Peaceful Himalaya crisis : शांत हिमालय संकटात का टाकताेय?
1 min read
Peaceful Himalaya crisis : नेपाळमधील (Nepal) महाप्रलयामुळे (Great Deluge) माणसांनी केलेल्या चुका आणि विकासाच्या नावावर पेरलेली संकटे आता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहेत. हिमालय आणि त्याच्या उप-पर्वत रांगा भारत, नेपाळ, भूतान, चीन, पाकिस्तानसह सात देशांमध्ये विस्तारल्या आहेत. शांत (Peaceful) व मनमोहक दिसणारा हिमालय (Himalaya) अलीकडे नेपाळ व भारताला नैसर्गिक आपत्ती (Natural disaster) व प्रपात देत आहे. याची खरी सुरुवात सन 2013 मध्ये झाली असली तरी या संकटांची (crisis) सूचना सन 2012 मध्ये काठमांडू येथे पार पडलेल्या दक्षिण आशियाई परिषदेत देण्यात आली होती. ऑगस्ट 2010 मधील लेह-लडाख भागातील भीषण ढगफुटी, उत्तराखंडमधील 16 आणि 17 जून 2013 ची ढगफुटी, 7 फेब्रुवारी 2021 चा फ्लॅश फ्लड (चमोली जिल्ह्यात नंदा देवी हिमनदीचा कडा कोसळल्यामुळे ऋषीगंगा आणि धौलीगंगा नद्यांना अचानक आलेला पूर), जानेवारी 2023 मध्ये उत्तराखंडमधील ऐतिहासिक जोशीमठ शहर अचानक खचणे, ऑक्टोबर 2023 मध्ये उत्तर सिक्किममधील दक्षिण ल्होनक हा हिम तलाव (Glacial Lake) फुटल्यामुळे तिस्ता नदीला महापूर येणे आणि चुंगथांग धरण वाहून जाणे, 5 ऑगस्ट 2025 चा उत्तरकाशी महापूर, नेपाळमधील 25 एप्रिल 2015 व 3 नोव्हेंबर 2023 चा विनाशकारी भूकंप, 26 ते 28 सप्टेंबर 2024 चा काठमांडू महापूर आणि 26 ऑगस्ट 2026 चा प्रपात ही प्रमुख व विदारक उदाहरणे आहेत.
♻️ हिमालयाचे स्वरूप
हिमालय व त्याच्या उप-पर्वत रांगा या ठिसूळ व मऊ आहेत. कारण येथील खडक गाळाचे (Sedimentary Rocks) म्हणजेच शिस्ट, शेल व वाळूपासून तयार झालेले आहेत. हे खडक सछिद्र असल्याने पाणी शाेषून घेतात व त्याचे सहज तुकडे हाेतात. हा पर्वत भारत खंडात हळूहळू उत्तरेकडे म्हणजेच भारतीय टेक्टोनिक प्लेट (Indian Plate) ही युरेशियन प्लेटकडे (Eurasian Plate) दरवर्षी सुमारे 4 ते 5 सेंटीमीटर हळूहळू उत्तरेकडे सरकतो आहे.
♻️ हिमालयातील नद्या
हिमालयातून 19 प्रमुख नद्यांचा उगम असून, 52 हिमनद्या (Glaciers) आहेत. या नद्या नेपाळ, भूतान, भारत, पाकिस्तान, बांगलादेश व चीन (तिबेट) मधून वाहतात. हिमालयातून भारतात उत्तर आणि उत्तर-पश्चिम वाहणाऱ्या नद्यांमध्ये सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, गंगा, यमुना, घाघरा/कर्णाली, गंडक, कोसी, रामगंगा व ब्रह्मपुत्रा नदीचा समावेश आहे.
♻️ हिमकडे का तुटतात?
