Groundwater Scientific Decision Processes : भूजल वैज्ञानिक निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी का असायला हवे?
1 min read
Groundwater Scientific Decision Processes : महाराष्ट्रातील भूजल (Groundwater) व्यवस्थापनाचा (Management) मागील 20 वर्षांचा जो प्रवास मी पाहिलाय, हा केवळ शासनाच्या योजनांचा प्रवास नाही. गेल्या काही दशकांत महाराष्ट्राच्या भूजल क्षेत्रात सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, जलकार्यकर्ते, स्वयंसेवक, तज्ज्ञ, सल्लागार, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांनी अनेक प्रयोग केले आहेत. जलसाक्षरता केंद्रे, ‘चला नदीला जाणूया’, वॉटर कप, जल स्वयंसेवक, जलतारा, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून नदी खोलीकरण, जलयुक्त शिवार, पाझर तलावांच्या गळती दुरुस्ती आणि अशा अनेक उपक्रमांनी महाराष्ट्रातील जलप्रश्नाला लोकचळवळीचे स्वरूप दिले आणि या प्रयत्नांचे महत्त्व नाकारताही येणार नाही. उलट, पाण्याचा प्रश्न हा केवळ सरकारचा विषय नसून समाजाच्या अस्तित्वाशी जोडलेला प्रश्न आहे, ही जाणीव निर्माण करण्यात या उपक्रमांचा मोठा वाटा आहे. समाजातील ऊर्जा, स्वयंसेवी संस्थांची कल्पकता आणि स्थानिक लोकांचा सहभाग हे जलव्यवस्थापनाचे (Water Management) अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.
♻️ परिणामकारकता तपासण्याची जबाबदारी कुणाची?
या सकारात्मक प्रवासाबरोबर एक मूलभूत प्रश्न आज अधिक गांभीर्याने विचारण्याची गरज आहे. एखादी जलव्यवस्थापनाची कल्पना लोकप्रिय झाली, समाजाने ती स्वीकारली आणि शासनाने तिला आर्थिक किंवा प्रशासकीय पाठबळ दिले, तर त्या कल्पनेचे वैज्ञानिक औचित्य, तांत्रिक व्यवहार्यता आणि दीर्घकालीन परिणामकारकता तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणाची असते? एखादा लहानसा उपक्रम यशस्वी झाला तर त्याचे श्रेय शासन, सामाजिक संस्था, जलकार्यकर्ते, स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि तज्ज्ञ अशा सर्वांना दिले जाते, पुरस्कार, प्रसिद्धीची व्यासपीठे लाभतात. परंतु जर अपेक्षित परिणाम मिळाला नाही, भूजलपातळी वाढली नाही, एखादी जलसंधारणाची रचना निष्प्रभ ठरली किंवा एखादे अभियान दीर्घकाळ टिकले नाही, तर निष्कर्ष अनेकदा एका वाक्यात निघतो ‘सरकार अपयशी ठरले.’ होय, शासनाची जबाबदारी नक्कीच आहे. सार्वजनिक पैसा, धोरणात्मक निर्णय आणि अंमलबजावणीची जबाबदारी शासनाचीच आहे. परंतु शासनापर्यंत कल्पना पोहोचवणारे, त्यांना समर्थन देणारे, समित्यांमध्ये सहभागी असणारे, तांत्रिक सल्ले देणारे आणि स्वतःला जलक्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून मांडणारे इतर घटकही या उत्तरदायित्वाच्या चौकटीबाहेर राहू शकत नाहीत. म्हणूनच जलव्यवस्थापनाकडे ‘कोणाचे काम?’ या प्रश्नापेक्षा ‘कोणाची कोणत्या टप्प्यावर काय जबाबदारी?’ या प्रश्नातून पाहण्याची गरज आहे. सार्वजनिक जलधोरण ही केवळ एखाद्या एका व्यक्तीची किंवा एका संस्थेची निर्मिती नसते. त्यामागे एक संपूर्ण निर्णयसाखळी असते, जसे की, कल्पना, सल्ला, वैज्ञानिक परीक्षण, तांत्रिक आराखडा, समितीची चर्चा, प्रशासकीय निर्णय (Decision), निधी, अंमलबजावणी, देखरेख आणि परिणाममापन. या साखळीतील कोणत्याही टप्प्यावर त्रुटी झाली तर अंतिम परिणामावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अपयशाचे विश्लेषण करताना केवळ शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या शासनाकडे बोट दाखवणे पुरेसे नाही. संपूर्ण साखळी तपासावी लागेल.
