Air pollution silent killer : हवेतील धूर, धूळ बनलाय ‘सायलेंट किलर’
2 min read
Air pollution silent killer : काँक्रीटचे जंगल बनलेल्या शहरांमध्ये विकासकामांसाेबतच जुन्या इमारती पाडून नवी घरे, नव्या इमारती, सिमेंट राेड बांधण्याचा धडाका सुरू आहे. सरकारी बांधकामांमध्ये वीज केंद्रातील फ्लाय ॲशसह विविध साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. वाहतूक व वापरादरम्यान वैज्ञानिक बाबींना तिलांजली दिली जात असल्याने ही ॲश, घरे पाडताना त्याच्या बांधकामासाठी वापरलेला प्रत्येक घटकाचे सूक्ष्म धूलिकण अर्थात अदृश्य विषारी घटक वातावरणात मिसळण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. या सर्व प्रक्रियेत उडणारी विषारी धूळ कुठे जाते, याचा विचार कोण करतो? धुळीतील सूक्ष्म विषारी कण श्वासावाटे माणसांसाेबतच पशुपक्ष्यांच्या फुफ्फुसांत शिरतात, झाडांच्या पानांवर या धुळीचा थर बसताे. अस्वस्थता निर्माण करणारी ही प्रदूषित हवा (Air pollution) प्रत्येक माणसासाेबत पशु-पक्ष्याला हळूहळू आतून पाखरते. विकासाच्या नावाखाली आपण आपल्याच जीवसृष्टीवर कुरघोडी करीत आहेत, याचे भान कुणालाही नाही. शहरांवर पसरलेला हा धुरकट पडदा आता उघडपणे ‘सायलेंट किलर’ (Silent killer) नावाने का ओळखला जातो, ते बघुया!
♻️ हवेत मिसळणारे घातक घटक
वायू प्रदूषण (Air Pollution) म्हणजे ज्यामुळे सजीव सृष्टी व पर्यावरणाला हानिकारक ठरणारे व दूरगामी घातक परिणाम करणारे घटक हवेत मिसळणे व त्याचे प्रमाण वाढत जाणे म्हणजेचे हवेचे प्रदूषण हाेय. वायुरूप प्रदूषक (Gaseous Pollutants), कणिक पदार्थ (Particulate Matter – PM) आणि इतर घातक काही घटक हवे प्रदूषणाला कारणीभूत ठरतात.
📍 वायुरूप प्रदूषक (Gaseous Pollutants)
🔆 कार्बन मोनोऑक्साइड (Carbon monoxide – CO) :- वाहने व कारखान्यांमधील इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून हा विषारी वायू बाहेर पडतो व ताे हवेत मिसळताे.
🔆 सल्फर डायऑक्साइड (Sulfur dioxide – SO2) :- कोळसा व तेलाच्या ज्वलनातून, वीजनिर्मिती केंद्र आणि सिमेंट प्रकल्पांमधून हा वायू वातावरणात साेडला जाताे.
🔆 नायट्रोजन ऑक्साइड्स (Nitrogen oxides – NOx) :- वाहनांचा धूर व औद्योगिक प्रक्रियांमुळे हा वायू तयार हाेताे व हवेत मिसळतो, ज्यामुळे फुफ्फुसांचे विकार होऊ शकतात.
🔆 मिथेन (Methane – CH4) :- कचरा कुजणे, सांडपाणी, शेती, पशुपालन व हरितगृहातून वायू उत्सर्जित होतो व हवेत मिसळताे.
🔆 ओझोन (Ozone – O3) :- जमिनीलगतच्या ओझोनचे थेट उत्सर्जन होत असले तरी इतर प्रदूषकांच्या सूर्यप्रकाशातील रासायनिक अभिक्रियेतून ओझाेन तयार होतो.
