krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farmers Global Brand : शेतकऱ्यांचा मालकीचा जागतिक ब्रँड

1 min read

Farmers Global Brand : आज भारताच्या कोणत्याही फळ विक्रेत्याकडे आपण गेलो की, अनेक विदेशी फळे सर्रास मिळतात. प्रामुख्याने न्यूझीलंड आणि काही इतर देशांमध्ये पिकणारे पण नुकत्याच भारतात 5,400 हजार कोटींचे विक्री मूल्य गाठलेले चायनीज गुसबेरी (Chinese Gooseberry) म्हणजेच ‘किवी’ (Kiwi) फळ (Fruit) सध्या खूप जास्त चर्चेत आहे. जगातील बाजारात ‘किवी’ फळाचा वाढता ट्रेंड हा एक कॉर्पोरेट सहकाराचा यशस्वी प्रवास आहे, ज्याने शेतकऱ्यांना ‘मूल्य-साखळी’तील नफा खऱ्या अर्थाने मिळवून दिला. तो शेतकऱ्यांचा (Farmers) मालकीचा जागतिक ब्रँड (Global Brand) म्हणजे ‘झेस्प्री’ (Zespri). आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करार झाल्यामुळे न्यूझीलंडचे वैज्ञानिक किवी फळाची लागवड वाढवणार आहेत व त्यासाठी काम देखील सुरू केले आहे.

📍 आदर्श समन्वित प्रणाली
जागतिक कृषी क्षेत्रात काही मॉडेल्स अशी आहेत, जी केवळ उत्पादनापुरती मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण मूल्यसाखळीवर नियंत्रण ठेवत जागतिक ब्रँड निर्माण करतात. न्यूझीलंडमधील ‘झेस्प्री’ ही अशीच एक ‘कॉर्पोरेट सहकारी’ संस्था आहे, जी आज केवळ ‘किवी’ हे फळ विकणारी कंपनी नसून, शेतकरी, संशोधन, सप्लाय चेन, मार्केटिंग आणि ग्राहक यांना जोडणारी एक आदर्श समन्वित प्रणाली बनलेली आहे. झेस्प्रीचे विशेष वैशिष्ट्य ‘कॉर्पोरेटाइज्ड कोऑपरेटिव’ म्हणजे कॉर्पोरेट पद्धतीने चालवलेली सहकारी संस्था. आज संपूर्ण ‘शेतकऱ्यांच्या मालकीची’ संस्था असूनही आज जागतिक पातळीवर ‘किवी’ फळातील प्रीमियम ब्रँड म्हणून ओळखली जाते. झेस्प्रीने शेतकरी संघटन, पोस्ट-हार्वेस्ट व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण, ब्रँडिंग आणि सप्लाय चेन यांचा वापर करून जागतिक बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे याची ही स्टोरी.

📍 गुणवत्ता व विश्वासार्हता
झेस्प्रीचा जन्म न्यूझीलंडमधील ‘किवी’ फळ उत्पादकांच्या अडचणीतून निर्माण झाला. 1990 च्या दशकात किवी फळ उत्पादकांना जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा, किंमत अस्थिरता आणि गुणवत्ता समस्या यांचा सामना करावा लागत होता. त्या काळात प्रत्येक शेतकरी किंवा विक्री करणाऱ्या स्थानिक कंपनी स्वतंत्रपणे निर्यात करत होत्या, ज्यामुळे बाजारात एकसंघ ब्रँड तयार होत नव्हता. या सगळ्या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक ‘सिंगल-डेस्क मार्केटिंग’ मॉडेल स्वीकारले, ज्यातून झेस्प्रीची स्थापना झाली. या मॉडेलमध्ये सर्व शेतकरी आज आपला माल झेस्प्री मार्फतच विकतात, ज्यामुळे बाजारात एकसंघ गुणवत्ता, विश्वासार्हता आणि ब्रँड तयार झाला.

📍 मुख्य उद्देश मूल्य व मागणी
झेस्प्रीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ‘शेतकरी-मालकीची रचना’ आहे. ही संस्था पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मालकीची आहे आणि त्यामुळे कंपनीचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शेतकऱ्यांकडून घेतले जातात. यामुळे उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांचा सहभाग असतो. या मॉडेलमुळे शेतकऱ्यांना केवळ उत्पादनाचा पैसा मिळत नाही, तर संपूर्ण ‘मूल्यसाखळीतून मिळणारा नफा’ देखील त्यांना मिळतो. झेस्प्रीच्या योजनांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, कंपनीचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ‘मूल्य’ मिळवून देणे आणि त्यासाठी जागतिक ‘मागणी’ निर्माण करणे.

