krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

War, agricultural products exports : युद्धामुळे भारतीय शेतमाल निर्यात ठप्प

1 min read

War, agricultural products exports : इराण-इस्राईल, अमेरिका (Iran-Israel, America) युद्धामुळे (War) आखाती देशांना हाेणाऱ्या (Gulf countries) बासमती तांदूळ, कांदा, द्राक्ष, डाळिंब, केळी, मसाले, काजू, भाजीपाला व काही फळांसह इतर शेतमालाची (Agricultural products) निर्यात (Export) 28 फेब्रुवारी 2026 च्या दुपारपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. रमजानच्या काळात आखाती देशांमध्ये भारतीय शेतमालाला चांगली मागणी असते. यावर्षी 19 फेब्रुवारी ते 19 मार्च हा काळ रमजान असून, युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने भारतीय निर्यातदारांसाेबतच संबंधित शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान (निर्यात थांबल्याने शेतमालाचे दर दबावात आले) झाले आहे. दुसरीकडे, कच्च्या तेलाचे (Crude oil) दर वाढल्याने वाहतूक खर्च म्हणजेच आयात-निर्यातीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे या युद्धाचे देशांतर्गत शेतमाल बाजारावर हाेत असलेले परिणाम स्पष्ट दिसून येत आहे. पश्चिम आशियातील काही देश या युद्धात ओढले गेले आहेत. इराणने दुबईवर हल्ला केल्याने जागतिक आयात-निर्यातीसाठी महत्त्वपूर्ण असलेले दुबईमधील जेबेल अली बंदर बंद करण्यात आले आहे.

♻️ निर्यातदारांना जबर फटका
भारतातून शेतमाल घेऊन गेलेले जवळपास 900 कंटेनर दुबईच्या (Dubai) जेबेल अली बंदरात (Jebel Ali Port) अडकले असून, मुंबईच्या न्हावाशेवा बंदरात (Jawaharlal Nehru Part) 1,900 आणि गुजरातच्या मुंद्रा बंदरात (Mundra Port) 1,800 कंटेनर अडकले आहेत. यात प्रामुख्याने नाशिकचा 5,400 टन कांदा (सुमारे 150-200 कंटेनर), द्राक्षांचे 300 कंटेनर) आणि केळीच्या 200 कंटेनरचा समावेश आहे. हा शेतमाल मुंबई पाेर्टमधील आहे. मुंद्रासह देशातील इतर बंदरात किमान 4 लाख टन बासमती तांदूळ अडकला आहे. भारतातून सर्व प्रकारच्या मालाची निर्यात करणाऱ्या किमान 38,000 कंटेनर या युद्धाचा परिणाम झाला असून, यात अर्धे कंटेनर द्राक्ष, केळी, डाळिंब, पपई, कलिंगड, खरबूज, भाजीपाला यासह इतर नाशिवंत शेतमालाचे आहेत. निर्यातदारांना हा माल परत घ्यावा लागणार असून, दुबईच्या मार्गात असलेले पण दुबईला न पाेहाेचलेले सर्व कंटेनर परत बाेलावावे लागणार असल्याने या युद्धाचा निर्यातदारांना जबर फटका बसला आहे.

♻️ वाहतूक खर्चात वाढ
या युद्धामुळे क्रूड ऑइलच्या दरात 8 ते 9 टक्क्यांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेले ब्रेन्ट क्रूड प्रति बॅरल 90 ते 93 डॉलर्सच्या (1 बॅरल म्हणले 158.98 लिटर तेल. 1 डाॅलर म्हणजे 91.94 रुपये) पुढे आहे. त्यामुळे तेलाचे दर वाढत असल्याने शिपिंग कंपन्यांनी वाहतुकीच्या भाडेदरात वाढ केली आहे. आपत्कालीन स्थितीच्या नावाखाली जागतिक शिपिंग कंपन्यांनी 3 ते 4 हजार डॉलर्स आपत्कालीन शुल्क लागू केले आहे. दुबईला एक कंटेनर पाठविण्यासाठी किमान 500 डॉलरचा खर्च येतो. शिपिंग कंपन्यांनी त्यावर आता 3 ते 4 हजार डॉलर्स आपत्कालीन शुल्क शुल्क घेणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, भारताची शिपिंग कंपनी नसल्याने इतर देशांच्या शिपिंग कंपन्या भारतीय निर्यातदारांची पिळवणूक करत आहे.