🔆 अमोनिया (Ammonia – NH3) :- शेतातील रासायनिक व शेणखतांचा वापर व पशुपालनातील कचऱ्यातून अमोनिया हवेत मिसळतो.
📍 कणिक पदार्थ (Particulate Matter – PM)
🔆 PM2.5 आणि PM10 :- हे हवेत तरंगणारे अतिसूक्ष्म धुलीकण आहेत. धूळ, धूर, बांधकामे आणि वाहनांच्या इंधनातून हे तयार होतात. हे कण श्वासाद्वारे थेट फुफ्फुसात शिरतात.
🔆 काजळी (Black Carbon) :- लाकूड, कोळसा किंवा कचरा उघड्यावर जाळल्यामुळे काजळी निर्माण होते, जी हवामानावर वाईट परिणाम करते.
📍 इतर घातक घटक
🔆 बाष्पशील सेंद्रिय संयुगे (VOCs) :- पेंट्स, क्लिनिंग एजंट्स व रसायनांच्या वापरामुळे ही संयुगे हवेत पसरतात.
🔆 शिसे (Lead):- काही औद्योगिक प्रक्रिया आणि जुन्या इंधनांच्या वापरामुळे शिशाचे कण हवेत मिसळतात.
♻️ सिमेंट
बांधकामात सिमेंटचा माेठ्या प्रमाणात वापर केला जाताे. बांधकाम ताेडताना या भिंतींना असलेल्या सिमेंटचे सूक्ष्म कण हवेत मिळतात. सिमेंट नेमके काेणत्या रासायनिक पदार्थांचे मिश्रण असते, हे पाहणे गरजेचे आहे.
📍 सिमेंटमधील मुख्य घटक (Main Ingredients)
🔆 चुना (Lime – CaO) :- 60-67 टक्के. हा सिमेंटचा सर्वात महत्त्वाचा घटक असून, तो सिमेंटला मजबुती देतो.
🔆 सिलिका (Silica) :- 17-25 टक्के. यामुळे सिमेंटला मजबुती मिळते.
ॲल्युमिना (Alumina) :- 3-8 टक्के. यामुळे सिमेंट लवकर सेट व कठोर होण्यास मदत होते.
🔆 आयर्न ऑक्साइड (Iron Oxide) : 0.5-6 टक्के. यामुळे सिमेंटला विशिष्ट राखाडी रंग, कडकपणा व मजबुती प्राप्त हाेते.
📍 सिमेंटमधील इतर घटक (Minor Ingredients)
🔆 मॅग्नेशिया (Magnesia – MgO) :- 0.1-4 टक्के. योग्य प्रमाणात असल्यास कडकपणा देतो.
🔆 जिप्सम (Gypsum) :- 3-5 टक्के. सिमेंट पाणी टाकल्यावर लगेच कडक होऊ नये (Setting Time नियंत्रित करणे) यासाठी त्यात जिप्सम मिसळले जाते.
🔆 सल्फर ट्रायऑक्साइड (Sulfur trioxide) :- 1-3 टक्के.
अल्कली (Alkalis) :- 1 टक्क्यापेक्षा कमी.
🔆 सिमेंटमधील रासायनिक संयुगे (Bogue’s Compounds)
(जेव्हा भट्टीत सिमेंट तयार होते, तेव्हा वरील घटकांच्या अभिक्रियेतून चार मुख्य संयुगे तयार होतात.)
🔆 ट्रायकॅल्शियम सिलिकेट (Tricalcium silicate) :- सुरुवातीच्या मजबुतीसाठी.
🔆 डायकॅल्शियम सिलिकेट (Dicalcium silicate) :- नंतरच्या काळातील मजबुतीसाठी.
🔆 ट्रायकॅल्शियम ॲल्युमिनेट (Tricalcium aluminate) :- लवकर कडक होण्यासाठी.
🔆 टेट्राकॅल्शियम ॲल्युमिनोफेराइट (Tetracalcium Aluminoferrite) :- मिश्रणाचे तापमान कमी राखण्यासाठी.
