Anti-farmer laws, point to slavery : गुलामीकडे बोट; एका वेगळ्या पुस्तिकेची प्रस्तावना
1 min read
Anti-farmer laws, point to slavery : शेतकरी प्रश्नाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. बरेच जन शेतकऱ्यांना कृषी संस्कृतीचे घटक किंवा रक्षक मानतात. तेच लोक पुढे जाऊन शेतकरी एक जात आहे, धर्म आहे असे म्हणू लागतात. काही लोक शेतकरी प्रश्नाचे मूळ शेतमालाच्या भावात आहे, अशी मांडणी करतात. त्यापैकी काहींना शेतकऱ्यांची गरिबी डाचते. ते सरकारी योजनाचा पुरस्कारही करतात. किसानपुत्र आंदोलनाचा शेतकरी प्रश्नाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन आहे. या देशात शेतकऱ्यांना (farmers) गुलाम (Slave) करण्यात आले आहे एवढेच हे आंदोलन सांगत नाहीत तर कोणत्या कायद्यांनी (laws) गुलाम केले आहे, तेही सांगते. हा विचार पुढे आल्यानंतर किसानपुत्र कवीनी कविता लिहिल्या. चित्रकारांनी साखळदंडानी बंदिस्त झालेला शेतकरी चित्रित केला. गेल्या काही वर्षात ‘सर्जकांचे स्वातंत्र्य’ ही नवी मांडणी पुढे आली त्यावरही चित्रे काढली गेली, कविता रचल्या गेल्या. अशा काही कविता व चित्राचे, अवघ्या 24 पानांचे, रंगीत संकलन ‘गुलामीकडे बोट’ (point to slavery) या नावाने प्रकाशीत होत आहे. या पुस्तकाची प्रस्तावना पुढे दिली आहे.
🔳 प्रस्तावना
किसानपुत्र आंदोलन सुरू होऊन दहा वर्षे झाली. या आंदोलनाने भारतातील शेतकऱ्यांच्या शोषणाचे मूळ कारण जगापुढे ठेवले. कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा, प्रामुख्याने या तीन कायद्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाची व्यवस्था निर्माण केली हे लक्षात आणून दिले. 1990 नंतर सरकारने धोरण बदलले. उदारीकरण स्वीकारले. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. त्याच्या कारणांचा अभ्यास केल्यानंतर हे स्पष्ट झाले की, शेतकऱ्यांना गुलाम बनवणारे कायदे अस्तित्वात असतील तर त्यांची प्रगती होऊ शकत नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न गरिबीचा नसून गुलामीचा आहे. बजेटमध्ये तरतूद करणे पुरेसे नाही. कायदे रद्द करावे लागतील. तसेच हेही लक्षात आले की, वर्ग संघर्ष खोटा, वर्ण संघर्ष खोटा. खरा संघर्ष हा सर्जक व बांडगुळ भक्षक यांच्यात आहे. या समग्र मांडणीने शेतकरी आंदोलनाला नवी दिशा दिली.
🔳 आंदोलनाचे नवे तंत्र
किसानपुत्र आंदोलनाने संघटना बांधली नाही. आंदोलनाचे नवे तंत्र विकसित केले. 19 मार्चला उपवास करायचा आणि 18 जूनला लोकजागृतीचा कार्यक्रम करायचा. हे दोन दिवस सांगितले. त्याशिवाय लोकजागृतीसाठी सभा, संमेलने, शिबिरे घेतली. न्यायालयाचे दार ठोठावले, निवडणुकीत भूमिका घेतली. कोणतीही भूमिका घेताना सत्याची कास सोडली नाही. हे सर्व करताना किसानपुत्राला तुरुंगात जावे लागणार नाही, याची काळजी घेतली. कारण आम्हाला चांगले माहीत आहे की तोच त्यांच्या कुटुंबाचा आधार आहे. किसानपुत्रांनी बोलते व्हावे, असे अनेक उपक्रम राबवले. महाराष्ट्रातील किसानपुत्रांनी वेगवेगळ्या माध्यमाने आपले म्हणणे लोकांसमोर मांडले. त्यातून वेगवेगळे कलात्मक अविष्कार पुढे आले. कोणी चित्रे काढली. कोणी कविता केल्या.
