krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Natural Farming : नागपूर जिल्ह्यात ‘नैसर्गिक शेती’ची पायाभरणी

1 min read

Natural Farming : रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे खालावत चाललेला शेतजमिनीचा पाेत आणि त्यातून घटत असलेले शेतमालाचे उत्पादन व वाढता उत्पादन खर्च तसेच रसायनयुक्त शेतमालाचे मानवी आराेग्यावर हाेणारे दुष्परिणाम विचारात घेता नागपूर जिल्ह्यात ‘नैसर्गिक शेती’ (Natural Farming) ही संकल्पना रुजायला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानात (NMNF – The National Mission on Natural Farming) नागपूर जिल्ह्यातील 6,250 शेतकरी 2,500 हेक्टरमध्ये नैसर्गिक शेती करीत असून, विविध सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा – Agricultural Technology Management Agency) अंतर्गत राबविले जात आहे.

📍 अभियानाची पार्श्वभूमी
महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीला प्राेत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन आणि परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत अभियान राबविले जायचे. पुढे केंद्र सरकारने देशपातळीवर मार्च 2023-24 पासून राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात केली. या अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी ‘आत्मा’वर साेपविण्यात आली आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात 2,500 हेक्टरवर नैसर्गिक शेती केली जात असून, 6,250 शेतकरी त्यांच्या शेतात विविध सेंद्रिय शेतमालांचे उत्पादन करीत आहेत, अशी माहिती नागपूर आत्माच्या प्रकल्प संचालक डाॅ. अर्चना कडू यांनी दिली.

📍 शेतकरी गट
या अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यातील 6,250 शेतकऱ्यांचे एकूण 50 गट तयार केले आहेत. प्रत्येक गटात 125 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना संस्था तसेच गाव पातळीवर नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. या अभियानांतर्गत नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक घेण्यासाठी दरवर्षी चार हजार रुपये प्रोत्साहन निधी दिला जाताे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार शेतकरी गट स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, हे गट स्थापन झालेले आहेत. नरखेड व कामठी तालुक्यात प्रत्येकी तीन शेतकरी गटांचे लक्ष्य दिले आहे. योजनेचा प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्हाभर मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. सध्या या अभियानाला शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

📍 अभियानाचे स्वरूप
या अभियानांतर्गत शेतकरी गट तयार केले जातात. प्रत्येक गटातील प्रत्येक सदस्याला नैसर्गिक शेती कशी करायची, स्वत: जीवामृत, बीजामृत व इतर जैविक कृषी निविष्ठा कशा तयार करायच्या याचे आत्माच्यावतीने तज्ज्ञांकडून वेळाेवेळी प्रशिक्षण दिले जाते. जैविक निविष्ठा केंद्रांची उभारणी केली जाते. त्यासाठी संबंधित शेतकरी गटांना सरकारकडून प्रोत्साहनपर निधी दिला जाताे.

📍 कृषी सखी व त्यांची कार्ये
या अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यात सध्या 100 कृषी सखींची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व सखी कार्यरत आहेत. त्यांना सरकारकडून दरमाह पाच हजार रुपये मानधन दिले जाते. या सखी गावागावांमध्ये जाऊन नैसर्गिक शेतीचा प्रचार-प्रसार तसेच प्रबाेधन व नाेंदणी करतात. त्या शेतकऱ्यांना जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत आणि दशपर्णी अर्क यासारखी नैसर्गिक खते व कीटकनाशके कशी तयार करायची, याचे प्रात्यक्षिक करून दाखवितात. पिकांवरील विविध राेग व किडींचे नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थापन कसे करायचे याबाबत तांत्रिक सल्ला देतात.

📍 ‘क्लस्टर’वर भर
या अभियानात शेतीच्या ‘क्लस्टर’ (Cluster)वर विशेष भर दिला आहे. त्यासाठी शेतकरी गट तयार केले जातात. एक क्लस्टर किमान 50 एकर शेतीचा असताे. जैविक कृषी निविष्ठांच्या निर्मितीसाठी गाेशाळा एकत्रीकरण केले जाते. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीच्या नियमांचे पालन केले की नाही, याची तज्ज्ञांकडून वेळावेळी तपासणी केली जाते. या शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते.

या अभियानांतर्गत तीन शेतकरी गटांना मिळून दाेन जैविक निविष्ठा केंद्र स्थापन करण्यासाठी प्रतिकेंद्र एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात 11 जैविक निविष्ठा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीतून उत्पादित केलेल्या शेतमालाचे सेंद्रिय व नैसर्गिक शेती प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक हाेणार नाही, अशी माहिती नागपूर आत्माच्या संचालिका डाॅ. अर्चना कडू यांनी दिली.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!