Sugarcane Price : जो कारखाना जास्त दर देईल, त्याला ऊस द्यावा
1 min read
Sugarcane Price : अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखानदार व शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीतील निर्णय योग्य नसून, जो कारखाना जास्त दर (Price) देईल, त्याला शेतकऱ्यांनी ऊस (Sugarcane) द्यावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना पहिला हप्ता किती मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. सुरुवातीला बैठकीला फक्त राजू शेट्टी व त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांनाच प्रवेश देण्यात आला होता. प्रवेश नाकारल्यावर अनिल घनवट यांनी जिल्हाधिकारी दालनासमोर घोषणाबाजी केली व एकाच संघटनेच्या नेत्यांना बैठकीत प्रवेश दिल्याबद्दल आक्षेप घेतला. तेव्हा त्यांना व भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या नेत्याला बैठकीत प्रवेश देण्यात आला.
पहिल्या फेरीत साखर कारखानदारांच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी 3,100 रुपये पहिला हप्ता देण्याची तयारी दर्शवली. हे मान्य नसल्यामुळे पुन्हा साखर कारखानदारांनी आपसात चर्चा करून पुन्हा बैठकीस बोलावले. या बैठकीला शेतकरी संघटनांच्या वतीने फक्त राजू शेट्टी, अनिल घनवट व रवी मोरे होते. यावेळी पालकमंत्र्यांनी 3,250 रुपये पहिला हप्ता, 100 रुपये कारखाना बंद होताना व 100 रुपये पुढच्या म्हणजे डिसेंबर 2027 मध्ये देण्याचे जाहीर केले. अनिल घनवट यांनी या प्रस्तावाला विरोध केला व पहिला हप्ता किमान 3,500 रुपये प्रतिटन असावा, असा आग्रह धरला. मात्र, राजू शेट्टी यांच्याकडून त्यास साथ मिळाली नाही. तसेच कारखान्याचे साखर वर्ष हे सप्टेंबरमध्ये संपते तेव्हा शेवटचा हप्ता द्यावा, अशी मागणी केली. तेव्हा दिवाळीपूर्वी देण्याचे कबूल करण्यात आले.
जाहीर झालेला 3,250 रुपये हा किमान पहिला हप्ता सर्व कारखान्यांनी द्यायचा आहे व ज्या साखर कारखान्यांची ऐपत आहे, त्यांनी जास्त दर दिला तरी चालेल, असे जाहीर करण्यास सांगितले. साखरेला चांगले दर असल्यामुळे शिखर सहकारी बँकेने साखरेचे मूल्यांकन 4,500 रुपये प्रति क्विंटल केले आहे व प्रत्यक्ष साखर 5,200 रुपये प्रति क्विंटल दराने विकत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना 3,500 ते 3,700 रुपये पहिला हप्ता देण्यास अडचण नव्हती. अहिल्यानगर जिल्ह्यातील व शेजारच्या पुणे जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी 3,700 रुपये दर जाहीर केला आहे. ऊस उत्पादकांनी, जो साखर कारखाना जास्त दर देईल त्याला ऊस द्यावा, असे आवाहन अनिल घनवट यांनी केले आहे.
साखरेला यावर्षी उच्चांकी दर मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा ऊस उत्पादकांना मिळाला पाहिजे. 3,450 रुपये हा अंतिम दर देऊन साखर कारखानदार शेतकऱ्यांना फसवण्याचा शक्यता आहे. रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे 70-30 अशी नफ्याची वाटणी व्हायला हवी. पहिला हप्ता कमी मिळाला तरी चालेल पण शेवटचा हप्ता साखर व उपदार्थांच्या विक्री दरानुसार मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाची तयारी ठेवावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते तथा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.