krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Polluted air a silent killer : ‘सायलेंट किलर’मुळे प्रत्येक श्वासात मृत्यूची सावली !

1 min read

Polluted air a silent killer : देशभरातील शहरी व ग्रामीण भागात हवेचे प्रदूषण (Air pollution) झपाट्याने वाढत असून, ही प्रदूषित हवा माणसांसह पशु-पक्ष्यांसाठी ‘सायलेंट किलर’ (Silent Killer) बनली आहे. हा सायलेंट किलर जगात दरवर्षी 81 लाख तर, भारतात 21 लाख लाेकांचा जीव घेताे. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये जगातील पाच वर्षांखालील सुमारे सात लाख तर, 1.69 लाख भारतीय मुलांचा समावेश आहे. कारखाने व वाहनांचा विषारी धूर, बांधकाम साहित्याची हवेत मिसळत असलेली रसायनमिश्रित धूळ, त्यातील घातक घटक श्वासावाटे फुफ्फुसे व रक्ताभिसरण क्रियेदरम्यान संपूर्ण शरीरात भिनत असल्याने ही प्रदूषित हवा गंभीर आजारांसाेबतच मृत्यूला निमंत्रण देत आहे. ही हवा माणसांचे सरासरी आयुर्मान पाच ते आठ वर्षांनी कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे. वाढते नागरीकरण, विकास व बांधकामांमुळे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये हवेचे प्रदूषण, त्यामुळे हाेणारे आजार व मृत्यूचे प्रमाण वाढत असताना या अतिशय गंभीर व जीवघेण्या समस्येकडे शासन, प्रशासन व नागरिक यापैकी कुणीही गांभीर्याने बघत नाही. त्यामुळे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न व उपाययाेजना केल्या जात नाही.

♻️ ‘डब्ल्यूएचओ’ची मानके
जागतिक आराेग्य संघटना (डब्ल्यूएचओ)च्या हवेतील PM2.5 ची वार्षिक सरासरी पातळी ही 5 पेक्षा अधिक नसावी. मुंबई शहरात ही पातळी सात पट, तर नवी मुंबईत 11 पट अधिक आहे. पुणे शहरात ही मर्यादा 7.8 पटीने जास्त नोंदवली गेली असून, चंद्रपूर 10 पटीने, तर नागपूर शहरात 9.4 पटीने अधिक असल्याचे आढळून आले आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणारे महाराष्ट्रातील 31 शहरे आहेत.

♻️ आजार व मृत्यूदर
प्रदूषित हवेमुळे हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेह, फुफ्फुसाचा कर्करोग, COPD (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज – Chronic obstructive pulmonary disease), ब्राँकायटिस या इतर गंभीर व दीर्घकालीन आजार जडतात. भारतात या आजारांच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ हाेत आहे. हवेच्या प्रदूषणामुळे जगात दरवर्षी 81 लाख लाेकांचा मृत्यू हाेताे. 5 वर्षांखालील सुमारे 7 लाख मुलांचा ही प्रदूषित हवी जीव घेते. भारतात 5 वर्षांखालील सुमारे 1.69 मुले दरवर्षी प्रदूषित हवेमुळे हाेणाऱ्या आजारात दगावतात. भारतात दरवर्षी 21 नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागताे. स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2025 (State of Global Air 2025)च्या अहवालानुसार भारतातील 7 पैकी 1 मृत्यू हा हवेच्या प्रदूषणामुळे होतो. दिल्लीसारख्या शहरांमध्ये केवळ श्वसन आजारांच्या रुग्णांत 40 ते 50 टक्क्यांची वाढ झाल्याचे हाॅस्पिटलमधील रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसून येते. दिल्लीतील 6 प्रमुख रुग्णालयांमध्ये 2022 ते 2024 या तीन वर्षांत तीव्र श्वसनविकाराचे (Acute Respiratory Illness) 2,04,758 रुग्ण नोंदवले गेले. हवा प्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी आयुष्य 5 ते 8 वर्षांनी कमी होत असल्याचा अंदाज Energy Policy Institute at the University of Chicago (EPIC) ने वर्तविला आहे. केंद्र सरकारने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP – National Clean Air Program) सुरू केला असला तरी त्याचे काम प्रभावीपणे हाेताना दिसून येत नाही.

♻️ महाराष्ट्राची स्थिती
विविध संस्थांचे अहवाल आणि The Lancet Planetary Health सह आरोग्य संघटनांच्या अभ्यासानुसार हवा प्रदूषणात उत्तर प्रदेश देशात क्रमांक-1 तर महाराष्ट्र क्रमांक-2 वर आहे. महाराष्ट्रात सुमारे 40.1 लाख लोक COPD (फुफ्फुसाचा गंभीर विकार) आणि 27 लाख लोकं दमा (Asthma) या आजारांनी त्रस्त आहेत. राज्यात दरवर्षी हाेणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे 16.7 मृत्यू हे थेट वायू प्रदूषणाशी संबंधित असून, सुमारे 1.4 लाख ते 1.8 लाख लोकांचा मृत्यू प्रदूषित हवेमुळे होतो. एकट्या मुंबई शहरात दरवर्षी सुमारे 5,100 तर पुण्यात 1,400 लोकांचा प्रदूषित हवेमुळे अकाली मृत्यू हाेताे.

