कचरा पचवून मातीला समृद्ध करतात, हा त्यांचा यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन होता.

📍 व्हिक्टर हेन्सेन
1877 च्या सुमारास जर्मन शरीररचनाशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ व्हिक्टर हेन्सेन (Victor Hensen) यांनी गांडुळांच्या जमिनीवरील हालचालींचा शेतीवर काय परिणाम होतो, यावर संशोधन केले. गांडुळे मातीमध्ये जी बिळे करतात, ती केवळ हवेसाठी नसून, वनस्पतींच्या मुळांना जमिनीच्या खोल थरात जाण्यासाठी तयार महामार्ग ठरतात. गांडुळांनी तयार केलेल्या छिद्रांमुळे झाडांची मुळे कडक जमिनीतही सहजपणे खाली जाऊ शकतात, ज्यामुळे पिकांची वाढ उत्तम होते, असेही हेन्सेन यांनी त्यांच्या संशाेधनात नमूद केले आहे.

📍 डॉ. थॉमस बॅरेट
20 व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. थॉमस बॅरेट (Dr. Thomas Barrett) यांनी गांडुळांचा वापर व्यावसायिक शेती आणि कचरा व्यवस्थापनासाठी कसा करता येईल, यावर संशोधन केले. त्यांनी यावर Harnessing the Earthworm हे पुस्तकही लिहिले. गांडूळ हा निसर्गाने माणसाला दिलेला मोफत कामगार आहे, जो 24 तास शेतीची मशागत करतो, असे डॉ. थॉमस बॅरेट यांनी त्यांच्या या पुस्तकात नमूद केले आहे. त्यांनी ॲग्रिकल्चरल अर्थवर्म (शेतीसाठी उपयुक्त गांडूळ) पाळण्याच्या पद्धती विकसित केल्या आणि रासायनिक खतांशिवाय केवळ गांडुळांच्या साहाय्याने उत्कृष्ट पिके घेता येतात हे प्रयोगाने सिद्ध केले. त्यामुळे त्यांना आधुनिक गांडूळ पालनाचे जनक मानले जाते.

📍 सर अल्बर्ट हॉवर्ड
ब्रिटिश शास्त्रज्ञ सर अल्बर्ट हॉवर्ड (Sir Albert Howard) यांनी भारतातील इंदूर येथे प्रदीर्घ काळ कृषी संशोधन केले. त्यांनी गांडुळांच्या विष्ठेचे (वर्मीकास्ट) महत्त्व जगाला पटवून दिले. जमिनीचे आरोग्य हे तिथल्या गांडुळांच्या संख्येवर अवलंबून असते. जर जमिनीत गांडुळे नसतील, तर ती जमीन मृत मानली पाहिजे, असेही ते म्हणतात. त्यांनी इंदूर पद्धतीचे सेंद्रिय खत (Indore Method of Composting) विकसित करताना गांडुळांच्या पचनसंस्थेचा मातीतील बुरशी व जिवाणू वाढवण्यासाठी कसा फायदा होतो, याचे सविस्तर वर्गीकरण केले आहे. त्यामुळे त्यांना सेंद्रिय शेतीचे जनक मानले जाते. जीवशास्त्रज्ञांनी हे वैज्ञानिकदृष्ट्या प्रस्थापित केले आहे की, गांडूळ हा केवळ मातीत राहणारा जीव नसून, तो जमिनीचा वायुवीजन करणारा (Aerator), मशिनरी नांगर (Plowman) आणि खत कारखाना (Chemist) या तिन्ही भूमिका एकाच वेळी पार पाडणारा निसर्गाचा उत्कृष्ट अविष्कार आहे. जमिनीतील माती अविरतपणे भुसभुशीत व सुपीक करणारे गांडूळ खऱ्या अर्थाने जमिनीचा मालक आहे आणि जगातील सर्वांत माेठा शेतकरीदेखील आहे.

♻️ गांडूळ कमी हाेण्याची कारणे
शेतातील किंवा मातीतील गांडूळ अचानक कमी होणे किंवा मृतवत (निष्क्रिय व नष्ट) होणे ही जमिनीचे आरोग्य बिघडत चालल्याची सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, गांडूळ मृतवत होण्यामागे मानवनिर्मित आणि पर्यावरणीय अशी दोन्ही प्रमुख कारणे आहेत.

