krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rainfall deficit, Kharif season : पावसाची मोठी तूट; खरीप हंगामाची घडी विस्कटली

1 min read

Rainfall deficit, Kharif season : आभाळ दाटूनही पाऊस (Rainfall) दडी मारतोय… आणि त्याची सर्वात मोठी किंमत देशातील शेतकरी मोजत आहेत. एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळे मान्सूनची (Monsoon) गती मंदावली असून, पावसाची मोठी तूट खरीप हंगामाच्या (Kharif season) मुळावर उठली आहे. देशात सरासरी 27 टक्के, तर महाराष्ट्रात तब्बल 33 टक्के पाऊस सरासरी पावसापेक्षा कमी असल्याने विविध पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी, 2025 च्या खरीप हंगामाच्या तुलनेत 9 जुलै 2026 पर्यंत देशातील खरीप पेरणीक्षेत्रात 23.25 टक्के, तर महाराष्ट्रात 31.5 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, जुलैअखेरीस मान्सून सक्रिय झाल्यास ही तूट काही प्रमाणात भरून निघण्याची आशा केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या क्रॉप वेदर वॉच ग्रुपने व्यक्त केली आहे.

♻️ देशात 23.25 टक्के तर राज्यात 31.5 टक्के पेरणीक्षेत्र घटले
1 जून ते 9 जुलै 2025 या काळात देशभरात 4 कोटी 43 लाख हेक्टर, तर महाराष्ट्रात 71 लाख 56 हजार हेक्टरमध्ये विविध खरीप पिकांची पेरणी (Sowing) करण्यात आली हाेती. यावर्षी 9 जुलै 2026 पर्यंत देशात 3 कोटी 51 लाख हेक्टर आणि महाराष्ट्रात 65 लाख हेक्टरमध्ये खरीप पिकांची पेरणी आटाेपली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातील खरीप पिकांचे पेरणीक्षेत्र 23.25 टक्क्यांनी तर महाराष्ट्रात 31.5 टक्क्यांची घटले आहे.

♻️ कापूस
देश पातळीवर कापसाच्या (Cotton) लागवड क्षेत्रात 23 टक्क्यांची घट झाली आहे. 9 जुलै 2025 पर्यंत खरीप हंगामात देशभर 1 काेटी 18 लाख 8 हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड करण्यात आली हाेती. यावर्षी याच काळात 96 लाख हेक्टरवर कापसाची लागवड पूर्ण झाली. आंध्र प्रदेश वगळता देशातील उर्वरित 10 राज्यांमध्ये कापसाच्या लागवड क्षेत्रात सरासरी 23 टक्क्यांची घट नाेंदविली आहे. सर्वाधिक 18 टक्क्यांची घट गुजरातमध्ये नाेंदविण्यात आली. गुजरातमध्ये चालू हंगामात 18 लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून, मागील वर्षी हे क्षेत्र 21 लाख 24 हजार हेक्टर एवढे हाेते. महाराष्ट्रातील कापूस लागवड क्षेत्र 12 टक्क्यांनी घटले असून, मागील वर्षी 28 लाख 42 हजार 560 हेक्टरवर कापसाची लागवड पूर्ण झाली हाेती तर यावर्षी 25 लाख 38 हजार हेक्टरवर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. आंध्र प्रदेशात कापूस लागवड क्षेत्रात 158 टक्क्यांची अपवादात्मक मोठी वाढ झाली आहे. मागील हंगामात 72,282 हेक्टरमध्ये कापसाची लागवड करण्यात आली हाेती तरी यावर्षी हे क्षेत्र 1 लाख 86 हजार 280 हेक्टरवर पोहोचले आहे. उर्वरित पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडून व ओडिशा या 8 कापूस राज्यांमध्ये लागवड क्षेत्रात घट नाेंदविली आहे.

