krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Drought Assessment, Farm Realities : दुष्काळाचे मूल्यांकन सरासरीने नव्हे, तर शेताच्या वास्तवाने करा

1 min read

Drought Assessment, Farm Realities : अधिकृतपणे पावसाळा (Monsoon) संपला. महाराष्ट्राच्या पावसाची सरासरीही (Average rainfall) जाहीर झाली. कागदावर आकडे आले, नकाशावर रंग भरले गेले, कुठे सरासरीपेक्षा जास्त तर कुठे कमी पाऊस झाला, याची मांडणी झाली. पण एक शेतकरी म्हणून माझ्या मनात एक साधा प्रश्न आहे, या आकड्यांमध्ये माझ्या शिवारातला पाऊस कुठे आहे? मी साठ पावसाळे पाहिले आहेत. प्रत्येक पावसाळा वेगळा असतो. निसर्ग कधीही मागच्या वर्षाची पुनरावृत्ती करत नाही. यावर्षीचा पावसाळाही तसाच वेगळा होता. कुठे पाऊस कोसळला, कुठे ढग आले अन् गेले, कुठे दोन पावसांमध्ये मोठे खंड पडले, तर कुठे पाऊस पडला पण तो पिकाच्या गरजेच्या वेळी पडला नाही. म्हणूनच फक्त पावसाची एकूण बेरीज करून शेतकऱ्याचे वर्ष समजत नाही.

🔶 पाऊस म्हणजे काय?
आज माणूस तंत्रज्ञानाच्या मदतीने आकाशाकडे पाहतो. उपग्रह आहेत, हवामानाचे मॉडेल आहेत, रडार आहेत, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, पावसाचे अंदाज आहेत, जलसंधारणाची साधने आहेत. नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून माणूस प्रगतीच्या कितीही उंचीवर गेला तरी शेतीच्या बाबतीत एक गोष्ट अजूनही त्याच्या हातात पूर्णपणे आलेली नाही, वेळेवर पडणारा चांगला पाऊस. कारण पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही. पाऊस म्हणजे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या जगण्याची सुरुवात. पाऊस म्हणजे पेरणीची वेळ. पाऊस म्हणजे उगवण. पाऊस म्हणजे खताचा उपयोग. पाऊस म्हणजे पिकाची वाढ. पाऊस म्हणजे जनावरांचा चारा. पाऊस म्हणजे विहिरीत आलेले पाणी. पाऊस म्हणजे पुढच्या वर्षाची आशा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाऊस म्हणजे शेतकऱ्याच्या घरातील आर्थिक चक्राला मिळणारी गती. म्हणूनच यावर्षीचा पावसाळा शेतकऱ्यासाठी केवळ कमी-अधिक पावसाचा विषय नाही. हा मोठ्या खंडांचा, चुकीच्या वेळी पडलेल्या पावसाचा आणि संपूर्ण खरीप हंगाम हातातून निसटल्याचा पावसाळा आहे.

🔶 प्रदेशनिहाय पावसाची तऱ्हा
महाराष्ट्राची सरासरी सांगताना मात्र एक वेगळीच गोष्ट समोर येते. महाराष्ट्र हा एकसारखा पाऊस पडणारा प्रदेश नाही. कोकणात मुसळधार पाऊस पडतो, विदर्भातील काही भागात वेगळी पर्जन्यस्थिती असते, तर पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्यछायेच्या पट्ट्यात परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. एका भागात पाऊस आणि दुसऱ्या भागात दुष्काळ, दोन्ही महाराष्ट्रात एकाच वेळी असू शकतात. मग संपूर्ण महाराष्ट्राची एक सरासरी काढून आपण दुष्काळ समजून घेणार कसा? माझ्या अहिल्यानगर जिल्ह्याकडे पाहा. त्याच जिल्ह्यातील पारनेर, अकोला आणि इतर भागांमध्येही पावसाचे स्वरूप आणि गरज वेगवेगळी आहे. एका ठिकाणी पडलेला अतिरिक्त पाऊस दुसऱ्या ठिकाणी पडलेल्या पावसाची कमतरता भरून काढू शकत नाही. पाऊस सरासरीत जमा होतो; पण शेतकऱ्याच्या शिवारात तो वेगळ्या पद्धतीने जगला जातो.

🔶 दुष्काळाचे मूल्यांकन गरजेचे
आता पावसाच्या मोजमापाचा (Rainfall measurements) आणि दुष्काळाच्या (Drought) मूल्यांकनाचा (Assessment) पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. सरकारने पावसाच्या विभागांचे पुनर्सर्वेक्षण (Resurvey) केले पाहिजे. महाराष्ट्राला फक्त जिल्ह्यांच्या सीमांनी नव्हे, तर पावसाच्या स्वतंत्र पॉकेट्सनुसार पाहिले पाहिजे. ज्या भागाची पावसाची भौगोलिक आणि हवामानाची परिस्थिती सारखी आहे, त्या भागासाठी स्वतंत्र सरासरी असली पाहिजे. कारण, एकाच जिल्ह्याची सरासरी अनेकदा जमिनीवरच्या वास्तवाला झाकून टाकते.

आकडा सांगतो… पाऊस झाला.
शेतकरी सांगतो… माझ्या पिकाला झाला नाही.
आकडा सांगतो… सरासरीच्या आसपास परिस्थिती आहे.
शेतकरी सांगतो… माझा खरीप हातातून गेला.
हीच खरी तफावत आहे.