♻️ प्लास्टर ऑफ पॅरीस (Plaster of Paris – PoP)
इमारतीच्या भिंती आणि छताला आतून गुळगुळतपणा यावा, यासाठी प्लास्टर ऑफ पॅरीसचा (पीओपी) वापर केला केला जाताे. प्लास्टर ऑफ पॅरीस प्रामुख्याने जिप्सम (Gypsum) या खनिजापासून तयार केले जाते. जिप्सम कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट (Calcium Sulphate Hemihydrate) या रासायनिक नावाने ओळखले जाते.
📍 पीओपीमधील प्रमुख घटक
🔆 कॅल्शियम सल्फेट (Calcium sulfate) :- हा पीओपीचा मुख्य रासायनिक घटक आहे.
🔆 पाणी (Water) :- यामध्ये स्फटिकीय पाण्याचे अर्धे रेणू असतात.
जिप्सम हे कच्चे खनिज असून, जेव्हा जिप्समला साधारणपणे 373 K (C) तापमानावर गरम केले जाते, तेव्हा त्यातील पाण्याचे काही रेणू निघून जातात आणि पांढऱ्या रंगाची पीओपी पावडर तयार होते. यामध्ये पाणी मिसळले की त्याचे पुन्हा जिप्सममध्ये रूपांतर होते व ते कडक बनते. याचा वापर बांधकामात फॉल्स सीलिंगसाठी, मूर्ती बनवण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रात हाडे जोडण्यासाठी प्लास्टर म्हणून केला जातो.
♻️ पेंट
घराच्या भिंतींना लावण्यात येणाऱ्या पेंटमध्ये प्रामुख्याने चार मुख्य घटक असतात, जे पेंटला त्याचा रंग, टिकाऊपणा व चमक देतात. बांधकाम ताेडतानाया पेंटचे घटक हवेत मिसळतात.
📍 पेंटमधील घटक
🔆 रंगद्रव्ये (Pigments) :- हे घटक पेंटला रंग व अपारदर्शकता (Opacity) देतात.
🔆 मुख्य रंगद्रव्ये :- पांढऱ्या रंगासाठी टायटॅनियम डायऑक्साइड (Titanium dioxide), (लाल व पिवळा रंगासाठी आयर्न ऑक्साइड – Iron oxide आणि हिरव्या रंगासाठी क्रोमियम ऑक्साईड – Chromium oxide या घटकांचा पेंटमध्ये वापर केला जाताे.
🔆 पूरक रंगद्रव्ये (Extender Pigments) :- यामध्ये चुनखडी (Calcium Carbonate), टॅल्क (Talc) किंवा चिकणमाती (Clay)चा वापर केला जाताे, ज्यामुळे पेंटचा उत्पादन खर्च कमी होतो व तो जाड होतो.
🔆 बाइंडर किंवा रेझिन (Binders/Resins) :- हे पेंटमधील सर्वात महत्त्वाचे घटक आहेत, जे रंगद्रव्याचे कण एकत्र धरून ठेवतात व भिंतीवर घट्ट चिकटण्यास मदत करतात.
🔆 पाणी-आधारित (Latex) :- यामध्ये ॲक्रेलिक किंवा विनाईल रेझिन वापरले जाते.
🔆 तेल-आधारित (Oil-based) :- यामध्ये नैसर्गिक तेल किंवा सिंथेटिक अल्कीड्स वापरले जातात.
🔆 सॉल्व्हेंट किंवा द्रव (Solvents/Liquids) :- सॉल्व्हेंटमुळे पेंट द्रव स्वरूपात राहतो व भिंतीवर लावणे सोपे जाते. पेंट सुकल्यावर हे हवेत उडून जातात.
🔆 पाणी :- इमल्शन किंवा पाणी-आधारित पेंटमध्ये पाण्याचा वापर होतो.