♻️ भूजल वैज्ञानिकाची भूमिका महत्त्वाची का?
याच ठिकाणी भूजल वैज्ञानिकाची (Groundwater Scientific) भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. पाण्याचा प्रश्न हा केवळ पृष्ठभागावर दिसणाऱ्या पाण्याचा प्रश्न नाही. जमिनीखालील पाणी कुठे आहे, ते कोणत्या खडकात साठते, त्याचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे, जलभृताची क्षमता किती आहे, पुनर्भरण कुठे आणि किती प्रमाणात होऊ शकते, पाण्याचा उपसा किती आहे, भूजलाची गुणवत्ता काय आहे आणि एखाद्या जलसंधारणाच्या हस्तक्षेपामुळे त्या संपूर्ण जलप्रणालीवर काय परिणाम होईल इत्यादी प्रश्नांची उत्तरे भूजल वैज्ञानिकीय अभ्यासातूनच मिळतात. भूजल वैज्ञानिक दृष्टी म्हणजे केवळ ‘इथे पाणी अडवता येईल का?’ एवढाच प्रश्न नसतो. त्याची दृष्टी यापेक्षा व्यापक असते, जसे ‘इथे पाणी अडवले तर ते कुठे जाईल? किती काळ टिकेल? कोणत्या जलभृताला त्याचा फायदा होईल? त्याचा परिणाम खालील भागावर काय होईल? पुनर्भरणाच्या तुलनेत उपसा किती आहे? पाण्याची गुणवत्ता सुरक्षित राहील का? आणि आज केलेला हस्तक्षेप 10 वर्षांनीही उपयोगी राहील का? ‘ही दृष्टी जलव्यवस्थापनाला संरचना-केंद्रित विचारातून जलप्रणाली-केंद्रित विचाराकडे घेऊन जाते.
♻️ या बाबींचा विचार करणे अपरिहार्य
याच कारणामुळे ‘कल्पना चांगली आहे’ आणि ‘उपाय वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे’ या दोन गोष्टी एकसमान मानता येत नाहीत. एखाद्या गावात एखाद्या पद्धतीने चांगला परिणाम मिळाला म्हणून त्याच पद्धतीची पुनरावृत्ती प्रत्येक गावात होईलच असे नाही. एका ठिकाणी नदी खोलीकरणाचा काही सकारात्मक परिणाम होऊ शकतो; दुसऱ्या ठिकाणी त्याचा अपेक्षित परिणाम होणार नाही. एखाद्या भागात पाझर तलाव प्रभावी ठरू शकतो; दुसऱ्या भागात भूगर्भरचना त्याला अनुकूल नसू शकते. कृत्रिम पुनर्भरणाच्या बाबतीत तर जलभृताची क्षमता, पुनर्भरण क्षेत्र, पाण्याची गुणवत्ता, गाळाचे प्रमाण, फिल्टरेशन, भूजल प्रवाह आणि उपशाचे स्वरूप यांचा विचार करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे जलव्यवस्थापनात लोकप्रियता ही वैज्ञानिकतेची कसोटी असू शकत नाही. दुर्दैवाने, सार्वजनिक चर्चेत जलक्षेत्रातील ‘वॉटरमॅन अर्थात जलमिसिहा’, जलनायक, जलकार्यकर्त्यांची प्रतिमा अनेकदा त्यांच्या सामाजिक कार्याच्या दृश्यमानतेवर आधारित तयार होते. मोठी मोहीम, हजारो लोकांचा सहभाग, मोठ्या प्रमाणावर श्रमदान, नदीत काम, बंधारे, जलजागृती आणि प्रभावी जनसंपर्क यामुळे एखादी व्यक्ती किंवा संस्था जलक्षेत्रातील मोठा आवाज बनू शकते. हे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. पण सामाजिक प्रभाव आणि वैज्ञानिक वैधता या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.