हा संपूर्ण पर्वत बर्फाच्छादित आहे. हिमकडे व हिमनद्यांमध्ये माेठ्या प्रमाणात गाळ असताे. ठिसूळपणामुळे हिमालयात कडा काेसळण्याचे प्रमाण वाढत आहे. पर्वताचा उतार ज्या शक्तीने माती व खडकांना एकत्र धरून ठेवतो. हिमालयात मुसळधार पाऊस पडताच, पावसाचे पाणी माती व खडकाच्या छिद्रांमध्ये शिरते. त्यामुळे मातीतील कणांमधील घर्षण कमी होते व छिद्र दाब वाढतो. जेव्हा हा दाब पर्वताच्या धरून ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त होतो, तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे संपूर्ण उतार व कडा खाली घसरतात. हिमालयातील उच्च उंचीवरील खडकांच्या भेगांमध्ये पावसाचे पाणी साचते. रात्री तापमान शून्य अंशाच्या खाली गेल्यावर या पाण्याचा बर्फ होतो. पाणी गोठल्यावर त्याचे आकारमान सुमारे 9 टक्क्यांनी वाढत असल्याने भेगा रुंदावतात. दिवसा बर्फ वितळतो आणि पुन्हा रात्री गोठतो. या सततच्या चक्रामुळे खडक फुटतात आणि भूस्खलनाला आमंत्रण मिळते. हिमालयातून वेगाने वाहणाऱ्या नद्या पर्वतांच्या पायथ्याची माती सातत्याने खरवडून काढतात. पायथा कमकुवत झाल्यामुळे पर्वताच्या वरच्या मोठ्या कडा कोसळतात.
♻️ ग्लेशियर लेक आऊटबर्स्ट फ्लड
26 ऑगस्ट 2026 राेजी तिबेट व नेपाळच्या सीमेवर भलामोठा हिमकडा तुटून ग्लेशियर लेकमध्ये (Glacier Lake) कोसळला आणि पाण्याचा दाब अचानक वाढला. याच कारणामुळे या भागात भूकंपाचे सौम्य धक्केही जाणवले. एवढेच नव्हे तर, भोटेकोशी व त्रिशूली या दोन नद्यांच्या प्रवाहाचा वेग प्रचंड वाढला आणि विनाशाला कारणीभूत ठरला. याच भागात चीन क्रॉस-बॉर्डर रेल्वे नेटवर्क, धरणे व जलविद्युत प्रकल्प (Hydroelectric project), लष्करी तळ, व्यापारी कॉरिडॉर व रस्ते रुंदीकरण आदी बांधकामे करीत असल्याने कोशी नदीच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होत आहे. ही नदी नेपाळ मार्गे भारतात वाहात आली आहे. कोशी तसेच भोटेकोशी व त्रिशूली या नद्या गंडक नदीत विलीन होत असल्याने उत्तर प्रदेश व बिहारमधील या दोन्ही नद्यांकाठच्या भागाला सतर्कतेचा इशारा दिला हाेता.
♻️ माती व चिखलाचा महापूर
26 ऑगस्ट 2026 राेजी भोटेकोशी व त्रिशूली या नद्यांच्या महापुरात माेठ्या प्रमाणात चिखल, माती व दगड वाहून आले हाेते. चिखलाच्या महापूर प्रक्रियेला भूगर्भशास्त्र व जलशास्त्रामध्ये डेब्रिज फ्लो (Debris Flow) किंवा हायपर-कन्संट्रेटेड फ्लो (Hyper-concentrated Flow) म्हणतात. चिखल वाहून येण्यामागे सॅच्युरेशन व लिक्विफॅक्शन (Soil Liquefaction) ही वैज्ञानिक कारणे आहेत. मुसळधार पाऊस किंवा हिमखंड वितळल्यामुळे पर्वताच्या उतारावरील मातीत पाणी शोषून घेण्याची कमाल मर्यादा ओलांडली जाते. मातीच्या कणांमधील हवेची पोकळी पाण्याने भरल्यामुळे छिद्र दाब (Pore Water Pressure) कमालीचा वाढतो. त्यामुळे घट्ट माती आपले स्थैर्य गमावते व द्रवासारखी (Liquid) वागू लागते. पर्वतावरच्या भागात बर्फाच्छादित कडा किंवा हिमखंड फुटल्यामुळे मोठी भूस्खलने होतात. हजारो टन दगड, माती व बर्फ वेगाने खाली येतात. हा अफाट गाळ जेव्हा नदीच्या प्रवाहात मिसळतो, तेव्हा नदीच्या सामान्य पाण्याचे रूपांतर दाट चिखलाच्या प्रवाहात होते. वेगाने वाहणाऱ्या या दाट चिखलाची घनता (Density) साध्या पाण्यापेक्षा 2 ते 3 पट जास्त असते. हा चिखल जेव्हा नदीच्या पात्रातून पुढे सरकतो, तेव्हा तो पात्रातील आणि कड्यांच्या पायथ्याची उर्वरित माती व खडक स्वतःसोबत खरवडून पुढे नेतो. यामुळे पुढे सरकताना चिखलाचे प्रमाण अधिकच वाढत जाते.
