Declare a Drought : अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा
1 min read
Declare a Drought : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 35 – 40 दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले व हाेत आहे. शेतातील उभी पिके पाण्याचा अभाव आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे करपत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यात काेरडा दुष्काळ (Drought) जाहीर (Declare) करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ एकरी एक लाख रुपयांची मदत करावी, रब्बी हंगाम डाेळ्यासमाेर ठेवून जमिनीतील पाणी पातळी वाढवण्याच्या दृष्टीने कृत्रिम पाऊस पाडावा, अशी मागणी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. श्रीरामपूर येथील प्रांतअधिकारी किरण सावंत यांनी हे निवेदन स्वीकारले.
काेरड्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील पशुधन धोक्यात आले आहे. चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने गुरांना जगवण्याचा यक्षप्रश्न शेतकरी व पशूपालकांपुढे निर्माण झाला आहे. या गुरांना जगवण्यासाठी सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यात पशू व चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात. अहिल्यानगर जिल्ह्यात आधीच पावसाचा मोठ्या खंड असल्यामुळे खरीप पिके करपत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित पाणी उपलब्ध आहे, ते शेतकरी पाणी देऊन त्यांची खरीप पिके कशीबशी वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत. पण महावितरण कंपनीने 1 सप्टेंबरपासून रात्रीच्या वीज पुरवठ्यामध्ये 4 तासांची कपात केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नवीन संकट निर्माण झाले आहे. महावितरणने दुष्काळात तेरावा महिना आणला आहे.
महावितरणने रात्रपाळीचा वीजपुरवठा पूर्ववत 10 तासांचा करावा, अशा मागण्या या निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे करण्यात आल्या असून, सरकारने यावर काही उपाययाेजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. शिष्टमंडळात शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, महिला आघाडीच्या सुनीता वानखडे, बाळासाहेब घोगरे, मधुकर काकड, प्रकाश जाधव, मयूर भनगडे, श्रीराम त्रिवेदी, शांताराम महांकाळे, नामदेव घोगरे, राजेंद्र शिंदे, बाबासाहेब गायकवाड, आशा महांकाळे, कोमल वानखडे, पुष्पा घोगरे, मंदा गमे यांच्यासह शेतकऱ्यांचा समावेश हाेता.