Pareto Principle and Indian Agriculture : पॅरेटो नियम आणि भारतीय शेती
1 min read
Pareto Principle and Indian Agriculture : भारतीय शेतीविषयी (Indian Agriculture) बोलताना आपण बहुधा दोन गोष्टी गृहीत धरतो. पहिली म्हणजे शेतकरी (Farmer) हा अथक परिश्रम करणारा माणूस आहे आणि दुसरी म्हणजे अधिक मेहनत म्हणजे अधिक यश. आपल्या सांस्कृतिक जाणिवांमध्येही या विचाराला मोठे स्थान आहे. पहाटेच्या अंधारात घराबाहेर पडणारा, उन्हातान्हात राबणारा, पावसाच्या प्रत्येक सरीकडे आशेने पाहणारा आणि रात्री उशिरापर्यंत बाजारभाव तपासणारा शेतकरी ही प्रतिमा आपल्याला परिचित आहे. परंतु, गेल्या काही दशकांतील कृषी वास्तवाकडे पाहिले, तर एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. जर मेहनतच यशाची हमी असती, तर जगातील सर्वात समर्पित शेतकरी मानला जाणारा भारतीय शेतकरी आजही आर्थिक असुरक्षिततेशी झुंज का देत आहे? उत्पादन वाढत आहे, तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे, सरकारी योजना राबवल्या जात आहेत, पण शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न अपेक्षित वेगाने का वाढत नाही? कदाचित या प्रश्नाचे उत्तर अधिक श्रमांत नाही, तर अधिक परिणामकारक श्रमांत दडलेले आहे. आणि याच ठिकाणी व्यवस्थापनशास्त्रातील एक प्रभावी सिद्धांत भारतीय शेतीसमोर येतो तो म्हणजे पॅरेटो नियम (Pareto Principle).
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीचे अर्थशास्त्रज्ञ (Economist) विल्फ्रेडो पॅरेटो (Wilfredo Pareto) यांनी एक निरीक्षण नोंदवले. त्यांच्या लक्षात आले की इटलीतील सुमारे 20 टक्के लोकांकडे देशातील 80 टक्के संपत्ती केंद्रित आहे. नंतर जगभरातील संशोधकांनी विविध क्षेत्रांचा अभ्यास केला असता असे दिसून आले की, हे प्रमाण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात दिसते. एखाद्या उद्योगातील 20 टक्के ग्राहक 80 टक्के महसूल निर्माण करतात, एखाद्या कंपनीतील 20 टक्के उत्पादने 80 टक्का नफा देतात, तर अनेक वेळा 20 टक्के कारणांमुळे 80 टक्के समस्या निर्माण होतात. यालाच पुढे ‘80/20 नियम’ असे नाव मिळाले. हा कोणताही गणिती नियम नाही; तो व्यवस्थापनाचा दृष्टिकोन आहे. सर्व घटक समान प्रभाव निर्माण करत नाहीत. काही मोजके घटकच बहुतेक परिणाम घडवतात.
भारतीय शेतीच्या संदर्भात हा विचार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण आपली कृषी व्यवस्था अनेकदा ‘सर्व काही महत्त्वाचे आहे’ या मानसिकतेने चालते. शेतकरी एकाच वेळी बियाणे, खते, औषधे, मजूर, पाणी, बाजार, वाहतूक, सरकारी योजना, कर्ज आणि हवामान अशा असंख्य गोष्टी हाताळत असतो. परंतु, या सर्वांपैकी काही मोजक्या निर्णयांचा त्याच्या अंतिम उत्पन्नावर सर्वाधिक प्रभाव असतो. प्रश्न असा आहे की त्या निर्णायक गोष्टी कोणत्या?
महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांचे उदाहरण घेऊ; द्राक्षबागेत वर्षभर अनेक कामे केली जातात. पण अनुभवी उत्पादक आणि तज्ज्ञ सांगतात की, योग्य छाटणी, फुलोरा, पाणी व्यवस्थापन आणि बाजारपेठेच्या अपेक्षांनुसार दर्जा राखणे या काही निर्णयांवरच संपूर्ण हंगामाचे यश अवलंबून असते. वर्षभरातील प्रत्येक काम आवश्यक असते; पण सर्व कामांचे परिणाम समान नसतात. काही निर्णयांचा प्रभाव इतका मोठा असतो की, ते संपूर्ण अर्थकारण बदलू शकतात. यालाच पॅरेटो नियमाची कृषी आवृत्ती म्हणता येईल.
