krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Viatina-19 Cow : अबब! 40 कोटींची ‘व्हिएटिना-19’ गाय… पण भारतीय गोवंश संवर्धनाचे काय?

1 min read

Viatina-19 Cow : ब्राझिलमधील मिनास गेराईसमध्ये नुकताच गायींचा लिलाव (Auction) झाला. भारतीय नेल्लोर (Nellore) जातीच्या ‘व्हिएटिना-19’ (Viatina-19) गायीची (Cow) बोली तब्बल 40 कोटी रुपयांना लागली. 1 हजार 101 किलो वजनाची ही गाय इतर जातीच्या गायींच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट वजनाची आहे. 4.8 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 40 कोटी रुपये) मध्ये ही गाय विकली गेली. आतापर्यंत विकली जाणारी ती सर्वांत महागडी गाय. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही ‘ओंगोल’ गायीची (Ongole Cow) नोंद झाली आहे. पण, प्रत्येक भारतीय गाय (Indian cow) 40 कोटींची होईल, यासाठी भारतात कधी प्रयत्न होतील. संशोधन, संवर्धनातून असा सन्मान आपण कधी मिळवू?

व्हिएटिना-19 या भारतीय वंशावळीच्या गायीमुळे जगातील दूध उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक गेल्या 25 वर्षांपासून नावाजला जातोय. भारतीय वंशावळीच्या गोवंशाबाबत म्हणूनच जगाचे लक्ष लागलेले आहे. भारतीय गोवंशाची गुणात्मक आणि प्रजननात्मक वैशिष्ट्ये जेवढी विदेशी संशोधकांना आणि उत्पादकांना कळली, त्यामानाने देशात तंत्रज्ञानाअभावी अशी सगळी वैशिष्ट्ये केवळ 10 टक्केच भारतीयांना समजली, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. गिरोलांडो या गीर जातीपासून विकसित केलेल्या गाईच्या बाबतीत जगातही सात-आठ वर्षांपूर्वी असाच गौरव झाला. अनुवंशिकता, प्रजननक्षमता आणि उत्पादकता या अंगीकृत गुणांबाबत संशोधन आणि विकासातून सातत्य साधताना भारतीय वंशावळच्या गोवंशाचे स्थान सर्वांत अग्रेसर आहे.

व्हिएटिना-19 ही नेल्लोर जिल्ह्यातील ओंगोल जातीची गाय. शरीराची कार्यक्षमता आणि दूध उत्पादन या दोन्ही बाबींसाठी वर्षानुवर्ष नावाजली गेली आहे. भारतीय वंशावळीच्या अनेक गोवंशाची जैविक किंमत मोठ्या प्रमाणात कळल्यामुळे चांगल्या गायी परदेशातून गेल्या 50 वर्षांत खरेदी करण्यात आलेल्या आहेत. आधुनिक काळातील जगाची आव्हाने तापमान वाढ, पर्यावरण ऱ्हास, नैसर्गिक असमतोल लागवडीखालील जमीनक्षेत्रात घट अशी असताना तग धरण्याची क्षमता या एकाच निकषावर भारतीय गोवंशाच्या सर्वच जाती श्रेष्ठ ठरतात.

परजीवी प्रादुर्भावावर यशस्वी मात, प्रतिकूल वातावरणात जगण्याची क्षमता, संसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी सक्षम रोगप्रतिकारकक्षमता, निकृष्ट शेतीसाठी टणक खुरांची उपयुक्तता याबाबत असणारा अद्वितीय वेगळेपणा भारतीय वंशाची किंमत कैक पटीने वाढवतो. जगाच्या इतिहासात सूक्ष्म अभ्यास केला असता दरवर्षी नियमित, मात्र अपेक्षित सरासरी दूध वाढ करून अनेक गोवंशाच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आणि होलस्टन फ्रेशियनसाठी अशी वाढ दीड-दोन लिटरपासून दीडशे लिटरपर्यंत झाली, याला दीडशे वर्षाचे सातत्य, पाठपुरावा, अभ्यास, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.

मूळतः आंध्र प्रदेशच्या ओंगोल प्रदेशातून आलेली ही जात कठीण हवामान सहन करण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. ही जात भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणात आढळते. ओंगोल तिच्या अद्वितीय आनुवंशिक गुणधर्मांमुळे आणि शारीरिक वैशिष्ट्यांमुळे जगभर ओळखली जाते. तिने प्रतिष्ठित ‘चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड’ स्पर्धेत ‘मिस साउथ अमेरिका’ हा सन्मानही मिळविला आहे. विलक्षण स्नायूंची रचना व दुर्मिळ आनुवंशिक वारसामुळे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामुळेच तिची वासरू जगभर निर्यात होतात. दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या गीर, थारपारकर, सहिवाल, रेड सिंधी, कांकरेज या टॉप फाइव्ह जातींसह पुढच्या टप्प्यात गिरोलांडो, ओंगोल या गायींच्या जातीही अधिक दूध देणाऱ्या आहेत. जवळपास 55 जाती नामांकित आहेत. पण, दुधाचे उत्पादन हे शेवटी व्यवस्थापनावर अवलंबून आहे. ओंगोलने त्यात ब्राझिलमध्ये आघाडी मिळवून हॅटट्रिक साधली आहे.

आजघडीला जनुकीय अभियांत्रिकी हा अतिशय प्रगत विषय गोठ्यापर्यंत जात नाही म्हणून भारतीय गोवंशाच्या विकासासाठी परदेशातच अधिक प्रयत्न होताना दिसतात. नोंदणी लांबच, साधा ओळख बिल्ला कानाला लावण्यासाठी आपल्या राज्यात अजूनही लक्षांक पूर्तता झाली नाही, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. सक्षम पैदास धोरण आणि त्याची कटाक्षाने अंमलबजावणी करणाऱ्या ब्राझिलला भारतीय गोवंशाच्या गाईच्या संवर्धनातून सन्मान प्राप्त करता आला, त्याचे मूळ ज्या दिवशी भारतीयांना कळेल त्या दिवशी देशातील प्रत्येक गाय 40 कोटी किमतीची होईल.

♻️ ही आहेत ‘व्हिएटिना-19’ची वैशिष्ट्ये
🎯 ओंगोल गाय ही शुद्ध भारतीय गोवंश.
🎯 या गायीला नेल्लोर गाय म्हणूनही ओळखले जाते.
🎯 गायीचे मूळ आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील ओंगोल आहे.
🎯 रोगप्रतिकारकशक्ती व मजबूत अंगकाठी असते.
🎯 प्रजाती कठीण व उष्ण परिस्थितीतही जगू शकते.
🎯 बैल शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
🎯 वासरं जगभर निर्यात केली जातात.
🎯 प्रजातीचे सांड जलीकट्टू खेळासाठी वापरले जातात.
🎯 जाड कातडीमुळे या गोवंशाला रक्तशोषक किड्यांची बाधा होत नाही.
🎯 पचनक्षमताही उत्तम असते.
🎯 विशिष्ट खुराक देण्याची गरज पडत नाही.
🎯 ओंगोल मादीचे वजन 432 ते 455 किलो असते.
🎯 स्तनपानाचा कालावधी 279 दिवसांचा असतो.
🎯 दुग्धोत्पादन 600 किलो ते 2,518 किलो असते.
🎯 ओंगोल दुधात बटरफॅटचे प्रमाण पाच टक्क्यांहून अधिक असते.
🎯 मोठे, चांगले पोषण झालेले वासरे तयार होतात.
🎯 दूध सोडण्याच्या वेळेपर्यंत वाढ लक्षणीय असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!