krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Ruler in Shishmahal : शिशमहलातील ‘सत्ता’धारी

1 min read
Ruler in Shishmahal : दिल्लीतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान उभारण्यासाठी, सजवण्यासाठी किंवा विस्तारासाठी केलेला अवाढव्य खर्च सध्या देशात चर्चेचा विषय झाला आहे. असाच अवाढव्य खर्च असलेली कित्येक कामे देशात पूर्वापार करण्यात येत आहेत. आपला बडेजाव मिरविण्यासाठी अशी कामे वेळोवेळी करण्यात आल्याचे दिसून येते. अशा वास्तू उभारताना जगातील प्रचंड श्रीमंत देशांचे अनुकरण करण्यात येत असल्याचेही स्पष्ट जाणवते. मात्र, आपण ज्या देशात वास्तव्य करीत आहोत. तेथील बहुतांश जनतेला अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजाही भागवता येत नसेल आणि सत्तेतील लोक (Ruler) मात्र त्यांच्या सुखासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोई करून आपलीच पाठ थोपटून घेत असेल तर, तो राष्ट्रीय गुन्हा नसेलही, परंतु निदान राष्ट्रीय पाप नक्कीच आहे.

ज्या मेट्रो ट्रेनने आमची शहरे आंतरराष्ट्रीय दर्जाची दिसू लागली आहेत, त्याच मेट्रोमार्गाच्या आडोशाने राहून जीवन कंठणारी दरिद्र जनता दुर्लक्षित का राहावी..? मुंबई महागरपालिकेची भव्य इमारत वास्तू सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना नक्कीच. मात्र, ती उभारण्याकरिता केलेला खर्च आणि त्या काळात देशातील जनतेची आर्थिक दुरावस्था याचा विचार केला तर राजसत्तेला लोकांची किती चिंता असते, याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. विविध कारणाने लोक किड्यामुंग्यासारखे मरत असताना याच देशात जुलमी राजसत्तेने ‘ताजमहल’ उभारला असेल.

याच आमच्या देशात लोककल्याणाची स्पष्ट जाण असणारे सम्राट अशोक आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश देणारे शिवछत्रपतीही होऊन गेले. यावर कोणाचा विश्वास तरी बसेल काय? माझ्या देशातील लोक उघडेनागडे असताना मी अंगभर कपडे कसे घालू शकतो, हा विचार मांडणारे महात्मा आमचे ‘राष्ट्रपिता’ असेल तर आमचा DNA नक्कीच दूषित झालेला असल्याचे मान्य करावे लागेल. युगाचार्य स्वामी विवेकानंद यांना अमेरिकेत मिळणाऱ्या सुखसोई पाहून आपले उपाशी देशबांधव आठवतात. त्यांचे अश्रू ओघळू लागतात. झोप लागत नाही. खरे साधूसंत आणि नेते देशवासीयांना सुसंगत असलेले साधे जीवन जगतात. त्यांना लोकांचा कळवळा होता. लोकांच्या अडचणीची जाणीव होती.

आता तर खेड्यापासून ते राष्ट्रीय पातळीवर जी काही कामे केली जातात, त्यात मुख्य मुद्दा असतो, राजकीय लाभ आणि कमिशन. नाव फक्त गरीब आणि विकासाचे. कसेही करून व्यापारी आणि उद्योजक यांचे खिसे भरणे हाच मुख्य हेतू. कारण देशातील आणि विदेशातील ‘पुंजीपती’च आपल्या राजकारणाचे खरे अन्नदाते होत.

आता तर अशी खात्री पटत आहे की, लोकसेवेचा लवलेश नसताना सत्तेची प्रचंड हाव असलेले जे काही आमचे विविध पक्षांचे नेते आहेत ते सर्व विदेशी आक्रमकांची ‘नाजायज औलाद’ असावी. ऋषीमुनी ज्यांचे मूळ होय ती भारतीय जमात ही नक्कीच नाही. विज्ञान खूप प्रगत झाले आहे. अशा नालायक सत्तालोलूप लोकांचा एकदा DNA तपासून पहिला तर त्याचे विदेशी आक्रमकांशी साधर्म्य नक्कीच आढळून येईल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!