krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Arrival of Monsoon : मान्सून 4 जूनला देशात दाखल होण्याची शक्यता

1 min read
Arrival of Monsoon : उष्णतेमुळे मुंबईकरांची घालमेल कायम असून, विदर्भ व खानदेशात उष्णतेसाेबतच धुळीचे लोट व वावटळींचीही शक्यता आहे. त्यातच देशात मान्सून 4 जून राेजी दाखल हाेण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

✴️ मान्सूनचे (Monsoon) यावर्षी देशाच्या प्रवेशद्वाराशी म्हणजे केरळात 4 जूनच्या दरम्यान आगमन (Arrival) होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे. वायव्य भारतातील पहाटेचे किमान तापमान (Minimum temperature), दक्षिण भारतातील चार राज्यातील पूर्वमोसमी पावसाचे (Pre-monsoon rains) वर्तन, दक्षिण चीन समुद्रातून रात्रीच्यावेळी बाहेर पडणारी दीर्घलहरी उष्णता ऊर्जा, मलेशिया थायलंड पश्चिम किनारपट्टीवर एक ते दीड किमी दरम्यानचे वाहणारे वारे, वायव्य प्रशांत महासागरावरील हवेचा दाब, बंगालच्या उपसागरातील बांगलादेश, इंडोनेशिया दरम्यानचा पण साधारण 10 किमी उंचीवरील वाहणारा वारा या सहा घटकांचे सतत निरीक्षणावरून हा मान्सून आगमनाचा अंदाज बांधला जातो. सरासरी 1 जून या सरासरी तारखेला केरळात आदळणारा मान्सून यावर्षी 4 दिवस उशिराने अपेक्षित असून, त्यातही कमी अधिक 4 दिवसाचा फरक जमेस धरला आहे. म्हणजे, तो केरळात 1 जून ते 8 जून या 8 दिवसादरम्यान कधीही दाखल होवू शकतो.
✴️ सरासरी तारीख 1 जूनला केरळात दाखल होणारा मान्सून त्याच्या सरासरी तारीख म्हणजे साधारण 10 जूनला मुंबईत सलामी देतो. तो कदाचित यावर्षी 15 जूनला मुंबईत दाखल होवू शकतो. त्यातही कमी अधिक 4 दिवसांचा फरक जमेस धरला तर, त्याचे आगमन मुंबईत 10 ते 18 जूनच्या दरम्यान केव्हाही होवू शकते, असे वाटते.
✴️ मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतरच मुंबईतील त्याच्या आगमनाची तारखेचा अंदाज बांधता येईल. खरं तर, मुंबईतल्या आगमनानंतरच तो उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश ठरवता येईल. म्हणजेच आजपासून (दि. 16 मे 2023) एक महिन्यानंतरच उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनची भेट अपेक्षित करू या!

✴️ हे जरी खरं असलं तरी, मान्सूनचे आगमन व 4 महिन्यात पडणारा मान्सून या दोन स्वतंत्र गोष्टी असून, त्यांच्या भाकितांचे निकषही स्वतंत्र आहेत. भारतीय हवामान विभागाकडून 31 मे दरम्यान मान्सूनसंबंधी सुधारित अंदाज येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच मान्सूनची टक्केवारी व वितरणाचा अंदाज येईल.

✴️ दिवसाचे कमाल उच्च तापमान व आर्द्रतायुक्त (Humidified) व गरम अशा हवेमुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेच्या काहिलीने जाणवत असलेली अस्वस्थता कायम असून, अजूनही पुढील दाेन ते तीन दिवस म्हणजे शनिवार (20 मे) पर्यंत जाणवू शकते असे वाटते.

✴️ महाराष्ट्रातील संपूर्ण खानदेश (नंदूरबार, धुळे, जळगाव) व विदर्भातील सर्व जिल्ह्यात (नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली) पुढील दाेन ते तीन दिवस म्हणजे गुरुवार (18 मे) पर्यंत उष्णतेबरोबरच वेगवान झटक्याखालील धुळीचे लोट उठवणाऱ्या वाऱ्यामुळे वावटळींची शक्यता जाणवते.

✴️ उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पुढील पाच दिवस तापमानात फरक जाणवणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!