krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Sugar shortage : केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी देशात 47 लाख टन साखर (Sugar) शिल्लक असल्याचे जाहीर केले हाेते. 1 ऑक्टोबर 2025 ते 30 सप्टेंबर 2026 या काळात देशभरात 291 लाख टन साखरेचे उत्पादन (Production) झाल्याने साखरेचा एकूण साठा 338 लाख टन झाला. यातील 8 लाख टन साखर निर्यात (Export) करण्यात आली असून, 247 लाख टन साखर देशांतर्गत बाजारात विकण्याची आणि 31 लाख टन साखर इथेनॉल (Ethanol) निर्मितीला देण्याची केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यामुळे देशात 52 लाख टन साखर शिल्लक असायला हवी हाेती. पण, केंद्र सरकारच्या मते साखरेचा शिल्लक साठा (30 सप्टेंबर 2026 अखेर) 35 लाख टन एवढा आहे. मग या संपूर्ण साखरेचा हिशेब केल्यास 17 लाख टन साखर गेली कुठे? याचे उत्तर कुणीही द्यायला तयार नाही.

♻️ अंदाज आणि वास्तव उत्पादन
1 ऑक्टाेबर ते 30 सप्टेंबर हा काळ साखर वर्ष मानले जाते. या काळात वर्षभरातील साखरेचे उत्पादन, वापर, आयात, निर्यात यासह शिल्लक साठ्याचा हिशेब ठेवला जाताे. 1 ऑक्टोबर 2025 ते 30 सप्टेंबर 2026 या वर्षभराच्या काळात देशात 343 लाख टन साखरेचे उत्पादन हाेण्याचा पहिला व प्राथमिक अंदाज (ऑक्टोबर 2025) इंडियन शुगर ॲण्ड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (ISMA – Indian Sugar & Bio-energy Manufacturers Association) व्यक्त केला हाेता. साखर हंगामाच्या सुरुवातीला देशातील समाधानकारक पाऊस व ऊस लागवड क्षेत्र चांगले असल्याने साखरेचे उत्पादन 340 लाख टनांच्या टप्पा पार करणार असल्याचेही ISMA ने त्यावेळी स्पष्ट केले हाेते. याच संस्थेने फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांच्या सुधारित अंदाजामध्ये 320 लाख टन साखर उत्पादन हाेणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही भागात उसाच्या गाळपाचा वेग मंदावला हाेता. उसावरील कीड-रोग (रेड रॉट) आणि काही भागात झालेल्या अवेळी पावसामुळे रिकव्हरी रेट (साखरेचे प्रमाण) कमी निघू लागल्याने त्यांनी अंदाजात 23 लाख टनांची घट केली हाेती. ऑगस्ट 2026 मधील अंतिम अंदाजामध्ये त्यांनी साखरेचे उत्पादन 306 लाख टनांपर्यंत खाली आणले. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक पट्ट्यातील अतिवृष्टी व उसाची घटलेली आवक यामुळे गाळप हंगाम लवकर आटोपला. उत्पादनात अधिकच घट दिसून आल्याने त्यांनी अंतिम अंदाज 306 लाख टनांवर आणला हाेता. वास्तवात, देशात 291 लाख टन साखरेचे उत्पादन झाल्याने केंद्र सरकारने स्पष्ट केले. मागील वर्षी (सन 2024-25 चा हंगाम) सततच्या व अतिपावसामुळे ऊस पिकाचे झालेले नुकसान, त्यामुळे घटलेले उत्पादन, पिकावरील रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे साखरेच्या उताऱ्यात आलेली घट याकडे सरकारचे दुर्लक्ष केले तसेच चुकीच्या आकड्यांमुळे वेळीच याेग्य उपाययाेजना न करता या समस्येला केंद्र सरकारनेच जन्म दिला.

