krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Post-Flood situation and response plans : आता थांबायचं नाही…!

1 min read

Post-Flood situation and response plans : गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसामुळे (Heavy rain) मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती (Flood situation) निर्माण झाली आहे. गावोगाव नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक घरे, शेतजमिनी आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला असून, आरोग्य, शिक्षण, बालकांची काळजी व संरक्षण आणि शेती क्षेत्रात विशेष आव्हाने निर्माण झाली आहेत. भविष्यात या आव्हानांना कसे सामोरे गेले पाहिजे, यासाठी विशेष समिती करून त्वरित उपाययोजना (response plans) करणे आवश्यक आहे.

🔘 आरोग्य आणि स्वच्छता
पूरग्रस्त भागात स्वच्छ पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने जलजन्य आजारांचा प्रसार होण्याची भीती आहे. डेंग्यू, मलेरिया, अतिसार, पोटाचे विकार यासारख्या रोगांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. आरोग्य केंद्रेही पाण्यात बुडाल्यामुळे औषधोपचार व आरोग्यसेवा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. गर्भवती महिला, लहान मुले व वृद्ध व्यक्तींवर या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. तातडीने आरोग्य शिबिरे, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि लसीकरण सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अंदाजे 1,500 गावे प्रभावित असून, 40 प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे पाण्याखाली गेल्याची नोंद आहे. सुमारे 25,000 गर्भवती महिला तातडीच्या आरोग्य सेवांपासून वंचित आहेत तर 5 लाख लोकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो, यासाठी मदत करणाऱ्या अनेक सामजिक संस्थेने घाई गडबडीत मदत न करता प्रशाकीय व्यवस्थेला विश्वासात घेऊन मदत करणे अपेक्षित आहे.

🔘 शिक्षण थांबले?
पूरामुळे अनेक शाळा पाण्याखाली गेल्या अंदाजे 1,200 शाळा पाण्याखाली किंवा निवाऱ्यासाठी वापरल्या जात आहेत. जवळपास 2.5 लाख मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. डिजिटल शिक्षणाच्या सुविधा मर्यादित असल्याने या मुलांना पर्यायी शिक्षण मिळणे कठीण झाले आहे. यासाठी आपत्कालीन शिक्षण केंद्रे, मोबाईल शाळा किंवा स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तातडीने शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. मुलांच्या शिक्षणाबाबत वेळीच उपाययोजना आखणी करून विद्यार्थी नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

🔘 बालकांची काळजी आणि संरक्षण
पूरस्थितीमध्ये बालकांची सुरक्षितता ही मोठी समस्या आहे. सुमारे 1.8 लाख मुले पूरग्रस्त भागात प्रभावित आहेत. निवाऱ्यात सर्दी, अन्न व स्वच्छतेचा अभाव, तसेच पालकांपासून वेगळे होण्याच्या घटना दिसून येत आहेत. मुलांवर मानसिक ताण व भीतीचे सावट आहे. काही ठिकाणी बालमजुरी व बालविवाहाची शक्यता वाढू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलांचे संरक्षण, समुपदेशन, सुरक्षित निवारा आणि पोषण आहार उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठवाड्यामध्ये बालविवाहाबाबत अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. आज पूर परिस्थितीत बालकांची काळजी आणि संरक्षण महत्त्वाचे आहे. यासाठी विद्यार्थांना शैक्षणिक प्रवाहात टिकून ठेवणे महत्त्वाचे असणार आहे. बालविवाह होणार नाही, यासाठी कुटुंबाना आधार देणे आवश्यक असेल.

🔘 शेतीचे कधी न भरून येणारे नुकसान
मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत (छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव) हंगाम सुरू झाल्यापासून सरासरी पाऊस अपेक्षेपेक्षा 8 -10 टक्के अधिक झाला आहे. या पुरामुळे सुमारे 2,188 गाव बाधित झाले असून 5,36,000 (पाच लाख तीस हजार) हेक्टर शेतजमिनी पाण्याखाली गेले. शेतीमधील माती वाहून गेली आहे. पशुधनाची हानी मोठी झाली असून, 57,000 हून अधिक जनावरे मृत्युमुखी पडले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी यासारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा व गोठ्यांचा प्रश्नही गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, कर्जमाफी, बियाणे व खतांचा पुरवठा याची आवश्यकता आहे. सरकार काय करेल, या आशेवर प्रत्येक नागरिक अवलंबून आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी स्वत: झालेल्या नुकसानाचे फोटो व व्हिडीओ करून पंचनामा करताना उपयोगी पडेल.

