krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Fasting by Sonam Wangchuk : सरकारची वृत्ती ब्रिटिशांपेक्षाही कठाेर

1 min read

Fasting by Sonam Wangchuk : शेतकरी संघटनेत काम करताना एखादे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुरू असताना माझे वडील कधी कधी म्हणायचे, दगडाच्या भिंतीवर डोके आपटण्यात काय अर्थ आहे? सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांचे उपोषण (Fasting) सुरू आहे, दिल्ली पोलिसांनी मात्र त्यांना उपचाराच्या नावाखाली दवाखान्यात दाखल करून नजरकैदेत ठेवले आहे. संसद भवनाकडे शांततेत कूच करणाऱ्या आंदोलकांवर विनाकारण लाठीमार व अश्रुधूर सोडण्यात आला. सरकार हे सगळे करेल मात्र साधी चर्चा करण्यास तयार नाही. दगडाच्या काळजाच्या सरकार पुढे असे अहिंसावादी आंदोलनाचा काही उपयोग होणार नाही. सरकारची वृत्ती ब्रिटिशांपेक्षाही कठोर आहे. अनेकांनी सामाजिक प्रश्नासाठी अन्नत्याग करून आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे, सरकारला काही फरक पडत नाही. आपण प्राणाचे बलिदान दिले तरी देशात क्रांती घडेल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही.

🔶 संवेदनाहीन सरकार
देशात अनेक संवेदनशील प्रश्नांवर आंदोलने झाली, पण सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून संपवले. गंगा शुद्धीकरणासाठी प्रा. जे. डी. अग्रवाल यांनी उपोषण करून प्राण त्याग केला, सरकारला फरक पडला नाही. देशाला अनेक पदके व सन्मान मिळवून देणाऱ्या कुस्तीगीर खेळाडूंचा विनयभंग केला, शोषण करणाऱ्या मंत्र्यावर कारवाईसाठी याच जंतर-मंतरवर आंदोलन झाले होते. सरकारने त्यांना माघार घ्यायला भाग पाडले. मणिपूर आजही जळत आहे, सरकारला देणे घेणे नाही. खोटे एन्काऊंटर व बुलडोझर सरकार अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. ज्या देशात बलात्कारी जामिनावर सुटून मौज करतात आणि संजीव भट सारखे निरपराध आयपीएस अधिकारी जन्मठेप भोगत आहेत, त्या देशातील राज्यकर्त्यांकडून प्रतिसादाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. दगडाच्या भिंतीवर डोके आपटण्यासारखे आहे.

🔶 जागृती झाली, आता रणनीती हवी
सोनम वांगचुक व कॉकरोच जनता पार्टीच्या पुढाकाराने देशातील जनता व विशेष करून तरुणांमध्ये बऱ्यापैकी जागृती झाली असली तरी आणखी व्यापक प्रचार मोहिम हाती घ्यावी लागेल. आता एक देशव्यापी आंदोलन छेडण्याची गरज आहे. दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात देशभरातील सर्व इच्छुकांना सहभागी होणे शक्य नाही. आंदोलनाच्या विषयाला समर्थन देणाऱ्यांना त्यांच्या तालुक्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करता येईल, असे एखादे आंदोलन घ्यावे लागेल.

🔶 विरोधी पक्ष कात्रीत
साधारणपणे अशा परिस्थितीत विरोधी पक्ष सक्रिय होऊन समर्थन देत असतो, आंदोलनात सहभागी होत असतो. या आंदोलनात मात्र विरोधी पक्ष आंदोलनापासून अलिप्त आहे. याचे करण ही राजकीय आहे. आता कुठे सत्ताधारी पक्ष बदनाम होऊन सत्ता हाती येण्याची लक्षणे दिसत असताना हे कॉक्रोच जनता पार्टीचे खूळ उभे राहिले आहे, असे त्यांना वाटत असावे. जर येत्या निवडणुकीत सीजेपी हा राजकीय पक्ष स्थापन झाला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर मत विभागणी होऊन पुन्हा भाजपाकडेच सत्ता राहण्याची भीती आहे. त्यात तथ्य ही आहे. त्यामुळे काय भूमिका घ्यावी, याबाबत विरोधी पक्ष विचार करीत असावेत. संसदेत मात्र आंदोलकांवर होणाऱ्या लाठीचार्जच्या विरोधात ठाम भूमिका घेत आहे, हे योग्यच.

