Sugar Production : साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल, उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर
1 min read✴️ साखरेचे राज्यनिहाय उत्पादन
देशातील 531 साखर कारखान्यांपैकी 67 कारखान्यांमध्ये 30 एप्रिल 2023 पर्यत उसाचे गाळप सुरू हाेते. या सहा महिन्यात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 105.30 लाख टन तर, उत्तर प्रदेशात 101.90 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उत्पादनात कर्नाटक तिसऱ्या स्थानावर असून, येथे 55.50 लाख टन, तामिळनाडूमध्ये 10.95 लाख टन, गुजरातमध्ये 10.10 लाख टन, हरयाणामध्ये 7.15 लाख टन, पंजाबमध्ये 6.65 लाख टन आणि बिहारमध्ये 6.40, मध्य प्रदेशात 5 लाख टन, उत्तराखंडमध्ये 4.75 लाख टन, तेलंगणामध्ये 2.80 लाख टन, आंध्र प्रदेशात 2.30 लाख टन आणि देशातील इतर राज्यांमध्ये 1.50 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
✴️ साखरेचा राज्यनिहाय उतारा
देशात साखरेच्या सर्वाधिक सरासरी उताऱ्यात गुजरातने बाजी मारली. गुजरातमध्ये साखरेचा सरासरी उतारा 10.80 टक्के असून, कर्नाटकमध्ये 10.10 टक्के, तेलंगणात 10.10 टक्के, महाराष्ट्रात 10 टक्के, आंध्र प्रदेशात 9.70 टक्के, बिहारमध्ये 9.70 टक्के, उत्तर प्रदेशात 9.65 टक्के साखरेचा उतारा आहे.
✴️ उसाचे गाळप
या कालावधीत उसाचे सर्वाधिक म्हणजेच 1,055.96 लाख टन उसाचे गाळप उत्तर प्रदेशात करण्यात आले. त्या खालोखाल महाराष्ट्रात 1,053 लाख टन व कर्नाटकात 549.50 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. ऊस गाळपाचा सध्याचा वेग लक्षात घेता देशातील गाळप हंगाम मे अखेरपर्यंत चालण्याचा अंदाज जाणकार व्यक्तींनी व्यक्त केला आहे. त्यातून अंदाजे 327 लाख टन नवीन साखर उत्पादन होण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. या व्यतिरिक्त 45 लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी करण्यात आला आहे.
✴️ महाराष्ट्रातील साखर उत्पादनाचा अंदाज
महाराष्ट्रात या हंगामात साधारणत: 1,150 लाख टन उसाचे गाळप करून 115 लाख टन साखरेचे उत्पादन हाेणार असल्याचा सुधारित अंदाज राज्याच्या साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. मागील हंगामाच्या (सन 2021-22) तुलनेत चालू हंगामात (सन 2022-23) राज्यात उसाचे उत्पादन 171 लाख टनांनी तर साखरेचे एकूण उत्पादन 22 लाख टनांना घटणार असल्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. राज्यात मागील हंगामात 1,321 लाख टन उसाचे गाळप पूर्ण करून 137.36 लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले हाेते. चालू वर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला 1,343 लाख टन उच्चांकी ऊस गाळप अपेक्षित धरण्यात आले होते. हवामानातील बदलाचा ऊस पिकाला फटका बसला. उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन 105 टनांवरून 85 टनापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे सुरुवातीच्या अंदाजापेक्षा 193 लाख टनांनी उसाची उपलब्धता कमी राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.