🔘 पूरपरिस्थितीत आणि नंतर मदत पोहचवताना या गोष्टींचा नक्की विचार करा
मराठवाडा व सोलापूर येथील पूरग्रस्तना कठीण प्रसंगी मदतीसाठी आवाहन करणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्यासाठी अनेक जण धावून जातात. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे गेल्या काही वर्षांपासून परिस्थितीची जाणीव इतर भागातील लोकांनाही अगदी काही तासांतच होते. लगेचच मदतीचा ओघही सुरू होतो. पण हे सगळे प्रयत्न तुकड्या-तुकड्यांत होताना दिसते. गरजूंपर्यंत योग्य मदत, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पोहचण्यासाठी हे सगळे प्रयत्न एकत्र होणं गरजेचं आहे. अशा भागांत मदतीसाठी पोहचलेल्या संस्थांनी एकमेकांशी तसंच स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून आपापली कामं निश्चित केली तर अनेकांसाठी ते फायद्याचं ठरू शकेल. त्यामुळे उपलब्ध वाहतुकीची साधनं, मनुष्यबळ, मदत म्हणून उपलब्ध झालेल्या वस्तू या रिसोर्सेसचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो.
🔆 प्राथमिक मदत पोहचल्यानंतर गरजू नागरिकांना आणखी कोणत्या वस्तूंची, मदतीची गरज आहे, याची माहिती त्यांच्याशी बोलून घेणे आवश्यक आहे.
🔆 घटनास्थळी उपस्थित असलेले स्वयंसेवक, प्रशासन, आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांना मदत पुरवणाऱ्या संस्था यांच्यात ताळमेळ असणं गरजेचं आहे.
🔆 पुरात अडकलेल्या आणि परिस्थितीतून सावरत असलेल्या नागरिकांपर्यंत पहिले दोन-तीन दिवस ताजं शिजलेलं अन्न पोहचवलं जाऊ शकतं. त्यानंतर मात्र, त्यांना कडधान्य, डाळी, तांदूळ यासहीत तेल, मीठ अशा गरजेच्या वस्तुंचं एका व्यक्तीसाठी एक कीट तयार करून ते घरोघरी जाऊन व्यक्तींच्या संख्येनुसार पुरवलं तर गरजू नागरिकांचा मान राखला जाऊनही सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात मदत पोहचू शकेल.
🔆 पुरानंतर ओलाव्यामुळे मच्छर आणि रोगराई पसरण्याची शक्यता वाढलेली असते. त्यामुळे स्वयंसेवकांनी अशा ठिकाणी गेल्यावर त्यादृष्टीने काळजी घ्यावी.
पूरग्रस्त भागात फिरताना सुरुवातीच्या काही दिवसांत स्वच्छ आणि सुकलेल्या महिलांना, पुरुषांना अंतर्वस्त्रांची आवश्यकता दिसून येते.
🔆 गॅस शेगड्या पाण्यात भिजल्यानं त्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे जुन्या – नव्या शेगड्या किंवा शेगड्या दुरुस्तीसाठी मदत गरजेची आहे.
🔆 शाळेत व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य मदत करणे आवश्यक असणार आहे. शैक्षणिक मदत करताना शाळा प्रशासन यांच्या समन्वयाने मदत करणे गरजेचे असेल.
🔆 महापुरात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याप्रमाणे देशात पी. एम. केअर, राज्यात सी. एम. केअर त्याप्रमाणे प्रत्येक गावात ग्रामपंचायतचा स्वत:चा आपत्तीसाठी निधी संकलन व्यवस्था करणे आवश्यक आहे. 73 व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायत व स्थानिक पंचायतराज व्यवस्थेला अधिकार मिळाले असून, ते स्वत: गावच्या बाबतीत निर्णय घेण्यास सक्षम आहे. महापूर परिस्थितीत या अधिकाराचा उपयोग करून नागरिकांना पुन्हा जीवनमान सुधारण्यासाठी सामाजिक संस्थेच्या व सरकारच्या मदतीने कार्य उभे करणे आवश्यक आहे.
🔆 गावातील नागरिकांना शेतकरी कुटुंब व नागरिकांनी टोकाचा निर्णय न घेता ‘आता थांबायचं नाही’ हा विचार करून आपलं गाव नव्याने उभं राहण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!