🔆 थिनर/स्पिरिट :- तेल-आधारित पेंटमध्ये टर्पेंटाइन किंवा मिनरल स्पिरीट्स वापरले जातात.
🔆 ॲडिटीव्ह (Additives) :- पेंटची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे घटक अतिशय कमी प्रमाणात मिसळले जातात.
🔆 बुरशीरोधक (Biocides) :- भिंतीवर बुरशी येऊ नये म्हणून मिसळले जाते.
🔆 वाळण्याचे घटक (Driers) :- पेंट लवकर सुकण्यासाठी.
🔆 अँटी-स्पॅटर (Anti-spatter) :- पेंट लावताना तो उडू नये यासाठी.
पेंट हे विज्ञानाच्या दृष्टीने रसायनांचे एक जटिल मिश्रण असते. या रसायनांबद्दलच्या काही महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.
🔆 संश्लेषित रसायने (Synthetic Chemicals) :- अलीकडे वापरले जाणारे बहुतेक पेंट्स हे नैसर्गिक नसून, ते प्रयोगशाळेत किंवा कारखान्यात तयार केलेल्या रसायनांपासून बनवलेले असतात. त्यात ॲक्रेलिक (Acrylic) हे प्लास्टिक/पॉलिमर रसायन असते.
🔆 VOC (Volatile Organic Compounds) :- पेंट लावताना विशिष्ट वास येताे, तो पेंटमधील बाष्पशील सेंद्रिय संयुगांमुळे (VOCs) असतो. हे रासायनिक वायू हवेत मिसळतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात.
🔆 मेटल ऑक्साइड्स (Metal oxides) :- रंगासाठी वापरले जाणारे टायटॅनियम डायऑक्साइड किंवा आयर्न ऑक्साइड ही देखील अजैविक रासायनिक संयुगे आहेत.
पूर्वी पेंटमध्ये शिसे (Lead) हे घातक रसायन मोठ्या प्रमाणात वापरले जायचे, परंतु आता आरोग्याच्या कारणास्तव अनेक देशांमध्ये Lead-free किंवा कमी शिसे असलेल्या पेंटचा वापर बंधनकारक केला आहे.
♻️ विटा
इमारतींच्या बांधकामात माती, सिमेंट अथवा फ्लाय ॲशपासून तयार केलेल्या विटांचा वापर केला जाताे. बांधकाम ताेडताना या विटांचेे सूक्ष्म अवशेष धुलीकणांमध्ये रुपांतरीत हाेऊन हवेत मिसळतात. मातीच्या विटांमध्ये पाच नैसर्गिक घटक योग्य प्रमाणात वापरले जातात. या मिश्रणाला तांत्रिक भाषेत ब्रिक अर्थ (Brick Earth) म्हणतात.
📍 विटांमधील घटक
🔆 सिलिका (Silica) :- 50 ते 60 टक्के. हा विटेतील सर्वात मोठा घटक आहे. सिलिका विटेला तिचा ठराविक आकार राखण्यास मदत करते व विटा सुकताना त्यांना तडे (Cracking) जाण्यापासून वाचवते.
🔆 ॲल्युमिना (Alumina) :- 20 ते 30 टक्के. ॲल्युमिनामुळे मातीला मृदुता (Plasticity) मिळते. यामुळेच मातीला विटेच्या साच्यात सहज बसवता येते व हवा तसा आकार देता येतो. जास्त ॲल्युमिना झाल्यास विटा सुकताना आकसतात.
🔆 चुना (Lime) :- 5 टक्क्यांपेक्षा कमी. हा घटक सिलिकाला वितळण्यास मदत करतो, ज्यामुळे विटेचे सर्व कण एकमेकांना घट्ट चिकटतात व विटेला मजबुती मिळते.
