krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Agriculture to Service Sector : भारतीय अर्थव्यवस्थेचा बदलता चेहरा; कृषिपासून सेवाक्षेत्राकडे वाटचाल

1 min read

Agriculture to Service Sector : भारताची अर्थव्यवस्था ही गेल्या काही दशकांत आमूलाग्र बदलांच्या प्रक्रियेतून गेलेली आहे. या परिवर्तनाचा सर्वाधिक ठसा जर कुठे उमटला असेल, तर तो कृषी (Agriculture) आणि सेवा क्षेत्र (Service Sector) यांच्यातील बदलांमध्ये दिसून येतो. एकेकाळी कृषिप्रधान म्हणून ओळखला जाणारा भारत आज सेवाक्षेत्राच्या बळावर वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. तथापि; या बदलाची दिशा, गती आणि त्यातून निर्माण झालेली असमतोल परिस्थिती यांचा विचार करणे अत्यंत आवश्यक ठरते.

🔲 स्वातंत्र्यानंतर प्रारंभीचा काळ
स्वातंत्र्यानंतर प्रारंभीच्या काळात भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिवर आधारित होती. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP – Gross Domestic Product) कृषिक्षेत्राचा वाटा सुमारे 50 ते 55 टक्के होता आणि देशातील सुमारे 70 टक्के लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून होती. ग्रामीण भाग हा आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू होता. शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नव्हते, तर ती संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धतीशी निगडित होती. परंतु, काळाच्या ओघात औद्योगिकीकरण, शहरीकरण, शिक्षणाचा प्रसार आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे अर्थव्यवस्थेची रचना बदलू लागली.

🔲 आर्थिक उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण
विशेषतः 1991 नंतरच्या आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणांमुळे सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळाली. माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, विमा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, दूरसंचार, ई-कॉमर्स आणि वाहतूक या क्षेत्रांनी झपाट्याने विस्तार केला. परिणामी, 2023-24 च्या सुमारास कृषिक्षेत्राचा GDP मधील वाटा सुमारे 15 ते 18 टक्क्यांपर्यंत कमी झाला, तर सेवाक्षेत्राचा वाटा 55 ते 60 टक्क्यांपर्यंत वाढला. मात्र, या बदलात एक गंभीर विसंगती प्रकर्षाने जाणवते. उत्पादनातील वाटा कमी होत असतानाही अजूनही सुमारे 42 ते 45 टक्के लोकसंख्या कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. याचा अर्थ असा की, देशातील मोठा लोकवर्ग कमी उत्पादकता आणि कमी उत्पन्न असलेल्या क्षेत्रात अडकलेला आहे. ही स्थिती आर्थिक असमानता वाढवते आणि ग्रामीण-शहरी दरी अधिक तीव्र करते. त्यामुळे या बदलाचे स्वरूप केवळ प्रगतीचे प्रतीक नसून, तो एक संतुलन साधण्याचा प्रश्नही आहे.

🔲 हरित क्रांती एक महत्त्वाचा टप्पा
कृषिक्षेत्रातील परिवर्तनाचा विचार केला असता, हरित क्रांती हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरतो. 1960-70 च्या दशकात सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आणि सिंचन सुविधांचा वापर वाढल्यामुळे अन्नधान्य उत्पादनात अभूतपूर्व वाढ झाली. 1950 च्या सुमारास सुमारे 50 दशलक्ष टन असलेले अन्नधान्य उत्पादन 2022-23 मध्ये 315 दशलक्ष टनांपेक्षा अधिक झाले. या वाढीमुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आणि जागतिक स्तरावर एक प्रमुख उत्पादक देश म्हणून उदयास आला. तथापि; या प्रगतीसोबत अनेक समस्या देखील निर्माण झाल्या. भारतातील मोठा भाग अजूनही पावसावर अवलंबून असल्यामुळे शेती हवामानाच्या अनिश्चिततेच्या जोखमीखाली आहे. हवामान बदलामुळे दुष्काळ, पूर, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तींची वारंवारता आणि तीव्रता वाढली आहे. याशिवाय, मातीची सुपीकता कमी होणे, भूजल पातळी घटणे आणि रासायनिक खतांचा अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न तुलनेने कमी असल्यामुळे त्यांच्या जीवनमानावर आणि आर्थिक सुरक्षिततेवर परिणाम होतो. अनेक शेतकरी कर्जबाजारीपणाच्या समस्येला सामोरे जात आहेत.