♻️ साेयाबीन
देशपातळीवर साेयाबीनच्या (Soybean) पेरणीक्षेत्रात 39.65 टक्क्यांची घट झाली आहे. देशातील अग्रगण्य सोयाबीन उत्पादक राज्य असलेल्या मध्य प्रदेशात यावर्षी 30 लाख हेक्टर क्षेत्रावर साेयाबीनची पेरणी झाली असून, मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा क्षेत्र 20 टक्क्यांनी मागे आहे. मागील वर्षी मध्य प्रदेशात 36 लाख हेक्टरवर साेयाबीनची पेरणी आटाेपली हाेती. महाराष्ट्रात यावर्षी 23 लाख 58 हजार हेक्टरवर साेयाबीनची पेरणी करण्यात आली. मागील वर्षी हे क्षेत्र 28 लाख 76 हजार 760 हेक्टर एवढे हाेते. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साेयाबीनचे पेरणीक्षेत्र 22 टक्क्यांनी घटले आहे. राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा या साेयाबीन उत्पादक राज्यांमध्येही घट नाेंदविली आहे.

♻️ धान
देश पातळीवर धानाचे (Paddy) राेवणी (पुनर्लागवड) क्षेत्र 13.07 टक्क्यांनी घटले आहे. सर्वाधिक 15 टक्के घट बिहारमध्ये नाेंदविण्यात आली. पावसाच्या अनिश्चिततेमुळे बिहारमध्ये 9 जुलैपर्यंत 2 लाख 45 हजार हेक्टर क्षेत्रावर धानाच्या पिकाची पुनर्लागवड करण्यात आली. मागील वर्षी याच काळात हे क्षेत्र 2 लाख 81 हजार 750 हेक्टर हाेते. पश्चिम बंगालमध्ये 5 जुलैपर्यंत 3 लाख 10 हजार हेक्टर क्षेत्रावर धानाची पुनर्लागवड करण्यात आली. मागील वर्षी याच काळात 3 लाख 41 हजार हेक्टरवर राेवणी करण्यात आल्याने पश्चिम बंगालमध्ये 10 टक्क्यांची घट नाेंदविण्यात आली. पंजाबमध्ये धरणाचे पाणी व सिंचनाची प्रभावी साेय असल्याने तिथे 26 लाख हेक्टरवर धानाच्या पिकाची राेवणी पूर्ण करण्यात आली. या राज्यात कुठलीही घट अथवा वाढ नाेंदविण्यात आली नसली तरी छत्तीसगड, महाराष्ट्रासह इतर धान उत्पादक राज्यांमध्ये पावसाअभावी धानाची राेवणी खाेळंबली आहे.

♻️ डाळवर्गीय पिके
देशपातळीवर विविध डाळवर्गीय (Pulses) पिकांच्या (कडधान्य) पेरणीक्षेत्रात 25.8 टक्क्यांची घट झाली असून, सर्वाधिक 41.9 टक्के घट तुरीच्या पिकाची नाेंदविली आहे. राजस्थानमध्ये मूग आणि इतर कडधान्यांच्या पिकांची पेरणी 25 लाख हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 5 टक्क्यांची घट झाली आहे. राजस्थानात मागील वर्षी 26 लाख 25 हजार हेक्टरमध्ये डाळवर्गीय पिकांची पेरणी करण्यात आली हाेती. पावसाच्या दिरंगाई व खंडामुळे तुरीच्या पेरणीत सर्वाधिक म्हणजे, 41.9 टक्क्यांची घट झाली आहे.