🔆 आयर्न ऑक्साइड (Iron Oxide) :- 5 ते 6 टक्केे. विटांना त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण लाल रंग या घटकामुळे मिळतो तसेच, हे विटांना अधिक कडक बनवते.
🔆 मॅग्नेशिया (Magnesia) :- अल्प प्रमाणात. मॅग्नेशियामुळे विटेचा लाल रंग अधिक गडद होतो आणि विटांची झीज कमी होते. विटा भाजताना या सर्व रसायनांची एकमेकांशी प्रक्रिया होऊन एक अत्यंत टिकाऊ बांधकाम साहित्य तयार होते.
♻️ फ्लाय ॲश
औष्णिक वीज केंद्रांमध्ये (Thermal Power Plants) विजेची निर्मिती करण्यासाठी कोळसा वापरला जाताे. त्यामुळे वीज निर्मिती केंद्रांतून बाहेर पडणारी फ्लाय ॲश (Fly Ash) हा सूक्ष्म कणांचा एक प्रकार आहे. कोळसा जळल्यानंतर उरलेली ही राख रासायनिकदृष्ट्या अतिशय क्रियाशील असते.
📍 फ्लाय ॲशमधील घटक
✳️ मुख्य रासायनिक घटक (Major Components)
🔆 सिलिका (Silicon Dioxide) :- 40 ते 60 टक्के.
🔆 ॲल्युमिना (Aluminum Oxide) :- 20 ते 30 टक्के.
🔆 आयर्न ऑक्साइड (Ferric Oxide):- 4 ते 10 टक्के.
🔆 कॅल्शियम ऑक्साइड (Lime ) :- 5 ते 30 टक्के (कोळशाच्या प्रकारावर अवलंबून).
✳️ इतर दुय्यम घटक (Minor Components)
🔆 मॅग्नेशियम ऑक्साइड (Magnesium oxide) :- 1 ते 3 टक्के.
🔆 सल्फर ट्रायऑक्साइड (Sulfur trioxide) :- अल्प प्रमाणात.
🔆 पोटॅशियम आणि सोडियम ऑक्साइड (Potassium and sodium oxides) :- अत्यल्प प्रमाणात.
✳️ फ्लाय ॲशचे मुख्य प्रकार
केमिकल कंपोजिशननुसार फ्लाय ॲशचे दोन प्रकार पडतात.
🔆 Class F :- यामध्ये सिलिका, ॲल्युमिना आणि लोहाचे प्रमाण जास्त असते (70 टक्क्यांपेक्षा जास्त). ही प्रामुख्याने ‘अँथ्रासाइट’ (Anthracite) किंवा ‘बिटुमिनस’ (Bituminous) कोळशापासून मिळते.
🔆 Class C :- यामध्ये कॅल्शियम ऑक्साइड (चुना – Calcium oxide) चे प्रमाण जास्त असते. ही राख पाणी टाकल्यावर स्वतःहून कडक होण्याचे गुणधर्म (Cementitious properties) दर्शवते.
✳️ फ्लाय ॲशचा उपयोग (Benefits)
फ्लाय ॲश ही पर्यावरणासाठी घातक मानली जात असली तरी, रासायनिक गुणधर्मांमुळे तिचा वापर ‘कचऱ्यातून सोने’ या संकल्पनेप्रमाणे केला जातो.
🔆 फ्लाय ॲश विटा :- या विटा मातीच्या विटांपेक्षा हलक्या आणि मजबूत असतात.
सिमेंट :- सिमेंट उत्पादनामध्ये काही प्रमाणात फ्लाय ॲश मिसळल्याने सिमेंटचा खर्च कमी होतो व टिकाऊपणा वाढतो.
🔆 रस्ते बांधणी :- रस्त्यांच्या भरावासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
फ्लाय ॲशमध्ये काही प्रमाणात आर्सेनिक (Arsenic) व शिसे (Lead) हे जड धातू असतात. ज्यामुळे ती उघड्यावर साठवणे प्रदूषणाच्या दृष्टीने घातक ठरते.
