Drought Soil Moisture : जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याचा कसा?
1 min read
Drought Soil Moisture : दुष्काळी (Drought) परिस्थितीत जमिनीतील ओलावा (Soil Moisture) टिकून ठेवणे एक आव्हान आहे. कमी पाऊस व वाढत्या तापमान अशा परिस्थितीत बाष्पीभवन (Evaporation) रोखणे आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून रब्बी पिके घेण्यात यावे. त्यासाठी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी काही प्रमुख दुष्काळी उपाय ध्यानात ठेवावे, असे आवाहन वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ तथा निवृत्त सहयाेगी संशाेधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी केले आहे.
🔶 जमिनीवर आच्छादनाचा (Mulching) वापर सर्वात प्रभावी उपाय आहे. सेंद्रिय आच्छादन (Organic Mulch) म्हणजे पिकाच्या ओळींमध्ये सुकलेले गवत, पालापाचोळा, गव्हाचे काड, उसाचे पाचट किंवा भुसा पसरवून द्यावा. यामुळे सूर्याची किरणे थेट मातीवर पडत नाहीत आणि बाष्पीभवन 70% पर्यंत कमी होते.
🔶 प्लास्टिक आच्छादन (Plastic Mulching) याचाही भाजीपाला किंवा फळबागांसाठी वापर करता येईल, ज्यामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो व गवत उगवत नाही आणि ओलावा साठीची स्पर्धा राहणार नाही.
🔶 योग्य शेती मशागतीचे तंत्र (Agronomic Practices) वापरून जसे की, थोप मशागत किंवा शून्य मशागत (Zero/Minimum Tillage) याद्वारे सुद्धा ओलावा टिकवण्यात मदतच होईल. दुष्काळात जमिनीची जास्त खोल नांगरणी करू नये. जमीन जास्त उकरल्यास आतील ओलावा हवेच्या संपर्कात येऊन उडून जातो. तसेच जमिनीतील ओलाव्याचा योग्य लाभ घेण्यासाठी पेरणी योग्य वेळी करावी.
🔶 योग्य आंतरमशागत (Inter-cultivation) म्हणजे पिकाच्या दोन ओळींमधील माती डवरनी अथवा कोळपणीद्वारे हलकीशी कोरून ठेवावी. यामुळे वरचा थर कोरडा होतो आणि मातीतील बारीक छिद्रे (Capillary tubes) बंद होतात, ज्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील पाणी वर येऊन उडून जात नाही.
🔶 तण नियंत्रण (Weed Control) याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. शेतातील तण (गवत) मुख्य पिकाच्या हिश्श्याचे अन्नद्रव्य, पाणी आणि ओलावा शोषून घेतात. त्यामुळे दुष्काळात तण वेळीच काढून नष्ट करावे.
🔶 पाणी देण्याच्या आधुनिक पद्धती (Smart Irrigation) यांचा उपयोग करण्यात यावा. जसे, ठिबक सिंचन (Drip Irrigation), पिकांना मोकळे पाणी देण्याऐवजी फक्त मुळापाशी ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. यामुळे पाण्याची 50 ते 60 टक्के बचत होते आणि ओलावा टिकून राहतो.
तुषार सिंचन (Sprinkler) रात्रीच्या वेळी वापरल्यास अधिक योग्य राहील. जर तुषार सिंचन वापरायचे असेल, तर ते कडक उन्हात न वापरता संध्याकाळी किंवा रात्री वापरावे, जेणेकरून उन्हामुळे पाणी हवेतच उडून जाणार नाही.
🔶 सेंद्रिय पदार्थांचा वापर (Soil Amenders) केल्यास पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल. मातीत शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर वाढवावा. हायड्रो जेल (Hydrogel) किंवा पूसा हायड्रो जेल याचा पण वापर करायला पाहिजे. हे एक असे रसायन आहे जे स्वतःच्या वजनापेक्षा शेकडो पट जास्त पाणी शोषून घेते. पेरणीच्या वेळी हे मातीत मिसळल्यास, पाऊस किंवा पाण्याच्या पाळीनंतर हे पाणी साठवून ठेवते आणि कोरड्या काळात पिकाला पुरवते.
🔶 योग्य पिकांचे नियोजन तेवढेच महत्त्वाचे आहे.कमी पाण्याच्या जाती (Drought-resistant crops) निवडण्यात यावे. दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची (उदा. बाजरी, मटकी, हुलगा किंवा सुधारित कोरडवाहू वाण) कमी कालावधीचे भाजीपाला इत्यादी निवड करावी.
🔶 हवा प्रतिबंधक पट्टे (Windbreaks) यांचाही विचार करता येईल. शेताच्या बांधावर शेवरी, सुबाभूळ किंवा कडुनिंबासारखी दाट झाडे लावावीत. यामुळे उष्ण वाऱ्याचा वेग कमी होतो आणि बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. पीक लागवड खर्च व आर्थिक ताळमेळ सुद्धा ठेवण्याचे आवाहन डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी केले आहे.