♻️ मका
पशुखाद्य (Poultry Feed) आणि इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची (Maize – Corn) मागणी वाढल्याने कापसाला पर्याय म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी मक्याकडे वळले आहेत. राज्यात सद्यस्थितीत 5 लाख 71 हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी पूर्ण झाली असून, ती गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 4.5 टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षी मक्याचे पेरणीक्षेत्र 5 लाख 96 हजार 695 हेक्टर हाेते. महाराष्ट्रात मक्याचे सर्वाधिक 63,239 हेक्टर पेरणीक्षेत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून, त्याखालाेखाल अहिल्यानगर जिल्ह्यात 13,00 हेक्टरवर मका पेरणी झाली आहे. राजस्थानातील उदयपूर आणि संवादाता पट्ट्यात सुमारे 6 लाख 50 हजार हेक्टरमध्ये मक्याची पेरणी करण्यात आली आहे. मागील वर्षीही मक्याचे पेरणीक्षेत्र एवढेच हाेते. मध्य प्रदेश सरकारने 2026 हे ‘कृषी कल्याण वर्ष’ घोषित केल्याने भरड धान्याला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. या राज्यात राज्यात आतापर्यंत 12 लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचे पेरणीक्षेत्र 6 टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षी मध्य प्रदेशात 12 लाख 72 हजार हेक्टरवर मक्याची पेरणी करण्यात आली हाेती. बुंदेलखंड आणि सातपुडा भागात जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी झालेल्या पावसामुळे ही घट भरून निघण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर्षी मान्सून उशिरा सक्रीय झाल्याने कर्नाटकात मक्याचे पेरणीक्षेत्र 7 टक्क्यांची घट झाली आहे. या राज्यात राज्यात सद्यस्थितीत 10 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. मागील वर्षी हे क्षेत्र 11 लाख 30 हजार हेक्टर हाेते. उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या खोऱ्यात 6 लाख हेक्टरवर मक्याची पेरणी करण्यात आली असून, ती मागील वर्षीच्या तुलनेत 0.5 टक्क्यांनी वाढली आहे. उत्तर बिहारमधील पूरप्रवण आणि सिंचन क्षेत्रात मक्याची पेरणी 2 लाख 10 हजार हेक्टरवर झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत यात 4 टक्के घट झाली आहे. मागील वर्षी 2 लाख 18 हजार 400 हेक्टरवर मक्याची पेरणी करण्यात आली हाेती.

♻️ बाजरी
राजस्थानात 32 लाख हेक्टरवर बाजरीची (Pearl millet) पेरणी करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र 8 टक्क्यांची वाढले आहे. मागील वर्षी हे क्षेत्र 34 लाख 56 हजार हेक्टर हाेते. महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यात 25,360 हेक्टरमध्ये बाजरीची पेरणी पूर्ण झाली आहे.

♻️ देशातील पेरणीक्षेत्र
🔆 पिके – वर्ष 2026-27 – वर्ष 2025-26 – घट/वाढ
🔆 धान – 60,00,000 – 68,96,500 – 13 टक्के घट
🔆 तेलबिया – 60,00,000 – 1,00,00,000 – 40 टक्के घट
🔆 सोयाबीन – 48,00,000 – 80,00,000 – 40 टक्के घट
🔆 कडधान्ये – 48,00,000 – 58,56,000 – 22 टक्के घट
🔆 कापूस – 96,00,000 – 1,18,08,000 – 23 टक्के घट
🔆 ऊस – 58,00,000 – 57,14,000 – 1.5 टक्के वाढ
(पेरणी क्षेत्र हेक्टरमध्ये)

♻️ मान्सूनचे देश व्यापला
दरवर्षी 8 जुलैला देशभर पाेहाेचणाऱ्या मान्सूनने यावर्षी 9 जुुलैला देश व्यापला आहे. मान्सून काळात समुद्र सपाटी ते दीड किमी उंचीपर्यंतचा हवेच्या कमी दाबाचा देशाच्या मध्यावर असणारा मान्सूनचा ट्रफ काहीसा उत्तरेकडे म्हणजे अनुपगड, रोहटक, फुरसतगंज, देहरी, धनबाद, बांकुरा, दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत स्थित आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. महाराष्ट्रात शुक्रवार (दि. 10 जुलै) ते रविवार (दि. 19 जुलै) पर्यंतच्या संपूर्ण 10 दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!