पहिल्या दहा वर्षातील किसानपुत्रांची अभिव्यक्ती म्हणून या कविता आणि चित्रांची महती अनमोल आहे.
🔳 साहित्यातील स्थित्यंतरे
एक काळ होता जेव्हा ग्रामीण जीवनाचे सुंदर हिरवे वर्णन केले जायचे. त्या बहुतेक निसर्ग कविता असायच्या. त्यानंतर कृषी जीवनाचे उदात्तीकरण करणाऱ्या कविता आल्या. त्यांनी एका बाजूला बैलगाडीत बसून गाणे म्हणताना दाखविला जायचा. त्याच काळात शेतकरी खलनायक म्हणून रंगवला गेला. पाटलाचा वाडा. त्यातला रंगेलपणा. वगैरे. ऐंशीच्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे वर्णन करणारे साहित्य येऊ लागले. पुढे पुढे शेतकऱ्यांच्या दुखाचा विलाप करणारे आले. या काळातील साहित्यात शेतकऱ्यांच्या दुखाला मोठे स्थान मिळाले. पण कोठेही या परिस्थिती मागचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. किसानपुत्र आंदोलन याच काळात सुरू झाले. या आंदोलनाने विलाप करायचे टाळले. चिकित्सा केली. कारणांवर बोट ठेवले. खरे तर भावनांची आंदोलने असली तर त्यातून साहित्य निर्मिती मोठ्या प्रमाणात होणे सहज शक्य असते. परंतु विचारांवर आधारित आंदोलनात ती शक्यता फार कमी असते. अमूर्त उद्देशाकडे वाटचाल असेल तर विपुल साहित्य निर्माण होते. कायद्यासारखा विषय असेल तर ती शक्यता कमी होते. म्हणूनच किसानपुत्र आंदोलनात काही मित्रांनी ज्या रचना केल्या त्या जास्त महत्त्वाच्या आहेत.
19 मार्चला आम्ही उपवास करतो. 1986 साली याच दिवशी साहेबराव करपे यांनी सहकुटुंब आत्महत्या केली होती. साहेबरावच्या आत्महत्येने व्यथित झालेल्या विठ्ठल वाघ यांनी एक कविता लिहिली. ती मुद्दाम या संग्रहात दिली आहे. विठ्ठल वाघ हे विदर्भातील नामवंत कवी आहेत. लोक चाल्वालीशी घनिष्ट नाते असलेले ते जेष्ठ कवी आहेत. संदीप धावडे हे तरुण कवी आहेत. चिकित्सेतून व्यथेकडे आणि व्यथेतून कवितेकडे ज्या सहजपणे ते संचार करतात ते त्यांच्या कवितेतून दिसून येते.
सांगू नको मले, पोचट योजनेचे फायदे
रद्द कर आंदी, शेती शोषणाचे कायदे
इतक्या चपखल शब्दात त्यांनी किसानपुत्र आंदोलनाचे सगळे म्हणणे स्पष्ट केले आहे. ही कविता किसानपुत्र आंदोलनाचे गीत झाली आहे. संदीप धावडे यांनी ही कविता अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही म्हटली होती. किसानपुत्रांच्या अनेक कवितांमध्ये अभंग रचना आल्या आहेत. हे आज ओघाने आलेले दिसत असले तरी ती एक अपरिहार्यता आहे, असे मला वाटते. तुमचा विचार लोकांपर्यंत पोचविण्याचा तो सुलभ मार्ग आहे हे संतांनी दाखवून दिले आहे. तो मार्ग किसानपुत्रांच्या लेखणीतून आला याचा मला अभिमान वाटतो. शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेतकऱ्यांचे साहित्य निर्माण झाले नाही पण दहा-अकरा वर्षात किसानपुत्र आंदोलनात कविता आणि चित्रे तयार झाली. याचे कारण समजावून घेतले पाहिजे. ‘शेतकऱ्यांचे साहित्य का नाही’ या लेखात मी लिहिले आहे की, जे घटक कोषांतर करतात ते साहित्य निर्मिती करतात.’ शेती किंवा शेतकरी कुटुंबाचा कोष ज्यांनी सोडला, ‘भारत’चा अनुभव असलेले जे ‘इंडिया’त गेले. ती ही मुले किसानपुत्र आहेत. दोन प्रकारच्या जगण्याचा अनुभव असणारे किसानपुत्र असल्या मुले ते कविता लिहू शकले. चित्रे काढू शकले.