♻️ हिमनद्या, माती आणि खडक
हिमनद्या (Glaciers) आणि त्यांच्या आत मोठ्या प्रमाणावर माती, वाळू, बारीक गाळ आणि लहान-मोठे खडक असतात. उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास हिमनदी फक्त पांढऱ्या किंवा निळ्या बर्फाचा मोठा साठा वाटते, परंतु वैज्ञानिकदृष्ट्या हिमनदी ही माती आणि खडकांना वाहून नेणारा एक नैसर्गिक कन्व्हेयर बेल्ट (Conveyor Belt) असते. हिमनदी जेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे अत्यंत मंद वेगाने (वर्षाला काही मीटर) उताराच्या दिशेने घसरते, तेव्हा तिच्या प्रचंड वजनामुळे ती खालील जमिनीला आणि खडकांना खरवडून काढते. या प्रक्रियेला प्लकिंग (Plucking) आणि ॲब्रेजन (Abrasion) म्हणतात. त्यामुळे खडकांचा चुरा होऊन बारीक माती तयार होते, ज्याला वैज्ञानिक भाषेत ग्लेशिअल फ्लोअर (Glacial Flour) किंवा रॉक फ्लोअर म्हणतात. दोन्ही बाजूंना असलेल्या उंच पर्वतांवर वारंवार होणाऱ्या भूस्खलनांमुळे माती, दगड आणि ढिगारे थेट हिमनद्यांमधील बर्फाच्या पृष्ठभागावर येऊन पडतात. आसपासच्या उघड्या भागातून वाऱ्यासोबत उडून येणारी बारीक माती आणि धूळ हिमनद्यांच्या बर्फावर साचते. नवीन बर्फ पडल्यावर ही माती बर्फाच्या थरांमध्ये दाबली जाते. भूगर्भशास्त्रात हिमनदीसोबत वाहून येणाऱ्या माती आणि खडकांच्या साठ्याला मोरेन (Moraine) म्हटले जाते. हिमनद्यांमधील अतिशय बारीक माती (Glacial Flour) जेव्हा बर्फ वितळल्यानंतर नदीच्या पाण्यात मिसळते, तेव्हा सूर्याच्या प्रकाशाच्या परावर्तनामुळे त्या नदीच्या पाण्याचा रंग फिरोजा (Turquoise Blue) किंवा दूधट हिरवा-निळा दिसतो.
♻️ माणसांनीच पेरली संकटे
📍 ग्लाेबल वार्मिंग
ग्लाेबल वार्मिंग व हवामान बदल हा मानवी चुका, हव्यास व चुकीच्या नियाेजनाचा परिणाम हाेय. जगात ग्लाेबल वार्मिंगची सुरुवात औद्याेगिक क्रांतीनंतर म्हणजे 1850 पासून झाली. सुरुवातीच्या काळात हा वेग अतिशय संथ असल्याने त्याचे परिणाम दृश्य नव्हते. जगाला सन 1980 च्या दशकापासून संपूर्ण जगाला ग्लोबल वॉर्मिंग व हवामान बदलाचा फटका जाणवायला लागला. 1988 हे वर्ष जागतिक हवामान बदलाच्या इतिहासात टर्निंग पॉईंट मानले जाते. याच्या तावडीतून हिमालय देखील सुटला नाही. सन 1970 नंतर हिमालयाच्या तापमानात अचानक तीव्र वाढ नोंदवली गेली. गेल्या 50 वर्षांत हिमालयाचे सरासरी तापमान दर दशकाला सुमारे 0.2°C ते 0.4°C ने वाढले आहे, जे जागतिक सरासरीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. वाढत्या तापमानामुळे 21 व्या शतकात हिमालयातील बर्फ वितळण्याचा वेग दुपटीने वाढला. ICIMOD (International Centre for Integrated Mountain Development) च्या अहवालानुसार, 1980 च्या तुलनेत 2000 नंतर हिमनद्या (Glaciers) 65 टक्के अधिक वेगाने वितळत आहेत. तिथे पाऊण ते एक किमी लांबीची सराेवरे तयार झाली आहेत. बर्फ पूर्णपणे नष्ट झाल्याने काही भागात गवत देखील उगवले आहे.