♻️ साखरेची आयात व दरातील तेजी
सध्या देशांतर्गत बाजारात साखरेचे दर प्रतिकिलो 60 ते 70 रुपयांवर पोहोचले आहेत. पुढे सण व उत्सवांचे दिवस असल्याने नामुश्की टाळण्यासाठी व ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 20 ऑगस्ट 2026 रोजी ब्राझीलहून 10 लाख टन कच्ची साखर विना शुल्क आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जागतिक बाजारात प्रक्रिया केलेल्या साखरेचे (रिफाइंड पांढरी साखर – White Refined Sugar) दर 535 ते 570 डॉलर प्रतिटन आहे. भारतीय रुपयांमध्ये विचार केल्यास 50,600 ते 54,390 रुपये प्रतिटन म्हणजेच 50.60 ते 54.40 रुपये प्रतिकिलो आहे. जागतिक बाजारात कच्च्या साखरेचे दर सध्या 392 ते 403 डॉलर प्रतिटन म्हणजेच 37,044 ते 38,083 रुपये प्रति टन अर्थात 37.04 to 38.08 रुपये प्रतिकिलो आहे. या साखरेवर प्रक्रिया करण्यासाठी 2,500 ते 4,000 रुपये प्रतिटन येत असल्याने या साखरेचे दर 62 ते 78 रुपये प्रतिकिलाेवर जाणार आहेत. कच्च्या साखरेपासून पांढरी साखर करण्याच्या प्रक्रियेत 2 ते 3 टक्के साखर वेस्टेज (Melting Loss) जात असल्याने प्रति टनामागे या साखरेचे मूल्य 800 ते 1,100 रुपये होते. ब्राझीलहून साखर आयात केल्यास वाहतूक, हाताळणी व विमा खर्च विचारात घेता हा दर किमान 65,000 रुपये प्रतिटन म्हणजेच 65 रुपये प्रतिकिलो हाेताे. विशेष म्हणजे साखरेचे सौदे आज जरी केले तरी ती साखर भारतात यायला किमान 45 ते 55 दिवस लागतात. त्यामुळे साखरेच्या दरातील तेजी किमान तीन महिने कायम राहणार आहे.

♻️ प्रमुख 10 साखर उत्पादक देश
🔆 ब्राझील : जगातील सर्वात मोठा उत्पादक देश. साखरेच्या जागतिक उत्पादनापैकी 25 ते 30 उत्पादन एकट्या ब्राझीलमध्ये हाेते.
🔆 भारत : दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश.
🔆 युरोपियन युनियन : युराेपातील काही राष्ट्रांमध्ये साखरेचे उत्पादन हाेते.
🔆 चीन : ऊस आणि बीट या दोन्हीपासून साखरेचे उत्पादन करतो.
🔆 थायलंड : आशियातील प्रमुख साखर उत्पादक देश.
🔆 पाकिस्तान : आशियाई बाजारातील महत्त्वाचा साखर उत्पादक देश.
🔆 रशिया : बीट साखरेचे (Sugar Beet) मोठे उत्पादन.
🔆 मेक्सिको : उत्तर अमेरिकेतील प्रमुख ऊस व साखर उत्पादक देश.
🔆 अमेरिका : ऊस आणि बीट दोन्हीचे उत्पादन.
🔆 ऑस्ट्रेलिया : किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर उसाचे व साखरेचे उत्पादन.
हा साखरेच्या वार्षिक उत्पादन क्षमतेनुसार उतरता क्रम आहे. ब्राझील, भारत, चीन, थयलंड, पाकिस्तान, मेक्सिकाे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे राष्ट्र उसापासून तर युराेपीय राष्ट्र, चीन, रशिया, अमेरिका बीटपासून साखर तयार करतात.

♻️ प्रमुख 10 साखर निर्यातदार देश
🔆 ब्राझील : जागतिक साखर निर्यातीत 40 टक्क्यांपेक्षा अधिक वाटा.
🔆 थायलंड : थायलंडमध्ये साखरेचा वापर कमी असल्याने हा देश बहुतांश साखर निर्यात करताे.
🔆 भारत : देशांतर्गत गरज आणि सरकारी धोरणांनुसार भारत साखर निर्यातीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर आहे.
🔆 फ्रान्स : युरोपमधील सर्वात मोठा रिफाइंड साखर निर्यातदार देश.
🔆 ग्वाटेमाला : मध्य अमेरिकेतील सर्वात मोठा साखर निर्यातदार देश.
🔆 जर्मनी : बीट साखरेची निर्यात करणारा देश.
🔆 पोलंड : युरोपियन युनियनमधील प्रमुख साखर निर्यातदार देश.
🔆 सौदी अरेबिया : कच्ची साखर आयात करून ती रिफाइंड (प्रक्रिया) करून पुन्हा निर्यात करतो (Re-exporter).
🔆 मोरोक्को : रिफाइंड साखरेचा मोठा निर्यातदार देश.
🔆 दक्षिण आफ्रिका व मेक्सिको : आफ्रिकी आणि अमेरिकन बाजारातील महत्त्वाचे साखर निर्यातदार देश.
भारत देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्यासाठी वेळोवेळी निर्यातीवर कोटा ठरवतो किंवा बंदी घालतो. त्यामुळे निर्यातीतील भारताचा क्रमांक हंगामानुसार बदलताे.

