krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Onion Procurement fraud : कांदा खरेदीत घाेळ, मार्केटिंग फेडरेशनचे एमडी निलंबित

1 min read

Onion Procurement fraud : नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदी (Onion Procurement) व वितरण प्रणालीत प्रचंड भ्रष्टाचार (fraud) झाल्याचा आरोप करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली होती. त्याअनुषंगाने कांदा खरेदी व वितरण प्रक्रियेत दाेषी आढळून आल्याने गाेवा येथील मार्केटिंग फेडरेशनचे व्यपस्थापकीय/कार्यकारी संचालक (Managing Director) काशिनाथ नाईक यांना निलंबित केले आहे. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती अनिल घनवट यांनी दिली.

केंद्र शासनाच्या मूल्य स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी नाफेड व एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी व वितरण केले जाते. मागील दोन ते तीन वर्षात कांदा खरेदी व वितरणात मोठा भ्रष्टाचार व गैरप्रकार झाले असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संस्थांनी शेतकऱ्यांकडून पूर्ण कांदा खरेदी न करता फक्त कागदाेपत्री खरेदी दाखवणे, फेडरेशनशी संबंधित असलेल्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करता ठराविक शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा वापर करून खोटे दस्तऐवज तयार केले. नाफेडने जाहीर केलेल्या दरात कांदा खरेदी केला आणि नंतर कांद्याचे भाव वाढले तर एफपीओच्या फेडरेशनने संगनमताने कांदा खुल्या बाजारात विकला आहे. नाफेडला कांदा देताना स्वस्त लाल कांदा खरेदी करून नाफेड व एनसीसीएफला दिला आहे.

गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आदी राज्यांना वितरित केलेला कांदा कागदावरच पाठवल्याचे व वितरीत केल्याचे दाखवले आहे. याबाबत नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साेबतच कांदा खरेदीचा कोटा मंजूर करताना, चाळीतला कांदा वितरणासाठी ट्रॅक मिळवताना, तपासणीसाठी अधिकारी आल्यास, शेतकरी उत्पादक कंपन्यांना, अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते, अशी तक्रार स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नाफेड, एनसीसीएफचे अधिकारी, फेडरेशन, वाहतूक ठेकेदार व काही शेतकरी या गैरव्यवहारात सहभागी असल्याची तक्रार अनिल घनवट यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे केली हाेती.

या तक्रारीची दखल घेत गोवा सरकारने गोवा राज्य मार्केटिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक काशिनाथ नाईक यांना तातडीने निलंबित केले असून, त्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे. ही कारवाई करणारे गोवा राज्य निबंधक (सहकारी संस्था) यांचे अनिल घनवट यांनी पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. या घोटाळ्याबाबत नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र, त्याची चौकशी झालेली नाही. या घोटाळ्यात सहभागी असलेले महाराष्ट्रातील साथीदारांवर सुद्धा तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच गोव्यासारखेच इतर राज्यात पाठवलेल्या कांद्याच्या चौकशी होऊन गुन्हे दाखल करा, अशी मागणी अनिल घनवट यांनी केली आहे. एक महिन्यात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्वतंत्र भारत पक्ष व व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!