📍 रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर
रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर हा गांडुळांचा सर्वात मोठा शत्रू आहे. आधुनिक शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खते व विषारी कीटकनाशके (Pesticides) मातीत मिसळतात, गांडुळांची त्वचा अत्यंत संवेदनशील आणि ओलसर असते. युरियासारखी रासायनिक खते मातीतील क्षारता (Salt concentration) वाढवतात. त्यामुळे गांडुळांच्या शरीरातील पाणी ओढले जात (Osmotic shock) असल्याने त्यांच्या त्वचेची जळजळ हाेते व ते जागेवरच मरतात. शेतातील तण मारण्यासाठी मारली जाणारी रासायनिक तणनाशके (/Weedicides) गांडुळांची प्रजनन क्षमता पूर्णपणे नष्ट करते व त्यांची कोकून (अंडी) घालण्याची क्षमता संपते.

📍 सेंद्रिय कर्बाची कमतरता
गांडुळांचे मुख्य अन्न हे कुजणारे सेंद्रिय पदार्थ (झाडांची पाने, शेणखत, पिकांचे अवशेष) आहे. शेतात फक्त रासायनिक खते टाकत गेलो आणि शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर बंद केला, तर मातीतील सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) अत्यंत कमी होतो. खायला अन्न न मिळाल्यामुळे गांडुळे एकतर अन्नाच्या शोधात खूप खोल निघून जातात (सुप्त अवस्थेत जातात) किंवा उपासमारीमुळे मरतात.

📍 ट्रॅक्टर व जड यंत्रांद्वारे अति-मशागत
शेतामध्ये वारंवार ट्रॅक्टर किंवा जड यंत्रांच्या साहाय्याने खोल नांगरणी किंवा रोटाव्हेटर फिरवल्यामुळे मातीच्या रचनेला मोठा धक्का बसतो. खाेल नांगरणीमुळे गांडुळांनी राहण्यासाठी व हालचालीसाठी तयार केलेली नैसर्गिक भुयारे व बिळे नष्ट होतात. रोटाव्हेटरच्या वेगाने फिरणाऱ्या पात्यांमुळे गांडुळांचे तुकडे होतात. जरी गांडुळांमध्ये पुनरुत्पादन क्षमता (Regeneration) असली, तरी गंभीर इजेमुळे मोठ्या प्रमाणावर गांडुळे मरतात. जड यंत्रांच्या सततच्या वापरामुळे मातीचे कण एकमेकांवर दाबले जाऊन जमीन कडक (Soil Compaction) बनते. कडक जमिनीत गांडुळांना हालचाल करणे अशक्य होते.

📍 पाण्याचा अयोग्य निचरा व पाणी साचून राहणे
पावसाळ्यात गांडुळे श्वास घेण्यासाठी वर येतात हे खरे असले, तरी जर शेतात अनेक दिवसांपर्यंत पाणी साचून राहिले (Waterlogging) तर तिथली परिस्थिती बदलते. जमिनीतील हवा पूर्णपणे निघून गेल्यामुळे तिथली हवा ऑक्सिजन विरहित (Anaerobic) बनते. जास्त काळ पाण्याखाली राहिल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने गांडुळे गुदमरून मृतवत होतात. गांडुळांना जगण्यासाठी व श्वसनासाठी मातीमध्ये किमान 20 ते 30 ओलावा (Moisture) असणे अत्यंत आवश्यक असते. उन्हाळ्यात जेव्हा तापमान खूप वाढते व जमीन कोरडी पडते, तेव्हा गांडुळांच्या शरीरातील ओलावा सुकू लागतो. स्वतःचा बचाव करण्यासाठी गांडुळे जमिनीच्या अत्यंत खाली (3 ते 5 फूट किंवा त्याहून खोल) जातात आणि सुप्त अवस्थेत (Diapause) राहतात. अशा वेळी ती वरून मृतवत वाटतात. जर शेतावर आच्छादन (Mulching) नसेल तर उन्हाच्या तीव्र चटक्याने ती मरून जातात.

📍 पिकांचे अवशेष/कचरा जाळणे
शेतकरी पीक काढणीनंतर उरलेला पळकाटा, पाचट किंवा कचरा शेतातच पेटवून देतात. त्यामुळे जमिनीच्या वरच्या थराचे तापमान अचानक प्रचंड वाढते. या उष्णतेमुळे जमिनीच्या वरच्या थरात राहणारी सुपीक गांडुळे आणि त्यांची अंडी (कोकून) जागेवरच जळून खाक होतात. गांडुळांना जिवंत ठेवण्यासाठी माती सजीव असणे गरजेचे आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वारेमाप वापर टाळणे, सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे, शेतामध्ये आच्छादन (Mulching) करणे हाच गांडुळांना पुन्हा जिवंत करण्याचा एकमेव वैज्ञानिक मार्ग आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!