🔶 दुष्काळाचे दुरगामी परिणाम
यावर्षीच्या दुष्काळाचे दुःख एवढ्यावर थांबत नाही. शेतकऱ्याने बियाणे घेतले, खत घेतले, औषधे घेतली, मशागत केली, मजुरी केली, डिझेल जाळले, कर्ज काढले आणि पावसाकडे पाहत राहिला. पण पिकाला गरजेच्या वेळी पाऊस मिळाला नाही. काही पिके उभी राहिली नाहीत, काही उभी राहून वाळली आणि काही पावसाच्या खंडामुळे उत्पादनाच्या क्षमतेपर्यंत पोहोचलीच नाहीत.
शेतकरी फक्त या वर्षाचे पीक गमावत नाही. तो आपल्या पुढच्या अनेक वर्षांच्या प्रगतीचा वेग गमावतो. दुष्काळाचा खरा हिशोब पिकाच्या नुकसानीतच होत नाही. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. नवीन जनावरे घेण्याचा निर्णय पुढे ढकलला जातो. विहीर, पाइपलाइन, ठिबक, फळबाग, शेततळे यासारख्या गुंतवणुकीचे स्वप्न थांबते. घरातील आवश्यक खर्च कमी होतो. कर्ज फेडण्याची क्षमता कमी होते. म्हणूनच शेतकऱ्याला वाटते, हा दुष्काळ मला दहा वर्षे मागे घेऊन जाणार आहे. कारण इतर माणूस ज्या वेगाने पुढे जात आहे, त्या वेगाने पुढे जाणे तर दूरच; शेतकरी आधी मागचे कर्ज फेडण्यासाठी धडपडतो. एक खराब हंगाम म्हणजे फक्त एक खराब वर्ष नसते. त्याचे परिणाम पुढच्या अनेक हंगामांवर उमटतात.

🔶 पाऊस आणि दुष्काळ
याच कठीण परिस्थितीत महाराष्ट्राकडे एक मोठी जमेची बाजू आहे, आपली धरणे भरलेली आहेत. ही निसर्गाने आणि मागील पावसाने महाराष्ट्राला दिलेली मोठी ताकद आहे. आता प्रश्न आहे तो या पाण्याच्या योग्य नियोजनाचा आणि योग्य विनियोगाचा. दुष्काळी भागातील पिण्याचे पाणी, जनावरांचे पाणी, शेतीसाठी आवश्यक पाणी आणि पुढील रब्बी हंगामाची गरज यांचा विचार करून उपलब्ध पाण्याचे शास्त्रीय आणि न्याय्य नियोजन झाले पाहिजे. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्याला दया नको; त्याला जगण्यासाठी व्यवस्था हवी. जनावरांसाठी चारा आणि पाणी हवे. पिकांसाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन हवे. वीजपुरवठा हवा. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला आधार हवा. नुकसानभरपाईची प्रक्रिया जमिनीवर पोहोचली पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दुष्काळाचे मूल्यांकन कागदावरच्या सरासरीने नव्हे, तर शेताच्या (Farm) वास्तवाने (Realities) झाले पाहिजे. कारण पाऊस संपला म्हणजे दुष्काळ संपत नाही.

🔶 रब्बी हंगामासाेबत इतर चिंता
आकाश निरभ्र झाले, हवामान विभागाने पावसाळा संपल्याचे जाहीर केले आणि आकडेवारीची पुस्तके बंद झाली म्हणून शेतकऱ्याचा प्रश्न संपत नाही. उलट आता त्याची खरी परीक्षा सुरू होते. पुढचा रब्बी कसा करायचा? जनावरांना चारा कुठून आणायचा? विहिरीत किती पाणी आहे? उपलब्ध पाणी किती दिवस पुरणार? कर्ज कसे फेडायचे? पुढच्या खरीपाची तयारी कशी करायची? हे प्रश्न आता शेतकऱ्याच्या घरात आहेत. साठ पावसाळे पाहिलेला शेतकरी म्हणून मला एक गोष्ट निसर्गाने शिकवली आहे, पाऊस आपल्या मनाप्रमाणे पडत नाही; पण पावसाच्या अनिश्चिततेशी सामना करण्याची व्यवस्था आपण नक्कीच अधिक चांगली करू शकतो.

🔶 दुष्काळी भागासाठी हवे स्वतंत्र धोरण
आज गरज आहे ती फक्त पावसाची वाट पाहण्याची नाही. गरज आहे ती पावसाचे अचूक स्थानिक मोजमाप करण्याची, हवामान बदल समजून घेण्याची, पाण्याचे विकेंद्रित नियोजन करण्याची, दुष्काळी भागासाठी स्वतंत्र धोरण आखण्याची आणि शेतकऱ्याला संकटातून पुन्हा उभे करण्याची. महाराष्ट्राची पावसाची सरासरी किती आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहेच. पण त्याहून मोठा प्रश्न आहे, ‘माझ्या शिवारात किती पाऊस पडला आणि तो माझ्या पिकाला केव्हा मिळाला?’ या एका प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर मिळाले, तर कदाचित दुष्काळाची खरी व्याख्याही बदलावी लागेल. पावसाळा अधिकृतपणे संपला आहे. पण शेतकऱ्याच्या डोळ्यातला पावसाचा प्रश्न अजून संपलेला नाही. आकाशाकडे पाहण्याची सवय त्याची आजची नाही; ती त्याच्या पिढ्यान्‌पिढ्यांची आहे. आता मात्र त्या आकाशाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्याला केवळ आश्वासन नको आहे. त्याला उपलब्ध पाण्याचे नियोजन, योग्य मदत, अचूक स्थानिक पर्जन्यमानाची नोंद आणि पुन्हा उभे राहण्याची संधी हवी आहे. कारण, दुष्काळ हा फक्त पावसाचा अभाव नसतो. दुष्काळ म्हणजे शेतकऱ्याच्या स्वप्नांच्या गतीला लागलेला ब्रेक असतो आणि यावर्षी महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांसाठी हा ब्रेक खूप मोठा आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!