📍 ग्राहकांच्या गरजांनुसार वाणांची निर्मिती
झेस्प्रीने ‘किवी’ फळ उत्पादनाच्या बाबतीत अत्यंत उच्च दर्जाची ‘मानके’ तयार केलेली आहेत. शेतकऱ्यांसाठी ‘ग्रोवर स्टँडर्ड्स’ बनवून बाग व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, पर्यावरणीय काळजी आणि सिंचन प्रणाली विकसित करून प्रत्येक फळाचा आकार, चव, रंग, पोषणमूल्य आणि टिकाऊपणा यावर कठोर नियंत्रण ठेवले जाते. या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी कंपनीने ‘संशोधन’ आणि ‘नवकल्पना’ यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. उदाहरणार्थ; सन-गोल्ड, ग्रीन आणि रुबीरेड या विविध प्रकारातील नवीन संशोधित वाणांची निर्मिती ही ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजांनुसार केली आहे.

📍 ट्रेसेबिलिटीचा याेग्य वापर
पोस्ट-हार्वेस्ट (काढणी पश्चात) व्यवस्थापन हे झेस्प्रीच्या यशाचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. शेतातून फळ काढल्यानंतर त्याचे वर्गीकरण, ग्रेडिंग, पॅकिंग आणि साठवणूक या सर्व प्रक्रिया अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने केल्या जातात. प्रत्येक फळाला एक विशिष्ट ओळख दिली जाते, ज्यामुळे ते कोणत्या शेतातून आले आहे हे सहज ओळखता येते. ट्रेसेबिलिटी प्रणालीचा वापर करून झेस्प्रीने प्रत्येक किवी फळाच्या पॅकवर बारकोड लावण्याची प्रणाली विकसित केली आहे, ज्यामुळे फळाचा संपूर्ण प्रवास शेतापासून ग्राहकांपर्यंत ‘ट्रॅक’ करता येतो. ही प्रणाली केवळ गुणवत्ता नियंत्रणासाठीच नाही, तर उत्पादनाकरिता लोकांच्या मनात विश्वास तयार करणारी ठरली आहे.

📍 ग्लोबल सप्लाय माॅडेल
झेस्प्रीच्या ‘सप्लाय चेन’ व्यवस्थापनात एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘जागतिक पुरवठा मॉडेल’ आहे. ‘झेस्प्री ग्लोबल सप्लाय’ नामक अशी व्यवस्था तयार केली आहे की ज्यामुळे वर्षभर जगभरातील बाजारात किवी फळ उपलब्ध राहील. यासाठी न्यूझीलंडच्या हंगामाबरोबरच इटली, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स या इतर देशांतील शेतकरी वर्गाला सोबत घेऊन उत्पादन केले जाते. या मॉडेलमुळे 12 महिने 50 पेक्षा अधिक देशांमध्ये सतत पुरवठा ठेवता येतो, ज्यामुळे विक्रेते आणि ग्राहकांमध्ये विश्वास तर निर्माण झाला सोबत आज बाजारातील 33 टक्क्यांपेक्षा जास्त मार्केट शेअर आणि 55 टक्क्यांपेक्षा जास्त बाजारमूल्य आज झेस्प्रीकडे आहे.

📍 लॉजिस्टिकमध्ये धोरणात्मक बदल
झेस्प्रीने चीनमध्ये ‘किवी’ वितरणाचे ‘लॉजिस्टिक’ सुधारण्यासाठी धोरणात्मक बदल केले. 2016 मध्ये स्वतः आयातदार बनून मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी केले. 2017 पासून स्थानिक भागातील प्ल्येअरसोबत भागीदारीत आधुनिक प्रक्रिया, रायपनिंग आणि गुणवत्ता सुधारणेसाठी सेंटर उभा केले. चीनमधील दोन ठिकाणी बंदरावर भागीदारीत स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केल्यामुळे पुरवठ्याचा वेळ 4 ते 5 दिवसांवरून थेट 2.5 दिवसांपर्यंत कमी झाला. यामुळे पुरवठा साखळीवर पूर्ण नियंत्रण, कस्टमाईज पॅकेजिंग आणि उच्च दर्जाची गुणवत्ता सुनिश्चित झाली.