🔲 सेवाक्षेत्र, राेजगार संधी व शहरीकरण
दुसऱ्या बाजूला, सेवाक्षेत्राने भारताच्या आर्थिक विकासाला नवे परिमाण दिले आहे. विशेषतः माहिती तंत्रज्ञान आणि ITES (Information Technology Enabled Services) क्षेत्रामुळे भारताला जागतिक पातळीवर महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. या क्षेत्राने केवळ देशाच्या GDP मध्ये मोठे योगदान दिले नाही, तर लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सेवा क्षेत्राचा वाढीचा दर कृषी क्षेत्राच्या तुलनेत अधिक असल्यामुळे आणि या क्षेत्रात मिळणारे वेतन जास्त असल्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. शहरांमध्ये रोजगार, शिक्षण आणि आधुनिक सुविधांची उपलब्धता अधिक असल्यामुळे लोक तेथे स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात. या प्रक्रियेमुळे शहरीकरणाला वेग आला आहे. परंतु, त्याचवेळी शहरांवर लोकसंख्येचा ताण वाढला आहे. झोपडपट्ट्यांची वाढ, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि पायाभूत सुविधांवरील दबाव यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. या आर्थिक बदलाचे सामाजिक परिणामही लक्षणीय आहेत. सेवाक्षेत्राच्या वाढीमुळे मध्यमवर्गाचा विस्तार झाला आहे, जीवनमान उंचावले आहे आणि शिक्षण व कौशल्य विकासाला चालना मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे समाज अधिक गतिमान झाला आहे. परंतु, या बदलामुळे पारंपरिक ग्रामीण मूल्ये, जीवनशैली आणि शेतीशी निगडित संस्कृती हळूहळू कमी होत आहेत. कुटुंबव्यवस्थेत बदल होऊन लहान कुटुंबांची संख्या वाढत आहे.

🔲 अन्नसुरक्षा महत्त्वाची
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशासाठी अन्नसुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सेवाक्षेत्राचा विकास होत असताना कृषिक्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ नये, ही काळाची गरज आहे. कारण अन्नधान्याची गरज सतत वाढत आहे. जर कृषिक्षेत्राची उत्पादकता आणि शाश्वतता टिकवली नाही, तर भविष्यात अन्नटंचाई निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर संतुलित आणि सर्वसमावेशक विकास अत्यावश्यक ठरतो. कृषिक्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक उत्पादनक्षम आणि नफ्याचे बनवणे गरजेचे आहे. यांत्रिकीकरण, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर-आधारित सिंचन आणि जलसंधारण यासारख्या उपाययोजना शेतीची कार्यक्षमता वाढवू शकतात. त्याचबरोबर, मूल्यवर्धन, अन्न प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज आणि बाजारपेठेची साखळी मजबूत करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव, पीक विमा, कर्जसुविधा आणि सरकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कृषिक्षेत्रात उद्योजकतेला चालना देण्यासाठी अ‍ॅग्री-स्टार्टअप्स, सेंद्रिय शेती आणि कृषी पर्यटन यासारख्या नव्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे तरुण वर्ग शेतीकडे आकर्षित होईल.

🔲 या उपाययाेजना आवश्यक
सेवाक्षेत्राचा विकास अधिक सर्वसमावेशक करण्यासाठी त्याचा विस्तार ग्रामीण भागात करणे गरजेचे आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करता येऊ शकते. ग्रामीण BPO (usiness Process Outsourcing), डिजिटल सेवा केंद्रे, ऑनलाइन शिक्षण आणि टेलिमेडिसिन यासारख्या सुविधा ग्रामीण भागातील लोकांना नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकतात. शिक्षण आणि कौशल्य विकास हे या परिवर्तनाचे केंद्रबिंदू आहेत. बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार तरुणांना आवश्यक कौशल्ये देण्यासाठी शिक्षण पद्धतीत सुधारणा करणे आवश्यक आहे. तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य दिल्यास रोजगारक्षम मनुष्यबळ तयार होईल. याशिवाय, ग्रामीण आणि शहरी भागातील दरी कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. चांगले रस्ते, वीजपुरवठा, इंटरनेट सुविधा, आरोग्य सेवा आणि शिक्षण व्यवस्था ग्रामीण भागात उपलब्ध झाल्यास तेथील जीवनमान सुधारेल आणि स्थलांतराचे प्रमाण कमी होईल. पर्यावरण संरक्षण हाही या विकासाचा अविभाज्य भाग आहे. रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, मातीचे आरोग्य जपणे आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब केल्यास दीर्घकालीन उत्पादनक्षमता टिकवून ठेवता येईल. शेवटी, कृषिक्षेत्र आणि सेवाक्षेत्र यामधील बदल हा भारताच्या आर्थिक विकासाचा एक नैसर्गिक आणि अपरिहार्य टप्पा आहे. सेवा क्षेत्र देशाच्या प्रगतीला गती देत असले तरी कृषिक्षेत्राचे महत्त्व अजूनही तितकेच अधोरेखित राहते. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांमध्ये संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. योग्य धोरणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन यांच्या साहाय्याने भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत, शाश्वत आणि सर्वांसाठी समृद्ध करणारी बनू शकते.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!