♻️ साखरेच्या निर्यातीवर परिणाम
केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2025 ते 30 सप्टेंबर 2026 या मार्केटिंग हंगामासाठी 20 लाख टन साखर (Sugar) निर्यातीचा काेटा नाेव्हेंबर 2025 मध्येच जाहीर केला हाेता. १ ऑक्टाेबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या काळात भारतातून 2,01,547 टन साखर निर्यात करण्यात आली. संयुक्त अरब अमिराती (UAE) हा भारतीय साखरेचा आखाती देशातील सर्वात माेठा आयातदार देश आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत भारताने 47,006 टन साखरेची निर्यात केली. साखर नाशिवंत नसली तरी या युद्धाचा साखरेच्या निर्यातीवर परिणाम हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखरेची निर्यात थांबल्यास देशांतर्गत बाजारातील साखरेचा पुरवठा व उपलब्धता वाढणार आहे. याचा किरकाेळ बाजारातील साखरेच्या दरावर फारसा परिणाम हाेणार नसला तरी उत्पादकांना मात्र फटका बसण्याची शक्यता बळावली आहे. होऊ शकतो.

♻️ काजू निर्यात थांबली
APEDA (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) आणि DGCIS (Directorate General of Commercial Intelligence and Statistics) च्या आकडेवारीनुसार भारताने सन 2025 मध्ये एकूण 65,243.93 टन काजू निर्यात केले हाेते. यातील 23.96 टक्के काजू (Cashews) संयुक्त अरब अमिरातीमध्ये तर 40 ते 55 टक्के काजू इतर आखाती देशांमध्ये निर्यात केले जाते. इराण भारतीय काजूचा मोठा आयातदार व ग्राहक देश आहे. मागील काही वर्षांत इराणला होणारी भारतीय काजूची निर्यात वाढत होती. मात्र युद्धामुळे आता ही निर्यात थांबली आहे.

♻️ बासमती तांदूळ निर्यात ठप्प
2024-25 मध्ये भारताने 60.65 लाख टन बासमती तांदळाची (Basmati rice) निर्यात केली हाेती. 2025-26 मध्ये ही निर्यात 65 टनांपर्यंत पाेहाेचण्याचा अंदाज वर्तविला जात हाेता. यातील 60 ते 70 टक्के बासमती तांदूळ आखाती देशांमध्ये निर्यात केला जाताे. पश्चिम आशियातील सौदी अरेबिया, इराण आणि यूएई हे भारतीय बासतमी तांदळाचे माेठे व प्रमुख आयातदार देश आहेत. युद्धामुळे ही बाजारपेठ धोक्यात आली आहे. निर्यातीसाठी पाठविलेला किमान 4 लाख टन बासमती तांदूळ मध्येच अडकला असून, यातील 2 लाख टन तांदूळ जहाजांमध्ये भरलेला आहे आणि तेवढाच तांदूळ बंदरांवर आहे.

♻️ वेलची निर्यातीवर परिणाम
APEDA च्या आकडेवारीनुसार भारताने 2024-25 मध्ये 7,778 टन हिरव्या वेलचीची (Cardamom) निर्यात केली हाेती. एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या काळात वेलची निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत 27 टक्के वाढ नोंदवण्यात आली. यातील 80 वेलची आखाती देशांमध्ये निर्यात केली जात असून, 35 ते 40 टक्के वेलची साैदी अरेबियात निर्यात केली जाते. साेबतच संयुक्त अरब अमिराती, कुवेत, ओमान आणि कतारमध्ये भारतीय वेलचीला माेठी मागणी आहे. स्पर्धक ग्वांटेमाला देशात यंदा उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे भारताला वेलचीची निर्यातीत चांगली संधी आहे. युद्धामुळे भारतातून आखाती देशांना होणारी वेलचीची निर्यातही स्थिती पूर्वपदावर येईपर्यंत थांबली आहे. त्याचा देशांतर्गत बाजारातील वेलचीच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