🔳 साखळदंडानी बांधलेला गुलाम
शेतकऱ्यांची चित्रे म्हणून जी वारंवार आली त्यात बहुतेक वेळा तो बैलांच्या मागे नांगरणी करताना किंवा पेरणी करतांना दिसतो. भात लावणी करणारा शेतकरी आपण अनेकदा पाहिला आहे. डौलदार पिकांच्या हिरव्याकंच रानात उभा असलेला प्रसन्न शेतकरीही दिसला. पुढच्या काळात चिंताग्रस्त शेतकऱ्यांचे चित्र प्रचलित झाले. दुष्काळ पडला की भेगाडलेल्या जमिनीवर बसून आकाशाकडे पाहणारा शेतकरी, शेतकरी आत्महत्या वाढल्या तेव्हापासून झाडाला लटकलेला शेतकरी किंवा फाशीच्या दोराच्या मध्यभागी बसलेला शेतकरी अशी चित्रे हल्ली प्रचलित आहेत. पण बेड्यांनी जखडलेला शेतकरी मात्र दिसला नाही. दुखी संकटग्रस्त, लाचार, याचक अशा अनेक गोष्टी दाखविल्या जातात पण तो साखळदंडानी बांधलेला आहे हे पहिल्यांदा किसानपुत्र आंदोलनाने दाखविले आहे. शेतकरी विरोधी कायदे या पुस्तकाच्या पाहिल्या आवृत्तीसाठी माझ्या विनंतीवरून अरुण यावलीकर यांनी साखळदांडानी हात पाय बांधलेला पाठमाेरा शेतकरी दाखवला. त्यानंतर सकाळच्या दिवाळी अंकात माझ्या मुलाखती सोबत तीन बेड्यांनी तीन कायद्यांचे नावे देऊन शेतकरी उभा केला होता. ते चित्र आम्ही 2017 मध्ये पुण्यात झालेल्या बेडी तोडो मेळाव्याच्या वेळेस वापरला होता.
🔳 आभार
या निर्मिती एकत्र करून प्रकाशित कराव्या, अशी माझी इच्छा होती. ती या छोट्या पुस्तिकेच्या रूपाने आकाराला आली आहे. मला हे माहीत आहे की, या प्रकाशनाचे विक्रीमूल्य फारसे नाही. पण दस्तावेज म्हणून त्याचे मूल्य मोठे आहे. कारण शेतकऱ्यांच्या गुलामीची ही पहिली जाणीव आहे. तिचे स्वरूप समजावून घेण्यासाठी ही पुस्तिका प्रमाण ठरणार आहे. या पुस्तकाचे उत्तम दर्जाचे प्रकाशन करण्यासाठी लागणारा खर्च किसानपुत्र आंदोलनातील मित्रांनी आनंदाने शेयर केला आहे. कवी व चित्रकार मित्रांवर त्याचा भार पडणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे.
आपण येथे थांबणार नाहीत. किसानपुत्र आंदोलनाच्या विचारांशी निगडित असलेल्या कविता आणि चित्रे दर दोन-तीन वर्षांनी प्रकाशित करणार आहोत. हा छोटासा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले, त्यांचे मन:पूर्वक आभार!
©️ अमर हबीब
संपादक, प्रकाशक आणि किसानपुत्र आंदोलनाचा कार्यकर्ता