Rain intensity subside : पावसाचा जोर ओसरणार
1 min read
Rain intensity subside : गुरुवार (दि. 2 जुलै)पासून जवळपास आठवडाभर मुंबईसह कोकण, घाटमाथा तसेच नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीलगतच्या पश्चिम भागात दमदार तर उर्वरित महाराष्ट्राच्या भागात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर (Rain intensity) शुक्रवार (दि. 10 जुलै) म्हणजे एकादशीपासून ओसरण्याची (subside) शक्यता निर्माण झाली आहे.
📍 उघडीप कधी व किती दिवसाने मिळेल?
शुक्रवार (दि. 10 जुलै) ते रविवार (दि. 19 जुलै)पर्यंतच्या संपूर्ण 10 दिवसांत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात सुद्धा सध्याच्या पावसाची तीव्रता कमी होवून केवळ हलक्याच पावसाची शक्यता असू शकते.
📍 उघडीप कशामुळे?
🔆 पावसाळी हंगामातील महाराष्ट्रातील पावसाला पूरक ठरणारा देशाच्या मध्यावरील दीड किमी उंचीपर्यंतचा पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाबाचा आस त्याच्या सरासरी जागेपासून अधिक उत्तरेकडे म्हणजे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश राज्यांकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर हवेच्या कमी दाबाची दक्षिणोत्तर तटीय द्रोणीय आस (घळ) ही विरळतेतून उथळ होण्याची शक्यता आहे.
🔆 बंगालच्या उपसागरातील उंचीवरील हवेचे तीव्र कमी दाब क्षेत्र हे पूर्व भारतात जोरदार पाऊस देत पश्चिम बंगाल व ओडिशातून उत्तर व उत्तर-वायव्येकडे मार्गक्रमण करत येत्या दोन दिवसात दक्षिण राजस्थानमध्ये विरळ होण्याची आहे.
🔆 अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे सध्याचे बळकट मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस पावसाचा जोर कमी होवून महाराष्ट्रात काहीशी उघडीप जाणवणार आहे.
📍 स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल इतकी उघडीपी असेल?
महाराष्ट्राच्या सर्व भागात नाही, परंतु भाग बदलत काही ठिकाणी उघडझाप व ढगाळ वातावरणासह उघडीप असेल. काही ठिकाणी भौगाेलिक रचनेनुसार स्वच्छ सूर्यप्रकाशही मिळू शकतो. उघडीपी दरम्यान दुपार 3 वाजताचे दिवसाचे कमाल तापमान त्या आठवड्यात असणाऱ्या सरासरी तापमानापेक्षा 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने खालवलेले असेल. म्हणजे ते 28 ते 30 डिग्री अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते.
📍 महाराष्ट्रातील पाऊस, पेर-ओल व पेरणी
शुक्रवार (दि. 10 जुलै)नंतर जसजशी जमीन पोतानुसार म्हणजे काळ्या कसदार जमिनीत जेथे 10 ते 12 सेमी. किंवा अधिक आणि हलक्या जमिनीत 15 ते 20 सेमी. ओल प्राप्त झाली असेल तर शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतःच्या विवेकावर घ्यावा.
📍 उर्वरित जुलै महिन्यातील पावसाची शक्यता
त्यापुढील म्हणजे 20 ते 24 जुलै दरम्यानच्या जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातील महाराष्ट्रातील पाऊस वा उघडीपी संबंधीचा खुलासा शुक्रवार (दि. 17 जुलै) दरम्यान तयार होणाऱ्या वातावरणीय प्रणाल्यांच्या निर्मिती शक्यतेच्या आधारावरच अवलंबून आहे. अर्थात त्यावेळीच त्या संबंधी खुलासा होवू शकेल.
📍 मान्सून कधी संपूर्ण देश काबीज करणार?
मान्सून सहसा 8 जुलै या त्याच्या सरासरी तारखेला संपूर्ण देश काबीज करत असतो. परंतु, यावर्षी अजूनही राजस्थानच्या वायव्य भागात मान्सून पोहोचवयाचा आहे. तो सुद्धा येत्या 3 दिवसांत म्हणजे 10 जुलै दरम्यान संपूर्ण देश काबीज करेल असे वाटते. मान्सूनने वेळेत देश काबीज करणे, हे मान्सूनच्या उर्वरित काळातील गतिविधीस पूरक ठरतो.
📍 भू-जल पाणी पातळीतील वाढीसंबंधी भाष्य
खरं तर, हीच वेळ पाणी पातळीत वाढ होण्याची असते. महाराष्ट्रात जुलै व ऑगस्ट महिन्यात घाट माथ्यावर कोसळणारा झडीचा मोसमी भीज पाऊसच जमीन भू-जल पातळीत, मोठी व लघु धरणे, साठवण जलाशये व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ करत असतात. अजून जुलै व ऑगस्ट महिने पूर्णपणे जायचे आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाने धरणे व इतर जलाशयात साठवणीचा श्रीगणेशा केला आहे. ऑक्टोबरअखेर नक्कीच पाणी पातळीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त वातावरणात एकाकी बदल झाल्यास तसे सूचित करता येईल.