♻️ साखरेचा वापर व मागणी
भारतात दरवर्षी सरासरी 280 ते 285 लाख टन साखरेचा वापर (Consumption) व मागणी (Demand) असते. यातील 60 ते 65 टक्के साखर ही औद्याेगिक वापरासाठी म्हणजेच बिस्किटे, बेकरी फूड, मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स आणि प्रोसेस्ड फूड तयार करण्यासाठी वापरली जाते. उर्वरित 35 ते 40 टक्के साखर ही घरगुती व नागरिक दैनंदिन वापरासाठी विकत घेतात. सणासुदीच्या काळात साखरेच्या मागणीत मोठी वाढ होते. भारतात दर महिन्याला सरासरी 25 ते 26 लाख टन साखरेची गरज असते. सणांच्या काळात ही मागणी 15 ते 20 टक्क्यांनी वाढून ही मागणी 28 ते 30 लाख टन प्रति महिन्यावर पोहोचते. वर्षभरातील एकूण साखरेच्या वापरापैकी 35 ते 40 टक्के साखर केवळ या 4 महिन्यांत वापरली जाते. घरगुती वापरापेक्षा व्यावसायिक मिठाई उत्पादक, बेकरी आणि शीतपेये बनवणाऱ्या उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात advance मध्ये साखरेची खरेदी व साठेबाजी केली जाते. नवीन उसाचा गाळप हंगाम ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होत असल्याने, ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात जुन्या साठ्यावर (Opening Stock) ताण पडतो. म्हणूनच या काळात साखरेचे दरात तेजी येते.

♻️ वाढती मागणी
ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांमुळे गाेड खाद्यपदार्थांच्या मागणीत दरवर्षी वाढ हाेत असल्याने या चार महिन्यात साखरेची मागणी वाढलेली असते. नेमके याच काळात साखरेचा तुटवडा निर्माण झाला असून, जागतिक बाजारात साखरेच्या दरात तेजी असल्याने त्याचे परिणाम साखरेच्या दरवाढीवर झाले आहे. परिणामी, बेकारी उद्याेगातील गाेड पदार्थांच्या दरात 10 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र सरकारने साखरेवर स्टाॅक लिमिट लावले असून, सरकारी यंत्रणा साखरेच्या साठेबाजीवर लक्ष ठेवून आहे.

♻️ आयात केलेली साखर कधी येणार?
केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने (DGFT – Directorate General of Foreign Trade) 20 ऑगस्ट 2026 राेजी ब्राझीलमधून 10 लाख टन कच्ची साखर आयात करण्याची सूचना जारी केली. ही आयात (Import) शुल्कमक्त आहे. त्यानंतर भारतीय किनारपट्टीवरील कोस्टल रिफायनरीज आणि मोठ्या व्यापाऱ्यांनी ब्राझीलमधील निर्यातदारांशी संपर्क साधून सौदे (Contracts) बुक करण्यास सुरुवात केली. ब्राझीलच्या सांतोस (Santos) पोर्टवरून निघालेली मालवाहू जहाजे भारतातील कांडला, मुंद्रा, जवाहरलाल नेहरू पोर्ट या बंदरांमध्ये पाेहोचण्यासाठी साधारणपणे 35 ते 45 दिवस लागतात. ऑगस्टच्या शेवटी सुरू झालेले सौदे आणि त्यानंतरची साखरेची शिपमेंट विचारात घेता ती कच्ची साखर ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भारतीय बंदरांमध्ये दाखल होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर त्यावर प्रक्रिया (Refining) करून ती पांढरी साखर विक्रीसाठी बाजारात येईल.

©️ मातीतलं अर्थकारण

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!