krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Loan waiver : कर्ज बेबाकीतून ‘त्यांना’ वगळा

1 min read

Loan waiver : सन 2017 ला शेतकऱ्यांचा संप झाला होता. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचे लोन पसरले होते. त्या वेळी मी पहिल्यांदा जाहीर भूमिका घेतली होती की, सरकारी पगारदार आणि आयकर भरणारे यांना कर्ज-बेबाकी (Loan waiver) देऊ नये. अशा घटकांना कर्ज-बेबाकी देणे हा तिजोरीवर दरोडा आहे. त्यांना दिले जाणारे पैसे शेतकऱ्यांना द्या. त्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होते. त्यांनी माझ्या म्हणण्यातील तत्व मान्य केले, पण केवळ हे दोन घटक न धरता त्यांनी लांबलचक यादी जोडली व वगळलेल्यांचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. त्यामुळे त्या निर्णयाच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला.

📍 का वगळावे?
मी तालुक्याच्या गावात राहतो. महसूल मधील एका मित्राने सांगितले की, गेल्या दोन वर्षांत आमच्या गावातील पाच डॉक्टरांनी सुमारे दोनशे एकर जमीन विकत घेतली. शेतीच्या उत्पन्नावर आयकर नाही म्हणून अशी तजवीज केली जाते. शिवाय रियल इस्टेट म्हणूनही जमीन हे महत्त्वाचे कलम आहे. तुमच्या भागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे किती जमीन आहे ते पहा. नदीच्या काठच्या जमिनी असो की शिवारात हिरवीकंच दिसणारी शेती पुष्कळदा अशा भ्रष्ट लोकांची असते. हे गौडबंगाल लक्षात येईल. जिल्ह्याच्या एम.आय.डी.सी. मध्ये उद्योग असलेले एक कारखानदार सांगत होते की, आमच्या मॉर्निंग ग्रुपमध्ये काही कारखानदार आहेत, काही डॉक्टर आहेत, काही अधिकारी आहेत तर एक जण साखर कारखान्याचे चेयरमनही आहेत. हल्ली आमच्याकडे ‘कोणाला किती पैसे आले?’ यावरच चर्चा होते. कोणी म्हणते, दोन लाख आले, कोणी म्हणते 80 हजार आले. ते पुढे म्हणाले, अशी मदत घेण्याची मला लाज वाटते. आमच्या सारख्यांना का पैसे देता? जे खरे गरजवंत आहेत त्यांना द्या. त्यांचे म्हणणे एका प्रामाणिक कारखानदाराचे आहे. मागे हायकोर्टातील वकील महेश भोसले यांनी मला कर्जमाफी नको, असे जाहीर केले होते.

सरकारी पगार घेणारी व्यक्ती दुसरा व्यावसाय करू शकत नाही, असा कायदा आहे. म्हणून त्याला दुकान काढता येत नाही, गिरणी चालवता येत नाही. पुस्तक प्रकाशन करून विकता येत नाही, म्हणून अनेक सरकारी पगारदार लोक प्रकाशक म्हणून बायकोचे किंवा आईचे नाव टाकतात. माझा मुद्दा त्यांनी काय करावे हा नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की, ते जर इतर व्यावसाय करू शकत नाहीत तर ते शेती कशी करतात? शेती हा व्यवसाय नाही का? शेती वंश-परंपरेने आली म्हणून काय झाले? वंश-परंपरेने आलेली शेती करायची असेल तर मग नोकरी का करता? नोकरी करायची असेल तर शेती का? ही सूट कोणी दिली? का दिली? बरे त्यावर यांना कर्जमाफी आणि अनुदानेही हवीत. वेतन आयोगही घेणार आणि शेतकरी म्हणून दुहेरी लाभ ही उपटणार. हे कसे चालेल?

सरकार कारखानदारांचे लाखो कोटीचे कर्ज ‘राईट ऑफ’ करते मग शेतकऱ्यांमध्ये भेदाभेद का? असा प्रश्न विचारला जातो. मी या प्रश्नामागची भावना समजू शकतो. असा प्रश्न विचारणारा प्राध्यापक असेल तर लक्षात घ्या, त्याना दोन गोष्टी माहित नाहीत. एक तर सगळ्या कारखानदारांची थकबाकी ‘राईट ऑफ’ केली जात नाही. सरकारच्या खास मर्जीतील निवडक कारखानदारांचीच थकबाकी ‘राईट ऑफ’ केली जाते. तेथेही सरसकट नसते. बगलबच्च्यांची कर्जे ‘राईट ऑफ’ करणे ही बाब मला जास्त गंभीर वाटते. सरकारने केलेला हा पक्षपात घातक आहे. मुठभर कारखानदारांना मार्ग मोकळा करणे देशाच्या हिताचे असणार नाही.

दुसरी बाब ‘शेतकरी तितुका एक एक’ म्हणजे ‘शेतकरी’ तितुका एक एक. बिगर शेतकरी आणि शेतकरी तितुका एक एक नव्हे. यासाठी तुम्हाला शेतकरी या शब्दाची व्याख्या समजावून घ्यावी लागेल. सातबारा आहे म्हणून त्याला शेतकरी म्हणायचे का? असे केले तर अनेक पुढारीच काय दारूचे गुत्तेवाले देखील त्या व्याख्येत येतील. शेतकरी या शब्दाची व्याख्या साधी आहे. ज्याच्या उत्पन्नाचे साधन शेती आहे, तो शेतकरी. शेतकरी तितुका एक एक म्हणजे ज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे, ते सगळे एक आहेत. त्यात मजूर, बटाईदार, संत्र्याचा – कापसाचा, बागाईतदार – कोरडवाहू, मराठवाड्यातला – पश्चिम महाराष्ट्रातला, ह्या जातीचा, त्या जातीचा – ह्या धर्माचा – त्या धर्माचा असा भेदाभेद करू नका. ज्यांचे ज्यांचे शेती हे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे ते सगळे शेतकरी होत. ज्यांना सरकारी पगार मिळतो, ज्यांना इतर व्यवसायातून उत्पन्न मिळते, जे राजकारणात कमाई करतात, ते कसे शेतकरी होतील?

