Thanks, Chandrababu : आयटी ते हॉर्टी हब, आयएसबी ते आयएसए : धन्यवाद चंद्राबाबू!
1 min read
Thanks, Chandrababu : ‘आयटी ते हॉर्टी हब, आयएसबी ते आयएसए, धन्यवाद श्री. चंद्राबाबू!’ अशी पोस्ट मी काल केली आणि त्यानंतर अनेक मित्रांनी फोन करून एकच प्रश्न विचारला, चंद्राबाबूंचे (Chandrababu) अभिनंदन (Congratulations) कशासाठी? तर महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर आंध्र प्रदेशातील मेदनपल्ली येथे मुख्यमंत्री श्री. एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी झाली. त्यापैकी एक आहे ग्लाेबल हाॅर्टिकल्चर हब Global Horticulture Hub (GHH), तर दुसरा आहे इंडियन स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर Indian School of Agriculture (ISA). भारतीय शेतीच्या भवितव्याच्या दृष्टीने या दोन्ही प्रकल्पांकडे प्रकल्प म्हणून न पाहता, शेतीला तंत्रज्ञान, व्यवस्थापन, प्रक्रिया, पायाभूत सुविधा आणि जागतिक बाजारपेठ यांच्याशी जोडण्याचा हा प्रयत्न म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे.
♻️ कोरडवाहू रायलसीमा ‘फ्रूट बाऊल’
आंध्र प्रदेशातील रायलसीमा हा तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळाशी झुंजणारा प्रदेश. आपल्या मराठवाड्या सारखाच. या भागात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने टोमॅटो, आंबा, डाळिंब, केळी, ड्रॅगन फ्रूट, अवोकॅडो यासारख्या उच्च मूल्याच्या फळपिकांची उत्पादकता आणि बाजारपेठ वाढविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. मात्र, या प्रकल्पाचे महत्त्व केवळ ‘फळे पिकविणे’ इतकेच नाही. शेतीपासून बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण इकोसिस्टम उभारण्याचा प्रयत्न त्यामागे आहे. रस्ते, वीज, पाणी, गोदामे, प्रतवारी केंद्रे, प्रक्रिया केंद्रे, शीतगृह साखळी, वाहतूक, निर्यात सुविधा, दर्जेदार रोपवाटिका, पीक व्यवस्थापन आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणी या सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यात केंद्र व राज्य सरकारची 40 हजार कोटी आणि 60 हजार कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक करण्यात येणार आहे. रायलसीमा हा भारताचा ‘फ्रूट बाऊल’ (Fruit Bowl) बनविण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे कोरडवाहू प्रदेशात शेतीवर आधारित मोठी ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहणार आहे.
♻️ इंडियन स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर ISA
Global Horticulture Hub GHH) सोबतच मेदनपल्ली येथे आणखी एका महत्त्वाकांक्षी संस्थेची पायाभरणी करण्यात आली Indian School of Agriculture (ISA). हैदराबादमधील Indian School of Business (ISB) ज्या पद्धतीने व्यवस्थापन आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात जागतिक दर्जाचे नेतृत्व घडविण्याचा प्रयत्न करते, त्याच धर्तीवर शेती क्षेत्रासाठी नवे नेतृत्व तयार करण्याची संकल्पना ISA मागे आहे. आज शेती बदलत आहे. AI, ड्रोन, प्रिसिजन फार्मिंग, स्मार्ट फार्मिंग, रोबोटिक्स, डेटा, लॉजिस्टिक्स, कृषी प्रक्रिया, पुरवठा साखळी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या सर्वांचा शेतीशी संबंध वाढत चालला आहे. उद्याचा शेतकरी केवळ नांगर आणि बैलांच्या माध्यमातून शेती करणारा असणार नाही. त्याला तंत्रज्ञान समजणारा, बाजारपेठ समजणारा, वित्त आणि व्यवस्थापन समजणारा आणि जागतिक मूल्यसाखळीशी जोडला जाणारा उद्योजक बनावे लागेल. त्यासाठी नवे कृषी व्यवस्थापक, कृषी उद्योजक आणि कृषी नेतृत्व तयार करणाऱ्या संस्थांची गरज आहे. याच अर्थाने ISA ही केवळ एक शिक्षणसंस्था नाही. ती भविष्यातील कृषी नेतृत्वाची नर्सरी ठरू शकते.