♻️ प्रत्येक उपक्रमाचे तांत्रिक मूल्यमापन आवश्यक
समाजाला प्रेरणा देणे ही एक जबाबदारी आहे; परंतु शासनाला धोरणात्मक किंवा तांत्रिक दिशा देणे ही त्यापेक्षा वेगळी आणि अधिक उत्तरदायी भूमिका आहे. म्हणूनच ‘जलमिसिहा’ या संकल्पनेकडेही आता अधिक जबाबदारीने पाहण्याची गरज आहे. एखाद्या व्यक्तीने समाजाला प्रेरित केले म्हणून त्याच्या प्रत्येक जलकल्पनेला वैज्ञानिक मान्यता मिळत नाही. एखाद्या सामाजिक संस्थेने एखाद्या गावात यशस्वी प्रयोग केला म्हणून तो प्रयोग संपूर्ण राज्यासाठी धोरण बनू शकत नाही. एखादा उपक्रम लोकप्रिय झाला म्हणून त्याचे तांत्रिक मूल्यमापन टाळता येत नाही.
उलट, जितका एखाद्या व्यक्तीचा किंवा संस्थेचा शासनाच्या धोरणांवर प्रभाव वाढतो, तितकी त्यांची वैज्ञानिक आणि सार्वजनिक उत्तरदायित्वाची पातळीही वाढली पाहिजे. येथे प्रश्न व्यक्तीविरोधाचा नाही, प्रश्न आहे उत्तरदायित्वाच्या समान निकषांचा. शासनाच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न विचारले जातात, निधीचा हिशेब मागितला जातो, कामाचे मूल्यमापन केले जाते. मग शासनाला कल्पना देणाऱ्या किंवा धोरणावर प्रभाव टाकणाऱ्या बाह्य तज्ज्ञ, सल्लागार, संस्था किंवा जलकार्यकर्त्यांच्या सूचनांचेही तितक्याच गांभीर्याने परीक्षण का होऊ नये? एखाद्या कल्पनेचा परिणाम अपेक्षित मिळाला नाही तर त्या कल्पनेमागील गृहीतके काय होती, त्याला कोणता वैज्ञानिक पुरावा होता, कोणत्या परिस्थितीत ती यशस्वी होईल असे मानले गेले आणि प्रत्यक्ष परिणाम काय मिळाला, या प्रश्नांची उत्तरेही सार्वजनिक असली पाहिजेत.
♻️ भूजल वैज्ञानिकाची दुय्यम भूमिका, गंभीर चिंतेची बाब
याउलट, या सर्व प्रक्रियेत सरकारी भूजल वैज्ञानिकाची भूमिका अनेकदा दुय्यमच ठरते आणि हीच अधिक गंभीर चिंतेची बाब आहे. शासनाच्या वैज्ञानिक यंत्रणेत काम करणारे भूजलतज्ज्ञ अनेक वर्षांचा क्षेत्रीय अनुभव, भूजलाची दीर्घकालीन आकडेवारी आणि स्थानिक भूगर्भरचनेचे ज्ञान घेऊन निर्णयकर्त्यांसमोर असतात. ते एखाद्या कामाबाबत ‘हे योग्य आहे’ असे सांगतात, तेव्हा त्यामागे वैज्ञानिक निरीक्षण असते; आणि ‘हे येथे योग्य नाही’ असे सांगतात, तेव्हाही त्यामागे तितकाच अभ्यास असतो. परंतु सार्वजनिक चर्चेत त्याच्या आवाजाला एखाद्या लोकप्रिय जलकार्यकर्त्याइतकी दृश्यमानता मिळत असेलच असे नाही. विशेषतः भूजल वैज्ञानिकाने दिलेला ‘नाही’ हा सल्ला समजून घेणे आवश्यक आहे. जलक्षेत्रात प्रत्येक ठिकाणी काहीतरी बांधणे किंवा काहीतरी करणे आवश्यक नसते. कधी कधी योग्य वैज्ञानिक निर्णय म्हणजे ‘हे काम करू नका’, “इथे ही पद्धत वापरू नका’, ‘या जलभृतात पुनर्भरणाची क्षमता मर्यादित आहे’, किंवा ‘या कामापेक्षा दुसरा हस्तक्षेप अधिक उपयुक्त ठरेल’ असे सांगणे असू शकते.
