Village : गाव हरवल्याच्या खुणा व्याकुळ करतात!
1 min read
Village : मला पुण्यात स्थायिक होऊन जवळपास 30 वर्षे होत आहे. तुम्ही कुठले म्हणून कोणी विचारलं तर लातूर जिल्ह्यातील चोबळीचा असं नैसर्गिक उत्तर येतं. आता गेली एक वर्ष कामाच्या व्यापामुळे गावी (Village) जाऊ शकलो नाही. सोशल मीडियामुळे गावचे हालहवाल कळतात. जुन्या पिढीतले लोकं पिकलेलं पिंपळ पान गळून पडावं असे एक एक करून गावपणाच्या खुणा घेवून मातीत लिन होत आहेत. यातल्या प्रत्येकाचं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रातलं योगदान आहे, पण हा त्यांचा अबोल इतिहास त्यांच्या बरोबर संपतो आहे.
मागच्या वर्षी गावी गेलो तर भावकीतल्या एका लहान मुलाने कोणाच्या घरी जायचंय म्हणून विचारलं. त्यावेळी मनात खोलपर्यंत कळ आली. ज्या गावात जन्मलो, वाढलो. पण नोकरी निमित्ताने शहरात यावे लागले. त्या गावात वर्षातून कधीतरी एकदा एक दोन दिवसांसाठी तोंड दाखवणं होतं. त्यामुळे आता जी 10 – 12 वर्षांची पोरं आहेत. ते मला माहिती नाहीत आणि त्यांना मी माहिती असण्याचा प्रश्न नाही. 4 हजार लोक वस्तीतल्या गावातला प्रत्येक जण एकमेकांना ओळखणारा. 30 वर्षे पुण्यात राहतोय, शेजारच्या अपार्टमेंट मधली लोकं मला माहिती नाहीत. गरजांची पूर्ती मार्केट करतंय, मनोरंजनासाठी अमाप साधन आहेत. पण मन मोकळ करायच म्हटलं की, गावातल्या मित्रांना फोन करून मन मोकळं होतंय.

ज्यांचे जन्म पुण्यात झालेत पण त्यांच्या मायाबापाची मुळं खेड्यात आहेत. त्या पोरांना कुठला आहेस विचारलं की ते पुण्याचा म्हणून सांगतात. मग खोदून विचारलं मुळचा कुठला म्हटल की वडिलांचे मुळ गाव म्हणून त्या खेड्याचा उल्लेख करतात. त्यावेळी खेड्याचं डिसकनेक्ट खुप वेदना देतं. त्यामुळे इतिहासाच्या पानात 15 – 20 पिढ्यांमागे आपले पूर्वज कुठले, याचा लिखित पुरावा सापडत नाही. इतिहासातला डीएनए मातीशी कनेक्ट व्हायला शिकवतो. मातीशी डिसकनेक्ट असण्याचे तोटे सहज कळत नाहीत, पण ते तोटे खुप मोठे असतात. याची जाणीव बहुतेकांना होत नाही. तुमच्या पिढ्यांचा इतिहास हा तुमच्या अस्तित्वाचे माईलस्टोन (Milestone) आहेत. त्या खुणाचं जर तुम्ही विसराल तर तुमच्या वैश्विक असण्याला मुळच नाहीत, असं म्हणावं लागतं…!