📍 विकासकामांचा हव्यास
अलीकडे पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यातून उद्भवणाऱ्या दूरगामी व भयानक संकटांचा विचार न करता, विकासकामे करण्याची व त्याचे श्रेय लाटण्याची फॅशन आली आहे. भारताने गेल्या 25 वर्षांत पायाभूत सुविधा, रस्ते रुंदीकरण आणि विकास प्रकल्पांसाठी (Forest Diversion) भारतीय हिमालयातील 70,000 हेक्टरपेक्षा जास्त अधिकृत वनजमीन इतर कामांसाठी वर्ग केली. ग्लोबल फॉरेस्ट वॉच (Global Forest Watch) नुसार, 2001 ते 2023 या काळात काश्मीरकडील भागातील 4,800 हेक्टरमधील म्हणजेच 48 चौरस किमी तसेच ईशान्येकडील हिमालयीन राज्यांमध्ये (आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम) सुमारे 5 लाख हेक्टर पेक्षा अधिक वृक्षछत्र (Tree Cover Loss) नष्ट करण्यात आले. गेल्या दोन दशकांत नेपाळमध्ये कृषी विस्तार, अवैध लाकूडतोड आणि रस्ते बांधणीमुळे दरवर्षी सरासरी 15,000 हेक्टर जंगल नष्ट केले जात आहे तर चीनने तिबेटी हिमालयीन प्रदेशात 25,000 हेक्टरपेक्षा जास्त वनक्षेत्र नष्ट केले आहे. जंगल नष्ट करण्यात पाकिस्तान देखील मागे नाही.
उत्तराखंडमध्ये 889 किमी लांबीचा चारधाम ऑल-वेदर रोड प्रकल्प आणि ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्गाच्या कामासाठी 50,000 हून अधिक झाडे तोडण्यात आली आणि हजारो टन गाळ (Muck) नद्यांच्या पात्रात फेकला गेला. सीमावर्ती भागातील धोरणात्मक (Strategic) महामार्गांच्या रुंदीकरणासाठी लाखो झाडे तोडली. चीनच्या सीमेवरील लडाख, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हजारो किलोमीटरचे रस्ते, बोगदे (अटलबोगदा, सेला पास बोगदा) आणि हवाई पट्ट्यांची उभारणी करण्यात आली. या बाेगद्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली असून, ते तयार करण्यासाठी जमिनीत अधिक क्षमतेचे सुुरुंग स्फाेट करण्यात आले.
अलकनंदा, भागीरथी, तिस्ता आणि सुबनसिरी या नद्यांवर धरणे तयार करून जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आले. जलविद्युत प्रकल्पांच्या टनेल आणि रिझर्व्हायरसाठी हजारो हेक्टर वनजमीन पाण्याखाली गेली व नष्ट झाली. नद्यांचे प्रवाह बोगद्यांमध्ये वळवल्यामुळे डोंगरांच्या अंतर्गत रचनेला मोठा धक्का बसला. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, नागालँडमध्ये जंगले जाळून शेती केली जाते. लोकसंख्या वाढल्याने या शेतीचे चक्र टप्प्याटप्प्याने वाढत आहे. शिमला, मसुरी, नैनिताल, पोखरा (नेपाळ) यासारख्या पर्यटन स्थळांचा अनियंत्रित विस्तार झाल्याने हॉटेल्स, होमस्टे आणि रिसॉर्ट्स उभारणीसाठी डोंगरांचा पायथा सपाट करून तेथील झाडे ताेडण्यात आली.
चीनने झियांगझांग रेल्वे (Qinghai-Tibet Railway) आणि ल्हासाला जोडणाऱ्या महामार्गांसाठी तसेच दुआनकान (Border Model Villages) व लष्करी तळांच्या बांधकामासाठी हजारो हेक्टर वनक्षेत्र नष्ट केले. ब्रह्मपुत्रा (यारलुंग त्सांगपो), मेकाँग आणि साल्वीन नद्यांवर चीनने जगातील सर्वांत मोठे जलविद्युत प्रकल्प उभारले आहेत. या धरणांच्या जलाशयाखाली हजारो हेक्टर घनदाट जंगले पाण्याखाली गेली. तिबेटमधील तांबे, सोने आणि लिथियमच्या खाणी उत्खननासाठी वनसंपदा नष्ट करून पर्वत बाेडके केले आहे. विकासाच्या नावावर निसर्गाशी सुरू असलेला हा खेळ, त्यातून जन्माला आलेले हवामान बदल व जीवघेणे संकटे याचा थेट व दूरगामी परिणाम शेतीक्षेत्रासह मानवी आराेग्यावर आहे. ही माणसांची पेरलेली संकटे असून, त्याकडे शासन, प्रशासन आणि नागरिक लक्ष द्यायला तयार नाहीत.
©️ मातीतलं विज्ञान