♻️ आउटपुट नव्हे आउटकम मोजणे गरजेचे
ही नकारात्मक भूमिका नसून वैज्ञानिक सावधगिरी असते. पण जर अशा सल्ल्याकडे सर्रास दुर्लक्ष करून निर्णय घेतले गेले आणि नंतर ते निर्णय अपयशी ठरले, तर त्या अपयशाचे श्रेय अथवा दोष वैज्ञानिकाच्या माथी मारणे ही एक गंभीर संस्थात्मक विसंगती ठरते. म्हणूनच शासनाने आपल्या वैज्ञानिकांना केवळ ‘तांत्रिक सल्लागार’ म्हणून न पाहता ‘निर्णय प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण संस्थात्मक भागीदार’ मानण्याची गरज आहे. वैज्ञानिकांचे मत नंतरच्या टप्प्यावर औपचारिकता म्हणून घेण्याऐवजी प्रकल्पाच्या संकल्पनेपासूनच त्यांचा सहभाग असावा. एखाद्या जलप्रकल्पाची व्यवहार्यता ठरवताना भूजल वैज्ञानिकीय परिस्थिती, जलभृताची क्षमता, उपलब्ध पाणी, पुनर्भरणाची शक्यता, पाण्याची गुणवत्ता आणि भविष्यकालीन जलवापर यांचा विचार अनिवार्य केला पाहिजे. त्याचबरोबर जलव्यवस्थापनाचे मूल्यमापनही बदलण्याची गरज आहे. आज अनेकदा आपण विचारतो, किती बंधारे बांधले? किती नाले खोदले? किती तलाव दुरुस्त केले? किती निधी खर्च झाला? किती गावांनी सहभाग घेतला? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत; पण ते आउटपुट मोजतात. जलव्यवस्थापनाला मात्र आउटकम मोजण्याची गरज आहे.
♻️ समाजाला पाण्याशी जोडा
भूजलपातळीत काय बदल झाला? प्रत्यक्ष पुनर्भरण किती झाले? पाण्याची गुणवत्ता बदलली का? विहिरींची टिकाऊ उपलब्धता वाढली का? पाण्याच्या वापरात शाश्वतता आली का? उपसा आणि पुनर्भरण यांचे संतुलन सुधारले का? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हा परिणाम काही महिन्यांचा आहे की अनेक वर्षे टिकणारा आहे? यासाठी दीर्घकालीन वैज्ञानिक निरीक्षण आणि स्वतंत्र परिणाममापन आवश्यक आहे. एखाद्या प्रकल्पाचा उद्घाटनाचा दिवस हा त्याच्या यशाचा दिवस नसतो. खरे मूल्यमापन काही वर्षांनी होते. कारण जलव्यवस्थापनाचा परिणाम पावसाच्या एका हंगामात किंवा एखाद्या फोटोमध्ये दिसत नाही. तो जलचक्रात, भूजलपातळीत, पाण्याच्या उपलब्धतेत आणि स्थानिक जलसंतुलनात दिसतो. याचा अर्थ सामाजिक संस्था, जलकार्यकर्ते किंवा ‘वॉटरमॅन’ चुकीचे आहेत असे अजिबात नाही. उलट, समाजाला पाण्याशी जोडण्याचे त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु सामाजिक नेतृत्व आणि वैज्ञानिक नेतृत्व यांची भूमिका परस्परपूरक असली पाहिजे, पर्यायी नाही. सामाजिक संस्था समाजाची ऊर्जा आणू शकते; जलकार्यकर्ता लोकांना प्रेरणा देऊ शकतो; स्थानिक ग्रामस्थ स्थानिक ज्ञान देऊ शकतात; प्रशासन संसाधने आणि अंमलबजावणी करू शकते; पण भूजल वैज्ञानिक संपूर्ण जलप्रणालीचा वैज्ञानिक अर्थ लावू शकतो. या सर्वांची सांगड घातली तरच जलव्यवस्थापन शाश्वत होईल. म्हणून भविष्यातील जलव्यवस्थापनाचे सूत्र कदाचित असे असावे, जसे समाजाची कल्पना, जलकार्यकर्त्यांची ऊर्जा, सामाजिक संस्थांचे सामाजिक भांडवल, स्थानिकांचे पारंपरिक ज्ञान, भूजलवैज्ञानिकाची वैज्ञानिक दृष्टी, प्रशासनाची अंमलबजावणी आणि स्वतंत्र परिणाममापन.
