Cold wave : महाराष्ट्रात 10 ठिकाणी थंडीची लाट तर 5 ठिकाणी लाटसदृश स्थिती
1 min read
Cold wave : महाराष्ट्रात मंगळवारी (17 नाेव्हेंबर) यवतमाळ, जेऊर व जळगाव येथे पहाटे पाच वाजता अनुक्रमे 9.6, 7 व 7.1 अंश सेल्सियस इतके किमान तापमान नोंदवले गेले आहे. ही तापमाने सरासरीपेक्षा अनुक्रमे 7.4, 7.5 व 7.7 इतक्या अंश सेल्सिअसने खालावून तेथे व लगतच्या परिसरात तीव्र थंडीची लाट (Cold wave) जाणवत आहे.
🔆 या सात ठिकाणी थंडीची लाट
अहिल्यानगर, नाशिक, मालेगाव, पुणे, गोंदिया, वाशिम व भंडारा येथे मंगळवारी (17 नाेव्हेंबर) पहाटे पाच वाजता अनुक्रमे 8.4, 9.2, 9.6, 9.4, 9.6, 10 व 10 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले असून, ही तेथील तापमाने सरासरीपेक्षा अनुक्रमे 5.3, 5.4, 5.5, 5.6, 6.2, 5.2 व (..) इतक्या अंश सेल्सिअसने खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची लाट जाणवत आहे.
🔆 पाच ठिकाणी थंडीच्या लाटसदृश स्थिती
महाराष्ट्रातील डहाणू 15.8 (-5.9), छत्रपती संभाजीनगर 10.6 (-4.8), सातारा 10.6 (-5.5), परभणी 10.8 (-5.8), नागपूर 10.9 (4.4) ह्या शहरात व लगतच्या परिसरात मंगळवारी (17 नाेव्हेंबर) थंडीच्या लाटसदृश स्थिती अनुभवली गेली. यापूर्वी डहाणू, अहिल्यानगर, पुणे, सातारा, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा ह्या शहरात व लगतच्या परिसरात थंडीच्या लाटसदृश स्थिती अनुभवली गेली.
🔆 पुढील चार दिवस थंडीचेच
सध्या महाराष्ट्रात जाणवत असलेली थंडी मंगळवारी (17 नाेव्हेंबर) पुढील चार दिवस म्हणजे शुक्रवार (दि. 21 नोव्हेंबर) (मार्गशीर्ष प्रतिपदा) पर्यंत अशीच जाणवणार असून, बुधवार (दि. 19 नोव्हेंबर) पर्यंत अशीच कडाक्याची थंडी जाणवू शकते.
🔆 थंडीचे सातत्य टिकून
महाराष्ट्रातील डहाणू, जळगाव, नंदुरबार, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी या शहरात व संपूर्ण विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात पहाटेच्या 5 च्या किमान तापमानाचा पारा सरासरीच्या 4 ते 5 डिग्री सेल्सिअसने खालावून तेथेही थंडीचे सातत्य टिकून आहे.
🔆 दिवसाही जाणवतो गारवा
मालेगाव ( जिल्हा नाशिक), जळगाव, बीड, नांदेड, वाशिम येथे दुपारी 3 चे कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 डिग्रीच्या आसपास खालवले असल्यामुळे तेथे व लगतच्या परिसरात रात्री बरोबर दिवसाही काहीसा गारवा जाणवत आहे.
🔆 पिकांना थंडीचा फायदाच
गेल्या 8-10 दिवसापासून म्हणजे 8 नोव्हेंबरपासून जाणवत असलेल्या माफक थंडीमुळे महाराष्ट्रातील सध्याचे बाल्यावस्थेतील रब्बीची पिके, फळबागा व इतर भाजीपाला पिकांना मदतच होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेतील या वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी ही जमेचीच बाजू समजावी, असे वाटते.
🔆 महाराष्ट्रात सध्याची थंडी कशामुळे?
सध्या उत्तर भारतात एकापाठोपाठ पश्चिमी झंजावात नाही. दोन पश्चिमी झंजावात काही दिवसांच्या गॅपमुळे, अगोदरच झालेल्या बर्फ वृष्टीवरून ताशी 25 ते 30 किमी वेगाने पूर्व दिशेकडून पूर्वीय अतिथंड वारे उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे झेपावत आहे. शिवाय महाराष्ट्रात आकाश निरभ्र आहेच. तसेच महाराष्ट्रसह संपूर्ण वायव्य भारतात हवेच्या दाबात 4 ते 6 हेक्टापास्कलने वाढ होवून 1016 ते 1018 हेक्टापास्कल अशा एकसमान व एकजिनसी हवेच्या दाब उत्तर भारताबरोबर सध्या महाराष्ट्रातही जाणवत आहे. त्यामुळे हवेच्या घनतेत वाढ होत आहे. म्हणून सध्या थंडीला अनुकूल वातावरण आहे. संपूर्ण महाराष्ट्र ओलांडून ही थंडी उत्तर कर्नाटक व उत्तर तेलंगणात झेपावली आहे. अशा प्रकारे येणाऱ्या थंडीला अडथळा न देणारा हवेच्या दाबाचा पॅटर्नही सध्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतात आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात चौफेर थंडी जाणवत आहे.
🔆 थंडी कधी कमी होणार?
वारा वहन पॅटर्नमध्ये होणाऱ्या बदलातून शनिवार (दि. 22 नोव्हेंबर)पासून महाराष्ट्रात थंडी कमी होण्याची शक्यता जाणवते.