Drought : दुष्काळ; संकटातून शाश्वततेकडे घेऊन जाणारी जिद्द हवी!
1 min read
Drought : दुष्काळ (Drought) ही केवळ निसर्गाची अवकृपा नसून, ते मानवी अस्तित्व आणि अर्थव्यवस्थेपुढील एक गंभीर आव्हान आहे. बदलत्या हवामानामुळे (Climate Change) दुष्काळाची वारंवारता आणि तीव्रता वाढत चालली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच प्रशासनाला दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळाची कारणे, संदर्भ अणि त्यातून जन्मलेली नवसंकल्पना मानवी जीवनावर दीर्घकालीन परिणाम करणारी ठरली आहे. दुष्काळावर मात करून शाश्वत संकल्पना राबविल्या तरच दुष्काळ पुन्हा परतला तरी घातक ठरत नाही.
📍 दुष्काळाची कारणे
दुष्काळाची प्रामुख्याने दोन कारणे असतात. नैसर्गिक आणि मानवनिर्मित. पावसाची अनिश्चितता आणि ‘एल-निनो’ (El-Nino) सारख्या जागतिक हवामान बदलांमुळे नैसर्गिक दुष्काळ ओढवतो. भूगर्भातील पाण्याचा अतिरेकी उपसा, जंगलतोड आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते, हा ‘मानवनिर्मित’ दुष्काळ आहे. नदी प्रदूषणाची समस्या दुष्काळात अधिक गंभीर होते. जेव्हा नद्यांचे पात्र कोरडे पडते, तेव्हा सांडपाण्यातील विषारी घटकांचे प्रमाण वाढते, ज्याचा थेट परिणाम आरोग्य आणि शेतीवर होतो.
स्वातंत्र्यानंतर भारताने आणि महाराष्ट्राने अनेक वेळा दुष्काळाचा सामना केला आहे. प्रत्येक वेळी शेतकरी, सरकार आणि समाज एकत्र आले आणि संकटातून बाहेर पडले. हा इतिहास आपल्याला धीर देतो. प्रत्येक वेळी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्याने देश सावरला.
🔆 1965-66 : देशात मोठी अन्नटंचाई निर्माण झाली होती. परदेशातून धान्य मागवावे लागत होते. तेव्हा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला. शेतकऱ्यांना सन्मान मिळाला आणि देशाने शेतीवर लक्ष केंद्रित केले.
🔆 1967-72 : इंदिरा गांधी, सी. सुब्रमण्यम आणि डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी मिळून ‘हरित क्रांती’ घडविण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. संकरित बियाणे आणि पाटबंधारे प्रकल्पांनी भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण केले.
🔆 1972 : महाराष्ट्रातील सर्वात भीषण दुष्काळ. वसंतराव नाईक यांनी ‘मागणाऱ्याला काम’ हे सूत्र मांडले. श्रमदानातून शेकडो मैल रस्ते व पाझर तलाव तयार झाले. रोजगार हमी योजना (EGS – Employment Guarantee Scheme) चा जन्म!
🔆 2005 : युपीए सरकारने EGS चे रूपांतर ‘मनरेगा’ (MGNREGA – Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act) मध्ये केले. ग्रामीण रोजगाराची ही योजना आजही कोट्यवधींचा आधार आहे.
🔆 2012-13 आणि 2015-16 : या दुष्काळावर मात करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरसाठी ‘जलदूत’ रेल्वे प्रशासकीय तत्परतेचे एक ऐतिहासिक उदाहरण ठरले.
📍 दुष्काळाशी लढण्याचे धाडस
इस्रायल, ऑस्ट्रेलिया, नामिबिया आणि सिंगापूर या देशांनी दुष्काळाशी लढण्याचे आदर्श वस्तुपाठ जगासमोर ठेवले आहेत.
🔆 इस्रायल : वाळवंटी भाग असूनही ठिबक सिंचन आणि सांडपाणी पुनर्वापराद्वारे 90 टक्के सांडपाणी पुन्हा शेतीसाठी वापरतो. जगाचा जलव्यवस्थापन गुरू.
🔆 ऑस्ट्रेलिया : मिलेनियम दुष्काळानंतर वॉटर ट्रेडिंग धोरण आखले. पाण्याला बाजारपेठेचे मूल्य देऊन कार्यक्षम वापर साधला.
🔆 नामिबिया : आफ्रिकेतील सर्वात कोरड्या देशांपैकी एक असूनही WindAid तंत्रज्ञानाने पवनऊर्जेतून पाणी शुद्धीकरण सुरू केले.
🔆 सिंगापूर : NEWater प्रकल्पाद्वारे सांडपाणी इतके शुद्ध करतात की ते थेट पिण्यायोग्य होते. पाण्याच्या पुनर्वापराचा आदर्श.
📍 कृषी कंपन्यांचे योगदान
दुष्काळाशी लढण्यात केवळ सरकारच नाही, तर कृषी निविष्ठा कंपन्याही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. बायर (Bayer) आणि सिंजेन्टा (Syngenta) या कंपन्यांनी दुष्काळरोधक बियाणे (Drought Tolerant Seeds) विकसित केली आहेत. Yara (नॉर्वे) ने Precision Nutrition तंत्रज्ञानाद्वारे पिकांची पाणी वापरण्याची कार्यक्षमता वाढवली. भारतात KRIBHCO सारख्या संस्थांच्या जैविक उत्पादनांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे.
📍 डिजिटल युगातील दुष्काळ व्यवस्थापन
आजच्या काळात दुष्काळाचा सामना करण्यासाठी केवळ श्रम पुरेसे नाहीत; तंत्रज्ञानाची जोड अपरिहार्य आहे.
🔆 उपग्रह देखरेख : पिकांची स्थिती व भूगर्भातील ओलावा याची रिअल-टाइम माहिती. दुष्काळपूर्व ‘अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ सक्रिय.
🔆 हवामान अंदाज : IBM Weather आणि Google च्या AI मॉडेल्समुळे हवामान अंदाज अधिक अचूक झाले आहेत.
🔆 ठिबक सिंचन : स्मार्ट सेन्सर्सच्या मदतीने पाण्याचा वापर 30 ते 50 टक्के कमी करता येतो. महाराष्ट्रात अनेक प्रयोग यशस्वी.
🔆 VAM व सेंद्रिय कर्ब : मायकाेरायझा (Mycorrhiza) आणि समुद्री शेवाळाच्या वापराने पिकांची मुळे खोलवर जाऊन पाण्याचा ताण सहन करतात.
🔆 जमिनीतील सेंद्रिय कर्ब (Soil Organic Carbon) जास्त असल्यास जमीन पावसाचे पाणी जास्त काळ धरून ठेवते. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे हा कर्ब झपाट्याने कमी होत आहे. हा दुष्काळाचा एक छुपा पण महत्त्वाचा घटक आहे.
दुष्काळ हे केवळ नैसर्गिक संकट नाही, तर ते मानवी नियोजनाची कसोटी पाहणारे संकट आहे. हरित क्रांतीच्या शास्त्रीजींच्या व्हिजनपासून ते आधुनिक काळातील जलयुक्त शिवारपर्यंत, भारताने नेहमीच जिद्दीने लढा दिला आहे. भविष्यात पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे, भूजल पुनर्भरण करणे, त्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे.