NCDEX Equity Sector : एनसीडीईएक्सचे इक्विटी क्षेत्रात पदार्पण, एनडीईएक्स, फिनडेक्स निर्देशांकांचा आरंभ
1 min read
NCDEX Equity Sector : भारतातील आघाडीच्या स्टॉक एक्स्चेंजेसपैकी (Stock Exchanges) एक असलेल्या एनसीडीईएक्स लिमिटेडने (पूर्वीचे नाव नॅशनल कमोडिटीज अँड डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंज लिमिटेड – NCDEX – National Commodities and Derivatives Exchange Limited) एनडीईएक्स (NDEX) आणि फिनडेक्स (FINNDEX) या दोन नियमाधारित निर्देशांक सादर करताना इक्विटी (Equity) आणि इक्विटी डेरिव्हेटिव्हज (Equity Derivatives) बाजारात पदार्पण केले आहे. ही सुरुवात म्हणजे एनसीडीईएक्सच्या एका व्यापक बाजार-पायाभूत सुविधा पुरवठादार म्हणून विकसित होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. शेअर्सची निवड आणि त्यांचे भारांकन (वेटेज) निश्चित करण्यासाठी मल्टी-फॅक्टर दृष्टिकोनाची रचना करण्यात आली आहे. या निर्देशांकांसाठी फ्री-फ्लोट बाजार भांडवलीकरण – Market Capitalisation (30%), सरासरी दैनिक व्यवहार मूल्य (30%), बीटा -Beta (20%) आणि अस्थिरता – Volatility (20%) यांचा समावेश असलेला एक संयुक्त स्कोअर वापरला जातो. ही कार्यपद्धती निर्देशांक रचनेच्या एका संरचित चौकटीत कंपनीचा आकार, ट्रेडिंगमधील सक्रियता आणि बाजाराप्रती शेअर्सची संवेदनशीलता यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. अंतिम घटकांचे वेटेज हे फ्री फ्लोट बाजार भांडवलाचे वेटेज आणि संयुक्त स्कोअरचे वेटेज यांचे समान मिश्रण असून, प्रत्येक फेररचनेदरम्यान (Rebalancing) कोणत्याही एका शेअरचे कमाल वजन 15% पर्यंत मर्यादित ठेवले आहे.
एनडीईएक्स (NDEX) हा आघाडीच्या सूचिबद्ध कंपन्यांच्या कामगिरीचा मागोवा घेण्यासाठी तयार केलेला एक बेंचमार्क निर्देशांक असून, यामध्ये एनएसई (NSE) वर सूचिबद्ध असलेल्या अव्वल 60 कंपन्यांमधून निवडलेल्या 20 मोठ्या आणि तरल (liquid) भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. फिनडेक्स (FINNDEX) मध्ये पात्र अशा अव्वल 40 कंपन्यांमधून निवडलेल्या वित्तीय क्षेत्रातील 15 शेअर्सचा (विमा कंपन्या वगळून) समावेश आहे. दोन्ही निर्देशांकांमधील घटक हे एका संयुक्त स्कोअरिंग फ्रेमवर्कच्या आधारे निवडले जातात, ज्यामध्ये फ्री फ्लोट बाजार भांडवल (Market Capitalisation), तरलता – लिक्विडिटी (Liquidity), बीटा (Beta) आणि अस्थिरता (Volatility) यांसारख्या महत्त्वाच्या निकषांचे मूल्यांकन केले जाते; ज्यामुळे त्यांच्या संबंधित क्षेत्रातून अत्यंत तरल आणि मूलभूतदृष्ट्या मजबूत शेअर्सचे प्रतिनिधित्व सुनिश्चित होते. या निर्देशांकांची मालकी एनसीडीईएक्स लिमिटेड (NCDEX) यांच्याकडे असून, त्यांचे मोजमाप व देखभाल एनएसई इंडायसेस लिमिटेड (NSE Indices Ltd.) द्वारे केली जाईल. दरवर्षी मार्च आणि सप्टेंबरमध्ये या निर्देशांकांचा अर्धवार्षिक आढावा घेऊन पुनर्संतुलन केले जाईल; तसेच विशिष्ट परिस्थितींमध्ये गरजेनुसार फेरबदल करण्याची तरतूदही आहे. दोन्ही निर्देशांकांमधील प्रत्येक शेअरची मर्यादा 15% पर्यंत मर्यादित ठेवली आहे, ज्यामुळे वैविध्य (डायव्हर्सिफिकेशन) वाढून एकाच नावावरील एकाग्रतेची जोखीम (कन्सन्ट्रेशन रिस्क) कमी होते. दोन्ही निर्देशांकांसाठी आधार महिना जानेवारी 2010 असून, त्याचे आधारभूत मूल्य (Base Value) 10,000 आहे. बाजार सुरू असतानाच्या वेळेत निर्देशांकाचे मूल्य एनसीडीईएक्सचे डेटा फीड, वेबसाइट आणि नियत कालावधीच्या फॅक्टशीटद्वारे रिअल टाईममध्ये मोजले व प्रसारित केले जाईल. एनडीईएक्स (NDEX) आणि फिनडेक्स (FINNDEX) हे दोन्ही एकत्रितपणे अनुक्रमे भांडवली बाजार आणि वित्तीय क्षेत्राच्या कामगिरीचे एक मजबूत व प्रातिनिधिक मोजमापाचे साधन उपलब्ध करून देतात.
या घोषणेवर बोलताना एनसीडीईएक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) विकास गोयल म्हणाले, ‘एनडीईएक्स (NDEX) आणि फिनडेक्स (FINNDEX) ची सुरुवात हा एनसीडीईएक्सच्या बहु-क्षेत्रीय (मल्टी-सेगमेंट) एक्स्चेंजमध्ये रूपांतरित होण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्हज क्षेत्रात आमचा झालेला हा विस्तार म्हणजे भारताच्या वित्तीय परिसंस्थेच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारी एक व्यापक बाजार संस्था उभारण्याच्या आमच्या दूरदृष्टीचाच एक भाग आहे. भारतीय भांडवली बाजार अधिक खोलवर जात असताना आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सहभाग वाढवत असताना, पारदर्शक आणि उत्तम रचना केलेले बेंचमार्क अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. या निर्देशांकांच्या माध्यमातून, माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णयांना पाठबळ देणाऱ्या, बाजार घटकांसाठी उपलब्ध असलेल्या साधनांची व्याप्ती वाढवणाऱ्या आणि जागतिक भांडवलासाठी एक महत्त्वाचे गंतव्यस्थान म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट करणाऱ्या बाजार पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’
एनसीडीईएक्सच्या इक्विटी बिझनेसचे प्रमुख तोजो बॅनर्जी म्हणाले, ‘एनडीईएक्स (NDEX) आणि फिनडेक्स (FINNDEX) हे केवळ बाजार भांडवलाच्या पलीकडे जाऊन निर्देशांक निर्मितीचा एक वेगळा दृष्टिकोन मांडतात. भारताच्या इक्विटी क्षेत्राचा अधिक सूक्ष्म दृष्टिकोन देणारे, केवळ कंपन्यांचा आकारच नव्हे तर त्यांच्या बाजारातील वर्तनावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक प्रतिबिंबित करणारे बेंचमार्क तयार करणे हा आमचा मुख्य हेतू आहे. फिनडेक्स (FINNDEX) हे भारताच्या वित्तीय परिसंस्थेतील वाढत्या वैविध्याची दखल घेते, जे केवळ पारंपरिक बँकिंगपुरते मर्यादित न राहता विस्तारणारे भांडवली बाजार, एनबीएफसी (NBFC) आणि फिनटेक क्षेत्रांचाही समावेश करते. दुसरीकडे, एनडीईएक्स (NDEX) हे मोठ्या आणि तरल भारतीय शेअर्ससाठी बेंचमार्क म्हणून काम करते. आमचा असा विश्वास आहे की हे निर्देशांक गुंतवणूकदार, बाजार घटक आणि संशोधकांसाठी भारताच्या विकसित होत असलेल्या वाढीच्या कथेचे मूल्यांकन करताना उपयुक्त संदर्भ ठरू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.’