♻️ पोल्ट्री निर्यात प्रभावित
भारताने एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या 10 महिन्यांच्या काळात 7.5 लाख टन पोल्ट्री उत्पादनांची (Poultry products) निर्यात केली आहे. एकूण निर्यातीच्या 25 ते 30 टक्के भाग ओमानमध्ये निर्यात केला जाताे. फिफा विश्वचषकानंतर कतारमध्ये भारतीय पोल्ट्री उत्पादनांची मागणी सातत्याने वाढली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये अंडी आणि फ्रोजन चिकन तर कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये भारतीय अंड्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. युद्धामुळे नामक्कल (तमिळनाडू) येथील पोल्ट्री हबमधून आखाती देशांकडे जाणारी 200कोटींहून अधिक अंडी सध्या बंदरावर आणि शीतगृहात अडकली आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये भारतीय पाेल्ट्री उत्पादन निर्यात 2,370 कोटी डॉलर्सवर पोहोचली आहे. मागील हंगामात याच काळात ही निर्यात 1,190 कोटी डॉलर्स होती. भारताच्या पोल्ट्रीसाठी यूएई, ओमान आणि सौदी अरेबिया हे महत्त्वाचे बाजार आहेत. या बाजारात इराण आणि टर्कीच्या पोल्ट्रीचीही भारताशी स्पर्धा आहे.

♻️ खाद्यतेल भाववाढीची शक्यता
भारत एकूण मागणीच्या 62 ते 65 टक्के म्हणजेच 155 ते 165 लाख टन खाद्यतेल (Edible oil) आयात (Import) करते. इंडोनेशिया व मलेशियामधून पामतेल (Palm oil), अर्जेंटिना, ब्राझील व अमेरिकेमधून साेयाबीन तेल (Soybean oil) आणि रशिया व युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची (Sunflower oil) आयात केली जाते. ही आयात काही प्रमाणात होर्मूझ सामुद्रधुनी आणि सुएझ कालव्यामार्गे केली जाते. विशेषतः सूर्यफूल तेल याच मार्गाने येते. युद्धामुळे इंधनाचे दर आणि वाहतूक खर्च वाढला वाढला आहे. साेबतच या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली तर आयातीवर परिणाम होऊन भाव वाढू शकतात. विशेष म्हणजे, सूर्यफूल तेलावर जास्त परिणाम हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

♻️ आयात महागण्याची शक्यता
भारताने मागील वर्षात 68 लाख टन कडधान्य (डाळी – Pulses) आयात केली होती. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यास वाहतूक खर्च वाढून डाळवर्गीय पिकांची आयात महाग होऊ शकते. भारत काही विशिष्ट फळांचीही आयात करीत असल्याने या फळांची आयात महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत इराण आणि अमेरिकेतून पिस्ता (Pistachio) आयात करतो. इराणमधून आयात ठप्प झाल्यानंतर दर प्रतिकिलाे किमान 100 रुपयांनी वाढले असून, बेदाणा (मनुका – Currant) व अंजीर (Fig) आयातीवरही परिणाम होण्याची तसेच दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

♻️ कांदा, द्राक्षे, चहा निर्यात प्रभावित
भारत आखाती देशांमध्ये दरवर्षी सरासरी 2 ते 3 लाख टन कांदा (Onion) निर्यात करताे. सन 2024-25 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये 87,977 टन, कुवेतमध्ये 19,450 टन तर बहरीनमध्ये 1,200 टन कांदा निर्यात करण्यात आला हाेता. सौदी अरेबिया, कतार व ओमान या आखाती देशांमध्ये भारतीय कांदा माेठ्या प्रमाणात निर्यात केला जाताे. युद्धामुळे कांद्याचे 150 ते 200 कंटेनर बंदरात अडकून पडले आहेत. भारत दरवर्षी सरासरी 3.43 लाख टन द्राक्षे (Grapes) निर्यात करीत असून, यातील 30,000 ते 40,000 टन द्राक्षांची निर्यात आखाती देशांमध्ये केली जातात. संयुक्त अरब अमिराती सर्वात माेठा द्राक्ष आयातदार देश आहे. युद्धामुळे 300 वातानुकूलित कंटेनर (अंदाजे 3,900 टन) द्राक्षांची निर्यात थांबली आहे. आखाती देश भारताच्या चहाचे (Tea) मोठे ग्राहक आहेत. मागील हंगामात इराकने 52,500 टन, यूएईने 52,700 टन, इराणने 11,200 टन आणि सौदी अरेबियाने 7,900 टन चहा पावडर भारतातून आयात केली होती. आता युद्धामुळे ही निर्यात ठप्प झाली आहे. वाहतूक खर्च वाढल्याने निर्यातीला अधिक पैसे माेजावे लागणार असल्याने त्याचा फटका निर्यातदारांना पर्यायाने उत्पादकांना बसत व बसणार आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!