♻️ हवा प्रदूषित राज्ये
📍 उत्तर प्रदेश : दरवर्षी सर्वाधिक मृत्यू – सुमारे 2.6 लाख ते 3.4 लाख.
📍 महाराष्ट्र : दरवर्षी मृत्यू – सुमारे 1.4 लाख ते 1.8 लाख.
📍 बिहार : प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत तिसरे राज्य.
📍 पश्चिम बंगाल : वायू प्रदूषणाचा मोठा आरोग्यावर भार आहे.
📍 राजस्थान : हे राज्य या यादीत पाचव्या क्रमांकावर येते.
(महत्त्वाची निरीक्षणे 2026 च्या अहवालानुसार)

♻️ जगातील सर्वाधिक प्रदूषित देश
जागतिक हवेच्या गुणवत्तेचा विचार करता, स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी IQAir च्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित देश…
🔆 देश – हवेतील PM2.5 ची सरासरी पातळी
📍 चाड (Chad) – 91.8 (जागतिक आरोग्य संघटनेच्या मर्यादेपेक्षा 18 पटीने जास्त).
📍 बांगलादेश – 79.9
📍 पाकिस्तान – 73.7
📍 काँगो (DRC): 58.2
📍 भारत – 50.6
भारतात 2023 मधील 54.4 वरून 7 टक्क्यांनी सुधारणा, तरीही मर्यादेपेक्षा 10 पट जास्त.

♻️ मृत्यूंच्या संख्येत भारत व चीन
🔆 जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे 81 लाख लोकांचा मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतो, यातील सुमारे 54 टक्के मृत्यू भारत आणि चीनमध्ये होतात.
📍 भारत – दरवर्षी 21 लाख ते 23 लाख लाेकांचा मृत्यू.
📍 चीन – दरवर्षी 18 लाख ते 23 लाख लाेकांचा मृत्यू.
या जागतिक क्रमवारीनुसार भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देश आहे. जगातील सर्वात प्रदूषित 100 शहरांपैकी 83 शहरे एकट्या भारतातील आहेत. यामध्ये बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वाधिक प्रदूषित महानगर ठरले आहे. दिल्ली हे सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे.

♻️ भारतातील सर्वाधिक प्रदूषित राज्ये व शहरे
🔆 IQAir World Air Quality Report 2024 नुसार भारतातील सर्वाधिक प्रदूषित राज्ये आणि शहरे…
📍 दिल्ली – दिल्ली सातत्याने भारतातील आणि जगातील सर्वात प्रदूषित राजधानी राहिली आहे. येथे हिवाळ्यात PM2.5 ची पातळी सरासरीपेक्षा 20 पटीने जास्त असू शकते.
📍 हरियाणा – हरियाणातील फरीदाबाद, गुरुग्राम आणि हिसार ही शहरे सर्वाधिक वायू प्रदूषित आहेत.
📍 उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशातील गाझियाबाद, नोएडा, लोणी आणि मुझफ्फरनगर ही शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत.
📍 बिहार – बिहारमधील बेगुसराय हे शहर 2024 मध्ये जगातील सर्वात प्रदूषित महानगर म्हणून नोंदवले गेले. मुजफ्फरपूर आणि पाटणा या शहरांतही वायू प्रदूषणाची पातळी उच्च आहे.
📍 पंजाब – प्रामुख्याने शेतातील वाळलेले पीक जाळल्यामुळे (Crop Burning) हिवाळ्यात पंजाबमधील मुल्लानपूर आणि जालंधर या शहरात हवेचे प्रदूषण वाढते.
📍 राजस्थान – राजस्थानातील भिवडी व श्रीगंगानगर ही शहरे सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहेत.
📍 भारतात सर्वाधिक म्हणजे 416 शहरे एकट्या उत्तर प्रदेशात आहेत. दिल्ली शहर सर्वाधिक प्रदूषित मानले जाते. जागतिक आराेग्य संघटनेच्या मानकाच्या तुलनेत दिल्लीतील प्रदूषण 20 टक्क्यांनी अधिक आहे. महाराष्ट्रातील 31 शहरांचा समावेश आहे.
📍 मेघालयमधील बर्निहाट (Byrnihat) हे शहर अनेकदा भारतातील व जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून नोंदवले गेले आहे.
📍 मिझोराममधील ऐझॉल, कर्नाटकमधील चामराजनगर आणि तामिळनाडूतील अरियालूर या शहरांमधील हवेची गुणवत्ता सर्वात चांगली व समाधानकारक आहे.