ऊस शेतीतही हेच दिसते. अनेक शेतकरी खतांवर आणि फवारण्यांवर हजारो रुपये खर्च करतात. पण लागवडीपूर्वी माती परीक्षण केले गेले नाही, योग्य बियाणे किंवा रोपे निवडले गेले नाही किंवा सुरुवातीच्या टप्प्यात पाणी व्यवस्थापन चुकले, तर पुढील सर्व खर्चाचा परिणाम मर्यादित राहतो. म्हणजेच शेतीतील सुरुवातीचे काही निर्णय संपूर्ण हंगामाचे भविष्य ठरवतात. जणू पहिल्या काही चालींवर संपूर्ण डावाचे यश अवलंबून असते.
भारतीय शेतीची एक मोठी समस्या म्हणजे आपण अनेकदा लक्षणांवर उपचार करतो, कारणांवर नाही. उदाहरणार्थ, उत्पादन घटले की अधिक खतांचा विचार केला जातो. कीड आली की अधिक फवारणी केली जाते. बाजारभाव कमी झाला की अनुदानाची मागणी केली जाते. पण पॅरेटो नियम आपल्याला विचारायला भाग पाडतो या समस्यांच्या मुळाशी असलेली ती काही निर्णायक कारणे कोणती? अनेक वेळा उत्पादन घटण्यामागे एक-दोनच प्रमुख कारणे असतात. चुकीचे वाण, अयोग्य सिंचन, अन्नद्रव्याचे अयोग्य व्यवस्थापन. जर ती कारणे शोधली, तर मोठा बदल घडवता येतो.
पाण्याच्या प्रश्नाकडे पाहिले तरी हेच दिसते. भारत जगातील सर्वाधिक भूजल वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. अनेक भागांत पाणीटंचाई गंभीर होत चालली आहे. तरीही अनेक शेतकरी पाण्याचा वापर पारंपरिक पद्धतीने करतात. संशोधन सांगते की पिकांच्या काही विशिष्ट वाढीच्या अवस्था अत्यंत संवेदनशील असतात. त्या वेळी योग्य प्रमाणात पाणी दिल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. उलट इतर काळात अधिक पाणी दिल्याने फारसा फायदा होत नाही. म्हणजेच संपूर्ण हंगामातील काही महत्त्वाच्या दिवसांवर घेतलेले निर्णय उत्पादनाचा मोठा भाग ठरवतात.
भारतीय कृषी अर्थकारणातही पॅरेटो नियम स्पष्ट दिसतो. अनेक शेतकरी विविध पिके घेतात; पण त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग दोन-तीन प्रमुख पिकांतून येत असतो. काही ग्राहक किंवा काही विक्री चॅनेल त्यांच्या व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. निर्यात, प्रक्रिया उद्योग किंवा थेट ग्राहक विक्री यासारख्या काही पर्यायांमुळे उत्पन्नात मोठी वाढ होते. पण आपण अनेकदा शेतकरी या कोणत्याच घटकावर काम करत नाही त्यामुळे नफ्यातील गळती वाढते.
डिजिटल युगात तर पॅरेटो नियम अधिकच महत्त्वाचा झाला आहे. आज माहितीचा अभाव नाही; उलट माहितीचा अतिरेक आहे. सोशल मीडियावर हजारो कृषी क्षेत्राबाबत व्हिडिओ उपलब्ध आहेत. दररोज शेकडो सल्ले दिले जातात. पण प्रत्यक्षात काही निवडक माहितीच शेतकऱ्यांच्या निर्णय प्रक्रियेला प्रभावित करते. अनेक कृषी संस्थांचा अनुभव असा आहे की त्यांच्या काही मोजक्या विषयांवरील सामग्रीला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो. याचा अर्थ असा नाही की उर्वरित माहिती निरुपयोगी आहे; पण सर्व माहितीचा प्रभाव समान नसतो.