♻️ या प्रश्नांची उत्तरे शोधा
या सर्व घटकांपैकी कोणालाही एकट्याला संपूर्ण सत्याचा अधिकार देता येणार नाही. शेवटी प्रश्न ‘दोष कोणाचा?’ एवढाच नसावा. प्रश्न असा असावा की ‘निर्णय कसा झाला?’ एखादा जलप्रकल्प अयशस्वी झाला तर कल्पना कुठून आली, तिच्यामागे कोणता पुरावा होता, वैज्ञानिक परीक्षण झाले का, भूजल वैज्ञानिकाचे मत काय होते, समितीत काय चर्चा झाली, कोणता आराखडा मंजूर झाला, अंमलबजावणी कशी झाली, देखभाल झाली का आणि परिणामांचे स्वतंत्र मूल्यमापन झाले का, अशा या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. कारण सरकारला दोष देणे सोपे आहे; पण निर्णय-साखळीचे प्रामाणिक विश्लेषण करणे कठीण आहे. शासकीय अधिकारी सहज टार्गेट करता येतो; पण लोकप्रिय व्यक्तीवर प्रश्न उपस्थित करणे कठीण आहे. जर एखादी व्यक्ती किंवा संस्था शासनाला दिशा देत असेल, तर तिच्या कल्पनांनाही वैज्ञानिक कसोटी आणि परिणामांची जबाबदारी स्वीकारावी लागेल. त्याचप्रमाणे सरकारी वैज्ञानिकांनीही आपली जबाबदारी केवळ अहवाल देण्यापुरती मर्यादित न ठेवता आपल्या वैज्ञानिक मताचा ठामपणे आणि स्पष्टपणे आग्रह धरला पाहिजे. पाण्याच्या प्रश्नाला आता ‘कोणाचा प्रकल्प?’ या चौकटीतून बाहेर काढून ‘कोणत्या जलप्रणालीसाठी कोणता वैज्ञानिक उपाय?’ या चौकटीत आणण्याची वेळ आली आहे. कारण जलव्यवस्थापनात लोकप्रियता क्षणिक असू शकते, परंतु भूजलाचे विज्ञान दीर्घकालीन असते. एखाद्या जलकार्यकर्त्याची मोहीम काही महिन्यांत प्रसिद्ध होऊ शकते; पण एका भूजलवैज्ञानिकाने जमिनीखालील जलभृत समजून घेण्यासाठी केलेला अभ्यास अनेक वर्षांचा असू शकतो. एकाला टाळ्यांचा आवाज मिळतो; दुसऱ्याचे काम अनेकदा शांतपणे फाइलमध्ये, नकाशात, निरीक्षण विहिरीच्या आकडेवारीत आणि क्षेत्रीय नोंदीत राहते. परंतु शेवटी पाणी टाळ्यांवर नाही, तर जलभृताच्या वास्तवावर टिकते.
♻️ खरे जल नेतृत्व काेणते?
म्हणूनच आज गरज आहे ती कोणालाही कमी लेखण्याची नाही; तर प्रत्येकाच्या भूमिकेची आणि प्रत्येकाच्या जबाबदारीची योग्य व्याख्या करण्याची. जलकार्यकर्त्यांनी समाजाला प्रेरणा द्यावी, पण आपल्या कल्पनांना वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेण्याची तयारी ठेवावी. सामाजिक संस्थांनी प्रयोग करावेत, पण त्यांचे परिणाम पारदर्शकपणे मांडावेत. सल्लागारांनी सूचना द्याव्यात, पण त्यामागील पुरावे स्पष्ट करावेत. समित्यांनी निर्णय घ्यावेत, पण त्या निर्णयांची कारणमीमांसा नोंदवावी. शासनाने निधी आणि अंमलबजावणी करावी, पण वैज्ञानिक सल्ल्याला संस्थात्मक महत्त्व द्यावे आणि भूजल वैज्ञानिकांनी केवळ डेटा देणारे अधिकारी न राहता जलधोरणाच्या केंद्रस्थानी असलेले वैज्ञानिक निर्णय सहकारी बनले पाहिजेत. कारण शेवटी प्रश्न एखाद्या सरकारचा, सामाजिक संस्थेचा किंवा एखाद्या ‘वॉटरमॅन’चा नाही. प्रश्न आहे, आपण पुढच्या पिढीला शाश्वत पाणी देऊ शकतो का? आणि त्याचे उत्तर मोठ्या घोषणांमध्ये नाही. ते उत्तर आहे, योग्य विज्ञानात, योग्य ठिकाणी केलेल्या योग्य हस्तक्षेपात, दीर्घकालीन निरीक्षणात, पारदर्शक परिणाममापनात, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कल्पना देणाऱ्यापासून निर्णय घेणाऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या उत्तरदायित्वात. पाणी अडवणे ही कृती आहे; पाणी कुठे, का आणि किती अडवायचे हे ठरवणे म्हणजे विज्ञान आणि त्या निर्णयाच्या परिणामाची जबाबदारी स्वीकारणे म्हणजे खरे जल नेतृत्व!