♻️ मानवी आराेग्यावर हाेणारे परिणाम
या प्रदूषित हवेमुळे माणसांना सर्वाधिक फुफ्फुसांचे दीर्घकालीन व असाध्य आजार जडतात. भारतातील साधारणपणे 93 टक्के लोकसंख्या अशा भागात राहते, जिथे हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO – The World Health Organization) मानकांपेक्षा निकृष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, हवा प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात साधारणत: 42 लाख तर भारतात 16 ते 21 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. भारतात प्रदूषित हवेमुळे श्वसनाचे आजार जडलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण 17 ते 18 टक्के आहे. अलीकडे उत्तर भारतात श्वसन आजार रुग्णांच्या संख्येत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचे हाॅस्पिटलमधील रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट हाेते.
📍 फुफ्फुसांवर होणारे परिणाम (Respiratory Impacts)
🔆 दाह आणि सूज (Inflammation) :- हवेतील सूक्ष्म कण (PM2.5) आणि सिमेंटची धूळ फुफ्फुसांच्या शेवटच्या टोकापर्यंत (Alveoli) पोहोचतात. त्यामुळे फुफ्फुसांना सूज येते.
🔆 क्रॉनिक आजार :- दीर्घकाळ अशा हवेत राहिल्याने अस्थमा (Asthma), ब्रॉन्कायटिस आणि COPD (फुफ्फुसांचा जुनाट आजार) होण्याचा धोका वाढतो.
🔆 फायब्रोसिस (Fibrosis) :- सिमेंट किंवा फ्लाय ॲशमधील सिलिका श्वासातून गेल्याने फुफ्फुसांच्या ऊती (Tissues) कडक होतात, ज्यामुळे श्वास घेण्याची क्षमता कमी होते. याला ‘सिलिकोसिस’ (Silicosis) म्हणतात.
📍 इतर परिणाम
🔆 रक्ताभिसरण :- हवेतील कार्बन मोनोऑक्साइड (carbon monoxide) रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
🔆 कर्करोग (Cancer) :- पेंटमधील VOCs आणि फ्लाय ॲशमधील आर्सेनिक, कॅडमियम या जड धातूच्या दीर्घकाळ संपर्कात आल्यास फुफ्फुसांचा कर्करोग हाेता.
🔆 मेंदू आणि मज्जासंस्था :- पेंट आणि जुन्या इंधनातील शिसे (Lead) लहान मुलांच्या मानसिक वाढीवर आणि मेंदूवर वाईट परिणाम करते.
हृदयविकार व स्ट्रोकला देखील ही प्रदूषित हवा कारणीभूत ठरते.
♻️ काेणत्या घटकाचा कुणाला, काय त्रास होतो?
🔆 सूक्ष्म कण (PM2.5) :- फुफ्फुसांचा कर्करोग, अस्थमा (लहान मुले आणि वृद्ध आधी बळी पडतात.)
🔆 सल्फर/नायट्रोजन ऑक्साईड :- आम्ल पर्जन्य, श्वास कोंडणे (पक्षी आणि पाळीव प्राणी बळी पडतात.)
🔆 VOCs (पेंटमधील) :- डोकेदुखी, यकृताला इजा (पेंट कामगार आणि रहिवासी बळी पडतात.)
🔆 सिलिका (विटा/सिमेंट) :- सिलिकोसिस (फुफ्फुसांचे कडक होणे) (बांधकाम मजूर बळी पडतात.)
♻️ पशुपक्ष्यांवरील परिणाम
🔆 प्रजनन क्षमता :- पक्षांची श्वसनसंस्था मानवापेक्षा अधिक संवेदनशील असल्याने त्यांना या वायू प्रदूषणाचा फटका लवकर बसतो. हवेतील विषारी वायूंमुळे पक्ष्यांच्या अंड्यांचे कवच कमकुवत होते आणि त्यांची प्रजनन क्षमता घटते.