यशस्वी शेतकऱ्यांकडे बारकाईने पाहिले तर त्यांच्यात एक समान धागा दिसतो. ते सर्व कामे स्वतः करत नाहीत; ते सर्वाधिक परिणाम देणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करतात. ते प्रत्येक तंत्रज्ञान स्वीकारत नाहीत; तर त्यांच्या परिस्थितीत सर्वाधिक मूल्य निर्माण करणारे तंत्रज्ञान स्वीकारतात आणि सर्वाधिक फायदेशीर बाजारपेठ ओळखतात. ते सर्व समस्यांवर एकाच वेळी झडप घालत नाहीत; तर सर्वाधिक नुकसान करणाऱ्या समस्यांना प्राधान्य देतात आणि पहिल्या त्या सोडवतात. याच कारणामुळे आताच्या काळात ‘स्मार्ट फार्मिंग’ ही संकल्पना लोकप्रिय होत आहे. स्मार्ट फार्मिंग म्हणजे केवळ ड्रोन किंवा सेन्सर वापरणे नव्हे. ती म्हणजे निर्णयांचे प्राधान्यक्रम ठरवण्याची क्षमता. आपल्या शेतातील सर्वाधिक महत्त्वाचे निर्देशक कोणते आहेत, हे ओळखणे. कोणते खर्च नफा वाढवतात आणि कोणते फक्त खर्च वाढवतात, हे समजून घेणे. कोणत्या क्रियांवर लक्ष दिल्यास सर्वाधिक परिणाम मिळतील, याचा सतत शोध घेणे.
पॅरेटो नियमाचा एक सामाजिक पैलूही आहे. भारतातील अनेक कृषी परिवर्तनांच्या कथा पाहिल्या, तर त्यामागे काही मोजके शेतकरी दिसून येतात. एखाद्या गावातील बोटावर मोजण्याइतके प्रगत शेतकरी नवीन तंत्रज्ञान स्वीकारतात. त्यांचे परिणाम पाहून इतर शेतकरी प्रेरित होतात. ज्ञानाचा प्रसार अशाच पद्धतीने घडतो. परिवर्तन अनेकदा सर्वांकडून एकाच वेळी सुरू होत नाही; ते काही मोजक्या लोकांकडून सुरू होऊन हळूहळू समाजभर पसरते. मात्र, पॅरेटो नियमाचा अर्थ चुकीचा लावण्याचा धोका आहे. याचा अर्थ असा नाही की उर्वरित 80 टक्के कामे निरुपयोगी आहेत. शेती ही कारखाना नाही. ती निसर्गाशी संवाद साधणारा व्यवसाय आहे. प्रत्येक कामाचे महत्त्व असते. परंतु सर्व कामांचा परिणाम समान नसतो. म्हणूनच व्यवस्थापनाचा खरा प्रश्न असा आहे की मर्यादित वेळ, पैसा आणि ऊर्जा यांचा वापर कुठे करायचा?
आज भारतीय शेतीसमोर हवामान बदल, जागतिक स्पर्धा, वाढते उत्पादन खर्च आणि बदलणारी ग्राहक मागणी यासारखी मोठी आव्हाने आहेत. या परिस्थितीत अधिक श्रम करणे हा एकमेव पर्याय राहिलेला नाही. अधिक अचूक निर्णय घेणे, योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आणि सर्वाधिक परिणाम देणाऱ्या घटकांवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. कदाचित भारतीय शेतीची पुढील क्रांती एखाद्या नवीन खतात, नवीन यंत्रात किंवा नवीन सरकारी योजनेत दडलेली नसेल. ती शेतकऱ्याच्या विचारपद्धतीत दडलेली असेल. जेव्हा तो स्वतःला विचारेल ‘माझ्या शेतीतील ती कोणती मोजकी कामे आहेत जी माझ्या बहुतांश यशाचे कारण ठरतात?’ तेव्हा परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होईल. कारण शेतीतील खरी स्पर्धा श्रमांची नाही; ती प्राधान्यक्रमांची आहे.
पॅरेटो नियम आपल्याला एक साधा पण अत्यंत प्रभावी संदेश देतो. प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करू नका. सर्वाधिक परिणाम देणाऱ्या गोष्टी ओळखा. त्यामध्ये उत्कृष्टता मिळवा. भारतीय शेतीचे भविष्य केवळ अधिक उत्पादनात नाही; तर अधिक परिणामकारक निर्णयांमध्ये आहे. आणि कदाचित उद्याच्या कृषी भारतात सर्वात मोठे भांडवल जमीन, पाणी किंवा पैसा नसेल; तर महत्त्वाचे आणि गौण यातील फरक ओळखण्याची क्षमता असेल. पॅरेटो नियमाचे खरे सामर्थ्य याच ठिकाणी आहे. तो आपल्याला कमी काम करण्याचा सल्ला देत नाही; तो योग्य कामाला योग्य प्राधान्य देण्याची बुद्धी देतो. आणि शेतीतही, जीवनातही, अनेकदा यशाची सुरुवात याच जाणिवेपासून होत असते.