♻️ महाराष्ट्रातील प्रदूषित शहरे
प्रदूषित राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्र पहिल्या 5 मध्ये येत नाही. यात दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. भारताच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (NCAP) अंतर्गत निवडलेल्या 131 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरांचा समावेश आहे. या दृष्टीने विचार केल्यास, प्रदूषित शहरांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई देशातील आठ प्रमुख प्रदूषित शहरांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
🔆 महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरे
📍 मुंबई : राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर. येथील सरासरी पातळी 35 असून, ती WHO मानकापेक्षा 7 पटीने जास्त आहे. काही दिवसांत ही पातळी 14.7 पटींपर्यंत देखील पोहोचते.
📍 नवी मुंबई : औद्योगिक क्षेत्रामुळे प्रदूषणाची पातळी उच्च असते. येथील प्रदूषण पातळी WHO मानकापेक्षा 11.6 पटींहून अधिक आहे.
📍 पुणे आणि पिंपरी-चिंचवड : वाढती वाहनसंख्या आणि बांधकामामुळे प्रदूषणात वाढ. पुण्यातील प्रदूषण पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा सुमारे 8 पटीने जास्त नोंदवली गेली आहे.
📍 चंद्रपूर आणि कल्याण : काेळसा खाण व औद्योगिक पट्ट्यामुळे हवेची गुणवत्ता अनेकदा खालावलेली असते. चंद्रपूर शहरातील प्रदूषण पातळी WHO मानकापेक्षा 8 ते 10 पटीने जास्त राहते.
📍 नागपूर : शहरातील हवेतील PM2.5 ची पातळी सुमारे 132 ते 203 असते. ही पातळी ती जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सुरक्षित मानकांपेक्षा 10 ते 13 पटीने जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, नागपूरमधील हवेत श्वास घेणे हे दिवसाला सुमारे 2 सिगारेट ओढण्याइतके घातक आहे.
📍 मालेगाव आणि जळगावमध्ये प्रदूषणाची पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा 20 पटींहून अधिक आहे.
📍 महाराष्ट्रातील इतर प्रदूषित शहरांमध्ये बदलापूर, भिवंडी, बेलापूर, उल्हासनगर, महाड, लोणावळा, मिरा-भाईंदर, ठाणे, कल्याण, जालना, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), अहिल्यानगर (अहमदनगर), अकोला, अमरावती, यवतमाळ, लातूर, कोल्हापूर, परभणी, धुळे, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली या शहरांचा समावेश आहे.
📍 जरी सरासरी PM2.5 पातळीत उत्तर भारतीय राज्यांचा क्रमांक वर असला, तरी प्रदूषित शहरांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे ‘हॉटस्पॉट’ बनले आहे.

♻️ विषारी धूळ व हवेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उपाय
🔆 वैयक्तिक सुरक्षा (Personal Protection)
📍 N95 मास्क वापरा : बाहेर पडताना साधा कपड्याचा मास्क वापरण्याऐवजी N95 किंवा N99 मास्कचा वापर करा, जे हवेतील सूक्ष्म कण (PM2.5) अडवू शकतात.
📍 वेळ पाळा : पहाटे आणि संध्याकाळी हवेत प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असते. शक्य असल्यास या वेळेत मैदानी व्यायाम किंवा फिरणे टाळा.
📍 AQI तपासा : बाहेर जाण्यापूर्वी तुमच्या भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) IQAir किंवा System of Air Quality and Weather Forecasting And Research (SAFAR) यासारख्या प्लॅटफॉर्मवर तपासा.

🔆 घरातील हवेची गुणवत्ता (Indoor Air Quality)
📍 हवा शुद्ध करणारे रोपे : घरात तुळस, कोरफड (Aloe Vera), स्नेक प्लांट किंवा मनी प्लांट लावा. हे नैसर्गिकरित्या हवा शुद्ध करतात.
📍 एअर प्युरिफायर : जर घरातील हवा जास्त खराब असेल, तर HEPA फिल्टर असलेले एअर प्युरिफायर वापरणे फायदेशीर ठरते.
📍 धूर टाळा : घरात अगरबत्ती, मेणबत्ती किंवा मच्छर कॉइल्सचा वापर कमी करा, कारण यामुळे घरातील PM2.5 ची पातळी वाढते.

🔆 आहार आणि जीवनशैली (Diet & Lifestyle)
📍 अँटी-ऑक्सिडंट्स : आहारात व्हिटॅमिन C (लिंबू, संत्री), व्हिटॅमिन E आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिडचा समावेश करा. यामुळे प्रदूषणाने शरीरात होणारी जळजळ (Inflammation) कमी होते.
📍 हायड्रेशन : भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक लघवीद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते.
📍 गूळ : गुळाचे सेवन केल्याने फुफ्फुसातील धूळ साफ होण्यास मदत होते, असे मानले जाते.

🔆 सार्वजनिक जबाबदारी (Public Responsibility)
📍 सार्वजनिक वाहतूक : स्वतःची गाडी वापरण्याऐवजी बस किंवा मेट्रोचा वापर करा. सिग्नलला गाडीचे इंजिन बंद करा.
📍 कचरा जाळू नका : उघड्यावर कचरा किंवा पाने जाळणे टाळा, कारण त्यातून अत्यंत विषारी वायू बाहेर पडतात.

©️ मातीतलं विज्ञान

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!