🔆 भटकंती :- हवेतील धुरामुळे (Smog) पक्ष्यांची दिशा ओळखण्याची क्षमता विस्कळीत होते.
🔆 अन्नसाखळी :- फ्लाय ॲशमधील जड धातू माती व पाण्यात मिसळल्याने ते गवत किंवा माशांच्या माध्यमातून प्राणी आणि पक्ष्यांच्या शरीरात जातात (Bio-accumulation). त्यामुळे त्यांची अन्नसाखळी विस्कळीत हाेते.
♻️ झाडांवर होणारा परिणाम
झाडे मानवाप्रमाणे स्वतःचा बचाव करू शकत नसल्याने किंवा त्यांना प्रतिबंधात्मक उपाययाेजना करता येत नसल्याने विटांची धूळ, सिमेंट, पेंटची रसायने आणि फ्लाय ॲश यासारख्या घटकांचा झाडांवर खूप गंभीर हाेताे.
🔆 पानांची श्वास कोंडणे (Stomatal Blockage) :- झाडांच्या पानांवर स्टोमेटा (Stomata) नावांची सूक्ष्म छिद्रे असतात ज्यातून ती श्वास घेतात. सिमेंट, विटांची धूळ आणि फ्लाय ॲशच्या सूक्ष्म कणांचा थर पानांवर जमा झाल्यास ती छिद्रे बंद होतात. त्यामुळे झाडांना कार्बन डायऑक्साइड घेता येत नाही. पर्यायाने त्यांचा श्वास कोंडतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Maharashtra Pollution Control Board) माहितीनुसार, औद्योगिक धुळीमुळे झाडांची वाढ 20-30 टक्क्यांनी कमी होते.
🔆 अन्न निर्मिती प्रक्रियेत अडथळा (Reduced Photosynthesis) :- पानांवर धुळीचा थर जमा झाल्यामुळे सूर्यप्रकाश पानांच्या आत पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्यांची प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) प्रक्रिया मंदावत असल्याने झाड पुरेसे अन्न तयार करू शकत नाही आणि ते हळूहळू कमकुवत होऊन वाळू लागते.
🔆 रासायनिक जळजळ (Chemical Burn) :- पेंटमधील रसायने (VOCs): पेंटमधील बाष्पशील रसायने हवेत मिसळतात, ज्यामुळे पानांच्या कडा जळतात (Leaf Scorch).
🔆 फ्लाय ॲशमधील अल्कली :- फ्लाय ॲशमध्ये कॅल्शियम आणि इतर अल्कधर्मी घटक असतात. जेव्हा ही राख पानांवर पडते आणि त्यावर दव किंवा पावसाचे पाणी येते, तेव्हा एक प्रकारचे रासायनिक द्रावण तयार होते जे पानांच्या पेशींना मारून टाकते.
🔆 मातीतील विषबाधा (Soil Contamination) :- विटा आणि फ्लाय ॲशमधील जड धातू (Lead, Arsenic, Cadmium) पावसामुळे मातीत मिसळतात. हे घटक मातीचा pH (सामू) बदलतात, ज्यामुळे झाडांच्या मुळांना पाणी आणि पोषक तत्वे शोषण्यात अडथळा येतो.
🔆 पुनरुत्पादनावर परिणाम :- प्रदूषणामुळे झाडांना कमी फुलधारणा हाेते. पानांवरील धुळीमुळे परागीकरण (Pollination) करणाऱ्या मधमाश्या आणि फुलपाखरे झाडांकडे आकर्षित होत नाहीत, ज्यामुळे फळधारणा कमी होते. थोडक्यात सांगायचे तर, हे सर्व घटक झाडांची वाढ खुंटवतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी करतात आणि शेवटी झाड अकाली मृत पावते.
©️ मातीतलं विज्ञान