♻️ आयटी ते हॉर्टी पर्यंत, चंद्राबाबूंच्या दृष्टीकोनाचा प्रवास
आज हैदराबाद हे भारतातील प्रमुख माहिती तंत्रज्ञान केंद्रांपैकी एक म्हणून जगभर ओळखले जाते. या परिवर्तनात चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हायटेक सिटी, सायबराबाद आणि आयटी-केंद्रित पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला. माहिती तंत्रज्ञानाला उद्योग, रोजगार आणि शहरी अर्थव्यवस्थेचा आधार बनविण्याचा प्रयत्न झाला. त्याच काळात Indian School of Business सारखी जागतिक दर्जाची व्यवस्थापन संस्था हैदराबादमध्ये उभी राहिली. याच संस्थेमुळे आज जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय व्यवस्थापक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. ज्या नेतृत्वाने आयटी अर्थव्यवस्थेसाठी पायाभूत व्यवस्था आणि व्यवस्थापनाचे नेतृत्व तयार केले, तेच नेतृत्व आता कृषी अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचे नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
♻️ IT ते Horti Hub – ISB ते ISA
हा केवळ दोन प्रकल्पांचा प्रवास नाही; हा अर्थव्यवस्थेच्या पुढच्या टप्प्याचा विचार आहे. प्रकल्पांपेक्षा संस्था अधिक महत्त्वाच्या असतात. सरकारे अनेक प्रकल्प जाहीर करतात. रस्ते, पूल, औद्योगिक वसाहती, महामार्ग, धरणे आणि इतर पायाभूत सुविधा उभ्या राहतात. पण काही प्रकल्प संपल्यानंतर त्यांचा प्रभावही मर्यादित राहू शकतो. पण भविष्यातील नेतृत्व तयार करणारी संस्था उभी केली, तर त्या संस्थेतून हजारो प्रकल्प उभे करणारे उद्योजक, व्यवस्थापक आणि नेते निर्माण होऊ शकतात. यामुळे ISA सारख्या संस्थेचे महत्त्व एखाद्या इमारतीच्या किमतीत मोजता येणार नाही. एक चांगली संस्था अनेक पिढ्यांची दिशा बदलू शकते. याच कारणामुळे चंद्राबाबू नायडू यांच्या या प्रयत्नाचे अभिनंदन केले पाहिजे.
♻️ आणि आता महाराष्ट्राचा प्रश्न…
इथेच हा विषय महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरतो. एकीकडे चंद्राबाबू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणणारा एक लाख कोटी रुपयांचा प्रकल्प आंध्र प्रदेशातील कोरडवाहू भागात सुरू करत असतांना महाराष्ट्रात मात्र देवाभाऊ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सुपीक जमिनीवर एक लाख कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प दडपशाहीने राबवत आहे. ज्या प्रकल्पाचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर नजीकच्या भविष्यात कोणताही चांगला परिणाम होणार नाही, वाईट परिणाम मात्र होईल. एकीकडे चंद्राबाबू आयएसए सारख्या संस्थेसाठी जमीन उपलब्ध करून शेती क्षेत्रात नवे भविष्य घडवत असतांना देवाभाऊ मात्र राज्यातील शेती महामंडळाची जमिनी सरकारच्या मित्र-मैत्रिणींना कवडीमोल भावाने अकृषिक वापरासाठी अध्यादेश काढून देत आहे. शेती महामंडळाची हजारो हेक्टर जमीन राज्य सरकारने अध्यादेश काढून अकृषिक करून कुठल्या तरी लॉजिस्टीक व संरक्षण क्षेत्रात काम करतो, असे म्हणणाऱ्या तथाकथित कागदावरील कंपन्यांना वाटली आहे. शेती महामंडळाची जमीन कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या आयएसए सारख्या एखाद्या संस्थेची उभारणी करणाऱ्या संस्थेला किंवा हॉर्टिकल्चर हब सारख्या प्रकल्पाला दिली असती तर राज्यातील शेतकऱ्यांना आनंदच वाटला असता.
एकीकडे आंध्र प्रदेशात कोरडवाहू प्रदेशात शेतीवर आधारित एक लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था उभी करण्याची कल्पना मांडली जात आहे; तर दुसरीकडे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सुपीक जमीन बिगरशेती प्रकल्पांसाठी वापरण्याच्या धोरणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. शक्तिपीठ महामार्ग हा त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्राला रस्ते, महामार्ग, लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक पायाभूत सुविधांची नक्कीच गरज आहे. विकासाला विरोध करणे हा मुद्दा नाही. पण प्रश्न असा आहे की, आपल्या सुपीक जमिनीचा वापर कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेसाठी करायचा? आंध्र प्रदेशात कोरडवाहू रायलसीमेत शेतीचे उत्पादन, प्रक्रिया, निर्यात आणि ग्रामीण रोजगार यांची संपूर्ण साखळी उभारण्याचा प्रयत्न होत असेल, तर महाराष्ट्रानेही आपल्या कृषी क्षमतेकडे नव्या दृष्टीने पाहण्याची वेळ आली आहे. शेवटी प्रश्न नेतृत्वाच्या दृष्टिकोनाचा आहे.
©️ धन्यवाद कोणाचे मानायचे? असो… देशभरातील तरुण व भविष्यातील शेतकऱ्यांकडून धन्यवाद चंद्राबाबू!
शेतकरी संघटने च्या माध्यमातून….आसाच काहीतरी वेगळा पण बळीराजाच्या उपयोगाचा निर्णय शासनाने घ्यावा यासाठी आपणासच प्रयत्न करावे लागतील…..