काहींचे म्हणणे असे की, शेती तोट्यात आहे, ती कोणाचीही असली तरी तोट्यात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात आहे. पगारदार असो की, व्यावसायिक त्यांना सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे. ह्या मित्रांनी हे लक्षात घ्यावे की, नोकरदारांना पगार मिळतो, आयकर भरणारे लोक काही कमी कमवत नाहीत, आपली कमाई लपवण्यासाठी ते जमिनी ठेवतात किंवा विकत घेतात. माझा मुद्दा हा आहे की, शेतीच्या लुटीचा मोबदला त्यांना त्यांच्या व्यावसाय आणि नोकरीत मिळतो. त्यामुळे त्यांना तक्रार करायला जागा नाही.

📍 सोपा मार्ग
सरकारी पगारदार आणि आयकर भरणारे यांना वगळणे अवघड नाही. त्यांची यादी करायला घरोघर जाण्याची आवश्यकता नाही. या दोन्ही याद्या काही तासात सरकारला मिळू शकतात. जास्तीजास्त आठ दिवस लागतील. सरकारी पगारदारांची यादी खुद्द सरकारकडे असणारच आहे. आयकर भरणाऱ्यांची यादी देखील महाराष्ट्रातील आयकर खात्याच्या वेबसाईटवर मिळू शकते. फक्त हेच दोन घटक सुरुवातीला वगळले पाहिजेत. माझ्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 17 लाख आहे व आयकर भरणाऱ्यांची संख्या जवळपास एक कोटी आहे. या एक कोटीमध्ये सरकारी कर्मचारी समाविष्ट असणार आहेत. ही यादी एकत्र आली की त्या पैकी किती जणांच्या नावे सातबारा आहे, हे सहज काढता येईल. आता सात-बारा देखील ऑनलाईन उपलब्ध आहे. एका बाजूला राज्य पातळीवर ही माहिती तयार करावी दुसऱ्या बाजूला महसूल कर्मचाऱ्यांकडून माहिती मागवून घ्यावी. आयकर भरणाऱ्यांची यादी स्थानिक महसूल यंत्रणेकडे देऊन त्या त्या नावावरील क्षेत्र कळू शकेल. सरकारने ठरवले तर ही माहिती आठ दिवसात गोळा होईल. वरील यादीत अनेक असे कर्मचारी आणि आयकर भरणारे लोक असतील की ज्यांच्या नावाने जमीन असणार नाही. हा आकडा किती असले हे आज नक्की सांगता येत नाही.

📍 कर्जबेबाकी सोबत मदतही करा
शेती हे मुख्य उत्पन्नाचे साधन असणारे किती कुटुंब महाराष्ट्रात असतील? याचा नेमका आकडा सरकारकडे नसावा, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांप्रती सरकारला कितपत आस्था आहे, याचा हा पुरावा आहे. मी सरकारला सीलिंगच्या जमिनीबद्दल माहिती मागितली होती. त्याबद्दलही हीच अनास्था दिसून आली. खरे तर सरकारची ही अनास्था चिंतेची बाब मानली पाहिजे. सरकार एखादे काम करीत नाही, तेव्हा विद्यापीठासारख्या स्वायत्त संस्थांनी पुढे आले पाहिजे. हे काम कोणत्याच विद्यापीठाने आजपर्यंत का केले नाही.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या स्वातंत्र्यपूर्व काळात होत होत्या. नंतरही सातत्याने होत आल्या आहेत. सन 1962 ला प्रमाण वाढले म्हणून पी एचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास केला. 1986 साली साहेबराव करपे कुटुंबियांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने सरकारने शेतकरी आत्महत्यांची वेगळी नोंद घ्यायला सुरुवात केली. सुमारे पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या उत्पाताचा सरकारवर परिणाम झाला नाही. पण शेतकरी मात्र जागे झाले. कोण्या नेत्याने सांगितले म्हणून नव्हे तर स्वत: शेतकऱ्यांनी ठरवले की, आपली पुढची पिढी शेतीत ठेवायची नाही. याच काळात खुलीकरण आले व इंडियाचे दार किलकिले झाले. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनी फार मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले. त्यामुळे आज ‘शेती हे उत्पान्नाचे मुख्य साधन’ असलेली कुटुंबे खूप कमी झाली आहेत. हे वास्तव नीट समजावून घेतले पाहिजे.

आत्महत्या करणारी कुटुंबे तीच आहेत, ज्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे. हे लक्षात घेऊन माझी सरकारला सूचना आहे की, सरकारने कर्ज बेबाकी तर करावीच. त्याच बरोबर सरकारी पगारदार व आयकर दात्यांना दिली जाणारी जी रक्कम शिल्लक राहणार आहे, ती त्या कुटुंबांमध्ये वाटावी ज्यांचा शेती हाच उत्पन्नाचा मुख्य आधार आहे. अशी रक्कम वाटल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळू शकतील. कर्ज – बेबाकी आणि मदत करून थांबू नका. त्याच्या पुढे जाऊन कमाल शेतजमीन धारणा कायदा आणि आवश्यक वस्तू कायदा हे जीवघेणे कायदेही रद्द करावे लागतील.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!