Rising Temperatures & Agricultural Sector : वाढत्या तापमानाचे कृषिक्षेत्रावरील संकट
1 min read
Rising Temperatures & Agricultural Sector : यावर्षी एप्रिल महिन्यात महाराष्ट्राच्या अनेक भागांत 43 ते 45 अंश सेल्सिअस तापमान (Temperatures) नोंदवण्यात आले. हे केवळ उन्हाळ्याचे चटके नाहीत तर कृषी क्षेत्रासाठी (Agricultural Sector) गंभीर धोक्याची घंटा आहे. प्रशांत महासागरात तयार होत असलेले ‘सुपर अल निनो’ (Super El Nino) आणि जागतिक हवामान बदल मिळून एक भयावह चित्र उभे करत आहेत. या वर्षी पुन्हा 1997-98 आणि 2015-16 च्या दुष्काळी अनुभवांची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्या काळात मान्सून कमकुवत राहिला, दुष्काळाने थैमान घातले आणि कृषी उत्पादनात 20 ते 40 टक्क्यांनी घट झाली होती. आज त्यात जगभरात पसरलेल्या युद्धाच्या सावटाची भर पडल्याने कृषी क्षेत्रावरील संकट अधिकच गडद होत आहे.
🔳 मागील पाच वर्षांतील तापमान वाढीचा आलेख
गेल्या पाच वर्षांत (2020 ते 2025) तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे आकडेवारी सांगते. 2024 हे 1901 नंतरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले (+0.65° से), तर 2025 मध्ये सरासरी तापमानात +0.28° सेल्सीअसने वाढ नोंदली गेली. 2022 मध्ये ही वाढ +0.51° सेल्सीअस होती. 2009 आणि 2016 ही वर्षेही गेल्या शतकातील सर्वाधिक उष्ण पाच वर्षांत गणली जातात. सन 2000 नंतर तापमान वाढीचा वेग इतका आहे की, ती आता केवळ पर्यावरणाचा नव्हे, तर अर्थव्यवस्थेचा थेट प्रश्न बनली आहे.
📍 वर्ष – प्रमुख परिणाम
🔆 2024 – उष्णलाटा; 15-20 टक्के शेती नुकसान.
🔆 2025 – हजाराे हेक्टरमधील विविध पिके बाधित.
🔆 2022 – गहू उत्पादनात घट; तीव्र पाणीटंचाई.
🔆 2016 – 1,600 हून अधिक नागरिकांचा मृत्यू; व्यापक दुष्काळ.
🔆 2009 – कमकुवत मान्सून; बहुतांश पिकांचे मोठे नुकसान.
या प्रत्येक वर्षी शेतीपूरक व्यवसायांची आर्थिक घसरण झाली आणि मोठ्या प्रमाणात मजूर व कामगारांचे स्थलांतर घडले. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार हवामान बदलामुळे जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे 307 अब्ज डॉलरचे नुकसान होते.
🔳 कृषीपूरक व्यवसायांवर वाढत्या उष्णतेचा घाला
वाढते तापमान शेतीशी संलग्न असणाऱ्या सर्व व्यवसायांसाठी आता थेट धोका बनले आहे. विशेषतः डेअरी (Dairy), पोल्ट्री (Poultry), शेळीपालन (Goat Farming), मत्स्यपालन (Fisheries) आणि इतर पूरक उद्योगांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
📍 दुग्ध व्यवसाय
उष्णतेमुळे गायी-म्हशींमध्ये उष्माघाताचा धोका निर्माण होतो. चारा सेवनात 20 टक्क्यांहून अधिक घट होते आणि त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर दिसतो. दूध उत्पादनात 20 ते 35 टक्के घट होण्याची शक्यता असते. याशिवाय गुरांच्या प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे दीर्घकाळात जनावरांची संख्या कमी होते. 2022 आणि 2024 मध्ये महाराष्ट्रातील सहकारी दूध संघांना वाढत्या तापमानाने मोठा फटका बसला; त्यामुळे दूध प्रक्रिया उद्योगात लक्षणीय घट नोंदवण्यात आली.
📍 कुक्कुटपालन
कोंबड्या उष्णतेला अत्यंत संवेदनशील असतात. उष्णतेमुळे काेंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अंडी व मांस उत्पादनात किमान 25 टक्क्यांपर्यंत घट होते आणि मृत्यूदर वाढतो. उष्ण हवामानात कोंबड्यांमध्ये श्वसनाच्या समस्याही वाढतात. 2016 आणि 2024 मधील उष्णलाटांमध्ये विदर्भातील अनेक पोल्ट्री फार्म बंद पडले. उद्योग उभारण्यासाठी केलेली गुंतवणूक वसूल होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.
📍 शेळी-मेंढीपालन
उष्णतेच्या ताणाने बकऱ्यांची तहान-भूक मंदावते. त्याना चारा कमी मिळाल्याने त्यांचे वजन घटते आणि मांस उत्पादनात किमान 20 टक्के घट होते. त्यांच्या शरीराचे तापमान अतिरिक्त वाढल्यास मृत्यूही ओढवतो. लहान शेतकऱ्यांसाठी शेळीपालन हा कमी खर्चाचा व जोखमीचा छोटा व्यवसाय मानला जातो; परंतु हवामान बदलामुळे हीच ‘सुरक्षित’ गुंतवणूकही आता धोकादायक बनत आहे. 2022 मध्ये मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचे मृत्यू नोंदवले गेले.
📍 मत्स्यपालन
तापमान वाढल्यावर तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होते, ज्यामुळे माशांचा मृत्यू होतो. उष्णतेमुळे पाण्यातील जीवाणूंचे प्रमाण वाढते आणि माशांमध्ये रोगांचे प्रमाण वाढते. 2024 मध्ये महाराष्ट्रातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडले. याचा थेट परिणाम मासेमारी सहकारी संस्थांवर झाला; अनेक संस्था डबघाईस आल्या आणि मासेमाऱ्यांना रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागले.
📍 इतर पूरक उद्योग
मधमाशी पालन, रेशीम शेती, हळद, आले उत्पादन, फुलशेती या व्यवसायांनाही उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. मधमाशांच्या वसाहती विस्कळीत होतात, परागीकरणावर परिणाम होतो. रेशीम उत्पादनाला लागणाऱ्या तुतीच्या पानांची गुणवत्ता घटते. या साखळी परिणामांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न एकाच वेळी अनेक बाजूंनी धोक्यात येते.
📍 सरकारी धोरणाची दिशा आणि उणिवा
हवामानातील बदल कुणाच्या मर्जीने थांबणार नाही, हे खरे आहे. परंतु त्यासाठी नियोजन करणे आपल्या हातात आहे. दुर्दैवाने, सरकार पिकांच्या नुकसानीबाबत देखील आखडता हात घेते, तर कृषिसंलग्न व्यवसायांकडे तर अक्षम्य दुर्लक्ष होते. शेतकऱ्यांना पूरक व्यवसायात प्रोत्साहन देण्याचे धोरण कागदावर आहे, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी अत्यंत तोकडी आहे. हवामान अनुकूल पशुधन विमा, उष्णतारोधक गोठे उभारण्यासाठी अनुदान, तलाव खोलीकरण आणि थंड पाण्याच्या व्यवस्थापनासाठी सरकारी मदत या गोष्टी आजही मागण्यांच्या यादीतच आहेत.