Heat rising : उष्णता वाढतेयं! प्रमुख शहरांत तर अधिकच वाढ
1 min read
Heat rising : महाराष्ट्रात कमाल व किमान अशा दोन्हीही तापमानांची (Temperature) सरासरीच्या खाली होणारी पाऱ्याची घसरण बऱ्याच ठिकाणी थांबली असून, तापमानात होणारी वाढ खालीलप्रमाणे जाणवत आहे.
🔆 कमाल तापमान
महाराष्ट्रातील मुंबई, सांताक्रूझ, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, यवतमाळ या शहरात व जिल्ह्यात दुपारी 3 च्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा जवळपास 4 डिग्री सेंटिग्रेडने वाढ होऊन सध्या तेथे 35 ते 38 डिग्री सेंटिग्रेड दरम्यानचे तापमान नोंदविले जात आहे. बुलढाण्यात तर 9 डिग्री सेंटिग्रेडने वाढ होऊन पारा चाळीशीकडे झुकत आहे.
🔆 किमान तापमान
महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), जेऊर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा या शहरात व जिल्ह्यात पहाटे 5 च्या किमान तापमानात सरासरीपेक्षा जवळपास दीड ते चार डिग्री सेंटिग्रेडने वाढ होऊन, सध्या तेथे 15 ते 20 डिग्री सेंटिग्रेड दरम्यानचे किमान तापमान नोंदविले जात आहे. मुंबई, कुलाबा, सांताक्रूझ, रत्नागिरी येथे तेवढ्याच वाढीने, पण 20 ते 22 डिग्री सेंटिग्रेड दरम्यानचे तापमान तेथे नोंदविले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर किमान तापमानाचा पारा साडेचार डिग्री सेंटिग्रेडने वाढ होऊन, 20 डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास किमान तापमान आहे. त्यामुळे वरील ठिकाणी उष्णतेच्या काहिलीत वाढ होऊन पहाटेचा गारवाही कमी होईल.
🔆 उष्णतेत फेब्रुवारीतच वाढ कशामुळे?
महाराष्ट्रावर वारा – वहनाच्या पॅटर्नमध्ये काहीही बदल झाला नाही, तो आहे तसाच टिकून राहिला. त्यामुळे महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून, प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तरेतील थंड वाऱ्यांना भिंतीसारखा अटकाव तयार झाला. पर्यायाने उत्तरेतील थंड वारे महाराष्ट्रात पोहाेचलेच नाही . त्यामुळे काहीसे निरभ्र आकाश असूनही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून विशेष खास अशी थंडी अद्यापपर्यंत महाराष्ट्रात जाणवली नाही. जी काही जाणवली ती चढ उतारासह केवळ किरकोळ अशीच थंडी जाणवली.
🔆 थंडी गायब झाली ?
उद्यापासूनच्या सुरू होणाऱ्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात चमत्कारीकपणे हवेच्या दाबात व त्यामुळेच जर वारा वहन प्रणालीत जर अजूनही एकाकी काही बदल झाला तरच थंडीपूरक अशा किमान तापमानाचा पारा खालावून थंडीची अपेक्षा करता येईल, असे वाटते. अन्यथा नाही.
🔆 पावसाची शक्यता आहे काय?
बंगालच्या खाडीतील सध्याच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे केवळ फक्त विदर्भातच शुक्रवार व शनिवार, दि. 21 व 22 फेब्रुवारी असे दोन दिवस ढगाळ वातावरण राहुन अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.