📍 पोषणमूल्यांवर आधारित मार्केटिंग
झेस्प्रीच्या यशामागे ‘एकात्मिक विपणन प्रणाली’ असून, कंपनीने आपल्या उत्पादनाला केवळ फळ म्हणून न पाहता आरोग्यासाठी ‘फायबर’ आणि ‘जीवनसत्व क’ यांचा चांगला स्रोत असल्याने ‘हेल्दी लाईफस्टाईल प्रॉडक्ट’ म्हणून बाजारात सादर केले. ग्राहकांमध्ये आरोग्याविषयी वाढती जागरूकता लक्षात घेऊन झेस्प्रीने आपल्या फळांच्या पोषणमूल्यांवर आधारित ‘मार्केटिंग’ केले आहे. कंपनीने वैज्ञानिक संशोधनावर आधारित ‘हेल्थ क्लेम्स’ विकसित केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांमध्ये जाहिराती, संशोधन पत्रिका याद्वारे विश्वास निर्माण केला. त्यामुळे या ‘ब्रँड’ची विश्वसनीयता प्रचंड वाढली आहे. जागतिक बाजारपेठेतील ‘बदलत्या ट्रेंड्स’चा विचार करून झेस्प्रीने आपली रणनीती सतत अद्ययावत ठेवली आहे. मध्यमवर्गीय लोकसंख्येची वाढ, आरोग्याविषयी जागरूकता आणि ई-कॉमर्सचा वाढता वापर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन झेस्प्रीने त्यादृष्टीने संधी निर्माण केल्या. त्याचबरोबर हवामान बदल, कामगारांची कमतरता आणि वाढती स्पर्धा ही काही प्रमुख आव्हाने आहेत, ज्यांचा सामना देखील कंपनीला करावा लागतो आहे, हे देखील त्यांनी नाकारले नाही.

📍 मागणी आधारित धोरण
झेस्प्रीच्या आर्थिक मॉडेलमध्ये ‘मागणी-आधारित धोरण’ हा एक महत्त्वाचा घटक आहे. कंपनी प्रथम बाजारात ‘मागणी’ निर्माण करते आणि त्यानंतर ‘उत्पादन’ वाढवते. यामुळे बाजारात जादा पुरवठा होण्याचा धोका कमी होतो आणि शेतकऱ्यांना चांगली ‘किंमत’ मिळते. कंपनीच्या अहवालानुसार, 2027 पर्यंत उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे, परंतु त्याच वेळी गुणवत्ता आणि मागणी यांचा समतोल राखण्यावर भर दिला जात आहे. झेस्प्रीचे संपूर्ण मॉडेल हे ‘संपूर्ण मूल्यसाखळीवरील नियंत्रण’ वर आधारित आहे. उत्पादन, पोस्ट-हार्वेस्ट, लॉजिस्टिक्स, मार्केटिंग आणि विक्री या सर्व टप्प्यांवर कंपनीचे नियंत्रण आहे. यामुळे गुणवत्ता, किंमत आणि ब्रँड यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येते. ही एका छताखाली चालणारी एकात्मिक पद्धतच झेस्प्रीला इतर स्पर्धकांपासून आज वेगळे ठरवत आहे.

📍 यशाचे गमक
झेस्प्रीचे यश हे केवळ चांगल्या उत्पादनामुळे नाही, तर एक सुसंगत प्रणालीमुळे आहे, जी शेतकरी, तंत्रज्ञान, संशोधन, सप्लाय चेन आणि मार्केटिंग यांना एकत्र आणते. शेतकरी संघटन, गुणवत्ता नियंत्रण, ट्रेसेबिलिटी, जागतिक पुरवठा साखळी आणि मजबूत ब्रँडिंग या सर्व घटकांचा योग्य समन्वय केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या मालकीचा जागतिक स्तरावर ‘प्रीमियम ब्रँड’ कृषी क्षेत्रातही निर्माण करता येतो, हे झेस्प्रीने सिद्ध करून दाखविले आहे.

©️ माझे सहकारी, इकोनॉमिस्ट अजित लाड यांनी केलेल्या विशेष संशोधनावर आधारित डेटावर हा लेख लिहला आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!