🔶 एक राजीनामा व्यवस्था बदलणार काय?
आंदोलनाच्या दबावामुळे कदाचित भारताच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला जाईल किंवा खाते बदल होईल, पण त्यामुळे व्यवस्था बदलणार नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अनेक वेळा देशातील सरकारे बदलली पण व्यवस्था बदलली नाही. हे आंदोलन फक्त एक राजीनामा किंवा दोषींवर कारवाई पुरते मर्यादित न राहता पूर्ण व्यवस्था बदलासाठी असायला हवे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, शोषक करप्रणाली, शेतकरी प्रश्न, ढासळती अर्थव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया अशा अनेक विषयाबाबत अमुलाग्र बदल करणारा प्रस्ताव जनतेसमोर ठेऊन समर्थन मिळवावे लागेल आणि देशव्यापी आंदोलन उभे करावे लागेल. असे न झाल्यास प्रत्येक विषयासाठी वेगळे आंदोलन करत सदैव रस्त्यावरच राहावे लागेल.

🔶 कर भरणे थांबवा
देशातील जनता कष्ट करून पैसे लावते, पण त्यातील अधिकांश पैसे कर रूपाने सरकारला देतो. या पैशातून जनतेला सुविधा व सुरक्षा मिळेल ही अपेक्षा असते. सध्या आपण पाहत आहोत की आपण भरलेल्या करा वर फक्त काही ठराविक मंडळी ऐश करत आहेत. जनतेला मिळतात ते फुटलेले रस्ते, पडणारे पूल, जीर्ण सरकारी शाळा, निकामी पाणीपुरवठा योजना वगैरे वगैरे. सरकार जे काम करेल, त्यात घोटाळा होणारच याची जनतेला आता खात्री असते. शेतकरी नेते शरद जोशी म्हणत ‘अशा सरकारला कर देणे म्हणजे दारुड्या नवऱ्याला गळ्यातले मंगळसूत्र विकून पैसे देण्यासारखे आहे’ कर, कर्जा नाही देंगे! अशी शेतकरी संघटनेची घोषणा आहे. सरकारला रग लागेल अशा ठिकाणी चिमटा घ्यावा लागेल.

🔶 आंदोलन अहिंसकच असायला हवे
सरकार अहिंसक आंदोलनाला दाद देत नाही म्हणून काही कडक भडक आंदोलन करावे, असे मत अनेक लोक चर्चा करताना व्यक्त करतात. नेपाळसारखे केल्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही, असे ही काही मंडळी आवेगाने बोलतात. पण हा मार्ग योग्य नाही त्यात देशाचे मोठे नुकसान होऊ शकते. सरकार ही त्याचीच वाट पाहत असावं. एकदा आंदोलकांनी तोडफोड सुरू केली की, पोलिस गोळ्या घालायला मोकळे. जंतर-मंतरवर काही सरकार प्रेमी समाजकंटकांकडून हिंसा भडकवण्याचा प्रयत्न झालेला आपण पाहिला आहे. सीजेपीच्या नेत्यांनी संयम आणि समजूतदारपणा दाखवला आहे, त्याचे कौतुकच करायला हवे. सरकारच्या अफाट क्रूर पोलिसी सामर्थ्य पुढे निःशस्त्र आंदोलनाचे हिंसक आंदोलन टिकाव धरू शकत नाही. श्रीलंकेत एलटीटीई आणि भारतात नक्षलवादी यांचा सशस्त्र लढा यशस्वी होऊ शकला नाही, आपण काय टिकणार?

🔶 सोनम वांगचुक सारख्या नेतृत्वाची गरज
ब्रिटिश सत्तेच्या विरोधात हिंसक आंदोलने झाली, पण आता काळ बदलला आहे. परकीय सत्ता जाऊन स्वकियांची सत्ता प्रस्थापित झाली आहे, लोकशाही आहे. आता बाँब फेकण्याची गरज नाही पण मोठ्या संख्येच्या जनआंदोलनाची गरज आहे. लोकशाहीत मतपेटीतून सरकारे बदलता येतात, पण आता मतपेट्या ही प्रामाणिक राहिल्या नाहीत म्हणून व्यापक जनआंदोलन हाच एक मार्ग आहे व त्यासाठी सोनम वांगचुक सारख्या नेतृत्वाची गरज आहे. आता उपोषण सोडून पूर्ण व्यवस्था बदलासाठी सोनम वांगचुक सारख्या प्रामाणिक, अभ्यासू आणि विज्ञानवादी नेतृत्वाची देशाला गरज आहे. आपल्या अशा बलिदानापेक्षा आपण भारतातील तरुणांना योग्य दिशेने घेऊन जाण्याचे कार्य केले तर ते देशाच्या जास्त हिताचे ठरेल. सोनमजी आपण उपोषणाचा त्याग करून चळवळीचे नेतृत्व करावे ही अपेक्षा आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!