Rain forcast : पहाळे टाईपसाेबतच किरकोळ पावसाची शक्यता
1 min read
Rain forcast : गुरुवार (दि. 19 जून) व शुक्रवार (दि. 20 जून) राेजी मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची (Rain) शक्यता जाणवते. विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या पहाळे टाईप (थेंब थेंब – थुई थुई पाऊस) पावसाची शक्यता या दोन दिवसात जाणवेल. खानदेशात मात्र हे वातावरण टिकून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शनिवार (दि. 21 जून) ते शनिवार (दि. 28 जून)पर्यंतच्या आठवड्यात पुन्हा ढगाळ वातावरण राहून किरकोळ पावसाची शक्यता (Rain forcast) निर्माण झाली आहे.
☢️ कोकण
मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्हे तसेच सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील जिल्ह्यात पुढील 10 दिवस म्हणजे शनिवार, दि. 28 जूनपर्यंत सध्या जाणवतो, तसा जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.
☢️ विदर्भ
विदर्भातील 11 जिल्ह्यात मात्र गुरुवार (दि. 19 जून)पासून पुढील तीन दिवस म्हणजे शनिवार (दि. 21 जून)पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून, त्यानंतर आठवडाभर मात्र पुन्हा तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
☢️ मराठवाडा
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात मात्र पुढील 10 दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
☢️ मान्सून
तीन आठवड्यांपासून जाग्यावरच खिळलेला मान्सून पुढे सरकला असून, त्याने नाशिक, अहिल्यानगर, संपूर्ण खानदेश, मराठवाडा व विदर्भासह जवळपास उत्तरेचा काही भाग वगळता महाराष्ट्र काबीज केला आहे.
☢️ पाऊस
मान्सून जरी पुढे सरकला तरी त्याच्या प्रवाहात सध्या म्हणावा असा विशेष जोर नाही. त्यामुळे 18 ते 25 जूनपर्यंतच्या आठवड्यात मुंबईसह कोकण व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र जोरदार तर घाटमाथा व विदर्भात मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
☢️ पेरणी
ज्या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या पावसाने भरपूर ओल आहे आणि ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांना पेरण्या करावयाच्या असतील तर अशा खानदेश, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बुधवार (दि. 18 जून) ते बुधवार (दि. 25 जून) या आमावस् पर्यंतच्या आठवड्यात काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. अर्थात पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यासह आपल्या विवेकावरच घ्यावा. सोयाबीन सारख्या पिकाला बक्कळ ओल व पूर्ण उतार होण्याची शक्यता असली तरी उतारानंतर सिंचन साधनाची उपलब्धता असेल तरच पेरणीचा विचार करावा. कारण खानदेश, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यात येत्या आठवड्यात सूर्यप्रकाशही जाणवू शकतो. शिवाय तुषार सिंचनासारख्या थुई-थुई पडणाऱ्या पावसाची शक्यता ही कदाचित या 18 जिल्ह्यात या आठवड्यात जाणवणार नाही.
☢️ आठवड्यात कमी पाऊस?
मान्सून प्रवाहातील कमी ताकद आणि सध्या एमजेओ त्याची ग्लोबल फेरी पूर्ण करून भारत महासागरीय विषुववृत्तीय परीक्षेत्राच्या फेज 2 व 3 मध्ये एमजेओ जरी कार्यरत असला तरी त्याचा ‘एम्प्लिटुड’ (वर्तुळ त्रिज्येसमान वर खाली होणारी कक्षा) किंवा दोलन(ऑसिलेशन क्रेस्ट व ट्रफची) विस्तृत वाढ – मर्यादेची पातळी(एम्प्लिटुड) ही एक पेक्षा कमी जाणवते. म्हणजे ती लहर मध्य रेषेजवळच रेंगाळताना जाणवत आहे. त्यामुळे आपल्याकडील मान्सून बळकटीसाठी त्या प्रणालीच्या पूरकतेचा अभाव व त्याचबरोबर इतर ठोकळ स्पष्ट अशा प्रणालीचा अभाव जाणवतो. त्यामुळे सध्यातरी आठवडाभर म्हणजे बुधवार (दि. 25 जून)पर्यंत कदाचित खानदेश, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यात सध्यातरी जोरदार पावसाला चालना मिळण्याची शक्यता जाणवत नाही. अर्थात वातावरणातील काही बदलच यावर मात करू शकतो.